एक बेट मंतरलेलं (भाग -३०)
© प्रतिक्षा माजगावकर
(सदर कथा पूर्णतः काल्पनिक असून कथेतील सर्व पात्रे, घटना, स्थळे यांचा वास्तवाशी काहीही संबंध नाही. कथा केवळ मनोरंजनाच्या हेतूने लिहिली आहे. यातून कोणतीही अंधश्रद्धा पसरवण्याचा किंवा कोणत्याही रुढी परंपरांचा अपमान करण्याचा हेतू नाही.)
****************************
अचानक प्रवीण गायब झाल्यामुळे सगळ्यांना काळजी वाटत होती पण, सगळे तो येईल या विचारातच त्याच्या वाटेकडे डोळे लावून बसले होते. सगळे येताना त्यांना दिसले पण त्यांच्यात प्रवीण नव्हताच!
"प्रवीण? प्रवीण कुठे आहे?" त्याची आई बाकीच्यांना बघून म्हणाली.
"समृध्दी! तुम्ही मुलं पुन्हा काही मस्करी करताय का? सांग कुठे आहे प्रवीण?" समृध्दी च्या आईने मुलं मस्करी करत असतील असा विचार करून तिला विचारलं.
"नाही.. मुलं मस्करी करत नाहीयेत... प्रवीण आहे... तुम्ही आधी शांत व्हा... तो मागे ठेच लागून पडला होता म्हणून त्याला नम्रता, तिचे बाबा आणि प्रवीण चे बाबा हॉस्पिटल मध्ये मलम पट्टी करायला घेऊन गेले आहेत... चला आपण पण जाऊ तिकडे..." समृध्दी च्या बाबांनी थोडक्यात सांगितलं.
"ठेच लागली म्हणून मलम पट्टी? प्लीज काय झालं आहे माझ्या प्रवीण ला सांगा ना... काहीही लपवू नका.. हॉस्पिटल मध्ये का नेलं?" त्याच्या आई ने रडत रडत विचारलं.
"वहिनी... शांत व्हा.. आपल्याला तिथे गेल्यावर समजेल... चला... मुलं सुद्धा शांत आहेत म्हणजे प्रवीण ठीक असेल.. आपण जाऊया.." नम्रता च्या आई ने तिला धीर दिला.
सगळे हॉस्पिटल ला जायला निघाले. तितक्यात मयुर च्या बाबांचा फोन वाजला म्हणून ते मागे थांबले. सगळ्या मुलांचे चेहरे पडलेले होते. प्रवीण च्या आईला कळत होतं आपल्याला खोटं सांगितलं जातंय पण, हॉस्पिटल मध्ये गेल्याशिवाय काहीही कळणार नव्हतं. समृद्धीच्या बाबांनी पटकन दोन रिक्षा थांबवल्या! तोवर मयुर चे बाबा सुद्धा आले. त्यांचं चेहरा सुद्धा काळजीत दिसत होता. पण, आधीच असलेल्या या टेंशन मध्ये सध्या त्यांनी शांत राहणं पसंत केलं. सिटी हॉस्पिटल सांगून सगळे रिक्षेत बसले.
**************************
तिथे हॉस्पिटल मध्ये प्रवीण वर उपचार सुरू झाले होते. तो अचानक त्या बाहुलीच्या प्रभावाखाली गेल्याने पुन्हा बेटाकडे ओढला जात होता आणि असाच तंद्रीत चालत असताना रस्त्यात एका बाईक ची धडक लागून तो पडला होता. जास्त वर्दळ नसलेला रस्ता असल्याने कोणाला तो तिथे पडला आहे हे माहीतच नव्हतं! आणि तो बाहुलीच्या प्रभावाखाली असल्याने कसलाच आवाज त्याने केला नाही... बाईक वाल्याने त्याला वाचवायचे पूर्ण प्रयत्न केले पण शेवटी त्याला धडक लागली आणि बाईक वाला घाबरून पळून गेला होता. जेव्हा सगळे प्रवीण ला शोधत मागे आले तेव्हा तो रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. सगळी मुलं आणि प्रवीण चे बाबा त्याला असं बघून खूप घाबरले होते. पण, शेवटी त्याच्याकडे बघून त्यांनी धीराने घेऊन त्याला हॉस्पिटल मध्ये घेऊन येण्यासाठी हालचाली सुरू केल्या. रस्त्याच्या कडेला असलेल्या एका दगडावर त्याचं डोकं आपटल्या मुळे डोक्याला खोप पडली होती आणि नेमकी तिथेच काचेची बाटली फुटून पडली होती त्याच्यातल्या एका काचेचा तुकडा त्यात अडकला होता. मयुर चे बाबा रिक्षा बघे पर्यंत नम्रता ने त्याचं डोकं मांडीवर ठेवून स्वतःच्या रुमालाने एक चुंबळ तयार करून त्याच्या खोपे भोवती ठेवून तिच्या बाबांचा आणि प्रवीण च्या बाबांचा रुमाल घेऊन तात्पुरतं बँडेज केलं होतं. तिचा सगळा ड्रेस आणि हात प्रवीण च्या रक्ताने माखले होते. अश्या अवस्थेत त्याच्या आईला सांगायला गेलं तर तिला खूप काळजी वाटेल म्हणून ती सुद्धा प्रवीण सोबत हॉस्पिटल मध्ये आली होती. प्रवीण चे बाबा, नम्रता चे बाबा आणि नम्रता बाहेर थांबले होते. डॉक्टर कधी येतायत आणि प्रवीण आता ठीक आहे असं सांगतायत असं त्यांना झालं होतं. एवढा वेळ नम्रता ने सगळं धीराने घेतलं होतं पण आता तिला सुद्धा त्याची खूप काळजी वाटत होती. एवढ्यात तिला बाकी सगळे येताना दिसले.
"प्रवीण! अहो प्रवीण कुठे आहे? ठेच लागली तर हॉस्पिटल मध्ये आणतं का कोणी?" प्रवीण च्या आईने रडत रडत विचारलं.
त्याच्या बाबांनी तिला शांत केलं आणि तिथल्या बाकावर बसवून घडलेला सगळा प्रकार सांगितला. एवढा वेळ स्वतःला सावरलेल्या नम्रता ला सुद्धा आता भरून येत होतं. ती सुद्धा तिच्या आईच्या गळ्यात पडून रडत होती.
"अगं नमु... काय झालं? तू आधी रडणं थांबव नाहीतर प्रवीण च्या आईला कोण धीर देईल? एवढं सगळं धीराने घेतलं आणि आता काय झालं?" तिच्या आई ने तिला मागे सारून तिचे डोळे पुसले आणि प्रवीण च्या आईच्या बाजूला बसवलं आणि ती तिच्या बाजूला बसली.
"आई! अगं माझंच चुकलं! मी त्याच्यावर नीट लक्ष ठेवायला हवं होतं. त्याला एवढं लागलं नसतं...." असं म्हणून ती पुन्हा रडायला लागली.
"नाही बाळा! तुझं काहीही चुकलं नाही... तुम्ही सगळे होतात म्हणून त्याला वेळेत उपचार मिळतायत... होईल तो बरा मला खात्री आहे.." प्रवीण ची आई स्वतःला सावरून स्वतःचे डोळे पुसत म्हणाली.
"आई... काकू... मी नाही जगू शकत प्रवीण शिवाय... त्याला काही त्रास झाला की त्याच्या पेक्षा जास्त त्रास मला होतो..." नम्रता ने भावनेच्या भरात तिचं प्रेम सगळ्यांसमोर व्यक्त केलं.
ती परिस्थिती अशी होती की कोणालाही ते एवढं लक्षात आलं नाही... एवढ्यात डॉक्टर बाहेर आले. त्यांना पाहून प्रवीण चे बाबा, आई आणि बाकी सगळ्यांनी त्यांच्या भोवती गराडा घातला.
"डॉक्टर! प्रवीण कसा आहे आता? काही सिरियस नाहीये ना?" त्याच्या बाबांनी विचारलं.
"तुम्ही सगळे आधी शांत व्हा... तो आता ठीक आहे... त्याला प्राथमिक बँडेज केल्यामुळे जास्त रक्तस्त्राव झाला असता तो वाचला. तरीही बरंच रक्त गेलं आहे त्यामुळे त्याला अशक्तपणा जाणवू शकतो. त्याला सहा टाके आले आहेत पण, तो थोड्याच दिवसात पूर्ण बरा होईल... साधारण अर्ध्या तासात तो शुध्दीवर आला की अजून काही टेस्ट करू मग उद्या सकाळी तुम्ही त्याला घरी घेऊन जाऊ शकता... आपण त्याला एक दिवस observation मध्ये ठेवणार आहोत." डॉक्टरांनी सगळं सांगितलं.
"थँक्यू डॉक्टर! आम्ही त्याला पाहू शकतो का?" त्याच्या आईने विचारलं.
"हो.. का नाही... पण, आत्ता तो बेशुद्ध आहे.. एक एक करून बघा... आणि सगळ्यांनी नका जाऊ.. फक्त दोन तीन जणं जा.. तिथे नर्स आहेत... काही लागलं तर त्यांना सांगा.. मी थोड्यावेळात येतोच आहे!" डॉक्टर म्हणाले.
लगेचच त्याची आई आत गेली. तो एकदम शांत झोपल्या सारखा बेडवर पडून होता. तिला त्याला असं बघवत नव्हतं. डोक्याला पांढऱ्या पट्टीचं बँडेज, निस्तेज चेहरा आणि खूप काळ आजारी आहे असे गळून पडलेले हात पाय! त्याची आई तशीच रडत रडत त्याला बघत होती. प्रवीण च्या बाबांनी तिला तिथे येऊन सावरलं आणि बाहेर आणलं. ते सुद्धा त्याला बघून आले. त्यांचा चेहरा पण काळजीने उतरला होता. त्याच्या आईला ते समजावत होते पण कुठेतरी मनातून ते स्वतः खचलेले जाणवत होते.
"नका काळजी करू.. डॉक्टर म्हणाले ना काळजीचं काही कारण नाहीये.... होईल तो बरा.." समृध्दी च्या बाबांनी प्रवीण च्या बाबांना खांद्यावर थोपटून धीर दिला.
त्यांनी फक्त मान डोलावली आणि एकदा त्याच्या आईकडे बघितलं. आपणच जर असं केलं तर हिने कोणाकडे बघायचं म्हणून त्यांनी स्वतःला सावरलं.
"तू नको काळजी करुस... मी डॉक्टरांना भेटून येतो... काही औषधं आणायची असतील तर घेऊन येतो..." ते त्याच्या आईला म्हणाले.
"मी पण येतो सोबत..." समृध्दी चे बाबा म्हणाले.
ते दोघं फॉर्मालिटी पूर्ण करायला गेले. मयुर च्या बाबांना पण सगळ्यांना काहीतरी सांगायचं होतं पण अजून हि योग्य वेळ नाही म्हणून ते शांत होते. थोडावेळ असाच शांततेत गेला.
"आई! मी एकदा प्रवीण ला बघून येते.. मला कसंतरी वाटतंय.." नम्रता म्हणाली आणि ती आत गेली.
अजूनही प्रवीण बेशुद्ध होता. ती तिथे असलेल्या खुर्चीवर बसली. एवढा वेळ कसंबसं तिने स्वतःला सावरलं होतं पण आता तिचा बांध फुटला होता. तिने त्याचा हात हातात धरला आणि त्याच्याशी बोलू लागली; "प्रवीण! यार असं करत का कोणी? काय हालत झाली आहे तुझी... लवकर बरा हो ना... सगळे बघ किती काळजीत आहेत.... खरंतर माझंच चुकलं! तुला नजरेआड करायला नको होतं... Sorry ना... पण आता उठ... तुला माहितेय ना तुला असा त्रास झाला की त्याच्यापेक्षा जास्त त्रास मला होतो! उठ ना...."
ती एवढं म्हणाली आणि त्याचा हात हातात घेऊनच रडत होती. तो अजुनही शुध्दीवर आलेला नव्हता. तिला त्याला असं बघूनच जास्त त्रास होत होता.
"प्रवीण! आय... आय.... आय लव्ह यू.." ती कचरत एकदम हळू आवाजात म्हणाली.
तरीही त्याची काहीही शुध्दीवर येण्याची चिन्हं दिसत नव्हती. तिने डोळे पुसले आणि बाप्पाचं नाव घेऊन ती बाहेर आली.
"नमु! कसा आहे ग तो?" तिच्या आईने तिला विचारलं.
हे ऐकुन तर तिला रडूच आलं आणि ती आईच्या कुशीत शिरून रडू लागली.
"आई.... प्रवीण बघ ना ग अजून शुध्दीवर आला नाहीये... का असा त्रास देतोय... आई! खरंच मी नाही जगू शकत त्याच्याशिवाय... आमचं एकमेकांवर प्रेम आहे...." ती रडत रडत सगळं बोलून गेली.
"काय? अगं नमु काय बोलतेय? अजून तुम्ही दोघं लहान आहात..." तिची आई नाराजीच्या सुरात म्हणाली.
ती काहीही बोलली नाही. इतक्यात नर्स बाहेर आली!
"तुमच्यात नम्रता कोण आहे? पटकन या.. पेशंट सतत नाव घेतोय.. तोवर मी डॉक्टरांना बोलवून आणते." नर्स ने विचारलं.
नम्रता लगेच आत गेली. प्रवीण शुध्दीवर येत होता आणि सतत तिचं नाव घेत होता. ती त्याच्याजवळ जाऊन बसली.
"मी आहे प्रवीण! तुला आता कसं वाटतंय.." तिने त्याचा हात धरून विचारलं.
तो फक्त शुद्धीत येत होता अजून बाकी काहीही बोलत नव्हता. इतक्यात डॉक्टर आले. नम्रता तिथून बाजूला सरकली... डॉक्टरांनी त्याला चेक केलं!
"इंजेक्शन तयार करा..." डॉक्टरांनी नर्स कडे बघितलं आणि सांगितलं.
नर्स ने एक इंजेक्शन तयार करून दिलं.. त्याला इंजेक्शन दिलं तसा तो हळूहळू डोळे उघडू लागला.
"नमु! आपण कुठे आहोत?" त्याने आजूबाजूला पाहत विचारलं.
डॉक्टरांनी त्याला तो हॉस्पिटल मध्ये आहे याची जाणीव करून दिली.
"आता कसं वाटतंय?" त्यांनी प्रवीण ला विचारलं.
"ठीक! पण डोकं जरा जड वाटतंय..." प्रवीण म्हणाला.
"हो.. तुला डोक्याला खोप पडली आहे तिथे टाके आले आहेत त्यामुळे जरा दुखेल... पण चक्कर किंवा डोक्यात मुंग्या आल्यासारखं वाटतंय का?" डॉक्टर त्याची नाडी तपासात म्हणाले.
"नाही..." तो म्हणाला.
"ओके.. गूड! आता आराम करायचा आणि जास्त बोलायचं नाही..." डॉक्टर म्हणाले.
नर्स ने सगळं लिहून तिथे त्याच्या बेड पाशी ठेवलं आणि ते दोघं बाहेर आले.
"डॉक्टर! कसा आहे प्रवीण? सगळं ठीक आहे ना?" त्याच्या आईने विचारलं.
"हो.. हो.. सगळं ठीक आहे.... मला आधी इंटर्नल काही मार लागला असेल याची शंका होती पण तसं काही नाहीये.. त्यामुळे काळजी नसावी.. शिवाय तो अर्ध्या तासात शुध्दीवर येणार होता पण वीस मिनिटातच आला. त्याची recovery लवकर होईल... आता तुम्ही सगळे त्याला भेटू शकता पण जास्त गोंधळ करू नका..." डॉक्टर म्हणाले.
"थँक्यू डॉक्टर! अजून काही औषधं वैगरे आणायची आहेत का?" प्रवीण च्या बाबांनी विचारलं.
"नाही... मगाशी फक्त तुम्हाला जी लिहून दिली आहेत ती घेऊन या आणि नर्स कडे द्या." डॉक्टर म्हणाले आणि तिथून निघाले.
सगळे आत गेले. नम्रता त्याच्याशी बोलत बसली होती... एरवी तो बडबड करत असे आणि ही ऐकुन घेत असे पण आज डॉक्टरांनी त्याला जास्त बोलू नको सांगितल्यामुळे नम्रता त्याला जास्त बोलून देत नव्हती. सगळ्यांना बघून नम्रता उठली. प्रवीण ची आई आणि बाबा त्याच्या जवळ जाऊन बसले.
"बाळा! आता बरं आहे ना? काय हे करून ठेवलं? असा कसा तू मागे राहिला आणि accident झाला?" त्याच्या आईने विचारलं.
"मलाच कळलं नाही... मला पुन्हा ती बाहुली दिसत होती आणि मी नंतर अचानक कुठे चालतोय हे लक्षात आलं नाही माझ्या... मला जेव्हा डोक्याला लागलं तेव्हा दुखलेलं जाणवलं पण, बेट डोळ्यासमोर येत होतं आणि नंतर पूर्ण अंधारी आली आणि डोळे उघडले तर आत्ता इथे आहे." प्रवीण ने हळूहळू आठवून सगळं सांगितलं.
"अरे देवा! म्हणजे पुन्हा त्या बाहुली मुळे तुझा जीव धोक्यात होता... जीवावरच आज खोपेवर निभावलं आहे." त्याची आई म्हणाली.
क्रमशः....
**************************
नम्रता आणि प्रवीण च्या प्रेमाबद्दल जेव्हा आता सगळं घरी समजेल तेव्हा त्यांची काय reaction असेल? मयुर च्या बाबांना कोणाचा फोन आला असेल? काय सांगायचं असेल त्यांना? आता सगळे देवळात कधी जातील? पाहूया पुढच्या भागात.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा