स्पर्धा
दुसरी बाजू _ शब्दांविना _ भाग १
"उद्या ऑफिसला सुट्टी आहे तर मी सकाळी ब्रेकफास्ट साठी एकदम क्रिस्पी मुगाचे डोसे आणि चटणी करेन. एरव्ही ऑफिसच्या घाईत असे काही करायला जमत नाही ना. तुम्हाला सर्वांना आवडतात ना!" नवीनच लग्न होऊन शेखर सबनिसांच्या घरी आलेली राधा अगदी उत्साहाने बोलत होती. डायनिंग टेबलवर ब्रेकफास्ट साठी बसलेला तिचा नवरा शेखर, सासूबाई मालती ताई, सासरे रमेशराव तिघांनीही तिला जास्त प्रतिसाद न देता फक्त `हुं ` असा हुंकार दिला. तिला वाटले सगळे खाण्यात बिझी आहेत म्हणून जास्त काही बोलले नसावेत.
राधा म्हणजे अगदी बोलघेवडी, उत्साहाने सळसळणारी! तिला सतत समोरच्या व्यक्तीशी संवाद साधायला आवडायचे. राधा दिसायला देखणी, गौर वर्ण, बोलके टपोरे डोळे, मध्यम बांधा, उजव्या गालावर बोलताना पडणारी मोहक खळी पाहणाऱ्याला भुरळ घालायची. तिच्या रेशमी सरळ केसांची कमरेपर्यंत रुळणारी एक वेणी बघणाऱ्याला वेणीच्या पेडांमध्ये गुंतवून ठेवायची. सावळ्या वर्णाचा शेखर सुद्धा
पावणेसहा फूट उंच. नागमोडी केसांचा भांग पाडून त्याच्या विशाल भालप्रदेशावर येणारी झुलपे त्याला शोभून दिसायची. अशा हँडसम व्यक्तिमत्वाच्या शेखरकडून राधाला मागणी आल्यावर ती आणि तिच्या घरचे नाही म्हणूच शकले नाहीत.
पावणेसहा फूट उंच. नागमोडी केसांचा भांग पाडून त्याच्या विशाल भालप्रदेशावर येणारी झुलपे त्याला शोभून दिसायची. अशा हँडसम व्यक्तिमत्वाच्या शेखरकडून राधाला मागणी आल्यावर ती आणि तिच्या घरचे नाही म्हणूच शकले नाहीत.
राधाच्या माहेरी आई बाबा, दादा वहिनी असे सारे खूप आनंदाने एकमेकांची काळजी घेत राहत होते. तिथे सगळे एकत्र असल्यावर हास्यविनोद, गप्पा गोष्टीना अगदी ऊत यायचा. प्रत्येकाचे वाढदिवस, लग्नाचे वाढदिवस उत्साहाने साजरे केले जायचे. जेवणात काहीतरी गोडाधोडाचे असायचे. कधी सर्व जण बाहेरच हॉटेल मध्ये जेवायला जायचे. प्रत्येक वेळी महागाचे असे नाही परंतु काहीतरी भेटवस्तू दिली जायची. दादा वहिनीला सर्वांसमोर एक आणि एकांतात एक अशा दोन वस्तू द्यायचा. वहिनी मैत्रीच्या नात्याने तिला सगळं सांगायची. त्यामुळे त्यांच्या जीवनात एक प्रकारचे चैतन्य होते.
इथे राधाच्या सासरी सुरुवातीला राधाने त्याच पद्धतीने वागायचा प्रयत्न केला. ती सर्वांच्या आवडीचे पदार्थ जेवणात बनवू लागली. कधी जेवणात दोन भाज्या, एखादी साईड डिश दिसू लागली. तेव्हा तिचं कौतुक होण्या ऐवजी मालती ताई तिला म्हणाल्या,
"अगं राधा सणावारी ठीक आहे परंतु रोजचे जेवण पोळी, भाजी वरण भात इतकेच असावे. आमच्याकडे शरीराला अशा चोचल्यांच्या सवयी नाहीत बरं."
नाही म्हटलं तरी राधाचं मन खट्टू झालं. तरी तिने मनाला समजावलं आज न उद्या आपण कधीतरी ह्यांच्या स्वभावात बदल घडवू शकू. ती सर्वांशी त्याच पद्धतीने वागत होती. रमेशराव आणि मालती ताई दोघेही शिक्षकी पेशातून निवृत्त झाले होते. तिला वाटायचं शाळेत दोघांनाही खूप बोलावं लागत असावं म्हणून कदाचित ते घरी आल्यावर जास्त बोलत नसावेत. त्यांच्या स्वभावामुळे शेखर पण असाच अबोल झाला असावा. त्या दिवशी असंच झालं. आईंचा वाढदिवस म्हणून तिने ऑफिसमधून येताना त्यांच्यासाठी सुंदर साडी, मोगऱ्याचा गजरा, काजू कतली आणली. शेखर घरी आल्यावर तिने आईंचं औक्षण केलं, त्यांना आणलेल्या वस्तू दिल्या. तिने जाहीर केलं की रात्री आपण सगळे आज बाहेर जेवायला जाऊया. लगेच पुन्हा मालती ताई कडाडल्या,
"राधा हा काय पोरखेळ आहे. वाढदिवस साजरा करायला मी काही लहान मुलगी आहे का! ही असली थेरं इकडे चालणार नाहीत."
राधाने असहाय नजरेने शेखरकडे पाहिलं. तिला वाटलं तो आपल्या बाजूने काही बोलेल. पण तो काहीच बोलला नाही. त्या नंतर तिनें ठरवलं की जे काही साजरे करायचे ते आपण आणि शेखर आपल्यातच करू. कितीही झालं तरी हे आपलं सासर आहे. इथल्या रितीभाती वेगळ्या असू शकतात. माहेरच्या वातावरणामुळे राधा खूप समंजस होती. ती कधीही कुणाला उलटून बोलणाऱ्यातली नव्हती. पण तिच्या मनाला वाईट वाटायचं.
(राधाच्या हौशी स्वभावाला शेखर कशी साथ देईल पाहूया पुढील भागात)
क्रमशः
©️®️सीमा गंगाधरे
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा