दुःखाच्या अंधारापलीकडे सुखाचा प्रकाश...५
सामाजिक कथा
गणपतच्या पाठोपाठ सुरेखा सुध्दा पोलिस स्टेशनला गेली.
"सुरेखा, यांना सांग ना जरा. म्या काहीही केलं नाही. मला सोडा साहेब."
"ए जरा चूप बसशील."
"हे बघा सुरेखा ताई,. गणपतला शिक्षा होणार हे नक्की. पण तरीही तुम्ही त्याला सोडविण्यासाठी वकील लावू शकता. जामीन मिळविण्यासाठी प्रयत्न करू शकता. उद्या त्याला कोर्टात हजर केले जाईल."
"नाही साहेब. आमची एवढी ऐपत नाही की वकील लावू आणि पैसे भरू शकू. साहेब याला जास्तीत जास्त शिक्षा झाली पाहिजे. अशी तरतूद करा. आज माझ्या मुलीचं आयुष्य बरबाद होता होता राहिले. शिवाय गावातील लोकांना सुद्धा मोकळा श्वास घेता येईल."
"हो, तरीही त्याला सरकारी वकील मिळू शकतो. त्यामुळे आता केस मजबूत करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहूच. हे बघा हे प्रकरण कोर्टात जाणार आणि त्यावर जामीन मंजूर होईल की नाही हे ठरेल. कारण जामीन मिळविण्यासाठी आरोपीचे वय, गुन्ह्याची परिस्थिती आणि त्याचे वर्तन यावर अवलंबून असते. बघुया त्याला उद्याच कोर्टात उभे करावे लागेल. तुमच्या सोबतच गावातील काही लोकांचा जबाब लागणार आहे. कोणी येतील का? तुम्ही काही नावं सुचवू शकता. तसं आम्ही आमचं काम करणारच आहोत. या आता तुम्ही."
निराश मनाने आणि जण अंतःकरणाने सुरेखा परत घरी येते. आपल्या दोन्ही मुलांना जवळ घेते. डोळ्यातले पाणी पुसते.
"आई, आज तुझ्यामुळे माझे लग्न थांबले ना."
"हो पण त्यासाठी तुझ्या वडीलांना शिक्षा होणार आहे."
"पण आता घाबरायच नाही. खूप शिकायचं, मोठं व्हायच. छान नोकरी करायची. "
गणपत आधीच त्याच्या वर्तनामुळे वाईट वागत होता. त्याला अटक झाल्यामुळे तो आता पेटून उठला होता. दुसऱ्या दिवशी गणपतला कोर्टात हजर केले. त्याच्यावर असलेल्या या गुन्ह्यामुळे त्याचा जामीन नामंजूर केला. सहा सात महिने हे प्रकरण चालूच राहणार होते.
सुरेखा मात्र हरली होती. पण आता खाण्या पिण्याचे हाल सुरू होते. तिचा संघर्ष सुरूच होता. सुरूवातीपासूनच जातीचे बंधन होते. खूप अपमान झाला होता. कोणीही तिला दाराशी उभे करत नव्हते. पण तिने अपमानाचे घोट पिऊन गावात लोकांच्या हातापाया पडून धुणीभांडी करण्याचे काम मागितले आणि हळूहळू लोकांचा विश्वास संपादन केला. सोबतच कपडे शिवण्याचे सरकारी प्रशिक्षण सुध्दा घेतले. आता रत्ना आणि तिचा भाऊ राकेश आनंदात होते. सात आठ महिन्यांनंतर गणपतच्या केसचा निकाल लागला. गणपतला दोन वर्षं कारावासाची शिक्षा झाली. शिवाय एक लाख रूपये दंड ठोठावण्यात आला. दंड न भरल्यास परत दोन वर्षे परत शिक्षा करण्यात येईल. हळुहळु सुरेखा स्थिर झाली. रत्ना आणि राकेश अधीर हुशार त्यामुळे शिक्षणासाठी खूप मेहनत घेतली. रत्ना बारावी पास झाली आणि राकेश चौथीत गेला.
गणपतने स्वतः ला सोडविण्यासाठी खूप प्रयत्न केले. पण त्याची सुटका झाली नाही सुरवातीला खूप नैराश्य आले होते. एक दोन वेळा त्याने आत्महत्या करण्याचा, पळून जाण्याचा प्रयत्न सुध्दा केला. सुरूवातीला जेलमध्ये सुध्दा भांडखोर असणारा, दादागिरी करणारा, दहशत पसरविणारा गणपत बराच शांत झाला. हळुहळु त्याला अंगमेहनत करण्याची सवय लागली. जेलमध्ये होणाऱ्या विविध कार्यक्रमात तो सहभागी होऊ लागला. कागदांचे कातर काम, मातीची भा़ंडी , शिवाय विविध मशीनची ओळख, शेतीची कामे असे बरेच उपक्रम कैद्यांसाठी राबवत होते. त्यांना मिळत असलेल्या समुपदेशनामुळे त्याचे जीवन बदलले. त्याच्या मनातले नकारात्मक विचार जाऊन सकारात्मक विचार आले. तो करत असलेल्या चुकांची त्याला जाणीव झाली होती. हळुहळु तो सुधारण्याच्या मार्गावर होता. इकडे रत्ना सुध्दा बारावी पास झाली होती आणि राकेश नववीत गेला होता. दोघेही बहीण भाऊ आपल्या आईसाठी खूप मेहनत घेत होते.
अचानक एके दिवशी गणपत घरी आला. त्याला बघताच तिघेही घाबरले होते. एकमेकांना चिकटून बसले.
"अरे, पोरांनो घाबरू नका. सुरेखा, खरच मला माफ कर. मी तुम्हा तिघांचाही गुन्हेगार आहे. आजपासून मी मेहनत करणार. गुंडागर्दी करणार नाही. तुम्हाला मारझोड सुध्दा करणार नाही."
"बाबा, तुमची भाषा किती शुध्द झाली. तुमचे विचार सुध्दा बदलले."
"हो, अग तिथे आम्हाला शिकवत होते. प्रार्थने पासून ते रात्री झोपेपर्यंत अगदी प्रत्येक काम आम्हाला शिकवत होते आणि मी ते आनंदाने शिकत होतो. सुरेखा, हे घे पैसे. तिथे केलेल्या कामाचे हे पैसे."
"आजपासून आपल्या चौघांच एक सुखी कुटुंब म्हणूनच जगणार. मी खूप मेहनत करणार. मी नसतांना जो संघर्ष तू केला ना सुरेखा त्याची कसर तर भरून निघणार नाही. पण आता मी मेहनतीने हे घरकुल सुंदर बनवेल. माणूस म्हणून मी नक्कीच प्रामाणिकपणे जीवन जगेल. तुम्हाला खूप शिकवेल. "
उशीरा का होईना सुरेखाच्या जीवनात आनंदाचे क्षण परत आले. सुरेखा आणि रत्नाची एका स्वच्छ प्रकाशाकडे वाटचाल सुरू होती. गणपतला कळून चुकले की दुःखाच्या अंधारापलीकडे सुखाचा प्रकाश आहे.
समाप्त
© अश्विनी मिश्रीकोटकर
अष्टपैलू लेखन स्पर्धा
अष्टपैलू लेखन स्पर्धा