एक बेट मंतरलेलं (भाग -२९)
© प्रतिक्षा माजगावकर
(सदर कथा पूर्णतः काल्पनिक असून कथेतील सर्व पात्रे, घटना, स्थळे यांचा वास्तवाशी काहीही संबंध नाही. कथा केवळ मनोरंजनाच्या हेतूने लिहिली आहे. यातून कोणतीही अंधश्रद्धा पसरवण्याचा किंवा कोणत्याही रुढी परंपरांचा अपमान करण्याचा हेतू नाही.)
****************************
आपापल्या घरी जाण्यासाठी म्हणून समृध्दी च्या आईने दार उघडलं तर बाहेर एक बाहुली पडली होती.
"नम्रता! हे बघ...." ती जवळ जवळ ओरडली.
नम्रता ने दारात वाकून बघितलं तर दीपा बाहेर पडली होती. एवढा वेळ तिच्या सोबत तिच्या खोलीत असलेली दीपा बाहेर कशी गेली हेच तिला समजत नव्हतं.
"एक मिनिट... कोणीही बाहुलीला हात लावू नका.." ती म्हणाली.
तिने धावत जाऊन खोलीत आधी दीपा आहे का बघितलं तर ती तिथे नव्हतीच! सगळ्या घरात तिला शोधलं तरीही नव्हती तेव्हा नम्रता ची खात्री पटली बाहेर जी बाहुली आहे तीच दीपा आहे. तिने लगेचच जाऊन दीपा ला उचललं.
"ही दिपाच आहे... घरात माझ्या रूम मध्येच होती पण बाहेर कशी आली मला नाही माहित... जाऊदे... आत्ता आपण विचार नको करायला... उद्या काय ते बघूया..." नम्रता म्हणाली.
"हो... अरे! नमु हे बघ.... दीपा च्या गळ्यात जी आधीची माळ होती ती आता नाहीये..." प्रवीण च लक्ष अचानक दीपा च्या गळ्यावर गेल्याने तो म्हणाला.
"हो रे.... जाऊदे... आत्ता तू कसलाच विचार करू नकोस... काही तासात सकाळ होईल.. आणि कोणीही नकारात्मक विचार करू नका.. बाप्पा आहे... तो आपल्याला सांभाळेल." नम्रता एकदम शांतपणे म्हणाली.
सगळ्यांनी फक्त होकारार्थी मान डोलावली आणि सगळे आपापल्या घरी गेले. नम्रता ने सुद्धा दीपा ला आत घेतलं आणि तिच्या रूम मध्ये ठेवलं.
"नमु! आपण सगळे आज इथेच हॉल मध्ये झोपुया...." तिची आई म्हणाली.
तिच्या बोलण्यात आणि डोळ्यात टेंशन दिसत होतं. म्हणून काहीही आढेवढे न घेता नम्रता आणि तिचे बाबा तयार झाले. सगळ्यांच्याच घरी तीच परिस्थिती होती... सगळे एकत्रच घाबरून झोपले होते. झोपले कसले! भीती पोटी झोप लागत नव्हती पण, कोणाचाही धीर खचू नये म्हणून स्वतःच स्वतःच्या मनाला समजावत डोळे मिटून पडले होते. सगळ्यात जास्त भीती तर प्रवीण च्या घरच्यांना होती. काही तास पण त्यांना खूप मोठा काळ असल्या सारखा भासत होता. त्यांच्या घरात आज त्यांनी लाईट चालूच ठेवले होते.
"बापरे! आज जर हरीश भाऊंनी प्रवीण ला बघितलं नसतं तर? नाही नाही... हे असे नकारात्मक विचार करून चालणार नाही... प्रवीण आहे... सुखरूप आहे.... आता एकदा सकाळ झाली की बरं वाटेल... पण पुन्हा हा रात्रीत कुठे जायला लागला तर?" प्रवीण चे बाबा उताणे झोपून डोक्यावर पालथा हात ठेवून छताकडे बघत विचार करत होते.
त्यांच्या मनात जसा प्रवीण पुन्हा कुठे गेला तर हा विचार आला तसे ते एकदम सावध झाले आणि त्यांच्या अंगावर एकदम काटाच आला. जर आपण आधीच मुलांचं ऐकुन काहीतरी केलं असतं तर आज सगळे सुखरूप असते या विचाराने सतत त्यांना त्यांचं मन खात होतं. या सगळ्या नकारात्मक विचारांनी त्यांना आता त्रास होऊ लागला होता. स्वतःच्याच विचारात ते खोलवर रुतत चालले होते.
"नाही.. नाही.. नम्रता म्हणाली होती नकारात्मक विचार करू नका... बाप्पा आहे! खरंच! विघ्नहर्त्या आता सगळं तुझ्या हातात आहे... या संकटातून आम्हाला सगळ्यांना बाहेर काढ..." त्यांनी पुन्हा विचार केला आणि न कळत त्यांचे हात जोडले गेले.
काही वेळ असाच गेला आणि साधारण साडेचार च्या आसपास त्यांचा डोळा लागला.
*************************
इथे बेटावर सैतान रागवल्यामुळे त्याने सांगितल्या प्रमाणे श्वेता स्वतःच्या सगळ्या शक्ती त्यागत होती... हळूहळू तिचं रूपांतर सावलीत होत होतं. अमन आणि त्या पिशाच्याच्या मूर्तीला फक्त बघत राहण्याशिवाय काहीही पर्याय नव्हता. श्वेता च रूपांतर जेव्हा पूर्ण सावलीत झालं तेव्हा सैतान चांगलाच खुश झाला आणि तिथून निघून पुन्हा बेटावर फिरू लागला.
"श्वेता! अगं का केलंस हे? आपण काहीतरी वेगळा उपाय केला असता ना..." अमन तिच्या सावलीकडे बघून म्हणाला.
"नाही..." ती फक्त एवढंच म्हणाली.
आता श्वेता च रूपांतर सावलीत झाल्यामुळे तिच्याकडे जास्त शक्ती उरल्या नव्हत्या. त्यामुळे बोलताना सुद्धा तिला काही शब्दच बोलता येणार होते. अजून तिची शक्ती वाया जावू नये म्हणून तो काहीही बोलला नाही. थोडावेळ तर फक्त भयाण शांततेत गेला.
"श्वेता ने पाठवलेल्या बाहुली ने तिचं काम केलं! सगळ्यांवर आता नकारात्मकता हावी होतेय... आणि आता आपले बळी इथे पुन्हा नक्की येणार...." रक्त पिशाच्च म्हणालं.
हे ऐकुन श्वेता ची सावली झपकन इकडून तिकडे गेली. या बातमीने जणू तिच्यात नवा उत्साह संचारला होता.
"पण रक्त पिशाच्च जी बाहुली तिकडे पाठवली होती ती सध्या आहे कुठे? आपल्याला चारही बळी एकत्र लागतील...." अमन म्हणाला.
"समुद्र किनारी!" त्या अर्धमुर्तीतून पुन्हा आवाज आला.
"हा... हा... हा... आता आपल्याला कोणीही थांबवू शकत नाही.... हा... हा... हा.... पुढच्या काही दिवसात पौर्णिमा आहे... आणि नंतर सगळीकडे आपलंच राज्य.... हा... हा..." अमन एकदम भेसुरपणे म्हणाला.
त्याच्या या आवाजाने संपूर्ण बेटावर एकच भीतीचा थरकाप गेला आणि पानांची सळसळ झाली. तो आवाज तसाच तिथे घुमत होता...
"हे रक्त पिशाच्च! ती बाहुली समुद्र किनारी आहे म्हणजे आपले सगळे बळी यायला निघाले का?" अमन ने विचारलं.
"नाही... पण, आपला डाव कामी आला आहे.. जी बाहुली त्या मुलांची मदत करत होती ती आता काहीही करू शकणार नाही... तो अडसर दूर झाला आहे आणि पुढच्या काही दिवसातच सगळे बळी इथे असतील...." त्या अर्ध मूर्तीतून पुन्हा भारदस्त आवाज आला.
*****************************
दुसरीकडे नम्रता च्या घरी उशिरा डोळा लागल्याने सगळे अजून झोपेत होते. पण नम्रता ला फक्त जाग आली होती. तिने घड्याळ बघितलं तर सव्वा सात झाले होते. आईला रात्रभर नीट झोप लागली नसणार आणि बाबा एवढी दगदग करत प्रवीण ला आणायला गेले होते म्हणजे ते दमले असतील म्हणून तिने त्या दोघांना सुद्धा उठवलं नाही हळूच उठून स्वतःचं आवरायला गेली. ती तिच्या रूम मध्ये गेली तर तिथे सगळ्यात आधी तिची नजर दीपा वर पडली. दीपा ला घेऊन ती बेडवर बसली.
"दीपा यार काल तू बाहेर कशी पडली होतीस? अगं खूप काही सुरू आहे ग इथे.... तुला काही हींट देता असेल तर सांग.... आज आपण देवळात जाणार आहोत... तेव्हा तुला बऱ्यापैकी शक्ती मिळतील तेव्हा सांग हा... चल आता आवरते." ती तिला हातात घेऊनच म्हणाली आणि तिथेच बेडवर ठेवून ती आवरायला वळली.
एवढ्यात बाहेर जोरात वारा वाहू लागला. अचानक एवढ्या शांत वातावरणात वारा वाहणं म्हणजे आश्चर्यच होतं. नम्रता ने याकडे दुर्लक्ष केलं आणि ती गेली. थोड्याच वेळात वाऱ्याचा वेग कमी झाला होता.. नम्रता ने तिचं आवरलं आणि सवई प्रमाणे प्रवीण ला गुड मॉर्निंग चा मेसेज करून ती पूजा करायला गेली. तिची पूजा आणि चहा होईपर्यंत एवढं साधारण आठ वाजले होते. उन्हाची तिरीप आत येत होती आणि त्यामुळे तिच्या आई - बाबांना जाग आली.
"अगं नमु! कधी उठलीस? आणि आम्हाला का नाही उठवलं?" तिचे बाबा तिला स्वयंपाक घरात बघून म्हणाले.
"मी सव्वा सातलाच उठले. तुम्ही दोघं आवरून या... मी चहा ठेवला आहे..." ती म्हणाली.
तिचे आई - बाबा फ्रेश होऊन आले आणि सगळ्यांनी मिळून चहा घेतला.
"नमु! आज आपण देवळात जाऊ तेव्हा गुरुजींना आणि तिथून आल्यावर दुपारी पॅरा नॉर्मल activity investigator येणार आहेत त्यांना सगळं नीट सांग हा.. बाकीचे सगळे घाबरले आहेत पण, तू सगळं सावरून घे बाळा." तिची आई तिच्या डोक्यावरून हात फिरवून म्हणाली.
"हो आई! नको काळजी करुस... बाप्पा आहे ना.. तोच बळ देईल..." नम्रता म्हणाली.
सगळं आवरून साधारण नऊ वाजता सगळी मुलं आणि त्यांचे पालक एकत्र जमले. नम्रता ने दीपा ला सुद्धा सोबत घेतलं होतं. सगळे रस्त्याने चालत होते पण कोणीच काहीही बोलत नव्हतं. नम्रता ने जरा वातावरण हलकं करायला बोलायला सुरुवात केली; "आज आपण देवळातून आलो ना की मस्त बाहेरूनच काहीतरी खाऊन जाऊया... सगळे दमले आहेत तर उगाच घरात कशाला करत बसायचं.."
"हो नमु! एकदम बरोबर.... तसंही आपण सगळे एकत्र आहोत तर छोटी पार्टी होईल.." समृध्दी तिला सामील होत म्हणाली.
