Login

दुरून डोंगर साजरे भाग १

एकत्र राहून दूर राहण्यापेक्षा,वेगळं राहिलेलं काय वाईट?
"योगेश, मी खोटं बोलत नाहीये. मी खरंच सांगते आहे. माझ्यावर विश्वास ठेव. मी सगळी कामं आवरूनच रुममध्ये गेले होते. वहिनी..."
ती पुढे काही बोलणार तोच तो म्हणाला, "हे बघ प्रिया आपलं एकत्र कुटुंब आहे. कामं जास्त असतात. वहिनी काम करत असतांना तू रुममध्ये गेलेली मला आवडणार नाही.

"योगेश, तु माझं म्हणणं ऐकून का घेत नाहीयेस? मला खरंच माहीत नाही वहिनी काय करत होत्या. जेवण, भांडी,लादी सगळं करूनच मी रुममध्ये बसले आहे." ती स्वतःची बाजू मांडण्याचा पुरेपूर प्रयत्न करत होती. योगेश ऐकण्याच्या तयारीत नव्हता. त्याने न ऐकल्यासारखे केलं आणि रागातच झोपुन गेला.

प्रियाला काही केल्या डोळा लागेना.
'हा मला समजून का घेत नाही? मी सांगते आहे ते तो ऐकत का नाहीये? योगेशच्या डोळ्यावर कसली पट्टी आहे? ह्या वहिनी एका कामाला हात लावत नाही. नुसतं आपलं किचनमध्ये वरवर कामं करतात आणि माणसं आली की, विनाकारण खूप काम करत असल्याची नाटके करतात. काही तरी मार्ग काढावाच लागेल. नाहीतर योगेश माझ्यापासून दूर जाईल. ते मी होऊ देणार नाही.'

प्रिया, देखणी,सालस, समजुतदार मुलगी होती. मिडल क्लास कुटुंबातून आली होती. प्रॉपर कांदे पोहेचा कार्यक्रम झाला. योगेशला ती फार आवडली. महिन्याभरात लग्न झालं.
योगेश तिला खुश ठेवत होता. ती देखील योगेशची काळजी घेत होती.

नव्याचे नऊ दिवस खूप छान होते. योगेशच्या घरी आई- बाबा, मोठा दादा प्रशांत त्याची बायको नेहा आणि आता प्रिया असं हे कुटुंब होतं. प्रिया पुरेपूर प्रयत्न करत होती त्या कुटूंबाचा भाग होण्याचा. योगेशने आधीच सांगितलं होतं की एकत्र कुटूंब असणार, तर एकमेकांना समजून घ्यावं लागणार. प्रियाला देखील काहीच प्रॉब्लेम नव्हता. लग्न झाल्यावर ती सगळी कामं मन लावून करायची. सकाळी सगळी कामं आवरून ती ऑफिसला जायची आणि रात्री देखील आल्यावर भांडी घासत बसायची. सुट्टी असली की, अजूनच कामं तिच्या वाट्याला होती. गपगुमान ती सारं करत होती. नंतर तिच्या लक्षात आलं की, नेहा गोड बोलून तिच्याकडून सगळी कामं करून घेत आहे.
कामाच्या वेळेस जाऊन फोन वर गप्पा मारत बसायची किंवा शेजारी जाऊन बायकांशी गप्पा मारायची. किंवा स्वतःच्या मुलीला तासभर जेवण भरवत बसायची. हे नेहमीचेच झालं होतं.

सासूला हे दिसत नव्हतं अश्यातला भाग नव्हता; पण प्रियाने आल्यापासून सर्व जबाबदारी घेतली होती. हया सगळ्यात फरफट होत होती, ती प्रियाची.
आधी तर सगळं ठीक होतं; पण प्रियाला मातृत्वाची चाहूल लागली, तेव्हा देखील नेहा तशीच वागत होती. कितीजरी त्रास झाला तरी प्रियाला आराम नव्हता. एक दिवस प्रियाला खूप त्रास होत होता, म्हणून ती झोपून राहिली.

आता सगळं काम नेहाला करावं लागेल हे तिला माहीत होतं, असंही प्रिया आल्यापासून ती अजूनच आळशी झाली होती. कामाची सवय सुटली होती.

प्रिया बेडरूमध्ये होती.
नेहा आली आणि तिला म्हणाली, "अगं प्रिया अशी लोळत राहिली, तर बाळाला त्रास होईल, ऍक्टिव्ह राहिली तर डिलिव्हरी व्यवस्थित होईल."


प्रियाला तिची खोड चांगली माहीत होती.

"वहिनी,मला डॉक्टरांनीच आराम करायला सांगितला आहे."

नेहाला मनातून तर राग आला होता.

"डॉक्टर काय गं, काहीही सांगतात. सगळंच त्यांच्या म्हणण्यानुसार करत राहिलो तर कसं होणार. ठीक आहे आज कर आराम;पण रोज रोज अशी लोळत राहू नको. नॉर्मल डिलिव्हरी पाहिजे असेल तर सतत बाईने कामं करत राहावं."

हे असं बोलून निघून गेली.

नेहाने सगळं जेवण बनवलं, भांडी घासली.
मनात तर तीची धुसफूस चालली होती.

'महाराणी आराम करत बसली आहे. मलाच सगळं करावं लागतं. होऊ दे एकदा डिलिव्हरी मग कशी कामाला लावते.' तिच्या मनात प्रियाविषयी फार द्वेष होता.


"नेहा, जेवण झालं का भूक लागली आहे." सासूने आवाज दिला.

ते ऐकून तर तिचा पारा चढला; पण सासूला उलट उत्तर कसं देणार.

"हो लगेच वाढते जेवण."

आज खूप दिवसाने तिने एकटीने काम केलं होतं. सवयच सुटली होती कामाची.
तिला प्रियाचा प्रचंड राग आला.


प्रिया जेव्हा डिलिव्हरीसाठी आईकडे गेली तर घरातलं सारं काम तिच्या एकटीवर पडलं होतं.
ती खूप चिडचिड करत होती. मुलीला विनाकारण जोरजोरात ओरडत राहायची.
सासूला तिचं वागणं खटकत होतं. ती प्रशांत आणि योगेश समोर खूप चांगली राहायची. तिचं दुट्टपी वागणं सासू बरोबर ओळखून गेली होती.

योगेशला, वहिनी अगदी साधी भोळी वाटायची.
तिचं वागणं घरात सासू आणि प्रियाला चांगले समजले होते.


प्रियाने मुलाला जन्म दिला. प्रियाला नेहाच्या वागण्याची कल्पना होती. ती सासरी मुलाला घेऊन आली. तिने ठरवलं होतं सगळ्याच कामाचा ताण घ्यायचा नाही. आता शांत बसायचे नाही. योगेशच्या डोळ्यावर अंधविश्वासाची पट्टी आहे,त्यामुळे त्याला सांगून उपयोग नाही. जे ही करायचे ते मलाच करावे लागणार.

काय करणार होती प्रिया?

क्रमशः
भाग दोन (अंतिम) वाचायला विसरू नका.