एक बेट मंतरलेलं (भाग -२)
© प्रतिक्षा माजगावकर
(सदर कथा पूर्णतः काल्पनिक असून कथेतील सर्व पात्रे, घटना, स्थळे यांचा वास्तवाशी काहीही संबंध नाही. कथा केवळ मनोरंजनाच्या हेतूने लिहिली आहे. यातून कोणतीही अंधश्रद्धा पसरवण्याचा किंवा कोणत्याही रुढी परंपरांचा अपमान करण्याचा हेतू नाही.)
********************************
मयुर च्या आई - बाबांनी त्याचं बोलणं शांतपणे ऐकून घेतलं आणि त्यांचा सुद्धा आधी नकारच होता. मयुर त्यांना सतत तिथे जायला मिळावं म्हणून परवानगी घेण्याचा प्रयत्न करतच होता.
"काय यार आई - बाबा! आजवर तुम्ही आम्हाला चौघांना कुठे फिरायला जाण्यासाठी कधीच अडवलं नाही... मग यावेळी का?" मयुर बोलत होता.
"हे बघ मयुर! मी स्पष्ट सांगते! इतर वेळी तुम्ही सगळे इथेच कुठेतरी जायचात त्यामुळे आम्हाला काही टेंशन नसायचं... यावेळी तू म्हणतोय ते एकतर निर्जन ठिकाण आहे. अजून तुम्ही सगळे एवढे मोठे नाही झालात की, एवढ्या निर्जन ठिकाणी राहू शकाल. तिथे काय असेल काय नाही आपल्याला माहीत नाहीये.. शिवाय घरापासून एवढं लांब! अरे आमचं कोणाचं लक्ष तरी लागेल का तुम्ही सगळे तिथे गेल्यावर? तू एकदा स्वतःला आमच्या ठिकाणी ठेवून विचार कर..." मयुर ची आई त्याला समजावत म्हणाली.
"पण आई..." मयुर बोलत होता. त्याला तोडत त्याचे बाबा बोलू लागले; "पण बिण काही नाही.. आई नी एकदा सांगितलं ना नाही म्हणजे नाही... हे असले फाजील लाड होणार नाहीत.. जेव आता गप गुमान..."
आत्ता सध्या तरी त्यांना काहीही बोलून उपयोग होणार नाही हे जाणून मयुर निमूटपणे जेवला. आपल्याला जशी परवानगी मिळत नाहीये तशीच बाकीच्यांना पण मिळाली नसणार हे त्याला चांगलं माहीत होतं... आता सगळ्यांना मिळून परवानगी कशी मिळेल हे ठरवावं लागणार होतं. त्यांच्यातल्या एकाच्या जरी पालकांनी परवानगी दिली तरी ते बाकीच्यांना समजावतील ही आशा होती. पण, आता फक्त प्रवीण बाकी होता! सगळ्यांचे एकमेकांना सध्या तरी परवानगी मिळाली नाहीये म्हणून मेसेज करून झाले. आता सगळी धुरा प्रवीण वर होती! त्याच्या घरून सुद्धा परवानगी मिळाली नाही तर पुन्हा दरवर्षी सारखं इथेच कुठेतरी फिरायला लागणार हे सगळ्यांना माहीत होतं. प्रवीण ने आता घरी विषय काढला.
"बाबा... आई कुठे आहे? मला तुमच्या दोघांशी जरा बोलायचं आहे." प्रवीण ने आई घरात दिसत नाही हे पाहून विचारलं.
"आई बाजूच्या काकूंकडे गेली आहे येईल एवढ्यात... तुला भूक लागली आहे का? वाढू का मी?" प्रवीण च्या बाबांनी विचारलं.
"नको... आपण एकत्रच जेवू..." प्रवीण म्हणाला.
त्याचे बाबा ओके म्हणून प्रवीण ची आई येई पर्यंत ताटं घेऊन ठेवावीत म्हणून आत गेले. त्यांच्या मागोमाग प्रवीण सुद्धा त्यांना मदत करायला गेला. प्रवीण चे बाबा पेशाने शेफ होते! स्वतःचं एक लहान हॉटेल ते चालवत. प्रवीण ने सुद्धा हॉटेल मॅनजमेंटमध्ये यावं असं त्यांना वाटत होतं पण, याची गोडी त्यात नव्हती. मुलाच्या इच्छे विरुद्ध काहीतरी करायला लावण्यापेक्षा त्याला ज्यात रस आहे ते करू दे असं ठरवून त्यांनी त्याच्यावर कधीही दडपण आणलं नव्हतं! म्हणूनच प्रवीण ने त्याला आवडणारी वाणिज्य शाखा निवडली होती. तरीही तो आपल्या आई - बाबांनी आपल्या आवडीच्या क्षेत्रात जाण्यासाठी प्रोत्साहन दिलं आहे म्हणून त्यांची आवड सुद्धा जपत होता. हळूहळू त्याने सुद्धा थोडा फार स्वयंपाक शिकून घेतला होता... आत्ता सुद्धा त्याने आणि त्याच्या बाबांनी प्रवीण ची आई येई पर्यंत जेवणानंतर खाण्यासाठी मस्त पैकी फ्रूट सॅलड बनवून ठेवलं. तोवर त्याची आई आली. दोघं बाप - लेकानी मिळून सगळी तयारी केली होतीच! सगळे जेवायला बसले.
"आई... मी तुझीच वाट बघत होतो... मला जरा बोलायचं आहे." प्रवीण ने विषय काढला.
"बोल.. आज कोणत्यातरी नवीन विषयाची माहिती शोधली असशील तीच सांगायची असेल ना?" त्याची आई सुमन म्हणाली.
"नाही... दरवर्षी प्रमाणे आमचा फिरायचा प्लॅन.." प्रवीण म्हणाला.
"अरे हो की! परीक्षा संपली ना तुमची... मला मगाशीच लक्षात यायला हवं होतं..." प्रवीण चे बाबा म्हणाले.
"हो... यंदा आम्ही सगळे एका बेटावर जायचा विचार करतोय...." प्रवीण सांगू लागला.
त्याने स्वतः त्या बेटा बद्दल माहिती शोधली होती ती सगळी सांगून आणि विशेषतः तिथे असणाऱ्या अफवा, त्या बेटाची स्थिती सगळं त्याने खरं सांगितलं. त्याचं सगळं सांगून झालं तरी त्याचे आई - बाबा काहीही बोलत नाहीत हे पाहून त्याला आता परवानगी मिळत नाही हे समजून चुकलं होतं. तरीही एक शेवटचा प्रयत्न करायचा विचार त्याने केला.
"आई... बाबा... बोला ना काहीतरी... असे गप्प का झालात?" त्याने विचारलं.
"काही नाही... तू जर ही गंमत करतोयस असं असेल तर ठीक... नाहीतर तिथे काही तुम्ही जायचं नाहीये." त्याची आई म्हणाली.
"अगं आई.. मीच सगळ्यांना त्या जागेबद्दल सांगितलं! आणि तुला माहितेय जेव्हा आम्ही हे डिस्कस केलं ना तेव्हा किती excited होतो तिथे जायला... आम्हाला वाटलं ही नव्हतं ग तुम्ही नकार द्याल... आपण हे असं भूत वैगरे मानत पण नाही ना.. मग काय?" तो म्हणाला.
"प्रश्न भुताचा किंवा तिथल्या अफवांचा नाहीये.. प्रश्न तुमच्या चौघांच्या सुरक्षेचा आहे. आपण किती बातम्या बघतो... अरे गर्दीच्या ठिकाणी ते दिवसा ढवळ्या चोऱ्या, खून होतात! आणि ते बेट तर... नाही... तिथे जायचं नाहीये...." प्रवीण ची आई म्हणाली.
"बाबा! तुम्ही तरी आई ला सांगा ना..." प्रवीण ने आता मोर्चा बाबांकडे वळवला.
"नाही... यात मी आई ला काहीही सांगणार नाहीये... तिचं बरोबर आहे. तुम्ही सगळे अजून लहान आहात. दुसरीकडे कुठेही जा.. आम्ही अडवणार नाही..." प्रवीण चे बाबा सुद्धा ठामपणे म्हणाले.
आता काहीही होत नाही हे जाणून प्रवीण ने कसंबसं अन्न पोटात ढकलल आणि तो त्याच्या रूम मध्ये गेला. त्याने सगळ्यांना कॉन्फरन्स मध्ये घेऊन फोन लावला आणि जे झालं ते सांगितलं.
"अरे यार... आता काय करायचं?" मयुर म्हणाला.
"आत्ता तर काही सुचत नाहीये यार... पण, आता तर जास्तच त्या बेटावर जायची इच्छा होतेय... असं का होतंय काही माहीत नाही पण, तिकडे ते बेट आपल्याला बोलवतं आहे असं वाटतंय..." नम्रता म्हणाली.
"हो ना.. काहीही करून आपण तिकडेच जायचं कॅम्प साठी...." समृध्दी सुद्धा तेच म्हणत होती.
बराचवेळ फोनवर चर्चा करून सगळ्यांनी उद्या त्यांच्या नेहमीच्या ठिकाणी भेटायचं ठरवलं आणि फोन ठेवला. त्यांना आता ते बेट झोपू देत नव्हतं. सतत त्या बेटाचे फोटो त्यांच्या डोळ्या समोर येत होते... अगदी लहान मुलांना कसं "हे करू नको" असं सांगितलं की त्यांना तेच करून बघायची जास्त इच्छा होते; अगदी तसंच या चौघांच्या बाबतीत घडत होतं. प्रवीण ने त्या जागे बद्दल सगळ्यांना सांगितलं होतं त्यामुळे इतर तिघांपेक्षा त्याला जास्त ओढ वाटत होती. त्यात त्याने तिथे जाऊन काहीतरी स्पेशल करायचं असं ठरवलं होतं! आता सगळ्या आशांवर पाणी फिरणार म्हणून तो हिरमुसला होता आणि विचार करत करत झोपला. बाकी सगळे सुद्धा आता काय करता येईल याचा विचार करत झोपले. दुसऱ्या दिवशी लवकर सगळं आवरून त्यांच्या नेहमीच्या कट्टयावर सगळे जमले.
"कोणाला काही सुचलं का काय करायचं आता?" मयुर ने विचारलं.
"ए आपण काहीतरी थाप मारून जाऊया ना.. आपले आई - बाबा आपल्याला दुसरीकडे कुठीही पाठवायला तयार आहेतच ना.. मग वेगळं ठिकाण सांगून जाऊया त्या बेटावर.." समृध्दी म्हणाली.
"नाही... असं खोटं बोलून नाही जायचं... आपल्या आई - बाबांचा विश्वास आहे आपल्यावर. असं नको..." नम्रता ने सरळ नकार दिला.
"हो ग समृध्दी! नम्रता बरोबर बोलतेय... हा विश्वासघात होईल... त्यापेक्षा वेगळं काही सुचतंय का बघा..." प्रवीण म्हणाला.
सगळे विचार करू लागले की नक्की आता काय करता येईल...
"मी आपल्या सगळ्यांसाठी काहीतरी खायला घेऊन येतो... जरा खाल्लं की डोकं चालेल.." मयुर म्हणाला आणि तो त्यांच्यासाठी खायला आणायला गेला.
त्यांच्या नेहमीच्या विठू काकांच्या गाडीवरून त्याने सगळ्यांसाठी वडापाव आणले. सगळे मस्त चवीने खात खात बोलत बसले होते. त्यांच्या आवडीचा खाऊ पोटात गेला तसे सगळे जरा प्रसन्न झाले होते पण, बेटाचा विषय काही केल्या डोक्यातून जात नव्हता. तरीही फक्त एवढ्या कारणाने इतके वर्ष आपली सगळी हौस पूर्ण केलेल्या आई - बाबांना उगाच नको दुखवायला म्हणून आता ती जागा सोडून दुसरीकडे फिरण्याचा प्लॅन सगळे करू लागले. एवढ्यात अगदी पिक्चर च्या हिरो सारखा एक मुलगा आणि अगदी बार्बी डॉल सारखी सुडौल, गोरी पान, सोनेरी केसांची आणि निळ्या शार डोळ्यांची मुलगी तिथे आले!
"हॅलो! तुम्ही सगळे त्या बेटावर जाण्यासाठी प्लॅन करत होतात ना? आम्ही तुमची काही मदत करू का?" त्यातल्या एका ने विचारलं.
सगळ्यांनी त्यांच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिलं. एकीकडे त्यांना आता आपण तिथे जाऊ म्हणून आनंद होत होता तर दुसरीकडे हे कोण आहेत हा प्रश्न!
"अरे असे काय बघताय? प्रवीण! तू सुद्धा मला ओळखलं नाहीस का?" दुसरी व्यक्ती म्हणाली.
सगळे आता प्रवीण कडे बघत होते. तो फक्त एकटक त्या व्यक्तीकडे पाहत होता. आपण कुठे आहोत, काय करत होतो याचं भान त्याला राहिलं नव्हतं! अगदी डोळ्याची पापणी सुद्धा न लवता तो कुठेतरी हरवला होता. सगळ्यांनी त्याला हाका मारल्या तरी त्याचा काहीही रिस्पॉन्स येत नव्हता.
"प्रवीण! अरे आठवलं का?" त्या व्यक्तीने त्याच्या डोळ्यासमोर टिचकी वाजवून विचारलं.
"अं.. हा... हा.. तुम्ही दोघं...." तो बोलत होता. पण, त्याला तोडत तीच व्यक्ती बोलायला लागली; "थांब! थांब! मीच ओळख करून देते आमच्या दोघांची!"
सगळे आता हे दोघं कोण म्हणून त्यांच्याकडे पाहू लागले. प्रवीण मात्र एकदम गप्प गप्प झाला होता.
"आम्ही दोघं प्रवीण च्या गावचे आहोत! मी श्वेता आणि हा अमन! आम्ही दोघं दरवर्षी समर कॅम्प अरेंज करत असतो. यंदा आम्ही दोघं आधी त्या बेटावर जाऊन बघणार होतो आणि मग पुढच्या वर्षी पासून तिकडे सुद्धा कॅम्प नेणार होतो. गेली दोन वर्ष आम्ही ती जागा बघून आलोय... छान आहे ती जागा... यंदा तुम्ही सगळे सुद्धा चला आमच्या बरोबर...." ती म्हणाली.
सगळे खूप खुश झाले होते. आता आपल्या सोबत मोठं कोणीतरी आहे म्हणजे घरचे परवानगी देतील हे वाटत होतं. त्यात हे दोघं प्रवीण च्या ओळखीचे आहेत म्हणजे टेंशन नाही असा विचार करून सगळे उड्या मारायला लागले होते.
"थँक्यू प्रवीण! तू काल सुद्धा आपला फिरायचा प्रश्न सोडवला आणि आज तिकडे जाण्यासाठी परवानगीचा." नम्रता म्हणाली.
प्रवीण मात्र एकदम शांत उभा होता जसं काही झालंच नाही. त्याच्या स्वभावामुळे असेल असं समजून सगळे आता खुश होते. कोणाच्या हे लक्षातही आलं नाही की, या दोघांना आपण तिकडे चाललोय हे प्रवीण ने कधी सांगितलं असेल? तो आपल्याला काही बोलला कसा नाही... सगळे फक्त आनंदात होते. अमन आणि श्वेता ने फक्त एकमेकांकडे बघितलं आणि त्यांचे डोळे चमकले.
"हे दोघं? मला यांना खरंच बघितल्या सारखं तर वाटतंय पण, यांना कळलं कसं आम्ही तिकडे जाणार होतो? मला या सगळ्यांना हे सांगायचं आहे पण सांगता का येत नाहीये?" प्रवीण मनात विचार करत होता.
श्वेता ने फक्त त्याच्याकडे पाहिलं आणि तो नॉर्मल झाला. आता त्याला कसल्याच शंका येत नव्हत्या. त्या बेटावर जाऊन मस्त एन्जॉय करायचं आणि त्याने जो स्पेशल प्लॅन तयार केला आहे तो पूर्ण करायचा हे त्याच्या डोक्यात सुरू झालं. तो सुद्धा आता त्या तिघांमध्ये मिसळून मजा करत होता.
क्रमशः...
**************************
हे दोघं कोण असतील? प्रवीण एकदम असा का वागला असेल? ही कोणत्या संकटाची चाहूल तर नसेल ना? त्यांचे पालक यावेळी परवानगी देतील की नाही? पाहूया पुढच्या भागात.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा