Login

दुर्बल

कोणाच्या दुर्बलपणाचा गैरफायदा घेऊन काय होतं, ते या कथेत वाचू.
एका सुसंस्कृत मध्यमवर्गीय कुटुंबात कुसुमताई आपल्या मुलगा माधव आणि सून सावित्रीसोबत राहत होत्या. त्या घरात कधी हसण्याची कमतरता नव्हती. अंगणात तुळशीचं वृंदावन, भिंतींवर जुन्या आठवणी सांगणारी छायाचित्रं आणि स्वयंपाकघरातून दरवळणारा तुपाचा सुगंध—कधीकाळी ते घर आनंदाने भरलेलं होतं.


कुसुमताई घराच्या आधारस्तंभ होत्या—सरळ, साध्या, संस्कारी आणि प्रत्येक नातं मनापासून जपणाऱ्या. त्यांनी कधीच स्वतःसाठी काही मागितलं नाही; फक्त कुटुंब सुखी असावं, हीच त्यांची इच्छा होती. पण काळ कुणासाठीच थांबत नाही.


हळूहळू कुसुमताईंना विस्मरणाचा, म्हणजेच अल्झायमरचा आजार झाला.


कधी त्यांनी जेवण केलं आहे की नाही, औषध घेतलं आहे की नाही, हे त्यांना आठवत नव्हतं. काही वेळा तर स्वतःच्या मुलाचं नावसुद्धा त्यांच्या ओठांवर येईना. हे सगळं पाहून माधव अस्वस्थ व्हायचा, पण नोकरीमुळे तो सकाळी लवकर घराबाहेर पडत होता आणि संध्याकाळी पण उशिरा येत होता.


आई आजारी पडल्यानंतर घराची आणि तिची संपूर्ण जबाबदारी त्याने पत्नी सावित्रीवर सोपवली—पूर्ण विश्वासाने.

लग्नानंतर सुरुवातीला सावित्री अतिशय प्रेमळ होती. सासूशी आदराने वागायची, त्यांना आईसारखं मानायची.


पण कुसुमताईंच्या आजाराने घरातलं चित्र बदललं. विस्मरणाला दुर्बलता समजून सावित्रीच्या मनात हळूहळू अधिकारबुद्धी रुजू लागली. सासूच्या आजाराचा तिने गैरफायदा घ्यायला सुरुवात केली.

मनातल्या मनात ती म्हणायची— “ही म्हातारी आता कुणाच्या उपयोगाची नाही. सगळंच विसरते. आता काही बोलली तरी कोण विश्वास ठेवणार?”

हळूहळू कुसुमताईंचं आयुष्य घरकामापुरतंच उरलं. सकाळपासून संध्याकाळपर्यंत झाडू, भांडी—सगळी कामं त्यांच्याकडून करून घेत होती. वरवर गोड शब्द वापरले जात होते — “आई, झाडू राहिली आहे.” “आई, जरा भांडी घासून द्या, माझी तब्येत बरी नाही."


विस्मरणाच्या आजारामुळे कुसुमताई काहीही न बोलता सगळं करत होत्या .स्वतःची औषधं घ्यायलाही विसरत होत्या .

औषध आणि जेवण देण्याची जबाबदारी माधवने सावित्रीवर सोपवली होती; पण ती ना वेळेवर औषध देत नव्हती, ना नीट जेवण देतं होती.

कधी कधी कुसुमताई विसरायच्या की त्यांनी जेवलंय की नाही. पोटात कळा उठल्या की भुकेची जाणीव व्हायची.

“सूनबाई… मी जेवले का गं?”
असं विचारलं की सावित्री वैतागून म्हणायची— “हो आई, आत्ताच तर खाल्ला. किती वेळा तेच तेच विचारता!”


खरं तर अनेकदा त्या दिवसभर उपाशी राहत होत्या .


भूक लागली की त्या स्वयंपाकघरात येऊन बोलायच्या— “एक पोळी मिळेल का? फार भूक लागली आहे…”
तेव्हा सावित्री ओरडायची— “आत्ता वेळ नाही, नंतर देईन!”


माधव घरी आला की सावित्रीचं रूप पालटायचं. ती काळजी करणारी सून बनायची.


कुसुमताई कधी काही सांगण्याचा प्रयत्न करायच्या, पण वाक्य पूर्ण होण्याआधीच आठवणी निसटून जायच्या. माधव पत्नीच्या बोलण्यावर विश्वास ठेवायचा आणि आईलाच सांगायचा — “आई, सावित्री एवढं सगळं करते, तरी तु तक्रारच करते.”
हे ऐकून कुसुमताई गप्प बसायच्या. त्यांच्या डोळ्यांतलं दुःख कुणालाच दिसत नव्हतं.


एक दिवस भूक असह्य झाली. त्या स्वयंपाकघरात गेल्या, तर डबा रिकामा. सावित्रीकडे विनवणी केली; पण ती मोबाईलवर रील्स पाहत बेडवर निवांत पडली होती. निराश होऊन कुसुमताई अंगणात गेल्या आणि कचऱ्यात पोळी शोधू लागल्या.
हे दृश्य शेजारीण सरोजबाईंनी पाहिलं. “आहो ताई , हे काय करताय?”
“भूक लागली आहे… बहुतेक मी जेवले नाही…”

सरोजबाईंना शंका आली. त्यांनी तात्काळ माधवला फोन केला.
माधव अचानक घरी आला. सावित्री गडबडली; पण सगळं आजारावर ढकललं. तरीही माधवच्या मनात शंकेचं बी पेरलं गेलं.

काही दिवसांनी त्याने घरात गुपचूप कॅमेरे बसवले.
जे दृश्य त्याने पाहिलं, त्याने त्याचं अंतःकरण हादरून गेलं. आई उपाशी होती, औषधं पण दिली नव्हती आणि कामवालीप्रमाणे राबत होती.

त्या दिवशी तो घरी आला तेव्हा कुसुमताई पोछा मारत होत्या. सावित्रीने नेहमीसारखं खोटं सांगितलं. पण यावेळी माधवने रेकॉर्डिंग दाखवलं. सत्य उघड झालं.


त्याने सावित्रीला माहेरी सोडून दिलं.
माहेरी सावित्रीला कर्मांची शिक्षा मिळाली.

जसं तिने सासूला वागवलं होतं, तसंच वागणूक तिला तिच्या वहिनीकडून मिळाली. वहिनी तिच्याकडून सगळं काम करून घेत होती. तेव्हाच तिच्या मनात पश्चात्ताप जागा झाला.तिला आपलं सासर आठवायला लागलं.

सासूबाई आणि नवरा किती प्रेम करत होते आणि आपण सगळं खराब केलं.

ती पुन्हा सासरी आली. कुसुमताईंचे पाय पकडून माफी मागितली.कुसुमताई सगळं विसरल्या होत्या .
“अगं, रडतेस का? तू माझ्या मुलीसारखी आहेस.”


हे शब्द सावित्रीच्या काळजावर उमटले.


माधवने शेवटी तिला एक संधी दिली.
यानंतर सावित्री खरंच बदलली. सेवेत प्रेम आलं, शब्दांत आदर उतरला. औषध, जेवण, काळजी—सगळं वेळेवर होऊ लागलं. घरात पुन्हा शांतता नांदू लागली.

माधवनी फोन करून सावित्रीच्या भाऊ -भावजयला सगळं सांगितलं.

तो म्हणाला —"तुमच्यामूळे मला माझी सावित्री परत मिळाली. तुम्ही तसं वागले नसते तर तिला ही जाणीव कधीच झाली नसती.तुमचं खूप आभार. "


"दुसऱ्यांच्या दुर्बलतेचा गैरफायदा घेणाऱ्याला काळ त्याच वेदना परत देतो.
म्हणून नेहमी जपून वागावं. "