(सदर कथा एक काल्पनिक कथा आहे. त्यातील घटना-प्रसंग आणि व्यक्तींचा वास्तवात कुणाशीही, कुठलाही संबंध नाही . तसा तो आढळल्यास केवळ एक योगायोग समजावा )
एक रम्य सकाळ- पूर्व क्षितिजावर भास्कराने आपले घोडे चौफेर उधळलेले - सूर्याच्या कोवळ्या किरणांची अवनीला आलिंगन द्यावे यासाठी लागलेली स्पर्धा , तर दुसरीकडे दिनकराने केशरी , नारंगी , गडद लाल रंगांची पूर्व दिशेला केलेली मुक्त उधळण, गुलाबी थंडीची थरथर अनुभवत असलेली झाडं , झुडपं आणि दवबिंदुंची नथ सावरत दिमाखात उभा असलेला गुलमोहर, एकीकडे पक्ष्यांचे मधुर कूजन तर दुसरीकडे पांढरा , पिवळा, लाल आणि गेंदेदार जास्वंद - पाकळी- पाकळीतुन उमलताना मनाला आल्हाद देत होता. नाजूक कुंद कळ्या , पांढरा गोकर्ण , झुपकेदार अनंत आणि तगर आपापल्या डोळ्यांच्या कडांवर रश्मिरथी ची आतुरतेने वाट पाहत होते.
सकाळी सकाळी लवकर उठून आपल्या बंगालीच्या लाॅन समोर चालता-चालता सुधा मनाशीच अशा अनेक कल्पना करून त्या विश्वात रमत असे.
सुधा - दादासाहेब इनामदारांची सौभाग्यवती, अण्णासाहेब इनामदारांची ज्येष्ठ स्नुषा एवढीच ओळख आहे का आपली? गॅस वरचा वाफाळणारा चहा बघता-बघ सुधा मनात विचार करत होती. सकाळचा पहिला चहा सुधा स्वतःच बनवत असे, घरातली सगळी काम करायला नोकर माणसं असूनही आणि मग एकटीच निवांत लाॅन वर बसून त्याचा आस्वाद घेत असे, संपूर्ण दिवसात तेवढेच चार दोन क्षण तिचे हक्काचे, बाकी संपूर्ण दिवस इनामदार घरांण्याच्या जबाबदाऱ्या सांभाळण्यात निघून जात होता.
आपली फुलांची आणि झाडांची आवड जपण्यासाठी 'दामू माळ्या' कडून सुधानं ही छोटीशी बाग खास तयार करून घेतली होती. तसेही रोजच्या घर कामाच्या व्यापातून तिला अजिबात सवड मिळत नसे.
दादासाहेब इनामदार - अमरावतीतील एक मोठं राजकीय व्यक्तिमत्व. अत्यंत धडाडीचे, शिस्तप्रिय, वक्तशीर, आणि अतिशय कार्यक्षम राजनेता म्हणून त्यांचा लौकिक. त्यांच्यात असणाऱ्या नेतृत्व आणि धडाडी या गुणांमुळेच आणि त्यांनी गरिबांसाठी केलेल्या कामामुळे राजकारणात ते लवकरच प्रस्थापित झाले.
दादासाहेब इनामदारांच्या मनात सर्वसामान्य आणि गोर गरिबांनासाठी चे प्रश्न याविषयी नेहमीच तळमळ असे. सर्वसामान्यांचा नेता अशीच त्यांची राजकीय वर्तुळात ओळख होती. त्यामुळेच इनामदार वाड्यावर सतत कार्यकर्ते, लहान-मोठे उद्योजक, कारखानदार , प्रशासकीय अधिकारी आणि सर्वसामान्य, आम गरीब जनता , यांचा सतत राबता असायचा. त्या सगळ्यांची उठबस आणि बडदास्त ठेवतात ठेवता , सर्व व्याप सांभाळता सांभाळता सुधाला स्वत:साठी मोकळा वेळच मिळत नसे.
