दुखणं असंही..
"काय सांगू तुला.. आम्ही काय दिवस काढले आहेत ते तुम्हाला असे समजणार नाहीत." कुसुमताई आपल्या भाच्याला सोहमला सांगत होत्या.
"एवढे कष्टात दिवस काढलेस का गं मावशी? मी खूप लहान होतो म्हणून मला आठवत नाही."
"दहा वर्षांचा असशील. माझा रितेशच बारा वर्षांचा होता, हे गेले तेव्हा." कुंदाताईंनी परत डोळ्याला पदर लावला.
"तुमचं चालू देत. मी चहापाण्याचं बघते." कुंदाताईंची सून चित्रा उठत म्हणाली.
"अगं वहिनी, चहापाणी होतच राहिल. तू बस ना." सोहम म्हणाला.
"असं कसं? इतक्या वर्षांनी तुम्ही आलात. मी चहा ठेवते मग स्वयंपाकाचं बघते. तुम्हाला वांगंबटाटा चालेल का?" चित्राने विचारले.
"वहिनी, स्वयंपाकाचं नका ओ काढू. आम्ही इथे आलो म्हणून सहज भेटायला आलो." सोहमची बायको रिमा अवघडून म्हणाली.
"तेच म्हणते आहे मी. लग्न झाल्यावर लगेचच तुम्ही परदेशी गेलात. आता इथे आल्यावर पहिल्यांदाच आला आहात. मग असंच कसं न जेवता पाठवणार?" हसतच चित्रा म्हणाली.
"मी येते मदतीला."
"नको.. माझा स्वयंपाक पटकन होतो. तसेही प्रिशा आहेच मदतीला."
चित्राचं बोलणं ऐकून रिमा परत बसली. आणि कुंदाताईंच्या आणि सोहमच्या गप्पा ऐकू लागली.
"तुम्ही नोकरी केलीत का?" रिमाने काहीतरी विचारायचे म्हणून विचारले.
"नोकरी? अगं आयुष्यभर फक्त कष्टच घेतले आहेत. कधी मेला जीवाला आराम नाही. सकाळी उठलं की घरचं आवरा, स्वतःचं आवरा आणि कामाला जा. घरी आलं की परत मुलांचं करा. बस्स.. आयुष्य असंच संपलं." कुंदाताई म्हणाल्या.
"पण आता सुखाचे दिवस आहेत ना? पूर्वा सासरी सुखी आहे. इथे तू सुखी दिसतेस. वहिनी न बोलता सगळं करते आहे." सोहम म्हणाला. तसं कुंदाताईंचा चेहरा बदलला. त्या काही बोलणार तोच आतून चहा घेऊन येणारी चित्रा त्यांना दिसली.
"आता काय रे.. आमचे जायचे दिवस आले. मी तर वाटच बघते आहे. कधी त्याचं बोलावणं येतं आहे याची." कुंदाताई म्हणाल्या. सोहमला मावशीच्या बोलण्याचं वाईट वाटलं. पण ते ऐकूनही त्यावर काहीच न व्यक्त होणाऱ्या चित्राचा त्याला राग आला.
"मावशी, असं काय भरल्या घरात बोलायचे ते. आता तर मी पण तुझ्याजवळच राहायला आलो आहे. भेट होतच राहिल आपली."
"हो रे.. माझी अशी जीवाभावाची माणसे आहेत म्हणून ढकलायचे कसेतरी दिवस. नाहीतर आजकाल म्हातारी माणसं सगळ्यांना अडगळच वाटतात." कुंदाताई परत म्हणाल्या.
"मी आहे हं आत. काही लागलं तर नक्की सांगा." चित्रा बाकी काहीच न बोलता आत गेली. यावेळेस रिमाला पण तिचं वागणं विचित्र वाटलं.
"मावशी, मी खूप दिवसांनी भेटतो आहे तुला. आई गेल्यापासून तूच मला तिच्याठिकाणी आहेस. आपली खूप वर्ष भेट झाली नाही म्हणून काय झालं? तुला काहीही त्रास असेल तरी मला सांग. तुझं आणि रितेशचं पटत नाही का?" सोहमने न राहवून विचारले.
"नाही रे.. सगळं छान आहे. पण आपलं कोणीच नाही याचं दुःख असतं रे. जाऊ देत. तू तुझं सांग. आता काय इथेच राहणार का?" कुंदाताईंनी विचारले.
"हो.. परदेशात कंटाळा आला. इथे आपली माणसं तरी आहेत. पण आमचं राहू देत. तूच बोल काय ते. तुझ्या जुन्या गोष्टी ऐकायला खूप छान वाटतंय." सोहम म्हणाला. सोहमच्या बोलण्याने कुंदाताईंना अजूनच उत्साह आला. त्या परत बोलू लागल्या. त्यांच्या गप्पा चालू असतानाच चित्राने मध्येच येऊन स्वयंपाक झाल्याचे सांगितले. चित्राने साधाच पण रुचकर स्वयंपाक केला होता. तोपर्यंत रितेशही ऑफिसमधून आला होता. पोटभर जेवून, गप्पा मारून सोहम आणि रिमा तिथून निघाले खरं. पण कुंदाताईंचा चेहरा सतत त्यांच्या डोळ्यासमोर येत होता.
कथेचा वापर व्हिडिओ बनवण्यासाठी किंवा निनावी शेअर करण्यासाठी मनाई आहे. तसे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा