Login

दुर्लक्ष

दुर्लक्ष केल्याने त्याचे परिणाम काय होतात, हे सांगणारी कथा!
चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५

लघुकथा लेखन

प्रस्तुत कथा ही काल्पनिक असून त्यात नाव,गाव,
स्थळ, प्रसंग, जीवित अथवा मृत्यूशी संबंध आला तर तो योगायोग समजावा.

शीर्षक: दुर्लक्ष.

" बंद करा हे क्लिनिक." काही लोक, जमावाने तिथे आले होते.

" हे काय, तुम्ही अशी दमदाटी करू शकत नाही. " तिथली रिसेप्शनिस्ट म्हणाली.

" अरे डॉक्टर म्हणजे एखाद्याला जीवदान देतात, पण ही डॉक्टर तर दुसऱ्यांचा जीव घेते. " रिसेप्शनिस्टच्या अंगावर धावून जातच त्यातील एकजण म्हणाला.

आतमध्ये आपल्या पेशंटला तपासणारी डॉक्टर रक्षा बाहेर आली.

" हा सर्व काय गोंधळ चालू आहे?"  तिथल्या सर्व माणसांना बघून ती म्हणाली.

डॉक्टर रक्षा यांचे छोटेसे क्लिनिक होते आणि काही पेशंटना एका वॉर्डमध्ये सलाईन सुद्धा लावण्यात आलेली होती आणि क्लिनिकमध्ये शांतता असावी, या उद्देशाने सर्वांना शांत करण्याचा प्रयत्न डॉक्टर रक्षा करत होती.

" आम्ही शांत बसणार नाही, तुमच्यामुळे आमच्या घरातील एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे." त्यातील एका व्यक्तीने रागाने सांगितले. 

तिथे काही पेशंट ऍडमिट होते, तर काही पेशंट डॉक्टरकडे तपासायला आले होते. त्यातले काही नवीन सुद्धा होते, हे बघून ते घाबरूनच गेले होते.

हे असं ऐकल्यावर डॉक्टर रक्षा सुद्धा थोडी घाबरलीच होती.

" हे बघा, तुमचा काहीतरी गैरसमज झाला आहे. आपण आतमध्ये जाऊन बोलूया. तुम्ही आत मध्ये या."  तिने त्यांना तिच्या केबिनमध्ये बोलावलं.

" आम्ही काही आतमध्ये येणार नाही आणि तुम्ही आमचा आवाज दाबू शकत नाही. तुमच्यामुळे माझ्या बायकोचा जीव गेला आहे." मगापासून शांत बसलेला त्या जमावातील एक व्यक्ती पुढे येऊन म्हणाला.

"  तुमची बायको कोण आहे ? आणि कोणाबद्दल तुम्ही बोलत आहात ? "  तिने डॉक्टरच्या पांढऱ्या कोटाच्या
खाली असलेल्या खिशामध्ये एक हात ठेवत विचारले.

" माझ्या बायकोचं नाव नंदा आहे आणि ती दहा दिवसांपूर्वी तुमच्याकडे पेशंट म्हणून आली होती. तुम्ही तिच्यावरती नीट उपचार न केल्यामुळे कालच तिचा मृत्यू झाला आहे, त्यामुळे तुम्हीच त्यांच्या मृत्यूला जबाबदार आहात."  तो माणूस आधी रागाने आणि नंतर जोराने रडत म्हणाला.

" तुमची बायको माझ्याकडे उपचार घेण्यासाठी आली होती हे मान्य आहे, पण त्यावेळी मी त्यांना काही वैद्यकीय तपासण्या सुद्धा करायला सांगितल्या होत्या आणि त्याचा कागद सुद्धा दिलेला होता; परंतु त्याच्यानंतर त्या माझ्याकडे पुन्हा आल्याच नव्हत्या. "

" खोटं, तुम्ही असे काहीच सांगितले नव्हते. नाहीतर तिने मला सांगितले असते. " तिचा नवरा तावातावाने म्हणाला.

" हे बघा, तुम्ही इथे गोंधळ घालत आहात आणि तुमचा काहीतरी गैरसमज झाला आहे. आपण हे सर्व शांततेत सोडवूया, इतर पेशंटसुद्धा  इथे आहेत. त्यांना त्रास नको व्हायला." डॉक्टर रक्षा शांतपणे त्यांना समजावत म्हणाली.

" आता ऐकून आणि समजून काय घ्यायचे आहे ? म्हणजे माझी गेलेली बायको, ती परत तर येणार नाही ना ?" नंदाचा नवरा रागाने म्हणाला.

" आम्ही तर आता हे क्लिनिक बंदच पडणार आहोत आणि आम्ही तुमच्या विरुद्ध पोलीस कम्प्लेंटही करणार आहोत."  त्यातल्या एका नातेवाईकाने असे म्हणून, त्यांनी तिथेच पोलिसांना फोन केला होता.

बाकीचे पेशंट सुद्धा घाबरलेले होते आणि ज्यांचा तपासण्यासाठी नंबर लागलेला होता, ते मात्र हे सर्व ऐकून तिथून लगेच निघून गेले.

डॉक्टर रक्षाला काही समजतच नव्हते, कारण नंदा नावाची पेशंट आली होती. तिला एका आठवड्यापासून सर्दी आणि खोकला होता आणि त्यामुळे डॉक्टरला थोडी शंका वाटली की, हे कोणते इन्फेक्शन तर नाही, म्हणून तिला काही वैद्यकीय चाचण्या करायला सांगितल्या होत्या; परंतु त्या दिवसानंतर नंदा डॉक्टरकडे पुन्हा आलीच नव्हती. त्यामुळे असे काही पेशंट्स असतात, जे सेकंड ओपिनियनसाठी दुसऱ्या डॉक्टरकडे जातात किंवा काही कारणाने त्या तपासण्या करत नाहीत, हे आता डॉक्टर रक्षाला चार-पाच वर्षाच्या तिच्या अनुभवावरून समजले होते.

नंदाचे नातेवाईक डॉक्टर रक्षाच्या क्लिनिकवर येऊन गोंधळ घालत होते आणि त्यांनी फोन केल्यावर पोलीस सुद्धा तिथे आले होते.

" डॉक्टर रक्षा, तुम्हाला आमच्या सोबत पोलीस स्टेशनमध्ये यावे लागेल. तुमच्या विरुद्ध तक्रार केली आहे." पोलीस तिला म्हणाले.

त्याचवेळी डॉक्टर रक्षाने आपल्या वकिलांना सुद्धा फोन केला होता.

तसेच ती सर्व पेशंटचे रेकॉर्ड आपल्या लॅपटॉपमध्ये ठेवत होती, त्याची सुद्धा प्रिंट घेऊन ती पोलीस स्टेशनला गेली होती.

तिथे गेल्यावर डॉक्टर रक्षाने नंदाबद्दल सांगितले.

" म्हणजे तुमचे असे म्हणणे की, तुम्ही त्यांना त्या तपासण्या करायला सांगितल्या होत्या आणि त्यांनी त्या केल्याच नव्हत्या. त्याच्यानंतर त्या तुमच्याकडे पुन्हा आल्या नव्हत्या. बरोबर? " इन्स्पेक्टरने डॉक्टर रक्षाला विचारलं.

" हो आणि त्या पुन्हा आल्या नव्हत्या. त्यांनी त्यांची लक्षणे सांगितल्यावर, मला शंका वाटत होती. त्या तपासण्या करणे खूप गरजेचे होते. जोपर्यंत त्या तपासण्या करणार नाहीत आणि त्याचा निकाल येणार नाही, तोपर्यंत आम्हाला काही समजणारच नाही ना !

मी असे कसे कोणतेही औषध त्यांना देऊ ? मी त्यांना सांगितले होते की,  लवकरात लवकर तुम्ही त्या चाचण्या करायला हव्यात. आता त्यांनी त्या केल्या नाहीत. त्यात  माझा काय दोष सांगा ? "  तिने विचारले.

"  तुमचे म्हणणे बरोबर आहे. यांच्याविरुद्ध तक्रार आम्ही घेऊ शकत नाही." पोलिसांनी ठामपणे सांगितले.

आलेल्या वकिलांनीही कायदेशीर माहिती देत डॉक्टर रक्षा निर्दोष आहेत, हे सांगितले.

" असे कसे तुम्ही तक्रार घेऊ शकत नाही?  ह्यांच्यामुळे माझ्या बायकोचा जीव गेलेला आहे. ह्यांनी जर वेळेत तिच्यावर उपचार केले असते, तर तिचा आजार बळावला नसता आणि  आज ती आमच्यासोबत असती. "  तिच्या नवऱ्याला तरी सुद्धा विश्वास वाटत नव्हता.

" इन्स्पेक्टर साहेब, कसे आहे ना. गरज भासल्यास आम्ही काही वैद्यकीय चाचण्या पेशंटना त्यांना सांगितलेल्या लक्षणांवरून त्यांना लिहून देत असतो, परंतु उगाचच डॉक्टर लोक सांगत आहेत आणि त्यामुळे त्या आवश्यक वैद्यकीय चाचण्या करण्यासाठी काही पेशंट दुर्लक्ष करतात, याचा परिणाम असा होतो की, त्यांचा आजार बळावतो. 

मग आम्ही त्यावेळेस काहीच करू शकत नाही. आमच्या हातात जे आहे, ते आम्ही करण्याचा प्रयत्न करतो. माझे छोटेसे क्लिनिक आहे आणि त्यांनी ही गोष्ट ऐकली नाही, कारण कदाचित त्यांना तपासण्या करणे, हे खर्चिक वाटत होते किंवा महत्वाचे वाटत नव्हते. "

पुढे डॉक्टर रक्षा म्हणाली,  " काही लोकांची मानसिकता अशी असते की, त्या चाचण्यांमध्ये तसे पण काही निघणार नाही, उगाचच डॉक्टर लोक तपासण्या करायला सांगतात; पण हा विचार करत नाहीत की, एकदा त्यांनी तपासणी केली तर त्यात काही निघाले नाही, तर उत्तमच आहे, परंतु जर आपल्याला थोडं सुद्धा एखाद्या आजाराबद्दल लवकर समजले तर, लवकरात लवकर उपचार घेऊन ती व्यक्ती बरी होण्याचाच प्रयत्न आम्ही डॉक्टर करत असतो. " 

डॉक्टर रक्षाने पोलिसांना समजून सांगण्याचा प्रयत्न केला.

" हो, तुमचे अगदी बरोबर आहे. डॉक्टर रक्षा, यात तुमचा काहीच दोष नाहीये."

" तुमच्या बायकोने डॉक्टरांनी सांगितलेल्या गोष्टींकडे दुर्लक्ष केल्यामुळे त्यांचा जीव गेला आहे आणि यामध्ये डॉक्टर रक्षा यांची काहीच चूक नाही. त्यामुळे तुम्ही आता येऊ शकता."  पोलिसांनी नंदाच्या नवऱ्याला आणि त्यांच्या नातेवाईकांना सांगितले.

डॉक्टर रक्षाने सुद्धा त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, परंतु ते नंदाच्या मृत्यूने भावनिक झाले होते आणि थोड्या दिवसांनी त्यांना स्वतःहूनच समजेल, असे समजून डॉक्टर रक्षा तिथून निघून गेली.

डॉक्टर जे सांगतात ते प्रत्येकवेळी त्यांच्या आर्थिक फायद्यासाठीच असते, असे नाही हेच डॉक्टर रक्षाने पोलीस स्टेशनमध्ये जाऊन आपली बाजू खऱ्याची आहे, हे न डगमगता सांगण्याचा प्रयत्न केला होता. दुर्लक्ष केल्यामुळे ते स्वतःच्या जीवावर सुद्धा बेतू शकते, हे सर्वांना सुद्धा, त्यावेळी डॉक्टर म्हणून तिने सांगितले होते.

© विद्या कुंभार

कथा आवडल्यास कमेंट आणि लाईक नक्की करा.


0