मागील भागाचा सारांश: केतन व मैथिलीचा साखरपुडा सुखासुखी पार पडल्यामुळे मैथिलीचे बाबा खूप खुश झालेले असतात. मैथिलीच्या बाबांना हे समाधान असते की त्यांना दोन्ही जावई संस्कारी, सुस्वभावी आणि निर्व्यसनी भेटले. राधिका सौरभ सोबत त्याला लागलेल्या व्यसनाबद्दल बोलते, तो तिला सांगतो की मी इथून पुढे सिगारेट पिणार नाही तसेच मला कुठलेही वाईट व्यसन लागू देणार नाही. मैथिलीचा सौरभवर विश्वास बसत नाही. सौरभ इतकं सहजासहजी सर्व काही सोडेल अस काही तिला वाटत नाही.
आता बघूया पुढे....
दुसऱ्या दिवशी सकाळी राधिका आणि शेखर माही ला घेऊन घरी जातात. सौरभ कॉलेजला निघून जातो. मैथिलीलाही हॉस्पिटल जॉईन करायचे असते. साखरपुडा असल्याने मैथिली नवीन हॉस्पिटल जॉईन करत नाही.एक आठवड्याने केतन तीन महिन्यांसाठी अमेरिकेला जाणार असल्याने मैथिली नवीन हॉस्पिटल जॉईन करायचे ठरवते. मैथिली ब्रेकफास्ट करुन हॉस्पिटल मध्ये जायला निघते तितक्यात केतनचा तिला फोन येतो,
"हॅलो मैथिली काय करतेस?"
" आजपासून हॉस्पिटल जॉईन करावे असा विचार करतेय, साखरपुड्यामुळे आधीच उशीर झाला आहे.सो आवरत होते." मैथिलीने उत्तर दिले.
"गुड डिसीजन, मी तुला सोडायला येऊ का?" केतनने विचारले
"नाही नको, मी रिक्षाने जाईन" मैथिलीने सांगितले
"मला भेटण्याची इच्छा नाहीये वाटतं" केतनने म्हणाला
मैथिली म्हणाली," केतन अस नाहीये पण उगाच तुला त्रास कशाला?"
केतन म्हणाला," तुझ्यासाठी काहीही करायला मला आवडतच, आणि आपला माणसासाठी काही करायचं म्हटल्यावर त्यात कसला आला त्रास."
मैथिली म्हणाली," केतन आत्ता मी जाते, तु मला घ्यायला ये म्हणजे आपल्याला थोड्या वेळ बसून बोलता येईल"
"चालेल मॅडम जशी आपली आज्ञा" केतन उत्तरला
"ऐक ना केतन मला हॉस्पिटलला जायला उशीर होईल, मी शिफ्ट संपल्यावर तुला फोन करते" मैथिलीने सांगितले
"नको ना, तुझ्याशी बोलतच रहावं अस वाटतंय, तु काम करता करता बोल, मला काहीच प्रॉब्लेम नाहीये" केतन बोलला
मैथिली म्हणाली," केतन मी तुझ्यासोबत बोलता बोलता कसं आवरू शकेल, प्लिज हट्ट करू नकोस."
केतन म्हणाला," ठीक आहे, मी जस्ट गंमत करत होतो, शिफ्ट संपल्यावर भेटू, बाय"
मैथिलीने केतनचा फोन ठेऊन पटपट आवरले व रिक्षाने हॉस्पिटलला पोहोचली. हॉस्पिटलला गेल्यावर ती डॉ अजय सूर्यवंशी च्या केबिनमध्ये गेली
"मे आय कम इन सर" मैथिलीने विचारले
"यस कम इन डॉ मैथिली" डॉ अजयने हसून मैथिलीचे स्वागत केले
मैथिली केबिनमध्ये जाऊन डॉ अजय समोरच्या खुर्चीत बसली.
"Congratulations डॉ मैथिली" डॉ अजय म्हणाला
मैथिली म्हणाली," थँक्स अ लॉट सर, आजपासून हॉस्पिटल जॉईन केले तर चालेल ना?"
"हो चालेल ना, काहीच प्रॉब्लेम नाहीये" डॉ अजयने उत्तर दिले
मैथिली म्हणाली," सर तुम्ही एंगेजमेंट ला आला नाहीत, केतनने तुम्हाला invite केले होते ना?"
"येस केतनने मला invite केले होते पण मी थोडा त्यादिवशी बिजी होतो, फॅमिली फंक्शन होतं, आधीच प्लॅन ठरलेला असल्याने मी येऊ शकलो नाही. तुम्ही दोघे त्या दिवशी हॉस्पिटलमध्ये आला होतात तेव्हा केतन काही बोलला नाही even केतनने तुमची ओळख मैत्रीण म्हणून करुन दिली होती. अस का?" डॉ अजयने विचारले
मैथिली म्हणाली, " त्या दिवशी आम्ही फ्रेंड्सच होतो, तेव्हा आमच्यात लग्न हा विषयही नव्हता."
डॉ अजय हसून म्हणाला," म्हणजे मनात असेल पण ओठावर नाही असच असेल म्हणायचं. Anyways तुम्ही बाहेर जाऊन सिस्टर ला भेटून घ्या, त्या तुम्हाला तुमच्या शिफ्ट्स आणि काम समजावून सांगतील."
मैथिली केबिनच्या बाहेर पडून सिस्टरला भेटली, सिस्टरने मैथिलीला तिच्या शिफ्टच्या वेळा आणि काम समजावून सांगितले. मैथिली तिच्या कामाला लागली. पहिल्यासारखे हॉस्पिटल एवढे मोठे नव्हते पण नवीन काही शिकायला मिळणार होते.मैथिलीने हॉस्पिटल मधील सर्व स्टाफ सोबत ओळख करुन घेतली. हॉस्पिटलचा स्टाफ फ्रेंडली असल्याने मैथिलीला त्यांच्यात मिसळून काम करायला काही अडचण आली नाही.
संध्याकाळी शिफ्ट संपल्यावर मैथिलीने केतनला फोन करुन बोलावून घेतले. फोन केल्यावर काही वेळातच केतन मैथिलीला घेण्यासाठी हॉस्पिटलला पोहोचला.
मैथिली केतनच्या गाडीत येऊन बसली व म्हणाली, "केतन मला खूप भूक लागली आहे, इथे जवळ एखादं स्नॅक सेंटर असेल तर तिथे चल."
केतन मैथिलीकडे आश्चर्याने बघत म्हणाला, "कशी मुलगी आहेस यार, इथे मी इतक्या लांबून तुला भेटण्यासाठी आलोय, माझ्याकडे बघायचं दूरच पण साध काही बोलली सुद्धा नाही आणि तुला फक्त खायचं पडलंय."
मैथिली म्हणाली," केतन मला खरंच खूप भूक लागली आहे, मी सकाळी घरातून निघताना ब्रेकफास्ट केलेला होता, दिवसभर काहीच खाल्लं नाहीये, आणि तुझ्या माहितीसाठी एक सांगते, पोट रिकामे असताना माझ्याकडून दुसरी कामे सोडच पण बोलायलाही सुचत नाही, माझी प्रचंड चिडचिड होते."
केतन म्हणाला, "ओके मॅडम आपण पहिले काहीतरी खाऊयात, मला तुझ्या बाबतीत सर्वच माहिती आहे असा माझा गैरसमज होता."
मैथिली पुढे काहीच बोलली नाही.केतनने गाडी एका रेस्टॉरंट समोर नेऊन उभी केली. रेस्टॉरंट मध्ये जाऊन मैथिलीने तिच्या आवडते स्नॅक्सची ऑर्डर दिली आणि मग ती म्हणाली, "केतन आता तु बोलू शकतोस, कसा आहेस?"
केतन हसून म्हणाला," पोट भरण्याआधीच मॅडमचा जीव शांत झालेला दिसतोय."
मैथिली म्हणाली," काही वेळात पोटात काहीतरी जाईल हे माहीत आहे ना मग पोट जरा शांत होतं आणि सोबतच मनही शांत होतं. अमेरिकेला जाण्यासाठी कपड्याची शॉपिंग केली आहेस का? काकूंनाही कपड्यांची शॉपिंग करावी लागेल ना? काकू तिकडे जाऊन थोडीच साड्या नेसणार आहेत का?"
केतन म्हणाला," तु आईला काकूच म्हणणार आहेस का?"
मैथिली जीभ चावत म्हणाली," अरे काकू म्हणायची सवय लागली होती ना म्हणून, आई म्हणण्याची सवय लावून घ्यावी लागेल."
केतन म्हणाला," मला थोडीफार शॉपिंग करावी लागेल आणि आईच्या शॉपिंगचं म्हटलं तर मी त्याबद्दल तिच्या सोबत जास्त काही बोललो नाहीये.तु एकदा आईशी बोलून घेशील का?"
मैथिली म्हणाली," हो मी बोलेलंच, तु लागणाऱ्या सामानाची यादी करून ठेव मग आपण शॉपिंग करु, यादी केलेली असेल तर सोपं जाईल."
केतन म्हणाला," हो आजच यादी करून घेतो, उद्या व्हिसाचा इंटरव्ह्यू आहे, एकदा व्हिसाचं काम झालं की मग शॉपिंग करायला मोकळो, बर ते जाऊदेत मला तुझ्याशी जरा थोड्या वेगळ्या विषयावर बोलायचं होतं. पण पहिले तु पेटपुजा करून घे मग आपण बोलू."
मैथिलीने ऑर्डर केलेले स्नॅक्स येतात, मैथिलीला इतकी भूक लागलेली असते की ती खाताना केतनकडे बघत सुद्धा नाही.केतन मात्र मैथिलीकडे बघून हसत असतो.
केतनला मैथिलीसोबत काय बोलायचे असेल हे बघूया पुढील भागात...
©®Dr Supriya Dighe
