Login

दुःखाच्या अंधारापलीकडे सुखाचा प्रकाश...२

कथा मलिका
दुःखाच्या अंधारापलीकडे सुखाचा प्रकाश....२

सामाजिक कथा

इन्स्पेक्टर विक्रमाच्या मनात विचारांचे काहूर माजले होते. त्याच दिवशी हवालदार पाटिलने गणपतची माहीती काढली.

पाहुया पुढे....

इन्स्पेक्टर विक्रम धर्माधिकारी एक सच्चा प्रामाणिक माणूस. श्रीमंत असो किंवा गरीब व्यक्ती त्याच्यासाठी एकच न्याय होता. गाव तसं अडीच तीन हजार लोकवस्तीच. पण शांतता आणि सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला होता.

दुसऱ्या दिवशी...
पाटील काय माहिती काढली.

"सर , तो गणपत फार विचित्र माणूस आहे. या गावात राज्य मात्र गणपतचेच चालते . गणपत म्हणजे गावचा मस्तावलेला गुंडच. अख्खं गाव त्याला टरकून राहते. दिवसेंदिवस त्याची दहशत वाढतच चालली आहे.‌ जसा तो बाहेर वागत असतो. त्यापेक्षाही भयंकर तो घरीसुद्धा वागतो. बाकी जास्त काही कळले नाही. कारण, लोक त्याच्या विषयी फार चर्चा करत नाही आणि भिती पोटी काही सांगायला तयार पण नाही."

तेवढ्यात सुरेखा परत आली होती. तिला इन्स्पेक्टर विक्रमला काही तरी सांगायचे होते.
ती हातवारे करत होती. तिचा नवरा दोन दिवसांसाठी बाहेरगावी गेला होता. या संधीचा फायदा घेत ती परत पोलीस स्टेशनमध्ये आली होती.

विक्रमने तिला आत बोलावले.

"बसा, ताई इथे खुर्चीवर बसा."

तिने हातानेच नको म्हटले. ती खाली एका कोपऱ्यात जाऊन बसली आणि कागद पेन मागू लागली‌. इन्स्पेक्टर विक्रमने त्या दिवशीचा कागद समोर केला. इकडे तिकडे बघत तिने लिहायला सुरुवात केली.

"मी सुरेखा, गणपतरावांची दुसरी बायको. मला शिक्षणाची प्रचंड आवड. त्यामुळे बारावीपर्यंत शिक्षण घेतले. कुटुंबासाठी, समाजासाठी काही तरी करायचे होते. पण अस्पृश्यता समाजाला लागलेला एक कलंक."

इन्स्पेक्टर विक्रमला उत्सुकता निर्माण झाली होती.

" मला असे वाटते की शिक्षणाने माणूस सुधारतो, त्याचे विचार बदलतात. पण पुढे शिक्षण घेण्याचे माझे स्वप्न अपूर्ण राहिले आणि माझ्या वाट्याला दुःखाचे पहाड उभे राहिले. समाज जागृती करून मी समाजातील काही प्रथांना दूर करू इच्छित होते. पण माझ्या बापाने या दारूड्या गणपत सोबत लग्न लावून दिले. तेही केवळ पंधरा हजार रुपयांसाठी. हतबलता, गरीबी, मजबुरी काय असते ना? ते मलाच माहिती. गणपत नुसता दारूडाच नाही तर दोन मुलांचा बाप असलेला एक वयस्कर माणूसच होता. हे कळताच माझ्या पायाखालची जमीनच सरकली. पण माझं नशीबच फुटके. तेथूनच माझी फरफट सुरू झाली. तरीही मी हार मानली नाही. आई विना असलेल्या दोन्ही मुलांचा मी मनापासून स्वीकार केला. आईची ऊब त्यांना मिळावी म्हणून मी सतत प्रयत्न करत होती. त्यांना सुध्दा माझ्या छायेत खूप सुरक्षित वाटते." डोळ्यातल्या आसवांना तिने लपवून ठेवले.

