सासूबाई आणि नुकत्याच घरी आलेल्या नणंदबाईंची नजर गौतमीवर पडली आणि गौतमीला नको नको झालं. गौतमीच्या ऑफिसमध्ये आज बॉलिवूड थीमवर पोशाख करून यायला लावला होता, त्यानुसार गौतमी तयार होऊन बाहेर पडली आणि समोर सोफ्यावर सासूबाई आणि नणंदबाई तिला खालून वर न्याहाळू लागल्या. 
गौतमीने नणंदबाईंकडे बघून एक स्मितहास्य केलं आणि त्यांना अपेक्षा होती की नणंदबाईंनी विचारावं, की आज काय स्पेशल आहे वगैरे, पण त्यांच्या नजरा जणू बोलत होत्या की "हिचं काय हे नवीन.."
गौतमी खजील होऊन पटकन बाहेर पडली. तिची गाडी काढली आणि ऑफिसच्या दिशेने जाऊ लागली. गाडीवर असताना तिच्या मनात विचार सुरू होते. ऑफिसमध्ये तिच्याबरोबरीचा सगळा स्टाफ अतिशय उत्साही. त्यांच्या घरचेही त्यांना सपोर्ट करत. बरोबरीच्या बायकांना त्यांचे नवरे, त्यांचे सासू सासरे वेळोवेळी मदत करत, पाठिंबा देत..पण गौतमीच्या घरी तिला ऑफिसला जाऊ देतोय हेच उपकार समज असं म्हणायलाही कमी करत नव्हते. 
ऑफिसमध्ये काही कार्यक्रम असला की सर्वांना अगदी उत्साह येई पण गौतमीला मात्र धडकी भरे. यावेळीसुद्धा तिने बॉलिवूड थीम पोशाख करायला नकार दर्शवला तेव्हा स्टाफने तिला आग्रह करून यायला भाग पाडलं.
"अगं सगळेच किती उत्साही आहेत, तुला नकार द्यायला काय कारण?"
या प्रश्नाचं उत्तर मात्र तिच्याकडे नसायचं. ऑफिसमध्ये मोकळ्या मनाचा, उत्साही आणि पाठिंबा देणारा स्टाफ आणि दुसरीकडे आपल्याला सतत पाण्यात बघणारं, परकं करणारं तिचं सासर यातली तफावत तिला त्रास द्यायची.
एकदा नणंदबाईंच्या घरी त्यांच्या सासऱ्यांचा निवृत्तीसोहळा असल्याने घरात सर्वांना आमंत्रित केलं होतं. नणंदबाईंचं सासर म्हणजे सुशिक्षित आणि उत्साही लोकं. त्यातल्या त्यात सर्वजण मोठ्या हुद्द्यावर असल्याने तेही काळाप्रमाणे चालणारे होते. कार्यक्रमात सर्वजण गेले. 
मुख्य कार्यक्रम झाल्यानंतर नणंदबाईंच्या दिराने पुढे स्टेजवर येऊन बोलायला सुरुवात केली,
"आज या निमित्ताने तुम्ही सर्वजण आलात त्याबद्दल आभार, माझ्या वडिलांनी इतकी वर्षे कष्ट केली, आम्हाला वाढवलं आणि सर्व नातेवाईकांनाही वेळोवेळी मदत केली. आदर्श असं व्यक्तिमत्त्व म्हणून आम्ही कायमच त्यांच्याकडे बघत आलोय. तुम्हा सर्वांना ते परिचित आहेतच, पण माझी विनंती आहे की माझ्या वडिलांबद्दल दोन शब्द पुढे स्टेजवर येऊन बोलावे"
सर्वजण एकमेकांकडे बघू लागले..दिराने नणंदबाईंना इशारा केला तसं नणंदबाईंना घाम फुटला,
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा