Login

एक बेट मंतरलेलं (भाग -३३) #मराठी_कादंबरी

Horror island story. Horror Marathi kadambari. Ira blogging stories.

एक बेट मंतरलेलं (भाग -३३) 

© प्रतिक्षा माजगावकर 

(सदर कथा पूर्णतः काल्पनिक असून कथेतील सर्व पात्रे, घटना, स्थळे यांचा वास्तवाशी काहीही संबंध नाही. कथा केवळ मनोरंजनाच्या हेतूने लिहिली आहे. यातून कोणतीही अंधश्रद्धा पसरवण्याचा किंवा कोणत्याही रुढी परंपरांचा अपमान करण्याचा हेतू नाही.)
****************************
नम्रता तिच्याच विचारात कुस बदलत हरवली होती. प्रवीण ला किंवा इतर कोणालाही काही त्रास होऊ नये यासाठी बाप्पाकडे प्रार्थना करता करता प्रवीण च्या विचारात हरवून तिला कधी झोप लागली हे समजलं नाही. ती झोपेत स्वतःशीच हसत होती. उशिरा झोपल्यामुळे सकाळी तिला काही स्वतः हून जाग आली नाही. एव्हाना सकाळचे साडे सात वाजले होते! तिची आई प्रवीण आणि बाकी सगळ्यांसाठी चहा, नाश्त्याची तयारी करत होती. प्रवीण ची आई सुद्धा मदतीला होती! त्या दोघींच्या आवाजाने नम्रता ला जाग आली! तिने घड्याळ बघितलं आणि काहीही न बोलता हळूच मोबाईल घेऊन सवई प्रमाणे प्रवीण ला गूड मॉर्निंग चा मेसेज केला आणि ती तिचं आवरायला गेली. सतत दोन दिवसाची धावपळ आणि अपुरी झोप यामुळे तिला आज जरा डोकं जड झाल्यासारखं आणि मरगळ आल्या सारखं वाटत होतं. पण, आज प्रवीण घरी येणार आणि गुरुजी सुद्धा येणार म्हणून त्याकडे दुर्लक्ष करून तिने आवरून घेतलं. 

"चल नमु! पटापट सगळं आवरू.... प्रवीण ला दहा वाजता सोडणार आहेत. त्याला घरी घेऊन आपण सगळेच जायचं आहे... अकरा पर्यंत गुरुजी येतील..." तिची आई तिला म्हणाली. 

नम्रता ने फक्त होकारार्थी मान डोलावली आणि सगळे चहा नाश्ता करू लागले. नम्रता जेव्हा तिचं आवरत होती तेव्हाच तिचे बाबा येऊन डबा घेऊन गेले होते आणि प्रवीण ला कधी सोडणार हे सांगितलं होतं. नम्रता च्या आईने लगेच समृध्दी आणि मयुर च्या घरी सुद्धा याबद्दल सांगितलं होतं आणि ते सगळे परस्पर प्रवीण च्या घरीच भेटणार होते. उगाच हॉस्पिटल मध्ये गर्दी नको म्हणून त्यांचं हे ठरलं होतं. सगळं आवरून या तिघी हॉस्पिटल मध्ये जायला निघाल्या. एव्हाना नऊ वाजत आले होते. हॉस्पिटल मध्ये पोहोचे पर्यंत साधारण सव्वा नऊ होणार होते. तिघी हॉस्पिटल मध्ये पोहोचल्या. नुकतेच डॉक्टर त्याला तपासायला आत गेले होते. 

"डॉक्टरांनी अजून काही टेस्ट वैगरे सांगितल्या आहेत का?" प्रवीण च्या आईने गेल्या गेल्या त्याच्या बाबांना विचारलं. 

"नाही.. ते त्याला चेक करतायत.. बघूया आता काय सांगतील." त्याचे बाबा म्हणाले. 

सगळे डॉक्टर बाहेर येण्याची वाट बघत होते. थोड्याच वेळात ते बाहेर आले. 

"प्रवीण आता बरा आहे. त्याची recovery पण फास्ट होतेय. तुम्ही त्याला दहा वाजता घेऊन जाऊ शकता. तोवर सगळ्या formalities पूर्ण करा आणि त्याला आत्ता गोळ्या दिल्या आहेत तर अर्धा तास झोपुद्या." डॉक्टर म्हणाले. 

"ओके... अजून काही पथ्य?" प्रवीण च्या बाबांनी विचारलं. 

"हो! म्हणजे त्याची जखम पाण्यात ओली होणार नाही याची काळजी घ्या. आपण पुन्हा उद्या संध्याकाळी त्याचं ड्रेसिंग करू. खाण्यात सगळं खाल्लं तरी चालेल फक्त जास्त तेलकट आणि तिखट नको. घरचं रोजचं जेवण द्यायला हरकत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं त्याच्या डोक्यावर जास्त ताण येईल अश्या सगळ्या गोष्टींपासून त्याला थोडे दिवस लांब ठेवा. जरी वरच्या वर मार बसला असला तरी त्याला जास्त विचार करून त्रास होऊ शकतो." डॉक्टरांनी सगळं सांगितलं. 

"ओके.." प्रवीण चे बाबा म्हणाले. 

"आत्ता मी नर्स कडे औषधं लिहून दिली आहेत ती घेऊन या.. नर्स तुम्हाला डोस समजावून सांगतील. मी त्याला डिस्चार्ज देण्याआधी एकदा येतोच आहे." डॉक्टर म्हणाले आणि ते पुढच्या राऊंड ला गेले. 

प्रवीण चे बाबा formality पूर्ण करायला तर नम्रता चे बाबा औषध घेऊन यायला गेले. नम्रता, तिची आई आणि प्रवीण ची आई बाहेरच बसल्या होत्या. 

"आई! मी प्रवीण झोपला का बघून येते.. नाहीतर त्याला झोपायला सांगते." नम्रता म्हणाली. 

ती आत गेली. तर प्रवीण ला आधीच झोप लागली होती. तो झोपेत अगदी लहान मुलासारखा निरागस दिसत होता. नम्रता त्याला फक्त पाहत होती. कालच्या पेक्षा आजचा त्याचा चेहरा जरा फ्रेश दिसत होता. 

"चला काल काही संकट आलं नाही. आज आता साहेब फ्रेश दिसतायत." ती त्याच्याकडे पाहत मनात म्हणाली. 

ती त्याच्याकडे भान हरपून पाहत असताना त्याची हालचाल झाली आणि तो हसत होता. त्याच्या चुळबुळी मुळे नम्रता ने नजर फिरवली. नंतर हळूच तिरकस नजरेने त्याच्याकडे बघितलं तर तो झोपेतच हसत होता. 

"वेडा! झोपेतच स्वतःशी हसतोय... किती निरागस दिसतोय... बाप्पा! कायम याला असंच सुखात ठेव... सतत दुसऱ्यांचा विचार करणारा, सगळ्यांची मदत करणारा ग्रुप चा कणा आहे हा! आणि माझ्या आयुष्याचा पण!" ती त्याच्याकडे बघत मनात म्हणत होती आणि स्वतःशीच लाजत होती. 

एवढ्यात त्याची आई आत आली. तिला असं पाहून त्याच्या आईला हसूच आलं. ती तिथेच उभी राहून नम्रता ची मजा बघत होती. अचानक नम्रता च लक्ष त्याच्या आई कडे गेलं आणि तिने लाजून मान खाली घातली आणि स्वतःशीच हसत जीभ बाहेर काढून डोक्यावर हात मारून घेतला आणि काहीही न बोलता सरळ बाहेर आली. 

"आई.. प्रवीण झोपला आहे..." ती नॉर्मल असल्या सारखी तिच्या आई ला म्हणाली. 

पण, तिचे लाल झालेले गाल तिच्या आई ने पाहिले होते आणि ती सुद्धा हसून बर म्हणाली. उगाच आपणच विषय नको वाढवायला म्हणून ती काहीच न बोलता तिच्या आईच्या बाजूला बसली. थोड्याच वेळात नम्रता चे बाबा आणि प्रवीण चे बाबा आले. एव्हाना दहा वाजत आले होते. प्रवीण च्या आईने त्याला घरी जाण्यासाठी उठवले होते. तो त्याचं आवरत होता. तोवर नर्स ने त्याच्या आई - बाबांना सगळ्या औषधांचे डोस समजावून सांगितले. प्रवीण च आवरून झालंच होतं. डॉक्टर सुद्धा तिथे आले. 

"घरी चालला आहेस पण काळजी घ्यायची. जास्त डोक्याला त्रास करून घ्यायचा नाही. निदान चार ते पाच दिवस तरी बाहेर जायचं नाही, घरातलं खायचं." डॉक्टर त्याला सगळ्या सूचना देत म्हणाले. 

प्रवीण ने हसून हो म्हणलं आणि ते सगळे पुन्हा घरी जायला निघाले. 

"तुम्ही सगळे पुढे व्हा. मी अंघोळ करून येतो लगेच." नम्रता चे बाबा म्हणाले आणि ते स्वतःच्या घरी जायला निघाले. 

"प्रवीण! आता खरंच बरं वाटतंय ना? अकरा वाजता गुरुजी येतील..." प्रवीण च्या आईने त्याला विचारलं. 

"हो आई! आता मी एकदम ठणठणीत आहे." तो म्हणाला. 

बोलता बोलता सगळे प्रवीण च्या घरी पोहोचले. साडे दहा वाजले होते. प्रवीण आणि त्याच्या बाबांनी पण स्वतःचं आवरून घेतलं. तोपर्यंत बाकीचे सगळे सुद्धा आले. सगळे तिथेच गप्पा मारत बसले होते. प्रवीण त्याच्या रूम मध्ये होता म्हणून सगळी मुलं तिथे गेली. 

"काय प्रवीण कसा आहेस?" समृध्दी ने विचारलं. 

"कसा दिसतोय?" तो म्हणाला. 

"अरे बस का भावा! एकदम टकाटक... ते पिक्चर मध्ये दाखवतात ना हिरो चा accident होतो आणि हिरॉईन त्याच्यावर फिदा होते तसं काही करायचं होतं का तुला?? आ... आ..??" मयुर त्याला कोपराने डिवचत म्हणाला. 

प्रवीण हसत होता आणि नाही म्हणून त्याने सांगितलं. समृध्दी नम्रता कडे बघत होती पण तिचं काही या सगळ्या गोष्टींकडे लक्ष नव्हतं. ती तिच्याच धुंदीत होती. तिघांनी एकमेकांकडे बघितलं आणि खांदे उंचावून काय झालं काय माहित अशी खूण केली. 

"नमु मॅडम! काय झालं?" समृध्दी एकदम तिच्या खांद्यावर हात टाकून म्हणाली. 

तिच्या या अचानक ओरडण्याने आणि धक्का लागल्याने नम्रता एकदम भानावर आली आणि दचकली. 

"जरा हळू ना! घाबरले ना मी.." नम्रता मस्तकावर हात ठेवून म्हणाली. 

ती खूपच जास्त घाबरली होती. तिचे वाढलेले हृदयाचे ठोके समृध्दी ला जाणवत होते. तिने लगेच नम्रता ला तिच्या मागे असणाऱ्या खुर्चीवर बसवले. 

"नमु यार एवढं काय झालं दचकायला? कसला विचार करत होतीस एवढा?" समृध्दी ने तिला विचारलं. 

तोवर प्रवीण ने त्याच्या बेड च्या बाजूला असलेल्या टेबल वरून पाणी घेतलं आणि ते तिला दिलं. पाणी पिऊन ती थोडी शांत झाली. 

"ते मला ना..." नम्रता बोलत होती एवढ्यात गुरुजी आले म्हणून बाहेरून प्रवीण च्या आईने सगळ्यांना हाक मारली म्हणून सगळे बाहेर गेले. 
*************************
बेटावर मात्र अमन, श्वेता आणि रक्त पिशाच्च मिळून जल्लोष साजरा करत होते. श्वेता च रूपांतर सावलीत झालं असलं तरी ती अमन आणि रक्त पिशाचाकडून येणारी ऊर्जा वापरत होती. सैतान तिथून दुसरीकडे गेला होता आणि म्हणून या तिघांना जरा बोलायला मोकळीक मिळाली होती. 

"हे रक्त पिशाच्च! प्रवीण बरा होऊन घरी आला आहे पण, आपला त्यावरचा ताबा सुटलेला तर नाही ना?" अमन ने विचारलं. 

"नाही.... फक्त एक काळजी करण्यासारखी गोष्ट घडली आहे!" रक्त पिशाच्च म्हणालं. 

"काय?" अमन ने विचारलं. 

रक्त पिशाचाचे बोलणं ऐकून श्वेता ची सावली पण स्थिर उभी होती. आधीच सैतान तिच्यावर कोपला होता म्हणून सावलीत तिचं रूपांतर झालं होतं त्यात जर अजून सैतान कोपला तर, रक्त पिशाच्च आणि अमन मूर्तीत परावर्तित होतील पण, तिचं तर अस्तित्वच संपून जाईल याची तिला जास्त भीती होती. 

"मुलांसोबत जी बाहुली त्यांना मदत करत होती तिच्याशी असणारा संपर्क तुटला आहे. नक्कीच काहीतरी घडलं आहे तिथे." रक्त पिशाच्च म्हणालं. 

"एवढंच ना! आपली सैनिक बाहुली आहे ना मग सगळं सांगायला." अमन निर्धास्त होत मान वाकडी करून हाड मोडत म्हणाला. 

"हो... पण, जर मुलांनी आपल्या शक्तींना कैद करून त्या बाहुलीला पकडायची योजना आखली असेल तर आपलं सगळं पितळ उघडं पडेल!" रक्त पिशाच्च म्हणालं. 

"नाही! असं काही होणार नाही... मुलांना माहीतच नाहीये आपली एक सैनिक बाहुली त्यांच्या मागावर आहे..." अमन म्हणाला. 

"कोण म्हणालं?" रक्त पिशाच्च ओरडून म्हणालं.

रक्त पिशाच्च असं ओरडून बोलणं आणि अचानक या गोष्टीचा उलगडा होणं म्हणून तो गोंधळात होता. 

"मुलांना तुम्ही पाठवलेल्या सैनिक बाहुली बद्दल शंका आली आहे. जर मला माझे बळी मिळाले नाहीत तर तुमच्या कोणाचंच काही खरं नाही..." रक्त पिशाच्च दात विचाकवून एकदम भयंकर पद्धतीने म्हणालं.

त्यांचं हे बोलणं सैतानाने ऐकलं होतं. त्याला येताना या सगळ्यांनी बघितलं म्हणून अमन बोलू लागला; "सैतान! आता तुम्हीच मार्ग दाखवा." अमन म्हणाला. 

"मी? मी का मार्ग दाखवायचा? मला जागृत केलं, सगळ्या सृष्टीवर तुम्हाला तुमचं राज्य हवं होतं तेव्हा मला विचारलं? मग आता का?" सैतान चवताळून म्हणाला आणि तिथून निघून गेला. 

"हे रक्त पिशाच्च! आता आपण नक्की काय करायचं? सैतान खुश राहायला हवा." अमन म्हणाला. 

"सैतानाला खुश करायचं तर आज त्याला माणसाचं मांस मिळायला हवं! माणसाचं मांस, ताज रक्त आणि साप, पालींची भेळ दिली तर तो खुश होईल." रक्त पिशाच्च म्हणालं.

"साप, पाली तर इथे मिळतील पण, माणूस आणायला बेटा बाहेर जावं लागेल आणि जोवर सगळे विधी पूर्ण होत नाहीत आम्ही बाहेर नाही जाऊ शकणार." अमन म्हणाला. 

"मी तुला आणि श्वेता ला काही शक्ती प्रदान करतो. श्वेता सावली रूपात आहे त्यामुळे तिला घाबरून माणूस तुझ्याकडे ओढला जाईल. पण, बेटा बाहेर तुम्ही फक्त पंधरा मिनिटं थांबू शकता. त्या नंतर पौर्णिमेच्या दिवसा पर्यंत तुमच्यात खूप कमी शक्ती असतील... त्यामुळे तुम्हाला दोघांना सावध राहावं लागेल. यात खूप मोठा धोका आहे पण, सैतानाला खुश करण्याचा हा एकमेव पर्याय आहे. विचार करून मला सांग." त्या अर्ध मूर्तीतून आवाज आला. 

"हो..." श्वेता च्या सावलीतून आवाज आला. 

तसंही आता हा शेवटचा पर्याय आहे आणि सैतान खुश झाला, आपल्या शक्ती वाढल्या तर नंतर आपलंच राज्य आहे असा विचार करून श्वेता ने हो म्हणलं होतं. तिचा होकार ऐकुन अमन ने सुद्धा होकार दिला. 

क्रमशः.....
**************************
रक्त पिशाच्च ज्या काही शक्ती य दोघांना देईल त्याचा उपयोग होईल का? सैतानाला खरंच मुलांचा प्लॅन समजला असेल की त्याने मुद्दाम केलं असेल? नम्रता ला अचानक काय वाटलं असेल? गुरुजी आले आहेत ते आता काय सांगतील? पाहूया पुढच्या भागात. 

🎭 Series Post

View all