चहा संपवून जेव्हा सुधा स्वयंपाक घरात गेली तेव्हा रामुकाकांनी नाश्त्याचा विचारलं-रती आणि राहुल साठी भेंडीची भाजी - पोळी, दादा साहेबांसाठी - भिजलेली उडदाची डाळ घालून केलेला उपमा , तर रवी साठी - बदामाचा , साजूक तूपाचा केशर घालुन केलेला शिरा. सुधानं रामुकाकांना आजच्या नाश्त्याचं सांगितलं आणि ती सकाळचं आवरून देवपुजे करता निघून गेली. सुमती येणार म्हणून खास तीच्या आवडीनिवडी चं जेवण सुधा आज जातीनं बनवणार होती !
सुमती आज जवळजवळ दीड वर्षाने माहेरी आली होती. दादासाहेब इनामदारांनी मुद्दामच तिला फोन करून बोलावून घेतलेलं होतं........... दादासाहेब , सुमती , मीना आणि रवी यांचे बहीण-भावाचं नातं अगदी घट्ट.......... सुमती च्या लग्नाला आता जवळपास पाच वर्ष झाली होती , रसायनशास्त्राची प्राध्यापक असल्याने आणि शिवाय पी .एच. डी.चं कामही सुरू असल्याने ती फार माहेरी येऊ शकली नव्हती.
सुधा - सुमा यावेळी खुप दिवसानंतर आलीस ग!
सुमा - हो दादांनीच परवा फोन केला होता , म्हणूनच आली (आश्चर्याने) दादाने तुम्हाला काही सांगितलं नाही का? मी आज येणार आहे हे तुम्हाला माहित नव्हते का?
सुधा - (किंचित कपाळावर आठ्या पाडून) सकाळी मीटिंग ला जाताना सांगितलं होतं त्यांनी तू येणार आहे म्हणून, बरं चल तू आंघोळ करून , जेवून घे मग आपण निवांत गप्पा मारत बसू.
सुमा - वहिणी इतक्या वर्षात तुम्हाला कधी तरी सवड मिळाली का गप्पा मारायला ? तुमचं तर कामच संपत नाही!
सुधा मंदस्मित करून निघून जाते.
सुमती आपल्या खोलीत आराम करता करता विचार करते..... वहिनी लग्न होऊन आली तेव्हापासून तिने घरातली सगळी जबाबदारी सांभाळली ! सगळ्यांच्या आवडीनिवडी, अण्णा आणि दादाच पथ्यपाणी , मुलांचा अभ्यास, घरातले सणवार ,सगळं सगळं एकहाती सांभाळलं सुधा वहिनींनं.
लग्नाच्या आधी आपण कॉलेजमधुन आल्यावर एखादी भाजी आवडीची नसेल तर , किंवा काही चटक-मटक खायचं असेल तर वहिनी आपल्याला स्वतः लगेच करून द्यायची. अण्णांच्या शेवटच्या काळात अण्णांची सगळी सेवा - सुश्रुषा सुधा वहिनीनच केली. रवीचा खाण्याच्या लहरी स्वभाव, तोही वहिनीने संयमाने सांभाळला. असा विचार करता करता सुमतीला केव्हा झोप लागली ते तिलाच कळलं नाही!
दुपारी दोन वाजता दादासाहेब त्यांच्या महत्त्वाच्या मिटिंगहुन परत आल्यावर , जेवणाच्या टेबलावर दोघा भावा-बहिणीच्या गप्पा सुरू होतात.
दादासाहेब - सुमती किती दिवस झाले तू एक फोन सुद्धा केला नाही! अग आठवड्यातून एखादा फोन करत जा !!
सुमा - दादा पीएचडी चं काम आता शेवटच्या टप्प्यात आला आहे . थिसीस पण लिहायचे आहेत, शिवाय कॉलेज ही असतं, त्यामुळे वेळच मिळत नाही . तुम्ही पण फोन करत नाही ना !
दादासाहेब - हो गं ! जेव्हापासून विरोधी पक्षनेता झालोय ना तेव्हापासून वेळच मिळत नाही !!
दादासाहेब - रती आता मॅट्रिकला आहे भरपूर मेहनत घेते आहे. राहुल ही आता सातवीत गेला आहे , पण अभ्यासात जरा मागे पडतो आहे.
जेवण झाल्यावर दादासाहेब आणि सुमती हॉलमध्ये गप्पा मारत बसतात.
सुमा - दादा , रवी कुठे दिसत नाही ?
दादासाहेब - त्या करताच तुला बोलावलं आहे ना ! मला रवीच काही कळतच नाही !! हा करतो काय ? बोलतो काय?? त्याचं वागणं काय??? एक धड नाही ! आज हे तर उद्या ते !! अगं नाही काही तर आपल्या घराण्याचा तरी विचार करायचा ना !!!
सुमा - आता काय झालं दादा? रवीचा परत काही प्रॉब्लेम झालाय का?
दादासाहेब - तुला माहिती आहे ना ! मागच्या वेळी आपण मीराला नाही म्हटलं , मग रवी राधीका साठी तयार झाला. पण आता तो राधिके सोबत झालेला साखरपुडा तोडून, मिराशी लग्न करायचं म्हणतोय, याला काहीच कळत नाही का? आता इतका मोठा झाला हा! मी तरी काय समजावणार त्याला ? तू जरा त्याच्याशी बोल ना.....
सुमती मनात विचार करते, आपला भाऊ - रवी किती हुशार आणि समजूतदार, यावर्षी एम. एस. ची तयारी करतो आहे , पण एमबीबीएसला असतानाच त्याला डॉक्टर देशपांडेची मीरा आवडली...........
मीरा होती पण छानच ! पण डॉक्टर देशपांडे यांचा भूतकाळ मध्ये आला ........
खरंतर डॉक्टर देशपांडे यांची मीरा ही अनौरस संतती.... ...............
डॉक्टर देशपांडे विद्यार्थीदशेत असताना एका विधवे पासून झालेली.......
पण तरीही डॉक्टर देशपांडे यांनी मीराचा स्वीकार केला......... डॉक्टर देशपांडे त्या विधवेशिही विवाह करणार होते............पण समाजाला घाबरून त्या विधवेने आत्महत्या केली.........
मागल्यावेळी पण आपण रवीला खूप समजावून सांगितले होते....... अण्णा गेल्यावर दादानेच आपल्या सगळ्यांचा, त्यांच्या मुलांप्रमाणे सांभाळ केलेला आहे ! तुझं आणि माझं शिक्षण!!.......... माझं आणि मीनाताई चं धडाक्यात केलेलं लग्न !!!.......... दादांनी कधीच कुठली कमतरता पडू दिली नाही आपल्याला !!!!
सुमती मनाशीच विचार करते......... प्रत्येक वेळी रवी असं विचित्र का वागतो ? समजून सांगितले की , त्याला कळतं ! पण पुन्हा ये रे माझ्या मागल्या !!
रात्री उशिरा घरी आल्यावर सुधा वहिनी रवीला सुमती आल्याचे सांगते , रोज रात्री सुधा वहिनी रवी साठी जाग्या असायच्या. रवी सुमती ला भेटायला तिच्या खोलीत जातो.......
रवी - काय सुमा दी? किती दिवसानंतर आलीस ??फोन पण नाही करत !! खूप बिझी असतेस का ग?
सुमा - तू तरी कुठे मला फोन करतोस ? तुलाच वेळ नाही आहे ! पण तरीही तुला चार गोष्टी समजवायला मी आली आहे !!
रवी - अग तुम्ही सगळेजण मला काय कुक्कल बाळ समजता का ? प्रत्येक वेळी मी माझ्या आयुष्याचा निर्णय घ्यायचा म्हटलं की , तुम्ही मला समजावत राहता , अरे माझा, माझ्या आयुष्याचा ,माझ्या मनाचा जरा तरी विचार करा ना !!! रवी चिडून बोलतो. माझ्या स्वतःच्या आयुष्यावर माझा काहीच हक्क नाही आहे का??
