Login

दुसरी बाजू _ शब्दाविना _ भाग २

भावना व्यक्त कराव्यात
स्पर्धा

दुसरी बाजू _ शब्दाविना भाग २

आज राघवचा वाढदिवस म्हणून राधाने त्याच्यासाठी नवीन शर्ट आणला. तिने सकाळीच त्याला शर्ट दिला म्हणजे तो घालून त्याला ऑफिसला जाता येईल. राघवने तो घेऊन कपाटात ठेवला. शर्ट कसा आहे ते राघवने सांगितलं नाही आणि राधाने काही विचारले विचारले नाही. हळव्या मनाची राधा आतून खूप दुखावली गेली परंतु ती काही न बोलता गप्प बसली. राधा मनाने हळवी असली तरी खूप हौशी होती. तिला आपल्या माणसांना त्यांच्या वाढदिवसाला भेटवस्तू देणं खूप आवडत असे. एकमेकांना भेट देऊनच नाही तर दोन शब्द प्रेमाने बोलून सुद्धा नात्याची दोर अजून मजबूत करता येते असं राधाचं प्रामाणिक मत होते. भावना व्यक्त करायला हव्या असे तिला वाटायचं.

त्यानंतर अजूनही दोन-तीन वेळा असाच प्रकार घडला. तेव्हाही राधा काही न बोलता मनातच कुढत राहिली. ती मनात विचार करू लागली की राघवला माझ्याबद्दल काही वाटतच नाही. किती कोरडेपणाने वागतो आपल्याशी. आपण मात्र त्याच्यासाठी किती काय काय करत असतो, पण कधी एक कौतुकाचा शब्द याच्या तोंडून निघत नाही किंवा कशाबद्दलही हा एकही शब्द तोंडातून कौतुकाचा काढत नाही.

राधाचा आधीचा उत्साह आता काही अनुभवानंतर थोडा मावळला होता. आता ती स्वतःहून काही करायचं म्हणत नव्हती. तिच्या वागण्यातील बदल सर्वांना जाणवत होता. तरीही कुणीही म्हणजे अगदी शेखरनेही त्याची दखल घेतली नव्हती. तिच्या मनात येत होतं आपल्याला पाहून मागणी घालणारा शेखर इतका रुक्ष कसा वागू शकतो. तिला आपल्या दादा वहिनी मधील रोमँटिक वागणं खूप आवडायचं. दोघेही एकमेकांना खूप जपायचे. असं नाही की त्यांच्यात अगदीच भांडण होत नसे. पण ते झाल्यानंतर ते दोघं एकमेकांशी जास्तच प्रेमाने वागायचे. आई आणि बाबांच्या लग्नाला इतकी वर्ष झाल्यानंतरसुद्धा त्यांच्यातील प्रेम लोणचे जसं मुरल्यावर जास्त चविष्ट लागते त्याप्रमाणेच त्यांचे प्रेम दिवसागणिक जास्त मुरत जातं आहे. ते जरी हल्लीच्या तरुणाईप्रमाणे एकमेकांना सारखं सारखं आय लव्ह यू म्हणत नसले तरी त्यांच्या कृतीतून ते नेहमीच दिसत आलं आहे.

साहजिकच राधा अशा वातावरणातून आल्यामुळे तिच्या आपल्या नवऱ्याबद्दल आणि सासू
सासऱ्यांबद्दल त्याच अपेक्षा होत्या. आता राधाच्या लग्नाला वर्ष होत आलं होतं. आयुष्य म्हणजे एक रोजचे रहाटगाडगं झालं होतं. अशातच राधाला एक सुखद आश्चर्याचा धक्का मिळाला. एका रात्री दोघेच बेडरूम मध्ये असताना शेखरने हळूच तिच्या हातात एक बॉक्स दिला आणि तिला तो उघडून बघायला सांगितला. खरं तर ती मनातून खूप मोहरुन गेली होती. तिने तो उघडून पाहिला. त्यात तिच्या आवडत्या मोरपिशी रंगाची एक अतिशय सुरेख सिल्कची साडी होती. तिला ती खूपच आवडली होती परंतु तिने मुद्दामहून काहीच प्रतिक्रिया दर्शवली नाही.

"राधा तुला साडी आवडली ना!"

"हुं" उत्तरादाखल तिने फक्त हुंकार भरला. आपण एखादी सुंदर कृती केल्यावर जर हा काही प्रतिक्रिया दर्शवत नाही मग मी तरी कशाला सांगू.

"अगं माझा एक मित्र त्याच्या बायकोसाठी साडी घ्यायला जात होता. त्याने मलाही सोबत नेलं. साड्यांच्या दुकानात मी पहिल्या प्रथमच गेलो. तो मात्र अगदी सराईतासारखा दुकानदाराला ही साडी दाखवा, ती दाखवा सांगत होता. मला खूप आश्चर्य वाटलं. मी त्याला म्हटलं,

"काय रे तू नेहमीच साडी खरेदी करायला येतोस का?"

"मी एकटा हिला सरप्राइज द्यायचं असेल तेव्हा येतो पण एरव्ही आम्ही दोघं एकत्र येतो. तिची आवड मला कळली आहे. काय रे शेखर तुझं पण हल्लीच लग्न झालं आहे ना. मग तू पण घे ना वहिनींसाठी एखादी साडी. बायकोला अधून मधून नवऱ्याने सरप्राइज दिलेलं आवडतं. तू तुझ्या पसंतीची साडी घे आणि तिच्या चेहऱ्यावरचा आनंद बघ."

मग मी पण तुला सरप्राइज म्हणून ही माझ्या आवडीची साडी आणली."

शेखरला वाटलं आपण साडी आणली म्हणून राधाला खूप आनंद झाला असेल. त्याने उत्साहाने तिच्याकडे पाहून तिच्या चेहऱ्यावरचे भाव वाचायचा प्रयत्न केला.

(शेखरला अपेक्षित प्रतिसाद राधाकडून मिळाला अथवा नाही पाहूया पुढील भागात)