एक अबोली भाग 2

आणखी बळी जाणाऱ्या अबोलीना न्याय मिळवून देईल का अनिता?

कथा मालिका:एक अबोली
विषय:रहस्य व सामाजिक

एक अबोली भाग 2

मागील भागात आपण पाहिले की अनिताला पाहून अश्विनी मॅडम गडबडल्या.सूनिताचे नेमके काय झाले?नक्की काय माहित होते बाईंना?


निशाने थरथरत्या हातांनी पेटी उघडली.त्या पेटीत आईला तिच्या विद्यार्थ्यांनी दिलेल्या भेटवस्तू होत्या.त्यातील एक अजून छोटी पेटी निशाने बाहेर काढली.बाईंनी हळूच चावी तिच्या हाती दिली.निशाने पेटी उघडली आत दोन पत्र होती.खूप जुनी.निशाने पहिले पत्र हातात घेतले.


त्यावर सरळ मजकूर लिहिला होता."बाई,गेले काही महिने चार गुंड मुले माझा पाठलाग करत आहेत.मला घाणेरड्या चिठ्ठ्या लिहीत आहेत. काल त्यातील एकाने माझा हात धरला.मी घरी सांगितले तर शाळा बंद होईल.बाई मला मदत करा.तुमची सुनीता."


निशाने.चिठ्ठी बंद केली.बाई म्हणाल्या,"मी चिठ्ठी वाचून सुनीताला बोलावले,त्या मुलांची नावे विचारली.आशक्या,पक्या, राजा आणि निल्या."

निशा बाईंना थांबवत म्हणाली,"आई म्हणजे,सर्जेरावचे कार्यकर्ते ना हे?"

बाई चष्मा पुसत म्हणाल्या,"हो,हेच ते नराधम.मी सुनीताला समजावले.तू यायचा जायचा रस्ता बदल.मैत्रिणी सोबत असू दे."


निशा रागावली,"म्हणजे,तू त्या चौघांना काहीच बोलली नाहीस?"

बाई म्हणाल्या,"मी बोलून प्रश्न चिघळला तर?अशी भीती वाटत होती.त्यानंतर पंधरा दिवसांनी सूनीताचे प्रेत सापडले.त्याआधी सुनीता मोघे बाईंकडे गेली.

ह्या चौघांपैकी राजा म्हणाला,"ह्या पोरीनेच मला नादाला लावले."

त्यांनी भरपूर पुरावे सादर केले.

असे म्हणून बाई थांबल्या आणि त्यांनी दुसरी चिठ्ठी निशाला वाचायला दिली.


निशाने थरथरत्या हाताने चिठ्ठी उघडली,"प्रिय बाई, माझी काहीच चूक नव्हती.मी तुम्हाला सगळे सांगितलेले.तरीही त्या नराधमांनी मला खोटे पाडले.तुम्ही काहीच बोलला नाहीत.त्यानंतर मी घरी जायला निघाले.त्यांनी मला पकडले आणि उसात घेऊन गेले.माझ्या अंगावरचे कपडे ओरबाडले,माझ्यावर अत्याचार केला.कुणाला सांगितले तर तुझ्या बहिणीचे असेच हाल करू अशी धमकी दिली.गेले दहा दिवस मी नरकात असल्यासारखी जगतेय बाई.रोज माझ्यावर अत्याचार होतोय.म्हणून आज हे पत्र तुम्हाला देऊन जातेय.हे पत्र तुम्हाला मिळेल तेव्हा मी नसेल.जमले तर आता तरी बोलाल ना बाई.तुमची सुनीता."



निशाने डोळे पुसत पत्र बंद केले.आईकडे वळून म्हणाली,"आई,तरीही तू गप्प बसलीस?का?अग स्वतः च्या आई वडिलांना न सांगता तुला सांगितले तिने.तू काय केलेस?"

अश्विनी मॅडम म्हणाल्या,"तुला काय वाटल,मी काहीच केले नसेल?मी सगळे पुरावे घेऊन सर्जेरावकडे गेले."

सर्जेराव मला म्हणाला,"बाई,कोर्टात मेलेली पोरगी साक्ष द्यायला येणार नाही पण तुमची पोरगी अजून जिवंत आहे."

"त्यानंतर मी ही पत्रे आणि सुनीता दोन्ही विषय बंद करून ठेवले,"बाई खिन्न होत म्हणाल्या


निशाने चिठ्ठी बंद केली,"आई आपण अनिताला देऊ हे पुरावे.ती पोलीस आहे."

अश्विनी मॅडम खेदाने म्हणाल्या,"निशा,ह्या पंधरा वर्षापूर्वी लिहिलेल्या पत्रावर कोणीही विश्वास ठेवणार नाही बाळा."


निशा निराश झाली,"मग आपण फक्त गप्प बसून रहायचे का?"


इतक्यात निशाला एक फोन आला आणि तो विषय तिथेच थांबला.


अनिताचा आज कामाचा पहिला दिवस होता.तिच्या ताईचे स्वप्न आज पूर्ण होणार होते.अनिता तयार होऊन कामावर जायला निघाली.गावात बरेच बदल झाले होते.ती बुलेटवरून पोलीस स्टेशनला पोहोचली.तिला पाहून हवालदार नीट बसला.बाकीचे जरा सावध झाले.


अनिताने चार्ज घेतला आणि एक बाई बाहेर तक्रार घेऊन आली.हवालदार तिला आत सोडत नव्हता.अनिता स्वतः बाहेर आली,"काय चालू आहे.ह्या बाईंना आत का सोडत नाही तुम्ही?"


हवालदार काळे हसला,"ती वेडी आहे.रोज येते इथे."


अनिता तरीही तिला आत घेऊन गेली. कृश,खोल गेलेले डोळे.अंगावर अगदी मळलेली साडी पण बाईंची भाषा अगदी स्वच्छ होती.नेमकी हीच बाब अनिताला खटकत होती.अनिताने त्या बाईंना समजावून परत पाठवले.तरीही डोक्यातून विषय जाईना.तिने निशाला फोन लावला.निशा पत्रकार होती.खरंतर ती मुंबईला काम करत असे पण सद्या इथे एका स्टोरीसाठी आली होती.



इकडे निशासुद्धा अस्वस्थ होती.तेवढ्यात अनिताने फोन केला,"संध्याकाळी भेट,लोकेशन पाठवते."


अनिताने निशाला भेटायला बोलावले.सकाळी आलेल्या बाईंचा फोटो तिला दिला,"ह्या बाईंची माहिती हवीय."

निशाने फोटो घेतला.त्यानंतर कॉफी ऑर्डर केली आणि म्हणाली,"अनिता मला काही सांगायचे आहे."

अनिता शांतपणे म्हणाली,"ताई बद्दल ना?"

निशाने आश्चर्याने पाहिले.अनिता म्हणाली,"ताईने मला सांगितले होते.मला काही झाले तर बाईंना भेट.पण त्याच रात्री आम्ही गाव सोडून गेलो."


निशाने अनिताच्या हातावर हळूच हात ठेवला आणि तिला सगळी हकीकत सांगितली.त्यानंतर ती म्हणाली,"अनिता आईच्या वतीने मी माफी मागते.तुझी आणि तुझ्या ताईचीसुद्धा."

निशा बोलत असताना दोघींचा फोन एकदम वाजला.फोन ठेवताच निशा म्हणाली,"क्राईम स्पॉट वर चाललीस ना? अग ब्रेकिंग झालीय बातमी.दहावीत शिकणाऱ्या मुलीने आत्महत्या केलीय.शाळा शहरातील नामांकित इंग्लिश माध्यम आहे."


अनिता म्हणाली,"चल बस पण जरा अलीकडे उतर."



घटनास्थळी जाताच अनिता हादरली. त्रिशा नावाची अतिशय गोड मुलगी होती.तिचे आई,वडील आजी प्रचंड घाबरले होते.


अनिताने लगेच हवालदार साळुंकेना बोलावले,"साळुंके फोटोग्राफर बोलवा,खोली तपासून सिल करा आणि बॉडी पी.एम.साठी पाठवा.शेजारी राहणाऱ्यांना चौकशीला बोलवा.ह्यांना नंतर विचारू."


भराभर सूचना देऊन अनिता बाहेर पडली. त्रिशाच्या जागी तिला तिची ताई दिसत होती.



इकडे निशाने बातमी कव्हर केली आणि लगेच समीरला फोन लावला,"तू उद्या इथे हवा आहेस.ही बातमी वाटते तितकी साधी नाही."


निशा घरी पोहोचली तरी आई जागीच होती.निशा म्हणाली,"आई,मी माझी काळजी घेऊ शकते.तू असे जागू नकोस."


इतक्यात बाबांचा फोन आला म्हणून निशा फोनवर बोलू लागली.बाईंचे मिस्टर गेली दहा.वर्ष परदेशात होते.आता ते परत येणार म्हणून निशा आली होती.बाईंनी निशाचे सामान उचलून ठेवायला घेतले इतक्यात त्यातून एक फोटो पडला.बाईंनी फोटो उचलला आणि ठेवणार इतक्यात त्यांची नजर गेली.


फोटो निरखून पाहताच बाई ओरडल्या,"निता?निताचा फोटो आणि अशा अवस्थेत?निशाला कुठे मिळाला असेल हा फोटो?"


एवढ्यात निशा आली आणि बाईंनी तिला विचारले,"हा फोटो कोणी दिला तुला?"

निशा हसत म्हणाली,"अनिताने सांगितले चौकशी करायला."


अश्विनी मॅडम म्हणाल्या,"अग ही निता आहे .माझ्या वर्गात होती.पण नंतर एका श्रीमंत मुलासोबत पळून गेली.खूप हुशार आणि धाडसी होती."


निशा चिडली,"आई,होती काय?अजून जिवंत आहे ती."


इतक्यात निशाचे डोळे चमकले,"आई,तू चल सोबत.बघू ती काही बोलते का?"


बाई म्हणाल्या,"ठीक आहे.पण शाळेत वेळेत पोहोचव मला."



इकडे अनिता विचार करत होती,"त्रिशा आत्महत्या करेल असे वाटत नाही.तिचे काही प्रकरण असेल का?कोणी त्रास देत असेल का? माझ्या सुनीता ताईला जसे संपवले तसे."



सूनीताच्या फोटोजवळ जाऊन अनिता उभी राहिली.ताई अग अबोली होतीस आणि त्याची केवढी शिक्षा भोगली तू.आज ह्या पोरीने पण तेच केले.अशा किती अबोलीच्या कळया अवेळी सुकणार ?"विचार करत ती झोपी गेली

कोण असेल निता? त्रिशाने आत्महत्या केली असेल का?
वाचत रहा.
एक अबोली.

🎭 Series Post

View all