एक धागा सुखाचा..(भाग १)

आयुष्य म्हणजे सुख दुःखाचा लपंडाव
एक धागा सुखाचा - भाग १

अवघ्या पस्तिशीत आलेले वैधव्य, अर्पिताच्या नशिबाचे चक्रच फिरवून गेले. उभे आयुष्य समोर पडलेले असताना क्षणात होत्याचे नव्हते झाले. त्यात पदरात एक लहान लेकरु, नुसत्या विचारानेच सर्वांच्या काळजाचा ठोका चुकत होता.

अर्पिताच्या आयुष्यातील सुखाच्या धाग्याची एक गाठ तर आता कायमची सुटली होती. उभे आयुष्य समोर असताना दुःखाचा डोंगर तिच्यावर कोसळला होता.

अशातच बायकांची कुजबुज सुरु होती. काहीजणी अर्पिताची समजूत काढत होत्या. तर काहीजणी आपापसांत हळहळ व्यक्त करत होत्या.

"अर्पिता सावर स्वतःला. आता तुलाच पाहायचा आहे हा सारा पसारा. निदान या लेकराचा तरी विचार कर. तू अशी रडत बसलीस तर कमल ताईंनी कोणाकडे पाहायचे ग? त्यांच्या तर हाडामांसाचा गोळा दुरावला ग त्यांच्यापासून. त्यांना तरी आता कोणाचा आधार आहे? तुझे दुःख मी समजू शकते पण आता तुम्हीच दोघींनी एकमेकींचा आधार बनायला हवा ना?"

शेजारच्या लक्ष्मी काकू अर्पिताचे नक्की सांत्वन करत होत्या की तिला तिच्या भविष्यातील जबाबदारीची जाणीव करुन देत होत्या हेच समजेना अनिता ताईंना. लेकीची अवस्था तर त्यांना बघवेना. तिच्या डोळ्यांतील अश्रूंच्या धारा थांबायचे काही नावच घेईना. आता कुठे त्यांच्या लेकीच्या संसाराची घडी नीट बसत होती. पण नियतीला तेही मान्य नव्हते की काय कोणास ठाऊक?

***********
अर्पिता आणि विनय यांचे अरेंज मॅरेज. दोघांच्याही लग्नाला आता जवळपास आठ वर्ष होत होती. पण नियतीने घात केला आणि दोघांच्याही सुखी संसाराला जणू कोणाची तरी दृष्टच लागली.

दोघेही एकमेकांसाठी तितकेच अनुरूप. मेकॅनिकल इंजिनियर असलेला विनय कॉम्प्युटर इंजिनियर असलेल्या अर्पिताच्या पाहता क्षणी प्रेमातच पडला. तिलाही विनय मनापासून आवडला. त्यात विनयची सरकारी नोकरी असल्याने तिच्या घरच्यांचाही लगेचच होकार मिळाला.

दोघेही उत्तम कमावते त्यामुळे 'चट मंगणी पट बिहा', असेच काहीसे झाले अर्पिता आणि विनय सोबत.

लग्नाआधीच अर्पिता शहराच्या ठिकाणी एका नामांकित कंपनीत जॉईन होती. बक्कळ पगाराची नोकरी गाठीशी होती. घरापासून दूर जरी असली तरी आई वडिलांच्या कष्टाचे चीज झाल्याचे समाधान तिच्यासाठी मोठे होते.

विनयचीदेखील काहीशी अशीच परिस्थिती. अत्यंत कठीण परिस्थितीत शिक्षण घेऊन तो इथवर येऊन पोहोचला होता.
लहानपणीच वडिलांचे छत्र हरपले आणि जबाबदारीच्या विस्तवात विनय अगदी होरपळून निघाला. पोटापुरती शेती होती, तिचाच काय आधार उरला त्यावेळी. पण त्याने जिद्द सोडली नाही. कष्ट करत करत शिकण्याचे बाळकडू जणू त्याला त्याच्या वडिलांकडूनच मिळाले होते. पुढे वडीलांच्या निधनानंतर त्याच्या चुलत काकांनी त्याच्या पंखात बळ भरले. त्याला खूप आधार दिला. त्याच्या वडीलांची जागा जणू काकांनीच घेतली.

रोज शाळेत जाण्याआधी आणि शाळेतून घरी आल्यावर विनय अरुण काकांसोबत शेतात जायचा. त्यामुळे शेती कामात तर तो आधीपासूनच तयार झाला होता. पुढे जाऊन तो काकांकडून ट्रॅक्टर चालवायला देखील शिकला. शेती बरोबरच चार चाकी गाड्यांचे देखील त्याला चांगलेच वेड होते. बघता बघता महाशय जेसीबी चालवायला शिकले. एवढे सगळे करून विनय शाळेत देखील अव्वल होता.

बारावीत उत्तम गुणांनी पास झाल्यानंतर त्याची आवड पाहून अरुण काकांनी गावातील काही सुशिक्षित लोकांच्या सल्ल्याने त्याला मेकॅनिकल इंजिनिअरिंगसाठी जिल्ह्याच्या ठिकाणी एडमिशन मिळवून दिले. बघता बघता विनय मेकॅनिकल इंजिनिअर झाला. एवढ्यावरच तो थांबला नाही.
पुढे जाऊन त्याने आरटीओची परीक्षा दिली. पहिल्याच अटेम्ट मध्ये तो पास देखील झाला. अखेर त्याच्या कष्टाचे चीज झाले. त्याचा खडतर प्रवास पाहीलेल्यांना विनयचा खूपच हेवा वाटत होता. जिद्द, मेहनत, चिकाटी आणि आत्मविश्वास याच्या जोरावर त्याने उत्तम यश मिळवले होते. त्याच्या गावापासून जवळच असलेल्या तालुक्याच्या ठिकाणी विनय आरटीओ ऑफिसर म्हणून जॉईन झाला होता.

पुढे अर्पिता सोबत त्याचे लग्न झाले आणि सुखाची जणू वाट त्याला गवसली. अर्पिताच्या रुपात एक संस्कारी मुलगी त्याच्या आयुष्याचा भाग झाली. लग्नानंतर नोकरीमुळे दोघांच्याही नात्यात दुरावा आला खरा पण त्यामुळेच दिवसागणिक प्रेमाची पालवी बहरायला देखील मदतच झाली.

जोडून सुट्ट्या आल्या की तीन ते चार तासांचा प्रवास करून विनय आपल्या लाडक्या बायकोला भेटायला जाणार हे आता नवीन नव्हते कोणाला. परंतु; कमल ताईंना  विनयचे हे असे बेजबाबदारपणाचे वागणे आवडायचे नाही.

"तू असा वरचेवर तिकडे पळतोस म्हणून तिला सासरी येण्याची गरज वाटत नाही."
असे म्हणत कमलताई वारंवार त्याला टोकायच्या. पण नव्या प्रेमाची नवी नवलाई त्याला तसे वागायला भाग पाडत असे. त्यामुळे सासू सुनेच्या नात्यात दुरावा यायला सुरुवात झाली. दोघींचाही एकमेकींशी जास्त संबंध काही आला नाही पण तरीही सासू सुनेच्या नात्यात गैरसमजाची ठिणगी मात्र पडली. त्यात एवढ्या लांबचा प्रवास करून अर्पिताला घरी बोलावणे विनयला पटायचे नाही आणि जरी ती आलीच तरी सांसारिक जबाबदारीतून त्यांना एकमेकांना वेळ थोडीच ना देता येणार होता.

बघता बघता अशीच दोन वर्षे सरली आणि अर्पिताला मातृत्वाची चाहूल लागली. दोघांच्याही आनंदाला जणू उधाण आले. दूर राहूनही विनय बायकोची काळजी घेत होता. जमेल तसे तिला भेटण्यासाठी जात होता. पण घरी कामाचा व्यापही जास्त होता. नोकरी सांभाळून त्याला घरच्या जबाबदाऱ्या देखील पार पाडाव्या लागत होत्या. त्यामुळे त्याचे हात दगडाखाली होते. तरीही जमेल तशी दुरून का होईना पण तो तिची काळजी घेत होता.

दोघेही नोकरदार म्हटल्यावर काही गोष्टी ॲडजस्ट कराव्याच लागणार, हे सत्य आता दोघांनीही स्वीकारले होते.

जसेजसे अर्पिताचे दिवस भरत आले तसे तिला कोणाच्या तरी आधाराची गरज आहे हा विचार करुन विनयने आईला तिकडे पाठवण्याचे ठरवले.

"आई, अगं अर्पिताला आता नववा महिना सुरू झालाय. तू काही दिवसांसाठी जातेस का तिच्या मदतीसाठी?" विनयने कमलताईंना विचारले. परंतु, कमलताईंनी मात्र स्पष्ट नकार दिला.

'आताशी सासूची आठवण झाली मॅडमला. एरव्ही सासू जिवंत आहे की मेली याचीही साधी चौकशी करायला फुरसत नाही.' कमलताई चरफडत मनाशीच बोलत होत्या.

"मी तिकडे गेल्यावर इकडे तुझ्या एकट्यावर कामाचा सगळा भार पडेल. त्यात तुझे जेवणाचेही हाल होतील." असे म्हणत कमल ताईंनी आरतीची जबाबदारी झटकली.

"कामे कशीही होतील आणि माझ्या जेवणाचे देखील मी करतो मॅनेज फक्त वेळ महत्त्वाची आहे." असे विनयने कमल ताईंना समजावून सांगितले.

कमल ताई मात्र काहीही न बोलता पुढच्या कामाला लागल्या.

"आई अगं मी तुझ्याशी बोलत आहे. जातेस ना मग तू?"

"अरे त्या शहराच्या ठिकाणी मला नाही करमत रे विनय. तूही थोडं समजून घे ना!"

"आई अगं तुला कायमचं थोडीच ना जाऊन राहायचं आहे तिकडे. फक्त महिन्याभराचा तर प्रश्न आहे."

"हो सगळं कळतंय मला. पण तूही थोडं समजून घे ना. एक काम कर तिलाच इकडे बोलावून घेतलं तर सगळेच प्रश्न सुटतील."

"आई अगं ते कसं शक्य आहे? तिची ट्रीटमेंट सुरू आहे तिकडे."

"मग इकडे पण चांगले डॉक्टर आहेत की. इकडे ट्रीटमेंट सुरू करता येईल की."

"आणि तिच्या ऑफिसचं काय? नियमानुसार लगेच सुट्ट्या नाही घेता येणार तिला."

"सगळं कसं रे विनय तू तिच्याच बाजूने बोलतोस. सुट्टी नाही म्हणत प्रत्येक वेळी इकडे यायला टाळाटाळ करते ती. हे नाही समजत का तुला?"

"तिच्या बाजूने नाही बोलत आई आणि तू जो गैरसमज करून घेतलाय ना तिच्याबद्दल तो आधी मनातून काढून टाक बरं. अगं अर्पिता तशी नाहीये. तू अजून ओळखलंच नाही तिला."

"हो ना... ओळखण्यासाठी तिनेही अधूनमधून सासरी यायला हवं ना. पण सासरच्या घरचा उंबरा लागतो जणू तिला. सासर फक्त नावाला आहे. तसंही तिला काही देणंघेणं नाही सासरचं." कमल ताईंनी मनातील खदखद बोलून दाखवली.

"आई अगं सतत तेचतेच बोलत राहिल्यावर तिला तरी कशी गोडी निर्माण होईल इकडची. ज्या ज्या वेळी ती इथे आली त्या त्या वेळी तू तिला हेच ऐकवत राहिलीस. मग तिला तरी कशी ओढ राहणार सासरची?"

"तुला माझं बोलणं दिसतं पण तिचं वागणं...ते कधीच चुकीचं वाटत नाही का रे?"

"आई... अगं मुलगी लग्न करून सासरी येते, तिलाही थोडा वेळ द्यायला नको का? सुरुवातच जर अशा अपेक्षांनी होत असेल तर ही अशी वेळ येते मग."

"जाऊ दे विनय. सगळं लक्षात येतंय माझ्या. तुला आईपेक्षा बायकोच बरोबर वाटत आहे. कारण तिने लग्न झाल्यापासून चांगली पट्टी पढवली आहे तुला. आधी तू असा नव्हता विनय."

"अगं आई उलट आता बघ किती छान संधी चालून आलीये, तुम्हा दोघींनाही एकमेकींना जवळून ओळखता येईल. त्यामुळे तुमचं नातंही छान होईल. असं नाही वाटत का गं तुला?"

"आता गरज आहे म्हणून जवळ करायचं आणि वेळ सरली की पुन्हा पहिले पाढे पंचावन्न."

"ते सगळं सोड आई. मला आता विषय जास्त नाही वाढवायचा. कारण त्याचा काही उपयोग नाही हे येतंय माझ्या ध्यानात. फक्त आता तुझं उत्तर हवंय मला. तू अर्पिताकडे जातेस की नाही? फक्त हो किंवा नाही एवढंच सांग. बाकी काही स्पष्टीकरण देऊ नकोस." 

क्रमशः

काय केले असेल त्यावेळी कमल ताईंनी? गेल्या असतील का त्या सुनेच्या मदतीसाठी? जाणून घेऊयात पुढील भागात.

©® कविता वायकर


🎭 Series Post

View all