Login

दुपारची झोप

Duparchi Zop


दुपारची झोप
©पूनम पिंगळे
तुमचं कधी अस झालंय का हो की दुपारी झोपला आणि उठल्यावर अस वाटलं सकाळ झाली आहे ..हा माझा एक किस्सा
मला खूप सर्दी झाली होती . म्हणून मी शाळेतून लवकर आले आणि डॉक्टर कडे गेले ..आमचे फॅमिली डॉक्टर खरच आमची फॅमिली होते ..माझ्या आजोबांचे मित्र ते
डॉक्टर : काय होतंय ग?
मी : सर्दी झालीये , डोकं दुखतंय
डॉक्टर : डोकं आहे म्हणजे तुला ..म्हणून दुखतंय ना ..कुठे गेली होती चोरून आइस्क्रीम खायला ? म्हणून झाली सर्दी तुला ..
मी : मनात विचार केला ..हे डॉक्टर आहे की ज्योतिषी? यांना कस समजलं काल मी आणि अर्चना म्हणजे माझी मैत्रीण ..आम्ही आईस्क्रीम खाल्ली ते ? नवलच आहे बाबा ..
डॉक्टर : आग ए लक्ष कुठाय तुझं? खाल्ली ना आईसक्रीम?
मी : नाही काय? मी नाही खाल्ली ..
डॉक्टर : बर ..मग इंजेक्शन घे
मी : डॉक्टर नको ना इंजेक्शन ..औषध द्या ना फक्त
डॉक्टर : (माझ्या डोक्यात टप्पल मारत) - बावळट डॉक्टर तू का मी? 3 दिवस ये इंजेक्शन घ्यायला ..आणि गोळ्या वेळेवर घे
मी हाताची बाही वर केली ..डॉक्टर इंजेक्शन भरून आले ..पण आता ते डिस्पोजेबल सुई वापरायची पद्धत आली होती ..आणि वयाप्रमाणे त्यांचा हात पण थोडा जड झाला होता ..
डॉक्टर : हातावर नाही कंबरेवर घे..दुखेल ही सुई
आता दुखेल म्हटल्यावर थोडी धडकी भरली आणि मी थांबले
डॉक्टर :( कंपाउंडर ला आवाज देत ) रुबिना आत ये हिचा हात धर ग ..
मी:ए नको येऊ ग ..मग काय मुकाट्याने कंबरेवर इंजेक्शन घ्यायला तयार झाले ..अय्यो लै दुखलं राव.. मग काय कंबर चोळत आले बाहेर तर डॉक्टरांनी परत आवाज दिला मला वाटलं आता काय परत टोचायच की काय? तर त्यांनी चॉकलेट दिल हातात ..मी खुश ..मग काय गोळ्या घेतल्या, घरी आले, आणि न जेवताच गोळ्या घेऊन झोपले ..दुपारचे 2 वाजले होते तेव्हा ..मी कधी दुपारी झोपत नाही पण त्या गोळ्यांमुळे मला खूप गाढ झोप लागली ..साधारण ६ वाजता जाग आली ..मी माझ्या कॉट वर होते ..आणि बाहेर कोंबडा आरवला ..आई झाडून काढत होती ..मला वाटलं सकाळ झालीये ..आणि सकाळचे ६वाजलेत माझी सकाळची शाळा असायची ..म्हटलं आज उशीर होणार ..किचनमध्ये पाहिलं तर आई चहा बनवत होती ..हिचा आज डबा द्यायचा मूड नाही आहे असं वाटलं ..बाकी काही तयारी दिसली नाही हिची ..
मी मग भराभर बाथरूम मध्ये गेले ..दात घासत घासत गिझर चालू केला ..डोळ्यावर आजूनपन खूप झोप होती ..दात घासत घासत मी किचनमध्ये गेले ..म्हटलं पाहूया आई डबा बनवतीये की नाही ..नाहीतर वडापाव आहेच ..इतक्यात हसत हसत काकी तिथे आली..
मी : काय झालं ग काकी का हसतेस?
काकी : अग आत्ता का अंघोळ करायची तुला ? आणि दात काय घसतीयेस आत्ता ?
मी : म्हणजे मला शाळेत जायचय ना.. मग अंघोळ नको का करायला ? तुम्ही तर काय आज माझा डबा पण बनवला नाहीये .. मला सर्दी खोकला आहे पण ठीक आहे मी खाईन वडापाव शाळेत ..
मग आई भडकली : आग बावळट आत्ता डबा कशाला बनवू ? चहा खारी खा..
मी : बघ कशी आहेस ना तू पण आई आणि काकी तू पण ..
इतक्यात आमच्या पिठाच्या गिरणी मधला कामगार चहा न्यायला आला
मी : अरे गौतम आज काय इतक्या लवकर गिरणी चालू केली? अरे नऊ वाजायला वेळ आहे की अजून ..मग काय तो आणि आई काकी सगळेच जोरात हसायला लागले ..
मला काहीच समजत नव्हतं हे सगळे अस वेड्यासारख का करत आहेत ?
गौतम : अहो ताई आता नऊ वजता तर गिरणी बंद होणार..
मी : अरे गिरणी तर सकाळी चालू आणि रात्री बंद होते ..तू उलटा काय बोलतोय?
गौतम : अहो ताई आत्ता रात्रच आहे ..चहा घेऊन तो हसत हसत निघून गेला ..
आई आणि काकी पण खूप हसत होते..
मी : आई तू मला पाहिलं होतंस ना उठून दात घासताना मग तू का काही बोलली नाहीस आणि संध्याकाळी झोपलं की तू चिडतेस..मग आज मला उठवलं का नाही? म्हणून मला वाटलं सकाळ झाली त्यात आज कोंबडा पण दोनदा आरवला..
आई : तू दुपारी औषध घेऊन झोपली होतीस ना ..म्हणून नाही उठवलं मी .. आणि मला वाटलं तुझ्या तोंडाची चव गेली असेल औषधाने म्हणून दात घसतीयेस .. आता मला काय माहित तुला सकाळ झालीये अस वाटतय ..
मी तर स्वतः वरच हसत आणि चिडत बाथरूम मध्ये गेले ..गरम पाणी निघालं होत ..मग काय घेतली अंघोळ करून .. नंतर बरेच दिवसांसाठी सगळ्यांना एक करमणुकीचा विषय मिळाला होता ..मला दुसंध्याकाळ सकाळ वाटली होती ते..