Login

दुःखाच्या अंधारापलीकडे सुखाचा प्रकाश...४

कथामालिका
दुःखाच्या अंधारापलीकडे सुखाचा प्रकश...४

लग्नाचा दिवस उजाडला. तशी सुलेखाची घालमेल सुरू झाली. लग्नाच्या वेळेपर्यंत जर इन्स्पेक्टर विक्रम नाही पोहोचले तर... एक एक मिनिट पुढे सरकत होता. नवरदेवाकडची मंडळी आली. फक्त चार पाच लोकच होती.

पाहुया पुढे....

नवरदेव गाडीतून उतरला आणि त्याला बघताच सुरेखाला चक्कर यायची बाकी होती. चाळीशी पार केलेला एक पुरूष.... बापरे! गणपत काय करायला निघाला आहे. आपल्या मुलीचे या माणसाशी लग्न... छी! अक्षरशः दारूच्या नशेत झिंगून तो आला होता."

आता काय करायचे? दाराशी वरात येऊन उभी होती. ती इन्स्पेक्टर विक्रमची सारखी वाट बघत होती. पण ते अजुनही पोहोचलेले नव्हते.

"ए सुरेखा, रत्ना झाली का तयार बगा आणि जरा पाहुण्यांच्या चहा पाण्याचे बघ. "

नवरदेवासोबत त्याची एक बहीण,जावई आणि आई वडील होते. त्या प्रौढ पुरूषासोभत आपल्या लेकीच लग्न. हा विचारच सुरेखाला सहन होत नव्हता.

गणपतची लगबग सुरू झाली. पंडित आले होते. चहापाणी होताच दोन पाट टाकले. मध्ये अंतरपाट धरून नवऱ्या मुलीला घेऊन या. पंडित बोलले.

"आई, ते कोणाला बोलवत आहे? नवरी मुलगी कोण आहे आणि आपल्या दाराशी मांडव का घातला?"

रत्नाच्या प्रशनांनी डोळ्यातल्या आसवांना सुरेखाने कसे बसे थोपविले. तिने मु़ंडावळ्या हातात घेतल्या आणि रत्नांच्या कपाळावर त्या बांधल्या.

"आई, तू मला का मुंडावळ्या बांधत आहे? माझे थोडी लग्न आहे?"

"बाळा रत्ना, आज तुझेच लग्न आहे? "

"काय? आई मला‌ लग्न करायचे नाही ग. या वयात लग्न थोडी करतात. मला खूप शिकायचे आहे ग आणि कोण आहे माझा नवरा? कसा दिसतो? काय करतो? काहीही माहिती नसतांना मी का लग्न करू? असे म्हणत रत्ना जोरजोरात रडायला लागली.

"रत्ना रत्ना, अग रडू नको."

रत्नाच्या आवाजाने गणपत आता आला.

"ए, रत्ना तुले बोंबलायला का झालं? आता गपगुमान ऱ्हावा. न्हाईत थोबाड रंगविल आता तुह?"

गणपतच्या बोलण्याला दोघीही घाबरल्या. त्यामुळे भितीपोटी चुप बसल्या.

रत्नाला बाहेर बोलावले. घाबरत घाबरत सुरेखा तिला बाहेर घेऊन आली. अजुनही इन्स्पेक्टर विक्रम आणि त्यांची टीम पोहोचली नव्हती. रत्ना नको नको म्हणत असतांना सुध्दा तिला पाटावर उभे केले. मंगलाष्टके सुरू झाली. आता मात्र सुरेखा खूप घाबरली. आपली मुलगी... मी तिचा असा बळी जाऊ देणार नाही. पण आता घराबाहेर सुध्दा पडू शकत नव्हती. तिचे डोळे इन्स्पेक्टर विक्रम कडे लागले होते. मंगलाष्टके पुर्ण होत झाली. आता काय करायचे? पण इन्स्पेक्टर विक्रम असे करणार नाही. ते नक्की वेळेवर येतील.

मंगलाष्टके पुर्ण होताच अंतरपाट बाजुला केला गेला. रत्नाने तिच्या होणाऱ्या नवऱ्याला बघताच तिला भोवळ आली. पण तिला सावरले . ती हार घालण्याच्या मन:स्थितीत सुध्दा नव्हती. पण तिच्या आत्याने तिचे हात धरून नवरदेवाच्या गळ्यात हार घालणारच की इन्स्पेक्टर विक्रम आले.

इन्स्पेक्टर साहेबांना बघताच सगळेजण घाबरले. पण सुरेखाच्या चेहऱ्यावर समाधान झळकले. तिने मनोमन देवाचे आभार मानले.

"ओ साहेब, इथं कशापायी आलात? हे तुमच पुलीस स्टेशन नाय. तुमी तिकडं जावा. हे या गणपतच घर हाय."

"हे बघा, हे तुम्ही सांगायची गरज नाही. तुम्ही तुमच्या अल्पवयीन मुलीचे लग्न एका प्रौढ पुरूषासोबत करून देत आहात. याची आम्हाला कुणकुण लागली आणि म्हणूनच आम्ही हे लग्न थांबवायला आलो."

"तुमी कोण हे लगीन थांबवीणारे? माह्या पोरीच लगीन हाय आणि ते तुमी बी थांबवू शकत नाई."

"ए..... तू मला सांगू नकोस. आम्ही काय करायच आणि काय नाही ते."

"पाटील अटक करा रे याला."

"ओ तुमी पुलिस आहात माईत हाय. म्हणून मले काऊन पकडून राहिल्ये?"

"अरे, तू तुझ्या अल्पवयीन मुलीचे तेही तिच्या मनाविरुद्ध लग्न करून देत आहे. म्हणून तुला अटक करण्यात येत आहे आणि या नवरदेवाला सुध्दा."

"ओ, साहेब. काय करता हे? सोडा माझ्या मुलाला. अहो, पहिल्या बायकोला मुलं होत नव्हती म्हणून आम्ही हे लग्न लावायला तयार झालो. या गणपतने स्वतः च्या मुलीचे वय एकवीस असल्याचे आम्हाला सांगितले. शिवाय भरपूर पैसा सुध्दा घेतला. चुकलो आम्ही साहेब. पुन्हा अशी चूक करणार नाही."

"हे बघा , जर तुम्ही कोणीही जर माझ्या कामात अडथळा आणला तर तुम्हा सगळ्यांना सुध्दा मी अटक करू‌ शकतो. उगाचच कायदाच्या विरोधात तुम्ही जाऊ नका. तेव्हा सहकार्य करा."

इन्स्पेक्टर विक्रमच्या म्हणण्यानुसार कोणीही मध्ये पडले नाही. नवरदेवाकडची मंडळी मुकाट्याने निघून गेली. इन्स्पेक्टर विक्रम गणपतला पकडून पोलिस स्टेशनला घेऊन गेली. गणपतची बहीण, आत्या, मामा- मामी सर्वजण आपापल्या गावी निघून गेले. गणपतला पोलिसांनी जरी पकडले असले तरी सुरेखाचा संघर्ष अजुनही संपला नव्हता.

गणपतच्या पाठोपाठ सुरेखा सुरेखा सुध्दा पोलिस स्टेशनला गेली.

पाहुया पुढच्या भागात... काय होते.

© अश्विनी मिश्रीकोटकर