चॅम्पियन्स ट्रॉफी 2025
दुष्काळी रात्र
" हॅलो, कोणी आहे का इथे?" सुहास आजूबाजूला सर्वत्र शोध घेत म्हणाला.
" कुठे आलो आहोत यार सुहास आपण? तुला सांगत होते, रात्रीच्या वेळेस हायवेवरच एखाद्या हॉटेलमध्ये थांबून सकाळी इथला पुढचा प्रवास करू, पण तू ऐकशील तर खरं." स्नेहा काहीशी चिडूनच सुहासला म्हणाली.
" अगं, मला काय माहीत की, आपली गाडी अशी मध्येच इथे आत शिरून ह्या गावा जवळच बंद पडेल. त्यात हे गाव असं की, इथे घरं आहेत, माणूस तर लांबच एक चिटपाखरू नाही." सुहास स्नेहाला म्हणाला.
" मग नक्की काय असेल ते इथे? मला भीती वाटते सुहास." स्नेहा घाबरून सुहासला म्हणाली.
" काही नाही गं, दुष्काळ ग्रस्त भाग वाटतोय. जास्त दुष्काळ पडल्यामुळे बहुतेक संपूर्ण गावच्या गावच इथून उठून गेलेला वाटतोय. अंधारात काही कळून पण येत नाही. सकाळी ते आपल्याला कळेलच, पण आता सध्या तरी आपल्याकडे इथे थांबण्याशिवाय काही पर्याय नाही. फोनला पण नेटवर्क नाही, म्हणून आता आपल्या वॅनमधून सामान बाहेर आणून इथेच जेवण करून राहू मस्त आणि तू काय घाबरते म्हणतेस. आपण आपल्या वॅनमधून दुनियाभर फिरतो. ह्यापेक्षा किती तरी भयानक जागांवर राहतो. एका रात्रीचा प्रश्न आहे. सकाळी आपण लवकर निघून जाऊ." सुहासने स्नेहाची समजूत काढली.
सुहास आणि स्नेहा दोघे कॉलेजपासून एकत्र होते. त्यांचं एकमेकांवर खूप प्रेम होतं. त्यांचं दोघांचं स्वप्न देखील एकच होतं ते म्हणजे भटकंती करणं. त्यांनी वर्षभरापूर्वी लग्न केलं. लग्नानंतर मिळून एक वॅन विकत घेतली आणि त्यावर पैसे खर्च करून तिला अगदी घरासारखे सुख सोयींचं बनवलं.
त्यात त्यांना झोपायला जागा होती. जेवण बनवायला गॅस आणि शेगडी होती. वीज पुरवठे साठी गाडीवर सोलर पॅनल बसवले होते. तिथे बाजूलाच एक छोटी पाण्याची टाकी बसवली होती. त्या वॅनमध्ये त्यांनी लागणाऱ्या सगळ्या सुविधा बसवून घेतल्या होत्या.
सुट्टीत ते दोघे त्यांची वॅन घेऊन गावोगावी फिरायला जात असत, पण ह्यावेळी त्यांचा अंदाज चुकला. ते एका सुंदर ठिकाणी जाण्यासाठी निघाले, पण त्यांना उशीर झाल्यामुळे घाई घाईत त्यांनी हायवे वरून शॉर्टकट घेतला आणि एका अनोळखी गावात येऊन पोहोचले.
तिथे पूर्णपणे सर्वत्र अंधार होता. रातकिड्यांचा देखील आवाज नव्हता. अंधारात पुसटशी घरं तर दिसत होती, पण त्या घरांमध्ये माणसे नव्हती.
त्यांची गाडी त्या गावाजवळ पोहोचताच बंद पडली. त्यांनी बाहेर उतरून टॉर्चच्या सहाय्याने जवळच्या घरांजवळ जाऊन त्यात कोणी आहे का हे बघण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना तिथे कोणीच दिसले नाही.
शेवटी त्यांनी तिथे रात्र काढण्याचा निर्णय घेतला. त्याशिवाय त्यांच्या जवळ कसला पर्याय नव्हता. तिथे राहण्यासाठी त्यांना काही अडचण नव्हती कारण त्यांच्याकडे तसं पुरेसं सामान होतं.
सुहासने गाडीतून गॅस आणि छोटी शेगडी बाहेर काढून जमिनीवर ठेवली. मग छोट्या खुर्च्या खाली ठेवून दोघे खाली बसले. सुहासने जेवणाचं सामान आणून स्नेहाकडे दिले. तिने साधा एकच भात लावायची तयारी सुरू केली.
ते दोघे त्या तयारीत गुंतल्यावर त्यांना जाणवलं की, त्या परिसरात अचानक गारा वाढू लागला होता. त्यांना वाटलं रात्रीची वेळ आहे, म्हणून कदाचित गार वारा वाहत असावा. त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं, पण हळू हळू सर्व बाजूने त्याचं प्रमाण वाढू लागलं होतं.
स्नेहाने सुहासला टोपातील तांदूळ धुवून आणायला सांगितले. त्याने टोपात तांदूळ घेतले आणि गाडी जवळ जाऊन एका बाटलीतले पाणी त्या टोपात ओतले.
पाणी टोपात ओतत असताना त्याला त्याच्यापासून काही अंतरावर भिंतीच्या मागून काही आकृत्या इथून तिथून जाताना जाणवल्या. ते देखील त्याने दुर्लक्ष केले आणि तो ते तांदूळावरच पाणी ओतून टाकायला बाजूला वाकला आणि त्याने त्यावर हात ठेवून पाणी खाली ओतायला सुरुवात केली.
संपूर्ण पाणी खाली ओतताच त्याने त्याची नजर वर करून समोर बघितले आणि तो जागीच थिजून गेला. त्याला दिसले की त्याच्या अगदी नजर समोर त्याच्या चेहऱ्याच्या जवळ एक विचित्र भयानक चेहरा त्यालाच टक लावून बघत होता.
ते दिसताच तो घाबरून मागे झाला आणि पाया मागे दगड असल्यामुळे तो मागच्या मागे पडला आणि घाबरून जोरात ओरडला. त्याचा तो आवाज ऐकून स्नेहा धावतच त्याच्या जवळ येऊन त्याला काय झाल्याचं विचारू लागली.
त्याच्या मुखातून शब्द फुटत नव्हते. तो बोटाने फक्त समोर इशारा करू लागला. तिने त्या दिशेला पाहिलं पण तिला तिथे काहीच दिसले नाही. तिने गाडीतून पाण्याची बाटली आणून त्याला पाणी पाजलं.
" स्नेहा, इथे काही तरी विचित्र आहे. खूप भयानक ! मला तो दिसला अगदी असा माझ्या डोळ्यासमोर उभा राहून बघत होता. विचित्र भयानक चेहऱ्याचा. त्याला अजिबात नव्हते, अगदी सडपातळ चामडी गळालेली होती त्याची. वाकलेला हातात काठी होती त्याच्या." पाणी पिऊन झाल्यावर सुहास स्नेहाला सगळं नीट सांगू लागला.
त्यांचं बोलणं चालू असतानाच पुन्हा आता त्या दोघांना सुद्धा त्या घरांच्या आजूबाजूने अंधारात किती तरी आकृत्या इथून तिथून अतिशय वेगाने या जा करताना नजरे समोर दिसू लागल्या. आता त्यांना कळून चुकले की, ते चुकीच्या जागेवर आले होते.
ते लगेच जागेवरून उठले आणि धावतच गाडी मध्ये जाऊन बसले आणि त्यांनी गाडीचा दरवाजा बंद करून घेतला आणि आत भीतीने एकमेकांना बिलगून बसले.
आत गेल्यावर हळू हळू हिंमत करून ते दोघे काचेतून बाहेर पाहू लागले. इतका वेळ त्यांना बाहेर एकही व्यक्ती दिसत नव्हती, पण आता गाडीत बसल्यावर त्यांना समोरून आजूबाजूने माणसांचा वावर दिसू लागला.
पण ती माणसं वेगळीच दिसत होती. त्यांचे प्रत्येकाचे शरीर एकदम सुकलेले होते जणू त्यांच्यात जीवच नव्हता. त्यांना किती तरी दिवस खायला प्यायला मिळाले नव्हते. आणि मुख्य म्हणजे त्यातील प्रत्येकाचे चेहरे उदास होते. जणू ते किती तरी वर्ष हसलेच नव्हते.
सुहास आणि स्नेहा घाबरतच गाडीतून त्यांना बघत होते, पण त्या माणसांचे त्यांच्याकडे लक्ष नव्हते ते फक्त इथून तिथून आता चालत होते. पण मध्येच अचानक त्यांना काय झाले कोणास ठाऊक ? ते सगळे एक एक करून जमिनीवर कोसळू लागले. त्यातील एकही आता वाचला नव्हता.
ते बघून तर त्या दोघांना धक्काच बसला. ते काही बोलणार करणार इतक्यात ती जमिनीवर कोसळलेली माणसे अचानक उठून उभी राहिली आणि सगळे एकत्र त्यांच्या दिशेला रागाने बघू लागली आणि पुढच्याच क्षणी सर्वांनी त्यांच्या गाडीच्या दिशेला धाव घेतली. त्यांना आपल्या दिशेला धावत येताना बघून दोघांचे शरीर भीतीने थरथरू लागले.
ते सगळे धावत त्यांच्या गाडी जवळ आले. त्यांच्या गाडीवर जोरजोरात थापा मारू लागले. त्यातले काही पुढून तर काही बाजूने जनावरा सारखे त्यांच्या गाडीवर चढले. तो सगळा प्रकार बघून दोघांना दरदरून घाम फुटला. त्यांनी आपले डोळे बंद करून एकमेकांच्या मिठीतच देवाच्या नावाचा धावा सुरू केला.
' टक... टक...' बऱ्याच वेळाने त्यांना गाडीच्या काचेवर कोणी तरी ठोठावल्याचा आवाज ऐकू आला. त्या दोघांनी हळू हळू आपले डोळे उघडले. आता बाहेर हळू हळू उजाडू लागलं होतं.
त्यांनी सुहास बसून असलेल्या बाजूच्या खिडकीच्या दिशेला पाहिलं. तिथे त्यांना एक गावचा पोशाख धारण केलेला म्हातारा माणूस त्यांच्याकडे पाहत असलेला दिसला. सुहासने भीत भीत काच खाली केली.
" काय पाहुणं, कोण तुम्ही इथं काय करताय?" काच उघडताच तो बाहेरचा माणूस त्यांना विचारू लागला.
त्याचं ते बोलणं ऐकून त्यांना नक्की झालं की, तो माणूसच होता. ते दोघे गाडीतून बाहेर उतरले.
" आजोबा, आम्ही जवळच फिरायला आलो होतो, पण काल रात्री इथून जाताना आमची गाडी इथे बंद पडली आणि त्यानंतर आम्हाला खूप विचित्र अनुभव आले. " सुहास सांगत असताना त्याला रात्रीची आठवण झाली आणि तो पुन्हा शांत झाला.
" व्हयं पोरा, तुम्हालाच नाही तर, रात्रीच्या वक्तास जो कोणी इथं येतो त्याला ते दिसतात." तो माणूस त्यांना म्हणाला.
" ते म्हणजे कोण बाबा? ते कोण होते किती भयानक होते ते." स्नेहाने त्यांना विचारले.
" ते म्हणजे पोरी इथले गावकरी. लय वर्षा पूर्वी इथं बराच दुष्काळ पडला हुता. माणसाला खायला अन्न पियाला पाणी नवतं. त्या वेळेस सरकारने त्यांची कायबी मदत केली नाही. बिचारी सगळी बिन अन्न पाण्याची तडफडून मेलीत. मेल्यावर त्यांच्या शरीराचे गिधाडांनी लचके तोडले. तवा पासून त्यांच्या अतृप्त आत्मा इथे फिरत असतो. जो कोणी बाहेरून येईल आणि जर त्याच्या जवळ पाणी असेल तर त्यांना ते सोडत नाहीत, तुमच्या जवळ पण पाणी असणार." इतकं बोलून तो माणूस त्यांच्या गाडीच्या गोल फिरू लागला.
गोल फिरताना त्यांच्या गाडीच्या सगळ्याबाजूला जमिनीवर पाणी सांडलेले दिसले. सुहासने तपास केल्यावर समजले की, त्यांच्या गाड्यावर असलेली टाकी फोडून त्यातील पाणी सर्वत्र पसरलं होतं. मग त्या माणसाने पुढे जाऊन गाडीत वाकून बघितलं तेव्हा त्याला आत देवाचा फोटो दिसला आणि त्याने त्याला नमस्कार केला.
" ह्या फोटोमुळे तुम्ही वाचलात पोरांनो. त्यामुळे ते तुम्हाला काही करू शकले नाहीत. नाही तर आता तुम्ही पण त्यांच्यापैकी एक असता. आता इथं अजाबात थांबू नका. जावा आपल्या घराला. मी बी जातो माझ्या गुरांना घेऊन इथून. तुमची गाडी बघून इथं आलो होतो मी." इतकं बोलून तो माणूस तिथून निघून गेला. त्या दोघांनीही पुन्हा एक नजर त्या गावावरून फिरवली, तर सगळी घरं त्यांना अर्धी तुटलेली वगैरे दिसू लागली. रात्री सारखं आता तिथे काहीच नव्हतं.
पुढे क्षणाचाही विलंब न करता सुहास आणि स्नेहाही आपल्या गाडीत बसले. देवाचं नाव घेऊन सुहासने गाडी सुरू केली आणि आता पहिल्या प्रयत्नात गाडी सुरू झाली आणि ते अजून कसला विचार न करता तिथून निघू लागले.
निघताना सुहासने तो माणूस गेला असलेल्या दिशेला एकदा पाहिले, तर त्याला दूरदूर पर्यंत तिथे कोणीच माणूस किंवा कोणतंच जनावर दिसत नव्हतं.
समाप्त.
लेखक : चेतन सुरेश सकपाळ.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा