जलदलेखन स्पर्धा फेब्रुवारी २०२६
विषय :दुसरी बाजू
शिर्षक :दादांच्या' आठवणीत सुनेत्रा भाग -१
प्रिय दादांना, सप्रेम नमस्कार...
आज तुम्ही गेलात आणि अवघ्या महाराष्ट्राचा 'दादा' हरपला. जनतेसाठी तुम्ही एक कणखर आणि लोक आदर लाभलेले नेते होतात, पण माझ्यासाठी? मी तर तुम्हाला 'सुनेत्राचा अजित' म्हणूनच ओळखले.
जनतेचे तुम्ही लाडके दादा होतात, त्यामुळे नकळत माझ्याही तोंडी तोच शब्द बसला.
पण आज काळजाच्या कोपऱ्यात दडून राहिलेला तो अबोल संवाद शब्दांतून बाहेर पडू पाहतोय.आपल्या ३८ वर्षांच्या सहवासाचा पट आज डोळ्यांसमोरून सरकत आहे.
या आयुष्याने खूप काही दिले, पण आज जाताना खूप काही हिरावूनही नेले.
मी मराठवाड्यातील धाराशिव जिल्ह्यातील तेर गावची माहेरवाशीण. बाजीराव पाटील यांची कन्या आणि पद्मसिंह पाटील यांची बहीण.
एका राजकीय आणि श्रीमंत वातावरणातून आलेली मी, देवगिरीच्या मातीतील संस्कार घेऊन तुमच्या बारामतीत 'पवार' घराण्याची सून म्हणून पाऊल ठेवले आणि तुमच्या स्वप्नांशी समर्पित झाले.
आपल्या घराण्याची 'घोषा' पद्धत, ती शिस्त आणि तो राजस थाट. त्या मोठ्या एकत्र कुटुंबात सामावून घ्यायला मला सुरुवातीला थोडा वेळ लागलाच.
पण आई-वडिलांची शिकवण होती की, खांद्यावरचा पदर कधी ढळू द्यायचा नाही आणि जिभेवर कधी 'अरे-तुरे'ची भाषा आणायची नाही. मी तसेच वागले. प्रसंगी मन दुखावले गेले, डोळे पाणावले, पण घराची अब्रू म्हणून 'इकडच्या गोष्टी तिकडच्या कानाला' कधी कळू दिल्या नाहीत.
लोक म्हणतात, दादांनी खूप प्रगती केली. पण दादा, मला सांगा, एकमेकांची साथ असल्याशिवाय का तुम्ही हा प्रवास करू शकला असता?
मुख्य म्हणजे या प्रवासात तुम्ही मला कितीसा वेळ दिलात? मी तर म्हणेन काहीच नाही.
मुले झाली, ती मोठी झाली, घराचा व्याप वाढला. मुलांचे संगोपन असो वा घराची सर्व जबाबदारी, तुम्ही सर्व माझ्या खांद्यावर टाकून स्वतःला जनतेसाठी वाहून घेतले.
तुम्ही नेहमी म्हणायचात, "सुनेत्रा, तू घराचा सगळा व्याप सांभाळतेस म्हणूनच मी राजकारणात इतका सक्रिय राहू शकतो." तुमचे हे एक वाक्य मला सुखावून जायचे खरे, पण त्याच एका वाक्याच्या जोरावर मी अख्खा संसार रेटला.
एक सर्वसाधारण स्त्री म्हणून मलाही वाटायचे की कधीतरी तुम्ही माझ्या शेजारी निवांत बसावे.
राजकीय गणितांशिवाय माझ्या मनात काय चालले आहे, हे विचारावे. पण तुमच्या बोलण्यात नेहमी सभा, बैठकी, लोकसभा आणि राजकारणाचेच वारे असायचे.
मला कधी विचारलेत का हो "सुनेत्रा, तुला काय हवे आहे?" मला कायम गृहीत धरले गेले. माझे दुःख ऐकायला, माझ्या मनातील घालमेल शांत करायला तुम्हाला कधी वेळच मिळाला नाही. ती ओढ अपुरीच राहिली.
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा