Login

दुर्वा:भाग 2

A Girl Story


दुसऱ्या दिवशी दुर्वा वेळेच्या दहा मिनिटे आधीच ऑफिसला पोहोचते.... काल अभय सरांनी दिलेल्या फाईल्स तिने रात्री उशिरापर्यंत जागून पूर्ण केल्या होत्या.... तिला कामात कसलीही कसर सोडायची नव्हती.... सरकारी नोकरी असली तरी कामाप्रती असलेली निष्ठा तिने वडिलांकडून वारशाने घेतली होती....


सकाळी अकराच्या सुमारास अभय ऑफिसमध्ये येतो.... कालच्यासारखाच पांढरा शर्ट आणि चेहऱ्यावर तोच गंभीर भाव.... तो थेट आपल्या केबिनमध्ये जातो..... थोड्या वेळाने दुर्वा फाईल्स घेऊन त्यांच्या केबिनमध्ये येते ...


"सर, कालचे रिपोर्ट तयार आहेत," बोलत ती फाईल त्यांच्या समोर ठेवते ....


अभय यांनी चष्म्यातून एकदा तिच्याकडे पाहिले आणि फाईल चाळायला सुरुवात केली.... पाच मिनिटे शांततेत जातात.... दुर्वा तिथेच उभी होती.... अभय यांनी अचानक फाईल बंद केली त्यांच्या चेहऱ्यावर एक छोटासा समाधानाचा भाव उमटले , जे त्यांनी लगेच लपवले..


"छान काम केलंय. मांडणी स्पष्ट आहे. बसून घ्या दुर्वा," ते पहिल्यांदाच थोडे मऊ आवाजात बोलले.


दुर्वा खुर्चीवर बसली. आज तिची नजर टेबलावरच्या त्या फोटो फ्रेमवर गेली, जी काल उलटी होती. आज ती नीट ठेवली होती.


फोटोमध्ये अभय आणि एक पाच-सहा वर्षांची छोटी मुलगी होती. मुलगी अगदी त्यांच्यासारखीच दिसत होती, पण फोटोमध्ये त्यांच्यासोबत कोणतीही स्त्री नव्हती.


"तुमची मुलगी आहे का सर?" दुर्वाने न राहवून विचारले.


अभय यांच्या हातातील पेन क्षणभर थांबले. त्यांनी फोटोकडे पाहिले आणि एक दीर्घ श्वास घेतला.


"हो, परी. माझं जग आहे ती."


"खूप गोड आहे," दुर्वा हसून म्हणाली.


अभय काही बोलले नाहीत. त्यांनी पुन्हा कामात लक्ष घातले.


दुर्वा फाईल उचलून केबिनबाहेर आली, तेव्हा तिला ऑफिसमधील जुन्या कर्मचाऱ्यांच्या कुजबुजी ऐकू आल्या. लंच ब्रेक मध्ये तिने कॅन्टीनमध्ये बसल्यावर शेजारच्या टेबलवरच्या गप्पा ऐकल्या.


"अगं, अभय सरांचं आयुष्य सोपं नाहीये," तिथे काम करणारी वंदना ताई सांगत होती, "तीन वर्षांपूर्वी एका अपघातात त्यांच्या पत्नीचं निधन झालं. तेव्हापासून ते या मुलीला एकटेच सांभाळतात. आई-वडील गावाला असतात, पण त्यांनी दुसरं लग्न करायला नकार दिला. तेव्हापासून ते असेच गप्प गप्प असतात."


दुर्वाला हे ऐकून खूप धक्का बसला. अभय सरांच्या त्या कडक शिस्तीमागे इतकं मोठं दुःख दडलं असेल असं तिला वाटलं नव्हतं.


तिला कालचा तो प्रसंग आठवला, जेव्हा त्यांनी तिला लिफ्ट देऊ केली होती...त्यांना ती किती काही म्हणाली होती....त्याच दुख जे त्यांचा आत आहे कदाचित ते कधी बाहेर पडत नाही त्यांच्या पदाचा आणि स्वभावाचा अडसर येत असावा.


दुपारी पावसाचा जोर वाढला होता. ऑफिसचं काम संपवून दुर्वा निघाली,आज तिने आठवणीने छत्री आणली होती....


ती निघाली तेव्हा तिने पाहिलं की अभय सर त्यांच्या केबिनमध्ये बसून कोणाशी तरी फोनवर खूप काळजीने बोलत होते.


"आई, अगं तिचा ताप उतरला नाहीये का अजून? मी येतोय लगेच... हो, डॉक्टरांना फोन केलाय मी."


अभय घाईघाईत बाहेर आले. त्यांच्या हातातील चावी दुर्वाच्या पायाजवळ खाली पडली. दुर्वा पटकन खाली वाकून चावी उचलून दिली.


"सर, काही प्रॉब्लेम झाला आहे का? परी ठीक आहे ना?" तिने काळजीने विचारले.


अभय यांनी तिच्याकडे पाहिले. त्यांच्या डोळ्यांत आज एक बाप हतबल झालेला दिसत होता.


"ती घरी एकटीच आहे... म्हणजे आई आहे पण तिला सांभाळणं कठीण होतंय. तिला खूप ताप भरलाय."


"सर, मी येऊ का तुमच्यासोबत? थोडी मदत होईल," दुर्वाने मनाचा हिय्या करून विचारले.


अभय क्षणभर विचार करत राहिले. त्यांना कोणाची मदत घेण्याची सवय नव्हती, पण आज परिस्थिती वेगळी होती.


"चालेल, चला," ते इतकंच म्हणाले.


दुर्वा त्यांच्या कारमध्ये बसली.कार अभयच्य घरच्या दिशेन निघाली ....आज ऑफिसची फाईल मागे सुटली होती आणि एका नवीन नात्याची, एका नवीन जबाबदारीची फाईल उघडली जाणार होती.