Login

दुसरी बाजू _ शब्दाविना _ भाग ३(अंतिम)

भावना व्यक्त कराव्यात
स्पर्धा

दुसरी बाजू _ शब्दाविना _ भाग ३(अंतिम)

मित्राने सांगितलं म्हणून शेखरने आपल्याला साडी आणली हे ऐकून राधाचं मन दुखावलं आणि इतके दिवस मनात साचलेल्या तिच्या भावनांचा उद्रेक झाला. कधी काही न बोलणारी राधा तिने अशी काही तोंडाची पट्टी सुरु केली की काही विचारूच नका. तिने मागचं पुढचं सगळं उकरून काढलं.

"अच्छा म्हणजे इतक्या दिवसांनी माझ्यासाठी साडी आणलीत ती पण मित्राच्या सांगण्यावरून. तुम्हाला स्वतःला असे कधीच वाटलं नाही का?
तुम्हाला माझ्या भावनांची काही कदरच नाही. मी तुमच्यासाठी काहीही केलं तरी कधी एक शब्द कौतुकाचा ऐकायला मिळत नाही. तुमच्यासाठी भेटवस्तू आणते परंतु तुम्ही कधी माझ्यासाठी एक साधा मोगऱ्याचा गजरा देखील आणला नाही. किती कंजूसपणा कराल. माझ्या माहेरी येऊन बघा कसे सगळे हसत खेळत जगत आहेत. एकमेकांचे कौतुक करत आहेत. तुमच्या जीवनात उत्साहाचा लवलेश नाही, नुसती मरगळ आहे."

जवळजवळ पाच मिनिटे राधा तोंडाला येईल ते बोलतच होती . राघवला खूपच आश्चर्य वाटले. तिच्या मनात आपल्याबद्दल इतकी कटूता आहे. तिने आपल्याला कधीही बोलून दाखवले नाही. राघवने स्वतःशी विचार केला आपण जाणून-बुजून काही केले नाही पण ही दुखावली गेली आहे. तो तिच्या पाठीवर हात ठेवून म्हणाला,

"अग राधा शांत हो. तुझ्या मनात एवढं सगळं खदखदत होतं. कधीतरी व्यक्त व्हायचं ना. आमच्याकडे अशा पद्धती नाहीत. पण म्हणून मला तुझ्याबद्दल काही वाटत नाही असा त्याचा अर्थ होत नाही. प्रत्येकाला बोलून दाखवण्याची सवय नसते. पण असा भावनांचा कोंडमारा करणं कधीही चांगलं नाही. याचा तुझ्याच आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. इतके दिवस सगळं मनात ठेवलंस. तू जर मला कधी बोलून दाखवलं असतंस तर मी नक्कीच माझ्या वागण्यात बदल करण्याचा प्रयत्न केला असता ग. आता आपलं जन्माचं नातं आहे."

इतक्यात राधा म्हणाली,

"अहो मागून दुनिया मिळते. न मागता एखादी गोष्ट मिळणं याचं अप्रूप फार वेगळं असतं. तुम्हाला नाही कळणार ते."

"अगं राधा मी लहानाचा मोठा झालो तो अशाच वातावरणात. आमचे सगळ्यांचे पण एकमेकांवर खूप प्रेम आहे आणि एकमेकांची काळजी पण वाटते. पण आम्ही कोणीच असं कधी बोलून दाखवत नाही. शिवाय मला जास्त नातेवाईक पण नाहीत. कुठे जास्त जाणं येणं नाही. त्यामुळे मला हे तुझ्यासारखे व्यक्त होणे जमत नाही. तुझ्या माहेरी तू अशा वातावरणात मोठी झाली म्हणून तुझ्याही तेच अंगवळणी पडलं आहे. मी प्रामाणिकपणे सांगतो मी हे जाणूनबुजून केलं नाही. राधा माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. तू मला बघता क्षणीच आवडलीस म्हणूनच मी तुला मागणी घातली आणि आता मी तुला वचन देतो की ह्या पुढे मी माझ्या वागणुकीत बदल करेन. तुला भावना व्यक्त केलेल्या आवडतात मी आता तसाच वागेन. तू पण मला वचन दे की यापुढे तुझ्या मनात जे काही येईल ते तू स्पष्टपणे मला बोलून दाखवशील. राग, लोभ, मत्सर सारं काही वेळच्यावेळी बाहेर आलेलं चांगलं असतं. नात्यात मोकळेपणा असायला पाहिजे. तुझं म्हणणं मला पटलं. पण जसे चांगल्या भावना बोलून व्यक्त करायच्या असतात तसेच एखादी न आवडलेली गोष्ट लगेच बोलून मोकळं व्हायचं. आता मनात अजिबात कटूता ठेवू नकोस."

"राघव मी भावनेच्या भरात तुम्हाला नाही नाही ते बोलले. मला माफ करा. मी तुमची बाजू समजून घेतली नाही. सगळ्यांना एकाच तराजूत तोलायचं नाही हे आता मला कळलं."

"राधा आता तुला माझ्याकडून कधीच तक्रारीची जागा राहणार नाही ह्याची मी काळजी घेईन. आपल्यात आता कोणताच गैरसमज असणार नाही. माझे काही चुकलं तर तू ते मनात न ठेवता मला स्पष्टपणे सांग. राणी सरकार आता तरी खुश ना! बोला आज आपली सुट्टी आहे. आपण बाहेर फिरायला जाऊया आणि बाहेरूनच जेवून येऊ."