सुमा - रवि तसं नाही आहे रे !, पण तू जरा शांतपणे विचार कर ना , दादांनी आपल्यासाठी , या घरासाठी खूप काही केलं आहे . शिवाय त्यांचं समाजातलं स्थान ! त्यांचा मान !!, आपलं घराणं!!! कुठे तरी याचा विचार करावाच लागेल ना!!!!
रवी - मान्य आहे की मी वेड्यासारखा वागलो ! आधी मीरा वर प्रेम केलं आणि मग राधिकाला लग्नासाठी होकार दिला !! पण अगं माझं खरंच मीरा वर खूप प्रेम आहे !!! मी राधिकेला नाही खुश ठेवू शकणार , आणि दादा चा मान म्हणतेस तर डॉक्टर देशपांडे हे या शहरातले प्रसिद्ध न्यूरोलॉजिस्ट आहेत . ते काही रस्त्यावर बसून जडीबुटी नाही विकत . त्यांचे समाजात काही ना काही स्थान आहेच ना !!!!
अण्णांनी घराण्याच्या प्रतिष्ठेसाठी , दादाला त्याच्या मनाविरुद्ध लग्न करायला भाग पाडलं , आणि तोच इतिहास आता माझ्यासमोर पुन्हा येऊन उभा ठाकला आहे! लग्नाच्या बाबतीत अण्णांनी दादा वर जो अन्याय केला आहे ना !! दादा तीच पुनरावृत्ती माझ्याबाबतीत करत आहेत !!! दादाला त्यांच्या आवडीच्या मुलीशी लग्न करता आलं नाही म्हणून तोच नियम ते आता मला लावत आहे !!! मीरा डॉक्टर देशपांडे यांची अनौरस मुलगी आहे यात मीराचा काय दोष?
सुमा - रवी मीराच्या वेळी आणि मग राधिकेच्या वेळी वहिणी तुझ्याशी काहीच बोलली नाही का रे?
रवी -नाही त्या कधीच स्वतःहून काहीच बोलत नाही! पण माझ्या प्रत्येक गोष्टीची त्या काळजी करतात .मी आत्ता बाहेरून आलो तर उद्या सकाळी माझे प्रॅक्टिकल आहे याची त्यांनी मला आठवण करून दिली. दादा पण त्यांच्याशी कधीच काही मसलत करताना मला दिसला नाही , आणि त्याही आपलं मत मांडताना कधी मी बघीतलं नाही.
सगळ्यांचं सगळं करतात त्या ! पण तरीही अगदी अलिप्तपणे !!! कशातच आणि कुणातच त्या कधीच गुंतत नाही!!! विचित्र आहे नाही!!!!
दुसऱ्या दिवशी जेवणाच्या टेबलवर सगळे एकत्र जमलेले असतात..... त्यावेळी दादासाहेब सगळ्यांच्या समोर परत रवी च्या लग्नाचा विषय काढतात........ राधिका च्या वडिलांचे दोन-तीन फोन येऊन गेले आहेत लग्न बस्त्या ची खरेदी केव्हा करायची ? ते विचारत आहे......
मी लग्नाच्या खरेदी करता येणार नाही! तुम्हाला जे वाटते जसं वाटते ते करा !! हे लग्नच मुळी माझ्या मनाप्रमाणे होत नाही आहे !!! मग बाकीचे सोपस्कार कशाला? - रवी.
(तिथून उठून रवी रागारागाने जायला निघतो......)
सुधा - रवी, थांब रवी!! हे काय सुरू आहे? तुझं तुला तरी कळत आहे का, तू काय बोलतो आहेस ?? तू काय वागतो आहेस??
यापूर्वीही जेव्हा घरात मीराचा विषय निघाला, तेव्हा सुद्धा सुधा कधीच कोणाच्या मध्ये बोलली नाही, आणि राधिके च्या वेळेस तर तिला काही बोलण्याची गरजही नव्हती. पण आता हे जरा जास्तच झालं होतं.....
सुधाच्या आवाजातली जरब आणि निर्धार दादासाहेब , सुमती आणि रवी सगळ्यांनाच कळला होता.....
सुधा परत बोलू लागली, \"रवी तुला काय वाटतं? लग्न म्हणजे पोरखेळ आहे का? एखाद्यावर प्रेम करावं ते शेवटच्या श्वासापर्यंत करावं , आणि जर कोणाला वचन दिलं तर ते माणसाने मरेपर्यंत पूर्ण करावं , अशीच आपल्या घराण्याची शिकवण आहे ना ! तू सारं विसरलास !! तू जर राधिकेला वचन दिलं असेल तर छातीत ताणून घोड्यावर चढुन लग्नाला तयार हो!!! आणि तुझं जर मीरा वर खरचं प्रेम असेल तर राधिकेला भेटून स्पष्ट सांग . आणि मीरेचा हात धरुन जे होईल त्याला सामोरे जाण्याची हिम्मत ठेव.
रवी - मी काय करू वहिनी मला काहीच कळत नाही?
मी काय करू , म्हणून मला काय विचारतोस रवी? मीरेवर प्रेम करताना तू माझी परवानगी घेतली होतीस? राधिकेला लग्नासाठी होकार देताना मला एका शब्दाने विचारलं होतं?
रवी - राधिकेला हो म्हणताना मी केवळ माझं कर्तव्य पूर्ण करत होतो.
सुधा - कर्तव्य ! या घराण्यांचं आता हेच ब्रीद वाक्य झालय .राधिके ला घरी आणल्यावर तिच्याशी चार शब्द बोलशील तरी ना ? कि तेही कर्तव्य म्हणूनच !! तुला मुलं होतील तेही कर्तव्य म्हणूनच !!! पूर्णआयुष्य काय तू असंच कर्तव्य म्हणून घालवणार आहेस का???
दादासाहेब सुधा कडे रागारागाने पाहतात.......... सुधा तुझं डोकं फिरलय का ? तु ही काय वायफळ बडबड करते आहेस?......
सुधा - मी ज्यावेळी लग्न करुन या घरात आली होती, तेव्हा तुम्हीही हेच म्हटलं होतं ना ! सुधा मी हे लग्न कर्तव्य म्हणून कलं आहे! फक्त अण्णांच्या इच्छे करिता !!! अजून किती सुधांचा बळी घेणार आहे हे घर??????
गेल्या अठरा वर्षात माझ्या भावनांचा , माझ्या इच्छांचा कधीतरी तुम्ही विचार केला आहे का? तुम्ही माझ्याशी केवळ कर्तव्य म्हणून प्रत्येक वेळी नातं निभावलं ! मला काय वाटतं याच्याशी तुम्हाला काही घेणं देणं नाही , तुमचं घर सांभाळायला तुम्ही केवळ एक बिन पैशाची मोलकरीण घेऊन आलात!!! पण आता या घरात येणारी मीरा असो किंवा राधिका तिच्या नशिबी हे कर्तव्य नअसावं एवढीच माझी इच्छा!!
सुधाच्या या वाक्यावर सगळे जण अवाक होतात आणि सगळीकडे शांतता पसरते.........
(सदर लिखान हे मोबाईल मधून केलेले असल्याने शुद्धलेखनाच्या काही चुका असल्यास क्षमस्व!)
(मंडळी तुम्हाला ही कथा कशी वाटली त्याबद्दल तुमची मतं आणि अभिप्राय नक्की कळवा तुम्हाला जर माझं लिखाण आवडत असेल तर मला फॉलो करा तुमच्या प्रतिक्रियांच्या प्रतीक्षेत.........)
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा