एक धागा सुखाचा..(भाग २)

आयुष्य म्हणजे सुख दुःखाचा लपंडाव.
एक धागा सुखाचा - भाग २

विनयने कमल ताईंची मनधरणी केली. पण त्याचा काही उपयोग झाला नाही.

"मला नाही जमणार तिकडे जायला." असे बोलून कमल ताईंनी सरळ सरळ हात वर केले.

"बरं ठीक आहे. नको जाऊस." नाराजीच्या सुरात विनय म्हणाला.

कमल ताईंच्या मनात सुनेबद्दल एकच राग होता की, 'हिने वरचेवरचे विनयला तिकडे बोलावून घेण्याऐवजी तिने स्वतःच महिन्यातून एखादी चक्कर टाकावी सासरी.'

सासू म्हणून आता कमल ताईंच्या सुनेकडूनच्या अपेक्षा दिवसागणिक वाढत चालल्या होत्या.

'तरी म्हणत होते मी विनयला, ग्रॅज्युएट झालेली एखादी साधी मुलगी असली तरी चालेल मला सून म्हणून; पण नोकरी करणारी नको. तेव्हा त्याने नाही ऐकले माझे. आता स्वतःबरोबरच होणाऱ्या लेकराचे देखील हाल कर म्हणावं. माझ्याच्याने आहे तेच काम होईना झालंय. आता आणखी हिची जबाबदारी... नको रे बाबा. दोन मुलींची बाळंतपणं कशी केली, ते माझं मला माहिती. ह्याला काय जातंय बोलायला.'

मनातल्या मनात कमलताई सूनेला आणि लेकालाच नावे ठेवून मोकळ्या झाल्या आणि जबाबदारीचे गाठोडे अलगद त्यांनी सरकवून दिले.

अर्पिता मात्र वर्षातून कधीतरी मोठी सुट्टी घेऊन काही दिवस माहेरी तर काही दिवस सासरी थांबून पुन्हा निघून जायची. त्यात असे कधीतरी गावी जाणे झाले की मग जवळच्या नातेवाइकांची देखील भेट महत्त्वाची वाटायची. पण हेच कमल ताईंना खटकत असे. कारण सून म्हणून त्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यात त्यांच्या दृष्टीने अर्पिता कुठेतरी कमी पडत होती.

सासू येणार नाही हे अर्पिताला आधीच ठाउक होते. तसे तिने विनयला आधीच बोलूनही दाखवले होते. पण विनयचा त्याच्या आईवर अति विश्वास होता.

'अर्पिता बरोबर बोलत होती. पण माझाच आईवर खूप विश्वास होता. ही आई पण ना. का असं वागते काही कळेना? गेली असती महिन्याभरासाठी तर काही बिघडलं असतं का? त्यामुळे अर्पिताचे देखील सासू विषयीचे बरेच गैरसमज दूर झाले असते.' विनय मनातच विचार करत होता.

तेवढ्यात विनयला अर्पिताचा कॉल आला.

"हॅलो, बोल ना अर्पिता."

"काय रे काय झालं? असा का येतोय तुझा आवाज. काही दुखतंय का?"

"नाही गं. व्यवस्थित तर बोलतोय. बोल ना."

"बरं काय म्हणाल्या आई? त्या येताहेत ना इकडे?"

"अर्पिता..अगं तू म्हणाली शेवटी तसंच झालं." नाराजीच्या स्वरात विनय बोलला.

"बरं जाऊ दे. तू नको टेन्शन घेऊ. मी बघते काय करायचं ते."

"पण मग आता कसं करायचं?"

"आता आईलाच बोलवावं लागेल दुसरा काहीच पर्याय नाहीये माझ्याकडे."

"सॉरी गं."

"अरे तू कशाला सॉरी म्हणतोस. इट्स ओके ना. बरं चल मी ठेवते फोन. आईला विचारून बघते. नंतर सांगते तुला काय होतंय ते." म्हणत अर्पिताने फोन ठेवला आणि लगेचच अनिता ताईंना फोन लावला.

अर्पिताने सगळी हकीकत आईला सांगितली.

"तू नको गं बाळा टेन्शन घेऊ. मी आहे ना." म्हणत अनिता ताईंनी लेकीला धीर दिला.

"पण आई तुला तरी किती त्रास द्यायचा गं. बरं नाही वाटत ते."

"अगं त्रास काय त्यात. आई म्हणून माझी जबाबदारीच आहे ना. सासूने सुनेची जबाबदारी झटकली म्हणून आईला थोडीच ना ती झटकता येणार आहे."

"आई.. पण तू इकडे आल्यावर तिकडे कसं होणार?"

"तू नको गं त्याची काळजी करू. तू फक्त आता तुझा आणि बाळाचा विचार कर. समजलं? अजिबात टेन्शन घ्यायचं नाही आता."

आईच्या शब्दांनी अर्पिताला वेगळेच बळ मिळाले. तिने लगेचच विनयला फोन करून ही बातमी सांगितली. त्यालाही मग हायसे वाटले. स्वतःच्या आईबद्दल मात्र त्याच्या मनात काही अंशी राग निर्माण झाला.

कमलताईंनी नाही म्हटल्यावर अर्पिताने तिच्या आईला बोलावून घेतले मग तिच्या मदतीसाठी. कारण दुसरा पर्यायच नव्हता तिच्याकडे. या प्रसंगानंतर सासूबद्दल अर्पिताच्या मनात देखील अढी निर्माण होणे स्वाभाविक होते.

त्यातच अनिता ताईंनादेखील जाणे शक्य नव्हते, पण आता लेकीसाठी, तिच्या काळजीपोटी त्यांनाच तिच्या पाठीशी खंबीर उभे राहणे भाग होते. कारण लेकीची ही वेळ सांभाळणे शेवटी आईचेच कर्तव्य होते. पुढे सुट्ट्या वाढवून घेता येतील हा विचार करून अर्पिताने नऊ महिने पूर्ण होईपर्यंत सुट्टी घेतलीच नाही. आई सोबत असल्यामुळे सगळे कसे अगदी सोपे वाटत होते तिला.

पुढे काही दिवसांतच अर्पिता आणि विनयच्या संसारवेलीवर एक गोंडस असे फुल उमलले. छोटा रुद्र म्हणजे जणू आई बाबांचीच सावली.

विनयने आणि आरतीने आधीपासूनच बाळाचे नाव ठरवून ठेवले होते. मुलगा झाला तर रुद्र आणि मुलगी झाली तर रुद्राणी. ठरल्याप्रमाणे बाळाचे नाव रुद्र ठेवले.

डिलिव्हरी नंतर काही दिवस अनिता ताई अर्पिताला माहेरी घेवून गेल्या. सव्वा महिना झाला नि कमल ताईंनी तगादा लावला... "कधी पाठवताय विहिणबाई आमच्या नातवाला आणि सुनेला?

"हो पाठवते." म्हणत अनिता ताई वेळ मारून न्यायच्या.

कसेबसे दोन महिने अर्पिताला माहेरी राहण्याचे सुख लाभले.

"आई काय म्हणायचं गं ह्या अशा वागण्याला? खूप राग येतोय मला आईंच्या वागण्याचा."

"हे बघ बाळा नको जास्त विचार करू. त्यांनाही आता नातवाची ओढ लागली असणार गं."

"इतकंच होतं तर मग तेव्हाच का नाही आल्या त्या? माझी ती वेळ फक्त त्यांनी सांभाळायला हवी होती आई. आयुष्यभर हे मी कधीही विसरले नसते."

"अर्पिता नको गं एव्हढा विचार करुस. त्या वेळेतही गेलं ना सगळं निभावून, मग झालं तर आणि ह्या दिवसांत असं टेन्शन घेणं बरं नाही. ज्या गोष्टी पटत नाहीत तिकडे दुर्लक्ष करायला शिक आता. निदान तुझ्या बाळासाठी तरी कर एवढं."

"पण आई..."

"पण नाही आणि बिन नाही. आई झालीस तू आता. ही गोष्ट विसरू नकोस. टेन्शन घेतलं तर काय होईल हे मी तुला वारंवार सांगणार नाही आता."

अनिता ताईंनी लेकीला चार हिताच्या गोष्टी सांगितल्या.

इच्छा नसतानाही अनिता ताईंनी मग दोन महिन्यानंतर लेकीला सासरी पाठवले. छोट्या बाळाला घेऊन अर्पिता सासरी कशी मॅनेज करणार? याची काळजी लागून राहिली होती त्यांना. पण त्यांचा लेकीवर तितकाच विश्वास देखील होता आणि जावयावर सुद्धा.

सासरी गेल्यानंतर अर्पिताची खूपच तारांबळ उडाली.

पहिलेच बाळ आणि त्यातच याआधी अर्पिताला जास्त दिवस कधी सासरी राहण्याची वेळ आलीच नव्हती. त्यामुळे सुरुवातीला तिला ॲडजस्ट व्हायला खूपच जड गेले. तिला क्षणोक्षणी आईची आठवण यायची. घरातील कामे पाहून रुद्रला सांभाळणे तिला थोडे जिकिरीचे वाटायचे.

सून कधी नव्हे तो इतके दिवस सासरी थांबली होती त्यामुळे काम करताना जणू कमलताईंचे हातपाय देखील जड झाले होते. परंतु, अर्पिताच्या मदतीला विनय होता.  त्याने तिला एकटं पडू दिलं नाही. त्यामुळे हळूहळू तीही सासरी रुळली. छोट्या रुद्रमुळे घराचे अगदी गोकुळ झाले.

हळूहळू अर्पिताची सुट्टी संपत आली तशी तिचीही काळजी वाढत चालली होती.

'आता तिकडे गेल्यावर रुद्रचे कसे होणार? त्याला कोण सांभाळणार?' या विचाराने अर्पिताला झोपच लागेना.

'आईने कसेतरी महिनाभर ॲडजस्ट केले माझ्यासाठी पण आता तिलाही शक्य नाही होणार.' छोट्या रुद्रला कुशीत घेऊन अर्पिता त्याचाच विचार करत होती.

"अर्पिता, नको ग एवढा विचार करुस. आधीच्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित पार पडल्याच ना मग आता यातूनही काहीतरी मार्ग नक्कीच निघेल. काळजी करू नकोस आणि सतत तोच विचार करत बसू नकोस. होईल सगळं ठीक." विनयने अर्पिताचे मनोबल वाढवले. याच आधाराची तिलाही गरज होती.

फायनली एकदाची सुट्टी संपली आणि दोनच दिवसांत अर्पिताला ऑफिस जॉईन करावे लागणार होते.

कमल ताई मात्र शब्दानेही विषय काढत नव्हत्या.

'पुढे कसे करणार आहेस?' असे विचारण्याचेही साधे कष्ट त्या घेईनात. उलट त्यांनाही जणू हेच हवे होते.

'निदान आतातरी आई म्हणतील, मी येते काही दिवसांकरता तुझ्यासोबत.' असे अर्पिताला वाटत होते. कारण सूनेसाठी नाही निदान नातवाच्या ओढीने त्या येतील असे तिला मनोमन वाटत होते; पण याहीवेळी तिची निराशाच झाली.

न राहवून शेवटी तिनेच विषय घेतला.

"आई, रुद्र छान राहतो आता तुमच्याकडे. एवढंसं लेकरू पण आता आजीचा लळा लागलाय त्यालाही. त्याच्यासाठी तरी तुम्ही येता का काही दिवस माझ्यासोबत?" अर्पिताने घाबरतच सासूला प्रश्न केला.

"अगं, कसं शक्य आहे ग अर्पिता? इथे विनयच्या जेवणाचे हाल होतील. रोज सकाळी त्याला डबा बनवून द्यावा लागतो. सर्वकाही माहिती आहे तुला. त्यात दिवसभर इथे जनावरांचे पहावे लागते. मग तूच सांग आता मी तरी काय करु? मलाही वाटतं यावं पण इकडची काळजी देखील सतावते." पुन्हा एकदा ही अशी काही कारणं सांगून कमलताईंनी अप्रत्यक्षरीत्या नकारच दर्शवला.

आता खूप मोठा पेच निर्माण झाला होता अर्पितासमोर. काय करावं तिला काहीच सुचेना.आता इथून पुढची लढाई पुन्हा एकदा तिला एकटीलाच लढावी लागणार होती. कारण आता विनय देखील तिच्यासोबत नसणार होता.

क्रमशः

आता अर्पिता यातून कसा मार्ग काढेल? जाणून घेऊयात पुढील भागात.

©® कविता वायकर


🎭 Series Post

View all