एक बेट मंतरलेलं (भाग -३४)
© प्रतिक्षा माजगावकर
(सदर कथा पूर्णतः काल्पनिक असून कथेतील सर्व पात्रे, घटना, स्थळे यांचा वास्तवाशी काहीही संबंध नाही. कथा केवळ मनोरंजनाच्या हेतूने लिहिली आहे. यातून कोणतीही अंधश्रद्धा पसरवण्याचा किंवा कोणत्याही रुढी परंपरांचा अपमान करण्याचा हेतू नाही.)
****************************
नम्रता आणि बाकी सगळे बाहेर आले. तोवर तिचे बाबा सुद्धा तिथे पोहोचले होते. सगळ्यांनी गुरुजींना नमस्कार केला आणि आता ते काय सांगतायत याकडे त्यांचं लक्ष लागलं. गुरुजी सगळ्या घरभर नजर फिरवत होते. त्यांच्या चेहऱ्यावरचे बदलणारे भाव सगळ्यांनाच दिसत होते. नक्कीच काहीतरी सिरियस झालं आहे हे सगळ्यांना कळून चुकलं होतं. गुरुजींनी त्यांच्या पिशवीतून एक माळ काढली आणि ते मंत्र म्हणत सगळ्या घरात फिरत होते.
"काय झालं असेल?" मयुर हळू आवाजात नम्रता च्या कानात पुटपुटला.
नम्रता ने थांब कळेलच म्हणून त्याला खुणावले. गुरुजीं कडे सगळे प्रश्नार्थक नजरेने बघत होते. त्यांनी त्यांचं काम केलं आणि पुन्हा हॉल मध्ये आले.
"काय झालं गुरुजी?" प्रवीण च्या बाबांनी विचारलं.
"तुमच्या घरात वाईट शक्तींनी प्रवेश केला आहे म्हणून प्रवीण ला त्रास होतोय.." त्यांनी सांगितलं.
"क.. काय? आता काय करावं लागेल?" प्रवीण ची आई घाबरून म्हणाली.
"एवढं घाबरून जाऊ नका... आपण घाबरलो की वाईट शक्ती जास्त प्रभावी होतात... म्हणूनच म्हणलं जातं भित्या पाठी ब्रह्मराक्षस..." गुरुजी म्हणाले.
"बघा आई, बाबा! मी म्हणत होतो ना एक बाहुली आहे... नक्की तिच अजून इथे असेल.." प्रवीण म्हणाला.
"हो.. हो... तू शांत हो... तुला असा डोक्याला ताण देऊन चालणार नाहीये... बस इथे." त्याची आई त्याला शांत करत तिथल्या खुर्चीवर बसवत म्हणाली.
तो जरा शांत झाला तेव्हा गुरुजींनी बोलायला सुरुवात केली; "काल पूजेच्या वेळी मला नम्रता ने सगळं सांगितलं आहे. तू फक्त ती बाहुली तुला कुठे दिसली होती हे सांग..."
"हो! चला मी दाखवतो..." तो म्हणाला आणि चालू लागला.
"एक मिनिटं..." गुरुजींनी त्याला थांबवलं.
त्याने मागे वळून पाहिलं आणि तो जागीच थांबला. गुरुजींनी त्यांच्या पिशवीतून धागा, अंगारा आणि एक लॉकेट काढलं. बाप्पाच स्मरण करून त्यांनी प्रवीण ला एक प्रकारे सुरक्षा कवच दिलं.
"चल आता..." ते म्हणाले.
प्रवीण ला सुद्धा आता खूप छान वाटत होतं. भीती कमी झाल्यासारखी वाटत होती. त्याने त्याच्या रूम मध्ये जिथे ती बाहुली पडली होती ती जागा दाखवली. गुरुजींना तिथे नकारात्मक शक्ती होती याची जाणीव व्हायला लागली होती. प्रवीण आत्ताच आजारातून उठला आहे आणि त्याचं मन एवढं strong नाहीये म्हणून गुरुजींनी त्याला बाहेर जायला सांगितलं.
"काय झालं प्रवीण? गुरुजी काय करतायत?" त्याच्या आईने विचारलं.
"ते आतच आहेत..." प्रवीण म्हणाला.
सगळे गुरुजी आता काय सांगतील आणि त्यांना बाहुली मिळाली असेल का या विचारात होते. प्रवीण चे बाबा तिथेच येरझाऱ्या घालत होते. थोड्याच वेळात गुरुजी बाहेर आले. त्यांच्या हातात ती बाहुली सुद्धा होती.
"ही बाहुली! प्रवीण ला हीच दिसली असणार... आणि या बाहुली च्या प्रभावाखाली दीपा त्या दिवशी गेली असणार. प्रवीण ज्या रात्री बेटावर जायला निघाला होता तेव्हाच दीपा वर सुद्धा हीचा प्रभाव पडत होता. खरंतर या बाहुलीला नम्रता च्या घरात सुद्धा प्रवेश करायचा असणार पण, तिच्या घरात जे भक्तीमय वातावरणात असतं त्यामुळे तिला प्रवेश करता आला नाही. म्हणून, दिपाचा वापर हिने करून घेतला." गुरुजींनी सांगितलं.
"हो! ही बाहुली मगाशी आतच होती म्हणून मला तिथे खूप विचित्र वाटत होतं. अस्वस्थ होत होतं. आणि एक महत्त्वाची गोष्ट! या बाहुलीचा चेहरा मला जी लहान मुलगी रस्त्यात भेटली होती तिच्या सारखा वाटतोय..." नम्रता म्हणाली.
"ही तीच असणार! दीपा साठी जी माळ दिली गेली होती त्या माध्यमातूनच या बाहुली ने दीपा ला वश केलं होतं. हिला तुझ्या घरात प्रवेश मिळवता आला नाही म्हणून दीपा चा वापर करणं चालू केलं होतं." गुरुजींनी सांगितलं.
"पण मग गुरुजी आता या बाहुली च काय करायचं?" नम्रता च्या आईने विचारलं.
"जोवर दीपा ला आपण मुक्ती मिळवून देत नाही तोवर या बाहुली सोबत आपण काहीही करू शकत नाही." ते म्हणाले.
"म्हणजे गुरुजी ही बाहुली आम्हाला, आमच्या मुलांना पुन्हा त्रास देईल..." प्रवीण ची आई काळजीने म्हणाली.
"नाही... तसं काही होणार नाही.... मी तिला बंधनात अडकवून ठेवतो..." ते म्हणाले.
लगेचच त्यांनी दिशा आणि बाकी गोष्टी बघून एका शो केस वर त्या बाहुलीला ठेवलं आणि तिच्या बाजूने मंत्र म्हणून एक धागा ठेवला.
"ही बाहुली आता हे बंधन तोडून कुठेही जाऊ शकणार नाही. पण, मुलांनो! तुम्ही सगळ्यांनी आता तुमचं मनोबल वाढवण्यासाठी नियमित बाप्पाच स्मरण करायचं, उपासना करायची म्हणजे कोणतीही वाईट शक्ती तुमच्यावर प्रभाव टाकू शकणार नाही." गुरुजींनी सांगितलं.
"चालेल... आम्ही नक्की करू..." समृध्दी म्हणाली.
"हे लॉकेट घ्या! सगळ्यांनी आपापल्या गळ्यात घाला." गुरुजी प्रवीण च्या बाबांच्या हातात लॉकेट देत म्हणाले.
त्यांनी सगळ्यांना लॉकेट दिले आणि सगळ्यांनी लगेचच ते घातले.
"चला आता मी येतो... काहीही गरज पडली तर अगदी मध्यरात्री सुद्धा कळवा." गुरुजी म्हणाले.
"बसा ना गुरुजी! निदान चहा, दूध काहीतरी घेऊन जा.." प्रवीण ची आई म्हणाली.
"आत्ता नको... मुलं जेव्हा या सगळ्यातून मुक्त होतील तेव्हा..." ते स्मित करत म्हणाले आणि निघाले सुद्धा.
सगळे त्यांच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत होते. गुरुजी घरी आले काय, त्यांनी सगळं नीट समजावून बाहुली शोधून तिला बंधनात अडकवले काय आणि आता अगदी कधीही मदत लागली तरी सांगा म्हणून गेले काय... सगळे बघतच राहिले होते. त्यांच्या येण्याने घरात आता एकदम प्रसन्नता निर्माण झाली होती. छान मंद हवेची झुळूक येत होती आणि त्या बरोबर चंदना चा सुगंध सुद्धा! सगळे एकदम तजेलदार आणि प्रसन्न झाले होते. गुरुजींनी जे काही करायला सांगितलं ते लक्षात ठेवून सगळे आपापल्या घरी गेले. प्रत्येक जण त्यांच्या सूचनांचे तंतोतंत पालन करत होता. नम्रता सगळ्यांकडून रोज बाप्पाची आराधना करून घेत होती.
*************************
बेटावर मात्र अमन, श्वेता ची माणूस मिळवण्यासाठी धडपड सुरू होती. फक्त पंधरा मिनिटांच्या वेळात त्यांना माणूस हवा होता. पण, आज एरवी ज्या बोटी समुद्रात दिसतात त्या सुद्धा दिसत नव्हत्या! बेटा बाहेर पडून त्या दोघांना साधारण आठ मिनिटं झाली होती. श्वेता सावली रूपात होती त्यामुळे अमन पेक्षा तिचा वेग जास्त होता. त्यात रक्त पिशाचाने शक्ती दिल्यामुळे तिच्यातली कमजोरी दूर झाली होती. ती बेटापासून बरीच दूर पर्यंत जाऊन आली पण तिला कोणीही दिसलं नाही. हताश होऊन ती पुन्हा अमन जवळ येत होती की एवढ्यात एक होडी तिला तिथे दिसली. आपल्याला आपलं सावज मिळालं म्हणून खुश होऊन तिने तिच्या शक्तींचा वापर करून त्या होडीतल्या माणसाला बेटा पर्यंत ओढून आणलं.
"अरे वा! श्वेता.. फक्त एक मिनिट शिल्लक आहे.. चल लवकर याला घेऊन बेटावर..." अमन घाईत जवळ जवळ ओरडलाच!
दोघांनी घाईत त्या माणसाला बेटावर नेलं. तो बोटी मधला माणूस काहीही प्रतिक्रिया देत नव्हता. या दोघांनी बरोबर बेटावर पाऊल ठेवलं आणि पंधरा मिनिटं पूर्ण झाली. तश्या दोघांच्या शक्ती कमी झाल्या आणि दोघं कमजोर होऊ लागले. तो माणूस अजूनही काही react झाला नव्हता. बहुतेक आपलं असं भयानक रूप बघून त्याला धक्का लागला असेल हा विचार करून दोघांनी त्याला त्या पडक्या घरात नेलं.
"हे रक्त पिशाच्च! माणूस आणला आहे." अमन धाप लागल्या सारखा हळू म्हणाला.
त्या अर्ध मूर्तीचे डोळे बंद होते. हळूच रक्त पिशाचाने डोळे उघडले.
"मूर्ख! सोडून द्या त्याला..." रक्त पिशाच्च जवळ जवळ दोघांच्या अंगावर खेकसले.
"का?" अमन ने गोंधळून विचारलं.
"नीट बघा.... हा आपल्यातला एक आहे... सैतानाचा भक्त! तांत्रिक बाबा आहे.. आणि सैतानाला काय त्याच्याच भक्ताचा बळी देणार का?" रक्त पिशाच्च पुन्हा जोरात ओरडले.
आधी सामान्य माणूस दिसणारा तो इसम आता तांत्रिक बाबा च्या रूपात होता. डोक्यावर, हाता पायांवर काळया रंगाच्या रेघा ओढलेल्या होत्या, गळ्यात कवट्यांची माळ आणि एकदम लाल भडक डोळे. त्याचं हे रूप बघून आणि रक्त पिशाचाची आज्ञा शिरसावंद्य मानून लगेचच त्या दोघांनी त्याला सोडलं आणि ते दोघं त्या पडक्या घरातून बाहेर येऊन बसले.
"आपलं काम चोख झालं आहे सैतान... हा.. हा.. हा..." रक्त पिशाच्च सैताना चे स्मरण करून म्हणालं.
अमन, श्वेता मात्र आता पूर्ण हताश झाले होते. मुलांच्या आता काय हालचाली सुरू आहेत हे कळायला मार्ग नव्हता तर दुसरीकडे रक्त पिशाच्च सुद्धा आता आधी सारखं प्रत्येक गोष्टीत त्यांची मदत करत नव्हतं. आता तर दोघांच्याही शक्ती पार कमी झाल्या होत्या. तांत्रिक बाबा तिथून निघाला तेव्हा त्याने हे पाहिलं.
"मला माहितेय तुमच्या दोघांच्या आता शक्ती पूर्णपणे कमी झाल्या आहेत... पण, याला कारणीभूत ते रक्त पिशाच्च आहे." तांत्रिक बाबा एकदम कुजबुजत दोघांना म्हणाला.
"नाही... हे शक्य.. तू इथून निघून जा..." अमन अडखळत त्या बाबाला हकलात म्हणाला.
"ठीक आहे... माझ्यावर विश्वास ठेवू नका.. पण, नंतर फक्त आत डोकावून पाहा.." तांत्रिक बाबा म्हणाला आणि तिथून निघूनही गेला.
अमन, श्वेता नक्की हा काय बडबडला आणि असा का बोलला याचा विचार करत होते. दोघांमध्ये आता जराही त्राण नव्हते म्हणून दोघं तिथेच बसून होते.
*************************
इथे आता रोजच्या बाप्पाच्या उपासनेमुळे मुलांना मानसिक शांती लाभत होती आणि त्यांचं मनोबल वाढत होतं. प्रवीण सुद्धा लवकर बरा होत होता आणि त्याची जखम सुद्धा बरीच भरली होती. अश्यातच आठवडा निघून गेला. आता सगळ्या पालकांनी पुन्हा त्यांच्या ऑफिस च्या कामाला सुरुवात केली होती. एक दिवस अचानक सगळ्यांना मयुर च्या बाबांनी त्यांच्या घरी बोलवून घेतलं. आता सगळं नॉर्मल होत असताना काय झालं म्हणून सगळे जरा काळजीत च त्यांच्या घरी गेले.
"काय झालं? असं अचानक का बोलावलं आहे?" प्रवीण च्या बाबांनी त्यांना दारातूनच विचारलं.
"आधी आत या सगळे... सांगतो.." मयुर चे बाबा म्हणाले.
सगळे आत गेले. मयुर च्या आईने सगळ्यांना बसायला सांगितलं आणि पाणी आणून दिलं. सगळे बसले.
"आता तरी सांगा.." प्रवीण चे बाबा म्हणाले.
"हो.. हो... आपण पॅरा नॉर्मल investigators ना बोलावलं होतं आठवतंय? ते आत्ता अर्ध्या तासात इथे येणार आहेत..." मयुर चे बाबा आनंदाने म्हणाले.
"अरे हो की! सगळ्या या गडबडीत ते डोक्यातून गेलंच होतं." समृध्दी ची आई म्हणाली.
"हो.. ते आले की डायरेक्ट दीपा सोबत बोलून तिच्या मुक्तीचा मार्ग विचारतील.. मग आपली पोरं या सगळ्या संकटातून लवकरच बाहेर पडतील." मयुर ची आई म्हणाली.
"चला बरं झालं! बहुतेक दीपा च्या शक्ती अजून कमी आहेत म्हणून ती स्वतः हुन आपल्याला काहीही क्लू देऊ शकत नाहीये... पॅरा नॉर्मल investigators नी आता काही केलं तर निदान तिला तिच्या मुक्ती चा मार्ग सांगता येईल." नम्रता म्हणाली.
"हो! आता ते येतील तेव्हा सगळं आपण त्यांना सांगू... आता सगळं पुन्हा आधी सारखं नॉर्मल होणार..." प्रवीण चे बाबा आनंदात म्हणाले.
आता मुलं पुन्हा आधी सारखी होतील, त्यांच्या वरचं संकट दूर होईल या आनंदात सगळे छान गप्पा मारत बसले होते. साधारण पाऊण तासात दारावरची बेल वाजली. मयुर च्या बाबांनी दार उघडलं तर समोर पॅरा नॉर्मल investigators ची टीम उभी होती.
"Welcome..." त्याचे बाबा म्हणाले आणि त्या सगळ्यांना आत घेतलं.
क्रमशः......
**************************
अमन, श्वेता ज्या माणसाचा बळी देणार होते तो माणूस तर काळया विद्येचा पुजारी निघाला! त्यांचा हा डाव तर फसला. पण, त्या तांत्रिक बाबा ने त्या दोघांना रक्त पिशाच्च धोका देत आहे असं का सांगितलं? पॅरा नॉर्मल investigators आले आहेत त्यांना याबद्दल काही कळू शकेल का? पाहूया पुढच्या भागात. तोपर्यंत तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा