दुखणं असंही.. भाग २
"त्या मावशींची सून जरा विचित्रच वाटली ना?" घरी आल्यावर रिमा सोहमला म्हणाली.
"हो गं.. वहिनी अशी नव्हती. म्हणजे मी आधी भेटलो आहे ना तिला. कशी छान, उत्साहाने रसरसलेली असायची. सगळ्यांना काय हवं नको ते विचारायची. सतत पुढे पुढे करायची."
"आजपण केलंच की. म्हणजे आपण बघ हं, तसं बघितलं तर न सांगताच गेलो होतो. तरी साग्रसंगीत स्वयंपाक होता. काय हवं नको ते बघत होत्या. मला नसतं हं जमलं असं ऐनवेळी कोणी आल्यावर स्वयंपाक करणं." रिमा म्हणाली.
"आपल्याला सवय नाही गं. पण काहीही असलं तरी मावशीकडे असं तिने दुर्लक्ष केलेलं मला अजिबात आवडलं नाही. मावशीला काही बोलायचं होतं वाटतं. वहिनीला घाबरून तर गप्प झाली नसेल ना?" सोहम काळजीने म्हणाला.
"मी एक करू का? मुलं शाळेत गेली की मी मावशींना भेटून येत जाऊ का? म्हणजे मावशींना काही अडचण असेल तर ती ही समजेल. तसंही आपलं घर दहा मिनिटांवर आहे. आणि माझं ऑफिस सुरू व्हायला वेळ आहे."
"नक्की जा.. बोलल्याने दुःख कमी होते. मनातला सल कमी होतो. कधी कधी तर न बोलल्यामुळे अनेक मानसिक आजार होतात. मावशीला असं काही होऊ नये याची काळजी तर घ्यायला हवी ना?"
"पण त्या वहिनींना राग नाही ना येणार?"
"आला तर येऊ देत. मावशीला होणारा त्रास महत्त्वाचा की तिचा राग? तू जा भेटायला मावशीला." सोहमने विषय संपवला.
"मावशी, येऊ का आत?" रिमाने विचारले.
"अगं तू? ये ना.. विचारतेस काय?" गोळ्या घेत असलेल्या कुंदाताई म्हणाल्या. "बस ना.. जेवतेस का?"
"नाही ओ.. जेवूनच आले मी. दुपारी थोडा कंटाळा आला होता एकटीला. म्हटलं तुमच्याकडे यावं."
"बरं झालं आलीस ते. मी पण दुपारी एकटीच असते."
"वहिनी?"
"ती कामाला जाते ना.. मुलं कॉलेजला. मी एकटीच असते बघ. कोणी बोलायला नाही, काही नाही."
"या गोळ्या कशासाठी घेता?"
"अगं एक का दुखणं आहे? बीपी म्हणू नकोस, हार्टचं म्हणू नकोस. हातपाय तर सतत दुखत असतातच. मग काय करणार? घेते औषधं. आपला कोणाला त्रास नको ना?"
"बोलायला कोणी नसलं की खूप त्रास होतो ना?" रिमा सहानुभूती दाखवत म्हणाली.
"हो गं.. आपण यांच्यासाठी मरमर मरायचे आणि यांना आपल्यासाठी वेळच नसतो. कदर नाही गं केलेल्याची. तुला सांगते, रितेश आणि पूर्वाला कधी कसली कमी पडू दिली नाही. कशाला म्हणून नाही म्हटलं नाही. सतत कामं करत रहायचे. ऑफिसमध्ये काम.. घरात काम. जरा म्हणून आराम नव्हता जीवाला." कुंदाताई परत बोलू लागल्या. रिमाने आलेली जांभई दाबली. थोड्या वेळाने चित्रा घरी आली.
"अगं तू? आज अचानक?" नाही म्हटलं तरी चित्राला रिमाला तिथे बघून आश्चर्य वाटलं होतं.
"हो.. ते मी घरी एकटीच कंटाळले होते. म्हणून मावशींशी बोलायला आले."
"बरं.. तुम्ही बोला. मी चहा ठेवते." चित्रा आत वळली.
"बघितलंस? थांबली इथे? वेळच नसतो ना तिला. आम्ही काय कामं केली नाहीत? पण नाही. हे जगावेगळेच ना?" कुंदाताई तणतणल्या. रिमालाही त्यांचे म्हणणे पटले.
"घ्या.. चहा घ्या." चित्रा स्वतःचं आवरून चहा घेऊन आली होती. रिमाने चहा घेतला.
"मी जरा बाजारात जाऊन येते. थोडं सामान आणायचं आहे." ड्रेस नीट करत चित्रा म्हणाली.
"मी पण येऊ का? म्हणजे मलाही इकडची माहिती होईल." रिमाने विचारले.
"चल की."
रिमा कुंदाताईंना बाय करून तिथून निघाली. चालताना चित्राशी बोलू की नको असा ती विचार करत होती.
"वहिनी, राग येणार नसेल तर एक विचारू?" मनाचा हिय्या करून तिने विचारलेच.
"विचार ना.."
"तुम्ही मावशींशी बोलत का नाही? या वयात त्यांना कोणाशीतरी बोलायची फार गरज आहे." रिमाने बोलून घेतले.
काय असेल चित्राचे उत्तर? बघू पुढील भागात. तोपर्यंत हा भाग कसा वाटला ते नक्की सांगा.
सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई
दादर मुंबई
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा