Login

दुखणं.. अंतिम भाग

दुखणं एका सुनेचं
दुखणं असंही.. भाग ३


"रिमा, एक काम करशील?" चित्राने विचारले.

"सांगा ना.."

"तू सध्या घरीच आहेस ना? मग येशील दुपारी घरी?" चित्राचा प्रस्ताव ऐकून रिमा तिनताड उडाली. तिला वाटलं होतं की चित्राला तिचं तिथं येणं आवडणार नाही. पण इथे तर उलटं होत होतं.

"मी?"

"हो.. तुला चालणार असेल तर."

"नक्की येईन मी. मला असं वाटतंय की मावशींना थोडं मानसिक दडपण आहे. बोलून कमी होईल ते. मी थोडा मानसशास्त्राचा अभ्यास केला आहे ना." रिमा उत्साहाने बोलत होती. त्यानंतर जवळजवळ आठवडाभर रोज रिमा कुंदाताईंना भेटायला येऊ लागली. कुंदाताई पण नेहमीपेक्षा उत्साही दिसू लागल्या. रितेशलाही हे जाणवले. त्यासाठी त्याने सोहम आणि कुटुंबाला एक छानशी पार्टी दिली. त्यानंतर काही दिवसांतच रिमाचे येणे कमी झाले, हळूहळू बंदच होत गेलं. चित्राला ते दिसलं पण ती नेहमीप्रमाणे गप्प बसली. मग कुंदाताईंनी तिला 'रिमा येत का नाही?' असं थेट विचारायला सांगितल्यावर तिचा नाईलाज झाला. तिने रिमाला फोन लावला.

"रिमा.. अगं आहेस कुठे? आली नाहीस ते घरी?"

"वहिनी, घरून बोलताय का?"

"हो.. सासूबाई विचारत होत्या तुला."

"वहिनी, आपण उद्या बाजारात भेटूयात का?" रिमाने विचारले.

"काही प्रॉब्लेम आहे का?"

"नाही.. भेटून बोलू." म्हणत रिमाने फोन ठेवला. पण चित्रा मात्र आता रिमाला काय सांगायचे आहे, या विचारात पडली.

"बोल गं.. काय झालं? असं अचानक घरी येणं बंद केलेस?" चित्राने रिमाला विचारले.

"ते वहिनी.. मला नाही जमणार तिथे रोज यायला. कधीतरी ठिक आहे. पण रोज? नकोच." रिमा म्हणाली.

"काय झालं विचारू?"

"तुम्हाला राग नाही ना येणार?"

"नाही येत. बोल.."

"ते मला आणि सोहमला वाटत होतं की मावशींना कोणाशी तरी बोलायची गरज आहे. म्हणून मी तुमच्याकडे रोज येत होते."

"मग?"

"पण तिथे आल्यावर मला समजलं की मावशी त्याच गोष्टी परत परत सांगतात. म्हणजे परवा त्यांनी रितेशदादांबद्दल जे सांगितलं तेच आजही आणि उद्याही. बोलायला काही नवीन नाहीच त्यांच्याकडे. बरं त्या बोलूही देत नाहीत इतरांना." रिमा म्हणाली.

"म्हणून मग तुला आणि सोहमभाऊजींना असं वाटलं की मी दुष्ट आहे. त्यांना बोलू देत नाही." चित्रा चहाचा घोट घेत म्हणाली.

"हो.." मान खाली घालत रिमा म्हणाली.

"तुला माहिती आहे, माझ्या लग्नाला किती वर्ष झाली?" चित्राने विचारले.

"नाही."

"माझ्या लग्नाला पंधरा वर्षे झाली. तू जसं नवीन नवीन उत्साहाने त्या गोष्टी ऐकल्यास तश्या मी ही ऐकल्या. वर आईची शिकवण, की सासूबाईंनी फार कष्टात दिवस काढले आहेत. त्यांना त्रास होईल असं वागू नकोस. लग्नाला वर्ष झालं, दोन वर्ष झाली. मुलं झाली, पण माझ्या सासूबाईंचं बोलणं संपलं नाही. तुला सांगते, आपण म्हटलं ना की मला डिलिव्हरीच्या वेळेस त्रास झाला की या स्वतःबद्दल बोलणं सुरू करणार. त्यातही त्या कश्या ग्रेट आपण किती सामान्य हे सुनवणार. आपण साधा भाजीचा विषय जरी काढला ना तरी आपल्याला ती भाजी कशी येत नाही आणि त्यांनाच ती कशी चांगली येते हे ऐकवणार. विचार कर.. गेले पंधरा वर्ष मी फक्त हेच ऐकते आहे."

"वहिनी.." रिमाने चित्राच्या हातावर हात ठेवला.

"तुला सांगू, लोकांना वाटतं की त्या घरी एकट्या असतात, त्यांनी खूप कष्टात दिवस काढले आहेत. पण आता त्यांच्याशी बोलायला कोणी नाही म्हणून त्यांना शारिरीक आजार सुरू झाले आहेत. पण असं नाही गं. मला सांग मुलं तरी किती वेळा त्याच त्याच गोष्टी ऐकणार? म्हणून मुलं तिथे थांबत नाहीत. रितेश तर घरी नसतोच. आणि असला तरी त्या दोघा मायलेकांचं एकमेकांशी बोलणं वेगळं असतं. तुम्हाला वाटलं होतं की त्यांना मानसिक त्रास आहे म्हणून. पण तुला सांगते, सतत तेच तेच ऐकून मानसिक आजारी तर मी झाली आहे. इतर कोणी आलं आणि मी काही बोलले की तिथेही त्यांनाच बोलायचे असते. मग आपण गप्प बसायचे." चित्राचं बोलणं रिमा अस्वस्थपणे ऐकत होती.

"पण मग त्यांना काही छंद वगैरे?"

"वाचलं की डोळे दुखतात, खाली उतरायची भिती वाटते. खालीच सोसायटीची बाग आहे, पण तिथेही जायचं नसते. फक्त घरी बसायचं आणि येताजाता तेच तेच बोलत बसायचं." चित्राचा बांध फुटला होता.

"सॉरी.. हे सगळं मला माहित नव्हतं."

"आतल्या गोष्टी कोणालाच माहित नसतात. लोकं फक्त वरवर बघतात. तुझं नाही म्हणत मी. पण माझा अनुभव. चल जाते मी आता.. नाहीतर आम्ही ऑफिसमधून कसे वेळेत घरी यायचो यावर ऐकावे लागेल मला." चित्रा बिल देत म्हणाली. मावशींना न बोलल्यामुळे मानसिक आजार होतो आहे का हा प्रश्न पडलेल्या रिमाला आता मात्र चित्राची काळजी वाटू लागली होती.


घरातल्या वयस्कर माणसांचे ऐकणे.. ही सुद्धा त्यांची गरज आहेच. पण सतत एकच गोष्ट ऐकण्याने घरातले पण कंटाळू शकतात किंवा इतर अनेक कारणे असू शकतात. ते मांडण्याचा हा केलेला छोटासा प्रयत्न.


या कथेचे यूट्युब व्हिडिओ बनवण्यास तसेच निनावी शेअर करण्यास परवानगी नाही.

सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई

🎭 Series Post

View all