दुसरी बाजू - भाग १
"कुणाल, अरे हे काय ऐकतेय मी? लग्नाला नकार दिलास तू! तुला तर फोटो पाहिल्या पाहिल्या ती मुलगी आवडली होती ना! मग आता असे काय झाले?"
छाया ताई म्हणजेच कुणालची आई त्याच्याशी चिडून बोलत होती. त्यांना काहीच कळत नव्हते. कालपर्यंत तिच्याबद्दल सर्व काही जाणून घेण्यात त्याने बराच वेळ घालवला होता आणि आज अचानक असे काय झाले?
छाया ताई म्हणजेच कुणालची आई त्याच्याशी चिडून बोलत होती. त्यांना काहीच कळत नव्हते. कालपर्यंत तिच्याबद्दल सर्व काही जाणून घेण्यात त्याने बराच वेळ घालवला होता आणि आज अचानक असे काय झाले?
"अरे बोल तरी घडाघडा! तिच्या घरच्यांना काय सांगणार मी! कालपर्यंत उतावीळ असलेला आमचा मुलगा आज लग्नाला नकार देतोय!"
आई अजूनही रागारागात बोलत होती. कुणाल मात्र शांतपणे आईचे ऐकून घेत बसून होता.
"अग का त्याच्यावर इतके ओरडत आहे. काहीतरी कारण असेल ना त्याच्या ह्या अशा वागण्यामागे. तू शांत हो आधी. उगाच तणतण करून घेऊ नकोस. वेळ आली की बोलेल तो स्वतःच आपल्याशी; त्यामुळे आपण वाट बघुया. जा तू नाश्त्याची तयारी कर, गोळ्या घ्यायच्या असतात ना तुला!"
दिलीपराव म्हणजेच कुणालचे वडील चिडलेल्या बायकोला समजून सांगत शांत करण्याचा प्रयत्न करत होते. यातून त्यांची काळजी पण दिसून येत होती.
"तुम्ही तर त्याला काही बोलूच नका! तुम्ही नेहमी मुलांना पाठीशी घालणार, पण जाब विचारणार नाही. आता पुढे काय करायचं? त्या लोकांचा फोन आल्यावर काय सांगणार आहोत आपण? याचा विचार तरी केला आहे का?"
छाया ताई किचनमध्ये गेल्या, पण तरीही त्यांचे बोलणे सुरूच होते. काम करताना हात तर चालूच होते पण तोंडाचा पट्टा देखील सुरूच होता.
"कुणाल, काय झाले नेमके? मला तरी सांगशील का?"
दिलीपराव मुलाला विचारत होते, पण तो खिडकीतून बाहेर बघत शांत उभा होता. त्याला सध्या कोणाशीच काहीच बोलायचे नव्हते. मनातून तो सुद्धा दुखावला गेला असणार हे त्यांना स्पष्ट दिसत होते; त्यामुळे त्यांनी वाट बघितली. त्याला स्वतः ला वेळ द्यायचे ठरवले.
"बरं ठीक आहे. तुला जेव्हा सांगायचं तेव्हा सांग, पण असा शांत राहू नको. तुझी आई बडबड करतेय ती मनाला लावून घेऊ नकोस. तुला तर तिचा स्वभाव माहितीच आहे ना! उगाच स्वतः ची चिडचिड करून घेत असते आणि बीपी वाढवून घ्यायचे काम करते. मी सांभाळतो तिला, पण तू काही बोलू नकोस."
दिलीपरावांच्या बोलण्यात काळजी दिसून येत होती. वयात आलेल्या मुलाशी कसे मैत्रीपूर्वक बोलायचे हे त्यांना चांगलेच समजत होते आणि म्हणूनच त्यांनी कुणालला वेळ द्यायचे ठरवले.
आज सकाळी सकाळी घरात वातावरण चांगलेच पेटले होते. मुलाने त्याच्या बाजूने लग्नाला नकार दिला होता. पण का? त्याचे कारण मात्र सांगायला तो तयार नव्हता. यामागे त्यांना काहीतरी कारण असेल असे वाटतं नव्हते. नक्कीच याचे काहीतरी बाहेर सुरू असणार; म्हणून नकार दिला असेल. ही शंका त्यांच्या मनात येत होती.
क्रमशः
सौ तृप्ती कोष्टी ©®
रायगड
रायगड
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा