Login

दुसरीही मुलगीच झाली..

दुसरीही मुलगीच झाली.. कथा तिच्या अस्तित्वाची..
दुसरीही मुलगीच झाली…
©अनुप्रिया


“अभिनंदन! मुलगी झाली… गोड सुंदरशी..”

डिलिव्हरी रूमचं दार हळूच उघडून नर्सने हलक्या हसऱ्या चेहऱ्याने सांगितलं. तिच्या चेहऱ्यावरचं हसू पाहूनही सायलीच्या नवऱ्याच्या चेहऱ्यावरचं हसू मात्र हरवलेलं.. त्याच्या आईने तर लगेच दुःखाने सुस्कारा सोडला.,

“अगं बाई., दुसरीही मुलगीच झाली.. अरे रामेश्वरा, आता आमच्या वंशाला कोण रे पुढे नेणार?”

सायलीच्या कानावर त्यांचे शब्द पडले. थकलेल्या शरीरापेक्षा आता तिला मन जास्त थकलेलं वाटू लागलं.

पहिली मुलगी ‘आर्या’ जन्मल्यावर घरात आनंदाचा जल्लोष झाला होता; पण थोड्याच दिवसांनी एका मोठ्या वाक्याने वातावरण हळूहळू बदलायला लागलं.

“पुढच्या वेळी मुलगा झाला तर बरं.”

सायलीने तेव्हा जास्त मनावर घेतलं नव्हतं. पण प्रत्येक वाढदिवशी, प्रत्येक उत्सवात, प्रत्येक छोट्याशा प्रसंगात हे वाक्य परत परत यायचंच.

“आर्याला अजून एक भावंडं नको का? आणि तोही भाऊच असायला हवा. भाऊ नसेल तर कसली मजा?”

“मुलगा असता तर घराला आधार मिळाला असता.”

सायली हसून विषय टाळत असायची पण मनात मात्र त्यांचं बोलणं सलत राहायचं.

सायलीला पुन्हा दिवस गेले. सर्वांच्या आशा पल्लवीत झाल्या. सगळ्यांच्या चेहऱ्यावर अपेक्षेचा प्रकाश होता. तिच्या सासूबाई म्हणाल्या,

“या खेपेस नक्की मुलगाच होणार.. माझं स्वप्न आहे ते.. आपल्या घराण्याला वारस मिळणारच.”

त्यांचं बोलणं ऐकून सायलीच्या मनात भीतीने शिरकाव केला.

“जर मुलगी झाली तर? सासूबाई, सासरे, नणंदबाई, नवरा माझ्याशी कसे वागतील? आणि माझं सोडा त्या जन्मास आलेल्या नवजात मुलीशी सर्वजण कसे वागतील? तिला हिडीसपिडीस करतील? मारहाण करतील?”

तिने मनातली ही भीती कोणालाच सांगितली नाही. तिने कोणताही अंदाज बांधला नाही. तिला ‘बाळ’ हवं होतं. मुलगा किंवा मुलगी काहीही असो ते बाळ फक्त सुदृढ आणि निरोगी असायला हवं इतकीच तिची इच्छा होती.

सायली त्या छोट्या जीवाला घेऊन हॉस्पिटलमधून घरी आली. सायलीच्या चेहऱ्यावर आईपणाचं तेज चमकत होतं. तिच्या कुशीत शांतपणे झोपलेल्या त्या गोड निरागस मुलीला पाहून तिचं मन आनंदाने नाचलं होतं.

“अगं माझ्या गोजिऱ्या, बाळा…”

तिने मायेने तिच्या गालावरून हात फिरवला. ती घरी आली पण बाहेर नवा पाहुणा आल्याचा उत्साह नव्हता.
नवरा शांत बसलेला.. सासूबाई खट्टू होऊन नाक फुगवून बसलेल्या. सासरेही फक्त मान हलवून खाली सोफ्यावर बसले. कोणी “अभिनंदन!”ही म्हणालं नाही. सायलीच्या मनात तीव्र वेदना उठली.

“तुमच्यासाठी ती फक्त एक मुलगी असू शकते; पण माझ्यासाठी ती माझं हृदय आहे.”

तीन दिवसांनी नाव ठेवण्याबद्दल चर्चा सुरू झाली. सायली म्हणाली,

“आपण ‘अन्वी’ नाव ठेऊया? सुंदर अर्थ आहे त्या नावाचा ‘दयेने परिपूर्ण..”

सासूबाईंनी तिच्याकडे तिरकस नजरेने बघितलं.

“त्यात तरी काय विशेष? मुलगा असता तर नावाला वजन असतं. मुलींची नावं कुठलीही चालतात.”

सायलीचा हात आपोआप मुलीकडे गेला.

“माझ्या बाळाचं नाव ठेवायला तुम्हाला कमीपणा वाटतोय?”

इतक्यात आर्या, तिची चार वर्षाची मोठी मुलगी धावत आली. सायलीला बिलगत निरागसपणे विचारलं,

“आई, सगळे का दुःखी आहेत? माझी बहीण आलीय ना… आपण सगळे खुश असायला हवं ना?”

सायलीच्या डोळे पाण्याने गच्च भरले. आर्याच्या निरागस प्रश्नाने तिचं हृदय पिळवटून निघालं. घरातल्या वातावरणाची कटुता त्या इवल्याश्या जीवालाही जाणवत होती. सायली आर्याला कवेत घेत म्हणाली,

“हो राजा, आपण खूप आनंदी आहोत ग.. कारण आपल्या घरी एक देवदूत तुझी बहीण बनून आली आहे.”

सायलीच्या शब्दांनी आर्याचे डोळे आनंदाने चमकले आणि चेहऱ्यावर हसू उमललं; पण लगेच पाठीमागून सायलीच्या सासूबाईंचा आवाज धडकला.