त्यांच्या या बोलण्याने जरावेळ बेट, बाहुली आणि त्या सगळ्या नकारात्मक गोष्टी मागे पडल्या आणि छान गप्पा रंगल्या. नम्रता ला हेच हवं होतं. सतत वाईट घडतंय याचा विचार करून आपणच आपल्यावर वाईट परिणाम करून घेणार मग त्यामुळे त्रास होणार आणि बाप्पा वरचा विश्वास कमी होऊ लागणार त्यापेक्षा सगळ्यांचं लक्ष कुठेतरी दुसरीकडे नेणं गरजेचं होतं जे तिने साध्य केलं. सगळ्या मुलांचे पालक पुढे चालत होते आणि त्यांच्या मागे सगळी मुलं. सगळं छान सुरू आहे आणि कोणी काळजी करत नाहीये हे बघून नम्रता ला बरं वाटत होतं.. सगळे गप्पा मारत होते पण प्रवीण का काही बोलत नाही म्हणून तिने मागे वळून पाहिलं तर प्रवीण तिथे नव्हताच!
"प्रवीण! अगं समु, मयुर प्रवीण कुठे गेला?" नम्रता एकदम काळजीने म्हणाली.
तिच्या आवाजाने सगळ्यांनी वळून बघितलं तर प्रवीण तिथे नव्हताच! त्याच्या आई - बाबांना खूप काळजी वाटू लागली. अचानक असं प्रवीण च पुन्हा गायब होणं काळजीचं कारण होतं. नम्रता ने कसंबसं स्वतःला सावरलं आणि त्याच्या आई - बाबांना धीर दिला.
"चला पोरांनो! बघा कुठे राहिला प्रवीण! मागे कुठे पक्षी वैगरे दिसला असेल तर फोटो काढण्याच्या नादात मागेच राहिला असेल.." समृध्दी चे बाबा म्हणाले.
"हो काका! आम्ही सगळे तिकडे बघतो तुम्ही त्या रस्त्याला बघा..." नम्रता म्हणाली.
सगळ्यांचे बाबा आणि मुलं प्रवीण ला शोधायला गेले. कालच्या प्रकारामुळे त्याच्या आईचा पूर्ण धीर खचला होता प्रवीण आपल्या सोबत नाही या विचारानेच तिला डोळ्यासमोर अंधारी येऊ लागली होती म्हणून सगळ्या मुलांच्या आई तिला सांभाळत होत्या.
"वहिनी! काळजी नका करू... सापडेल प्रवीण.. त्याला निसर्गाची किती आवड आहे माहीत आहे ना... असेल इथेच... सापडेल.." मयुर ची आई तिला धीर देत म्हणाली.
तोवर नम्रता ची पटकन बाजूच्या गाडीवरून पाणी घेऊन आली आणि तिला दिलं. सगळे तिथे रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाच्या पारावर बसले होते.
"मला खूप काळजी वाटतेय... प्रवीण! तो नक्की बरा असेल ना? काल जसं काही झालं तसं काही होणार नाही ना..." ती रडत रडत बोलत होती.
तिचा हात थंड पडत होता आणि ती सारखे डोळे मिटत होती. तिचं बी.पी. शूट झाल्यामुळे हा त्रास होत होता.
"शु... वहिनी तुम्ही काळजी करू नका काही नाही होणार प्रवीण ला... तुम्हाला असा त्रास झालेला त्याला आवडेल का.. तुम्ही आधी हे पाणी प्या..." समृध्दी च्या आईने तिला समजावलं.
नम्रता च्या आईने तिच्या तोंडावर पाणी मारून तिला थोडं शुद्धीत आणलं आणि पटकन बाजूला असलेल्या मेडिकल मधून मेडिकल वाल्यांना केस सांगून प्राथमिक औषध आणलं. त्यामुळे त्याच्या आईला आता बरं वाटत होतं. सगळ्या जणी आता प्रवीण कुठून येतोय याकडे डोळे लावून बसल्या होत्या. दोन मिनिटात त्यांना सगळे येताना दिसले पण.....
क्रमशः....
**************************
आता पुन्हा काय झालं असेल? प्रवीण अचानक कुठे गेला असेल? त्याच्यावर पुन्हा काही संकट आलं असेल का? सगळे देवळात जायच्या आधीच हे संकट आलं.... आता यातून त्यांची सुटका कशी होईल? पॅरा नॉर्मल investigators कधी येतील आणि काय करतील? पाहूया पुढच्या भागात.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा