एक अबोली भाग 1

एक सामाजिक मुद्दा मांडणारी रहस्य कथा मालिका
कथा मालिका:एक अबोली
विषय:रहस्य व सामाजिक
भाग 1
गावात डाक वाजत होता.देवीचा उत्सव रंगात आला होता.सगळेजण जमले होते.इतक्यात एक पोलिस शिपाई बातमी घेऊन आला.गावाबाहेर सुनीता मरून पडली होती.कोणालाही त्याचे काहीच वाटत नव्हते.सुनीता,काशिनाथ आणि कमळाची थोरली लेक.अभ्यासात हुशार,दिसायला देखणी.आता कुठे दहावीत गेलेली सुनीता.शाळेत शिक्षकांची खूप लाडकी.आपल्या भावंडांची प्रिय ताई,आई वडिलांची लाडाची लेक.आज निष्प्राण होऊन पडली होती.पोलीस आले.पंचनामा झाला.पोलिसांनी नोंद केली पाय घसरुन विहिरीत पडल्याने आकस्मित मृत्यू.


त्या रात्री काशिनाथ, कमळी आणि त्यांची दोन्ही पोरे खूप रडली.

शेवटी कमळी म्हणाली,"आपून हे गाव सोडून जावू.हित रहायला नग."

काशिनाथने मान डोलावली.चार फुटकी तुटकी भांडी,कपडे आणि सामान घेऊन ते आपली दोन पोर अनिता आणि शेखर दोघांना घेऊन घराबाहेर पडले.गावात राखी पुनव साजरी होत असताना शेखर मात्र ताई दिसत नाही म्हणून रडत होता आणि आठ वर्षांची अनिता त्याचे डोळे पुसत होती.गावगाडा काळाच्या ओघात सगळे विसरून जातो.गेल्या पंधरा वर्षांत गावात शहरीकरण होऊ लागले.गाव बदलू लागले आणि गरीब बिचारा काशिनाथ आणि दुर्दैवी सुनीता सगळ्यांचा विस्मरणात गेली.


आज गावातील नवीन पोलीस स्टेशन आणि शाळेचे उद्घाटन झाले होते.अश्विनी मॅडम मुख्याध्यापक खुर्चीत बसल्या होत्या.


अचानक त्यांना आवाज आला,"बाई,आतातरी खरी तक्रार असलेल्या मुलींना न्याय द्याल ना?"


बाई खुर्चीतून उठल्या आणि घाम पुसू लागल्या.

तेवढ्यात शिपाई आला,"बाई,नगरसेवक आणि त्यांचे कार्यकर्ते आलेत."

बाईंनी हाताने आत पाठव अशी खूण केली.सर्जेराव शिर्के आणि त्यांचे चार कट्टर कार्यकर्ते आत आले.त्यांना पाहताच बाईंच्या कपाळाची शिर उडू लागली.पण.....बाई असाह्य होत्या तेव्हाही आणि आजही.त्या अगदी कोरडेपणा ठेवून सर्जेराव शिर्के बरोबर बोलल्या.


जाताना शिर्के म्हणाला,"बाई,एवढं मनाला लावून घेऊ नका. इसरून जा."

सर्जेराव गेला आणि बाईंचे मन अस्वस्थ झाले.त्यांनी अर्धी रजा टाकून घरी जायचे ठरवले.


तेवढ्यात त्यांच्या मुलीचा फोन आला,"आई,आज मला एक जुनी शाळेतली मैत्रीण भेटली.घरी घेऊन येते तिला."

लेकीचा फोन ठेवून बाई घरी जायला निघाल्या.घरी आल्यावर त्या थोड पडल्या. मनातील विचार शांत होत गेले.त्यांना नकळत झोप लागली.थोड्या वेळाने बाई उठल्या.चार वाजून गेले होते.


उठून स्वतः साठी कॉफी ठेवली.इतक्यात दारावर बेल वाजली.त्यांची मुलगी निशा आणि तिच्याबरोबर एक मुलगी होती.


त्या मुलीला पाहून बाई स्तब्ध झाल्या.निशा म्हणाली,"आई,अग आत तरी येऊ दे आम्हाला."

बाई यांत्रिकपणे बाजूला झाल्या.निशा परत म्हणाली,"आई,कॉफी करतेस?"

बाई मानेने हो म्हणाल्या.आत जाताना त्या मुलीला पाहून बाईंना बसलेला धक्का स्पष्ट जाणवत होता."कसे शक्य आहे हे? ही मुलगी अगदी सूनितासारखी दिसते.पण ..."

बाईंच्या विचारांची गती वाढत होती.इतक्यात कॉफी घेऊन बाई बाहेर आल्या.

निशा सांगू लागली,"आई,ही आपल्याच शाळेत होती.माझ्याच वर्गात."

बाई तिच्याकडे पहात म्हणाल्या,"अग इतके विद्यार्थी येऊन जातात.मुले मोठी झाल्यावर ओळखायला येत नाहीत.शिवाय मी माध्यमिक वर्ग शिकवायचे.त्यामुळे प्राथमिक शाळेतून सोडून गेलेली मुले नाही आठवत."

ती मुलगी आता मंद हसली,"हरकत नाही बाई.मी एकच वर्ष शाळेत होते.आता पी.एस.आय.झाले आहे."


निशा म्हणाली,"म्हणजे तू त्या नवीन पोलीस स्टेशनची प्रमुख आहेस तर."

ती हसत म्हणाली,"हो,इथे काही आठवणी आहेत.त्या सोडवत नाही."

ती निघून गेल्यावर निशा चिडली,"आई,अग ही अनिता.माझी पहिलीत असलेली खास मैत्रीण.तिची बहीण सुनीता..."

बाईंनी तिला थांबवले,"निशा,जा फ्रेश होऊन ये.जरा बाहेर जाऊन येऊ."

बाई निशाला घेऊन बाहेर पडल्या.निशा म्हणाली,"आई काय झाले?तू खूप अस्वस्थ आहेस.अनिताला पाहून तुला धक्का बसलेला."

बाई सावरून घेत म्हणाल्या,"अग मी तिला आठवत होते.नक्की कोणती बॅच.निशा,तिकडे मस्त सेल लागलाय चल."बाईंनी निशाचे लक्ष दुसरीकडे वेधले.


खरेदी करताना बाई अस्वस्थ होत्या.तेवढ्यात त्यांना हाक ऐकू आली,"अश्विनी,ये अश्विनी."

बाईंनी.मागे पाहिले त्यांच्या निवृत्त मुख्याध्यापिका आणि मैत्रीण मोघेबाई होत्या.निशा म्हणाली,"आई,ते बघ मोघे मावशी."

मोघे बाई भेटल्यावर शाळेतील,घरच्या अनेक छान आठवणीत बाईंचे मन रमुन गेले.


इकडे पोलीस स्टेशनची प्रमुख म्हणून नवीन अधिकारी येत आहे असे कळवण्यात आले होते.कोणीतरी महिला आहे हे ऐकून सर्जेराव म्हणाला,"किशा जरा जपून."

ते ऐकून सख्या हसला,"आण्णा आजवर किती बाया वाटला लावल्या आपुन.हिनी आईकल नाय तर आणखी एक भर."

सगळे हसायला लागले.इकडे अनिता घरी आली.काशिनाथ म्हणाला,"पोरी,आजुन इचार कर,सुनीता गेली आता तुला काही व्हायला नग."

अनिता हसली,"बाबा,ताई का गेली?ह्याचेच उत्तर शोधतेय मी.गेली पंधरा वर्ष हा ध्यास घेऊन ऑफिसर झाले मी.अभ्यास करून अधिकारी व्हायची स्वप्न पाहणारी माझी ताई अशी विहिरीत पडून मेली?तेही पोहता येत असताना?"


अनिताचे डोळे भरून आले होते.शेखरचा फोन आला,"हॅलो ताई,कशी आहेस? पोहोचलीस ना?"

अनिता म्हणाली,"मी पोहोचले.तू सध्या तुझ्या खेळावर आणि अभ्यासात लक्ष दे.इथे मी खंबीर आहे."

अनिता हातपाय धुवून सूनिताच्या फोटोसमोर उभी राहिली,"ताई,जे मला वाटतंय ते खोटं असेल तर चांगलेच आहे.पण मला सत्य शोधण्याचा मार्ग दाखव."

अनिता शांतपणे झोपायला गेली.उद्यापासून नवी आव्हाने सुरू होणार होती.


इकडे अश्विनीबाई खोलीत आल्या.आज दिवसभर त्यांच्या शालेय कारकीर्दीत असलेली दुखरी आठवण त्यांना त्रास देत होती.अभ्यास,खेळ,शिस्त सगळ्यात सरस असलेली.नम्र,वागण्या बोलण्यात गोड आणि त्यांची प्रचंड लाडकी सुनीता.


नुसते सुनीता नाव घेतले तरी बाईंना अस्वस्थ वाटत असे. बाईंवर प्रचंड विश्वास असलेली एक हुशार मेहनती विद्यार्थिनी.बाईंना विचाराच्या तंद्रीत झोप केव्हा लागली समजलेच नाही.


मध्यरात्री अचानक त्यांना आवाज आला,"बाई,का नाही बोललात तुम्ही?मी तुम्हाला सगळे सांगितले होते.सगळे पुरावे दिले होते.तरीही का गप्प राहिलात?"

बाई म्हणाल्या,"माफ कर मला.माझ्या पोरीच्या जीवाचा मोह..."

सुनीता म्हणाली,"माझा जीव गेला शिवाय तो का गेला हेसुद्धा कोणालाच समजले नाही.बाई माझ्या आई इतका विश्वास तुमच्यावर होता.आता तुम्ही परत असेच वागणार का?तुम्ही निदान मोघे बाईंना सांगायचे.तुम्ही खुनी आहात बाई,तुमच्या विद्यार्थिनीचा,तुमच्यातल्या शिक्षिकेचा खून केलाय तुम्ही."


नाही!मी काही केले नाही!बाईंचा आवाज ऐकून निशा धावत आली.बाईंचे संपूर्ण अंग घामाने भिजले होते.त्या थरथरत होत्या.निशाने त्यांना हलवून विचारले,"आई काय झाले?कोणाशी बोलत होतीस तू?काय केले नाहीस तू?"


बाईंनी पाणी प्यायले.थोड्या भानावर आल्यावर त्या उठल्या आणि त्यांनी कपाट उघडले.त्यातून एक पेटी काढली.निशाकडे वळून त्या म्हणाल्या,"वाच आणि जमले तर मला माफ कर."


काय असेल त्या पेटीत? सुनीता आणि बाईंच्या स्वप्नांचा काय संबंध असेल? अनिताला नक्की काय शंका आलेली.

वाचत रहा.
एक अबोली
प्रशांत विश्वनाथ कुंजीर
जिल्हा पुणे

🎭 Series Post

View all