"पण गणपतची दहशत संपूर्ण गावावर पसरली आहे. स्वतः कष्ट न करता, स्वतः चा काहीही व्यवसाय न करता तो गावातील लोकांकडून वसुली गोळा करतो. मला कंटाळा आला आहे या सर्वाचा. त्याच्या या वागणुकीचा निषेध केला तर तो मारझोड करतो. जराही माणुसकीचा गंध नसलेल्या माझा नवरा. हल्ली तर गणपत आता हाताघाईला आला आहे. आधीच जातीपातीचा पडदा आमच्या समोर उभा आहेत आणि त्यात हा गणपत आता माझ्या मुलीच्या मागे लागला आहे. फक्त आठवीत शिकत असलेल्या, कोवळी कळी असलेल्या, वयाने अल्लड असलेल्या माझ्या मुलीचे लग्न करून द्यायला निघाला आहे. साहेब तुम्ही त्याला अटक करा. माझी हात जोडून विनंती आहे की त्याला गजाआड टाका. तरच मी आणि हे गाव सुध्दा मोकळा श्वास घेऊ शकेल. मी जर शिकले असते तर आतापर्यंत त्याची दूर निघून गेली असती. पण..."

तिने लिहीलेला कागद विक्रम समोर केला. हात जोडून ती उभी राहिली.

तिने केलेले वक्तव्य चुकीचे नव्हते.

त्याने कागदावर लिहीले. असे त्याने काय केले की तुम्ही बोलू‌ शकत नाही."

"मी बोलू शकते साहेब.

"काय ! तुम्ही बोलू शकता. मग एवढं हातवारे करून का सांगता?

"साहेब, त्याने मला धमकीच तशी दिली आहे की, मी जराही तोंड उघडले तर तो माझ्या सोबतच, माझ्या मुलांना आणि माझ्या माहेरच्या लोकांनाही संपवेल. त्यामुळे सहा महिन्यांपासून तो माझ्या तोंडावर चिकटपट्टी लावून ठेवू लागला. तो घरी नसतांना सुध्दा मला तोंड बंदच ठेवावे लागायचे. फक्त खाण्यासाठी तेवढं तोंड उघडायचा. मग हळूहळू मला शांत बसण्याची सवयच लागली. कधीकधी शब्द सुद्धा आठवेना. माझ्या जीभेला भरपूर जखमा झाल्या होत्या."

इन्स्पेक्टर विक्रमाच्या काळजाचा थरकाप उडाला. सानप मॅडम आणि हवालदार पाटील सुध्दा यांना सुध्दा वाईट वाटले.

"साहेब, तुम्ही त्यांना अटक करा."

"पण कोणत्याही पुराव्याशिवाय गणपतला पकडणे शक्य नाही. तुम्ही आधी तक्रार का केली‌ नाही. "

तर तिने सांगितले की, आधीच्या इन्स्पेक्टरने त्याच्या धमक्यांना घाबरून तक्रार घेण्यास नकार दिला होता. त्यामुळे माझ्यावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवताच आला नाही आणि प्रयत्न केले तर तो खूप मारझोड करायचा . तिच्या डोळ्यातून वाहणारे अश्रू विक्रमला अस्वस्थ करून गेले.

"सर, आपण काहीच करू शकत नाही. गणपतला अटक करणे इतके सोपे नाही." पाटील

"अरे, मी या अगोदरही तुम्हाला सांगितले आहे. की आपण कोणत्या क्षेत्रात काम करत आहोत. आपण या समाजाचे, जनतेचे, देशाचे सेवक आहोत. तुमच्या तोंडी अशी भाषा शोभत नाही."

"पण सर आपण काहीच करू शकत नाही."

"हे बघा ताई, तुम्ही घाबरू‌ नका. यावर काही तरी उपाय निघेलच. पण मला एक प्रश्न पडला आहे की तो असा का वागतो? "

सर त्या मागे पण मोठ्ठी कहाणी आहे.

© अश्विनी मिश्रीकोटकर