एक धागा सुखाचा..(भाग ३)

आयुष्य म्हणजे सुख दुःखाचा लपंडाव
एक धागा सुखाचा - भाग ३

न राहवून ह्यावेळी देखील विनयने कमल ताईंना मनवण्याचा प्रयत्न केला.

'आधी परिस्थिती थोडी वेगळी होती. आता नातवाच्या ओढीने आई अर्पितासोबत जायला नक्की तयार होईल',अशी विनयला मनोमन खात्री वाटत होती.

"आई अगं आता तरी तू अर्पिताच्या मदतीला जावंस, असं मला वाटतं." कमल ताईंचा मूड पाहून शांतपणे विनयने विषय काढला.

"हे बघ विनय, इतकंच जर वाटत असेल तर तुझ्या बायकोला म्हणावं नोकरी सोड आणि फक्त लेकराला सांभाळ. तिच्या एका नोकरीमुळे सगळ्यांचेच असे हाल होणार असतील तर मग काय उपयोग त्या नोकरीचा?"
कमल ताईंनी कुठलीही आडकाठी न ठेवता रोखठोक शब्दात त्यांचे मत सांगून टाकले.

दाराच्या आडून सासूचे बोलणे अर्पिताच्या कानावर पडले. तसे तिलाही खूपच वाईट वाटले.

विनयला कमल ताईंचे हे असे बोलणे अपेक्षितच नव्हते. त्यालाही मग जरा रागच आला.

"बस झालं आई. तुझ्याकडून कुठलीच अपेक्षा करण्यात काहीच अर्थ नाहीये. फक्त तू मात्र सर्वांकडून अपेक्षा ठेव."
एव्हढे बोलून विनय उठून बाहेर जायला निघाला. भिंतीच्या आड अर्पिता उभी होती. तिचा पडलेला चेहरा पाहून विनयला देखील खूप वाईट वाटत होते.

'जाऊ दे ना, नको टेन्शन घेऊस. मी बघते काय करायचं ते.' नजरेतून अर्पिताने विनयला खुणावले.

पुन्हा एकदा अर्पिताला तिच्या आईशिवाय दुसरा पर्यायच दिसत नव्हता. पण ह्यावेळी अनिता ताईंना देखील जाणे शक्यच नव्हते.

हो नाही करता करता अनिता ताईंनी त्यांच्या शेजारच्या एका विश्वासू स्रीला अर्पितासोबत पाठवण्याचा निर्णय घेतला.

सुमन काकी अनिता ताईंच्याच वयाच्या होत्या. मुले सांभाळण्याच्या बाबतीत अनुभवीदेखील होत्या. त्यांच्या घरची परिस्थिती थोडी नाजूक होती. सुमन काकींचा मुलगा आणि सून मोलमजुरी करुन घर चालवत होते. त्यांनीही सुमन काकींना काही दिवस अर्पितासोबत जाण्याची परवानगी दिली.

तात्पुरते का होईना पण अर्पिताच्या जीवात जीव आला. दुसऱ्याच दिवशी मग सुमन काकींना घेऊन अनिता ताई जावयाच्या गाडीतून लेकीला सोडवायला गेल्या. दोन दिवस राहून तिची व्यवस्थित घडी बसवून त्या पुन्हा गावी परतल्या.

आता रुद्रची जबाबदारी सुमन काकींवर होती. त्या छोट्या रुद्रला खूप छान सांभाळत होत्या. ऑफिसच्याच बाजूला रूम असल्याने थोडा वेळ ब्रेक घेऊन अर्पिता घरी येऊ जाऊ शकत होती. त्यामुळे सगळेच अगदी सोयीचे झाले होते. त्यात सुमन काकींमुळे आता अर्पिताला रुद्रचे कसलेही टेन्शन राहिले नव्हते.

"काकी तुम्ही बाकी कोणत्याच कामाला हात लावायचा नाही. फक्त माझ्या रुद्रची छान काळजी घ्या तेच खूप आहे ओ माझ्यासाठी." असे वारंवार अर्पिता सुमन काकींना बोलायची.

अर्पिता देखील सुमन काकीला अगदी आपलेपणाची वागणूक देत होती. त्यामुळे त्याही अगदी निर्धास्तपणे राहायच्या. अर्पिता सकाळी सर्व आवरुन ऑफिसला जायची. सुमन काकींना रुद्र सोडून इतर कोणतेही काम न करण्याची अर्पिताने ताकीदच दिली होती. पण तरीही सुमन काकी जमेल तशी अर्पिताला मदत करणार हे ठरलेलेच असायचे. काही दिवसांतच दोघींचे छान सुत जुळले होते. दोघीही एकमेकींना छान सांभाळून घेत होत्या.

बघता बघता रुद्र एक वर्षांचा झाला. हळूहळू तो आता वरचे खाऊ पिऊ लागला. तो जसा मोठा होऊ लागला तशी सुमन काकींची जबाबदारी मात्र वाढली. दिवसभर त्याच्या मागे पळून पळून त्याही थकून जायच्या.

एकदा सहज त्यांच्या मनात आले आणि त्यांनी अर्पिताला विचारले, " अर्पिता...आता रुद्रही मोठा होतोय, मी आता काही दिवस गावी जाईन म्हणतिये. "

सुमन काकींच्या तोंडून हे शब्द निघताच अर्पिताला खूपच टेन्शन आले. पुन्हा एकदा तिला जुने दिवस आठवू लागले.

"काकी काय झाले नेमके? असा अचानक गावी जायचा विचार का बरं आला तुमच्या डोक्यात? काही चुकले का ओ माझे?" अर्पिताने विचारले.

"नाही ग बाळा, पण असं अजून किती दिवस थांबणार ना मी इथे? तुलाही माहितीये गावची परिस्थिती. तिकडेही जीव लागतो ग आता."

पुन्हा एकदा अर्पितासमोर मोठा पेचप्रसंग उभा राहिला. "आता कसे करायचे?" या विचाराने ती बेचैन झाली.

यावर अनिता ताईंनी एक धाडसी निर्णय घेतला. रुद्रला त्यांच्यासोबत गावी नेण्याचा प्रस्ताव त्यांनी अर्पितासमोर मांडला.

"मी काम पाहून सांभाळील त्याला. त्यात तुझे बाबाही आहेत मदतीला. अधूनमधून सुमन काकी पण असतीलच." अनिता ताईंनी लेकीला धीर दिला.

"अगं आई पण मी कसं राहू माझ्या रुद्रशिवाय?" भरल्या डोळ्यांनी अर्पिताने विचारले.

"फक्त काही दिवसांचाच तर प्रश्न आहे अर्पिता. मी असताना तू नको काळजी करु."अनिता ताईंनी कशीबशी तिची समजूत काढली आणि रुद्रला त्या गावी घेऊन गेल्या.

सुरुवातीला अर्पिताला खूप त्रास झाला या गोष्टीचा. आतापर्यंत नवऱ्याचा विरह तिने सहन केला आणि आता मुलाचा देखील विरह तिच्या वाट्याला आला. सगळ्या बाजूंनी जशी तिची कोंडी झाली होती जणू.

'खरंच किती हतबल झाल्यासारखं वाटतं अशावेळी. एका स्त्रीला काय काय दिव्य पार पाडावी लागतात.' मनातच अर्पिता विचार करू लागली.

विनय आणि रुद्रच्या आठवणीत ती एकांतात खूप रडायची. कधीकधी तर 'नकोच ती नोकरी' असा विचार देखील तिच्या मनात यायचा.

दिवसामागून दिवस जात होते. रुद्रही गावी आजी बाबांकडे छान रुळला होता. अर्पितादेखील फोनवरुन रोज त्याची चौकशी करायची. जमेल तसा न चुकता व्हिडिओ कॉल करायची. लेकराला आनंदी पाहून तिच्याही जीवात जीव यायचा मग.

'आता असे अजून किती दिवस घरापासून, घरच्यांपासून दूर राहायचे?' असा विचार करून लवकरात लवकर बदली करून गावी जाण्यासाठी तिची धडपड सुरू होती. पण प्रयत्नांना काही यश येईना. म्हणावी तशी ऑफर काही मिळत नव्हती आणि मिळाली तरी तिला ती पटत नव्हती.

लग्नाला आता पाच वर्षे होत आली होती. पण अजूनही अर्पिता आणि विनयच्या संसाराची घडी काही नीट बसली नव्हती. ती एकीकडे, मुलगा दुसरीकडे तर नवरा तिसरीकडे. हे चित्र अजूनही अगदी जसेच्या तसेच होते.

रुद्र दोन अडीच वर्षांचा होईपर्यंत अर्पिताने त्याला गावी ठेवले. परंतु, आता मात्र तिला लेकराचा विरह सहन होईना. तिने रुद्रला सोबत नेण्याचा निर्णय घेतला.

"होईल थोडी धावपळ, पण लेकरू माझ्या जवळ, माझ्या नजरेसमोर तर राहील." हा विचार करुन तिने त्याला सोबत नेले. लेकराला पाळणाघरात ठेवून ती ऑफिसला जायची.

ह्यातच पुढचे आणखी एक दीड वर्ष सरले. रुद्र आता जवळपास साडे तीन वर्षांचा झाला होता. त्यातच अर्पिताच्या बदलीची ऑर्डर निघाली. नशिबाने तिच्या मनासारखी बदली तिला मिळाली. तिचा कामाचा अनुभव आणि हुशारी पाहून कंपनीत तिला एम.डी. ची पोस्ट देण्यात आली. सासरी तिच्या घरापासून अंदाजे दहा ते बारा किमी अंतरावर तिला नवीन जॉईनिंग मिळाले होते. आता अर्पिताला तर आभाळच ठेंगणे झाले.

विनयलादेखील लगेचच तिने फोन करून ही आनंदाची बातमी सांगितली. त्याचाही आनंद गगनात मावेनासा झाला. इतक्या वर्षांच्या प्रतिक्षेनंतर अखेर दोघांनाही आता संसाराचे सुख एकमेकांच्या सहवासात उपभोगता येणार होते.

पुढच्या काही दिवसांतच अर्पिता सासरी परतली. कमल ताईंनाही खूपच आनंद झाला. अर्पिताच्या मनात मात्र त्यांच्याविषयी असलेली अढी कायम होती आणि का असू नये? तिच्या वाईट काळात कमल ताईंनी तिला कोणतीच साथ दिली नाही.

"माझ्या जागी जर ह्यांची लेक असती तर ह्यांनी असेच तिला वाऱ्यावर सोडले असते का?" राहून राहून हाच विचार अर्पिताला सतावत होता.

परंतु, "मागच्या गोष्टी विसरुन आपण नव्याने आपल्या संसाराची सुरुवात करुयात." विनयने अर्पिताची समजूत काढत तिला म्हटले.

"तुम्हा पुरुषांना किती सोप्पं वाटतं ना सारं काही. पण, वाटतो तितका सोपा नव्हता रे हा सर्व प्रवास माझ्यासाठी. एक एक दिवस त्या अनोळखी वातावरणात मी कसा काढला ते माझे मला माहिती. एक वेळ तर अशी होती की सर्व नाती असूनही जणू मी अनाथ समजत होते स्वतःला. पोटच्या लेकराला असं दूर ठेवताना जीव तीळतीळ तुटायचा रे माझा. त्यावेळी डोळ्यांतील अश्रूंची सोबत तेव्हढी आधार देऊन जायची."

विनयला देखील अर्पिताचे म्हणणे पटत होते. कारण बऱ्याच गोष्टी त्याने अगदी जवळून पाहिल्या होत्या. बायकोला जवळ घेत त्याने न बोलताही तिच्या बोलण्याला जणू पाठिंबा दर्शवला.

विनयच्या कुशीत शिरून अर्पिता मग मनसोक्त रडली. इतक्या  दिवसांचा नवऱ्याचा विरह सहन केल्यानंतर आज त्याच्या मिठीची ऊब तिला हवीहवीशी वाटत होती. दोघेही मग एकमेकांच्या मिठीत अलगद विरघळले.

क्रमशः

आता कुठे खऱ्या अर्थाने अर्पिता आणि विनयच्या सुखी संसाराला सुरुवात झाली होती. पण नियतीच्या मनात मात्र वेगळेच काहीतरी होते. काय होणार आता पुढे? जाणून घ्या पुढील भागात.

©®कविता वायकर


🎭 Series Post

View all