एक धागा सुखाचा..(भाग ४)

आयुष्य म्हणजे सुख दुःखाचा लपंडाव
एक धागा सुखाचा - भाग ४

अर्पिता बदली होवून आता स्वतःच्याच गावी परतली. गावापासून जवळच, दहा बारा किमी अंतरावर तिचे नवीन ऑफिस होते. लग्नानंतर तब्बल पाच वर्षांचा विरह काळ भोगून आता कुठे खऱ्या अर्थाने विनयचा आणि तिचा संसार सुरू झाला. दोघांनाही अगदी आभाळ ठेंगणे झाले होते.

पुढच्या दोनच दिवसांत अर्पिताने नवीन ऑफिस जॉईन केले. अर्पिताची स्वतःची स्कूटी होती पण विनयच्या ऑफिसच्या मार्गावरच अर्पिताचे ऑफिस असल्याने दोघेही सोबतच घराबाहेर पडायचे. जाता जाता तो अर्पिताला ड्रॉप करुन मग पुढे जायचा. संध्याकाळी पुन्हा तिला पिक करायचा.

योगायोगाने दोघांचा टायमिंग जुळत होता. कधीतरी त्यात खंड पडायचा, पण अशावेळी दोघेही एकमेकांना समजून घ्यायचे. जो काही विरह काळ दोघांनी अनुभवला होता, त्यातूनच आता दोघांचेही नाते नव्याने फुलत होते, बहरत होते.

सुरुवातीच्या विरहामुळेच प्रेमाचे धागे अधिकच घट्ट होत होते. सुखाचे समाधानाचे आयुष्य दोघेही जगत होते. रोजच दोघेही नव्याने एकमेकांच्या प्रेमात पडत होते. एकमेकांची प्रेमाची आश्वासक मिठीही पुरेशी होती त्यांचा थकवा, शीण दूर करायला.

थोड्याच दिवसांत सर्वांचे रूटीन अगदी छान बसले होते. रुद्रही कमल ताईंसोबत छान रुळला होता. त्यामुळे अर्पितालाही त्याचे आता टेन्शन नव्हते. ती निर्धास्तपणे ऑफिसला जाऊ शकत होती. पण घर सांभाळून नोकरी सांभाळताना तिची तारेवरची कसरत ही ठरलेलीच होती. असे असले तरीही विनय सोबत असताना सारं काही तिला सोप्पं वाटत होतं. जुन्या गोष्टी विसरणं जरी तिला शक्य नव्हतं तरीही त्या विसरुन नव्याने पुढे जाण्याचा प्रयत्न ती करत होती. सून आणि नातू कायमचे घरी आल्याने कमल ताईदेखील आता आनंदी होत्या.

बघता बघता दोन वर्ष कशी सरली ते समजलेच नाही. रुद्रचा ह्या वर्षी पाचवा वाढदिवस अगदी महिन्यावर येऊन ठेपला होता. रुद्रच्या आई बाबांनी लेकाचा वाढदिवस मोठा साजरा करण्याचे ठरवले. त्यानुसार दोघांनीही प्लॅनिंग सुरू केले. पाच वर्षातील हा पहिला वाढदिवस असा होता की, यावेळी सगळे एकत्र असणार होते. जवळच्या सर्व नातेवाईकांना बोलवण्याचे ठरले. आता रोजच घरात रुद्रच्या वाढदिवसाची चर्चा होती.

अचानक याच दिवसांत विनयची थोडी दूरच्या ठिकाणी बदली झाली. आता जवळपास एक ते सव्वा तास, त्याचा जाण्यायेण्यातच जाऊ लागला. अर्पिताच्या सांगण्यावरून स्वतःच्या सेफ्टीसाठी आधी बाईकवरुन ऑफिसला जाणारा तो आता त्याच्या फोर व्हिलरमधून ऑफिसला जाऊ लागला.

अर्पिता आणि विनयचा सुखाचा संसार सुरू होता. परंतु, नियतीच्या मनात काहीतरी वेगळेच होते जणू.

रुद्रच्या वाढदिवसाच्या आदल्या दिवशी थोडीफार शॉपिंग बाकी होती म्हणून अर्पिताने विनयला थोडे लवकर घरी यायला सांगितले. पण याच दिवशी नियतीने घात केला. नशिबाची सारी चक्र क्षणात उलट फिरली. एका सुखी समाधानी कुटुंबाच्या आनंदाला नियतीचीच जणू दृष्ट लागली.

ऑफिसमधून घरी परतत असताना विनयच्या गाडीचा मोठा अपघात झाला. अपघात इतका भयानक होता की,जागेवरच त्याला त्याचे प्राण गमवावे लागले. अचानक गाडीसमोर आलेल्या एका वृद्ध व्यक्तीला वाचवण्याच्या नादात त्याचा गाडीवरचा कंट्रोल सुटला आणि गाडी समोरून येत असलेल्या टेम्पोला जाऊन धडकली.

इकडे अर्पिता बाहेर जायचे म्हणून आवरुन तयार झाली होती. चार वेळा आत बाहेर करत ती विनयची आतुरतेने वाट पाहत होती. छोटा रुद्रही आईच्या मागे पुढे करत त्याच्या लाडक्या बाबाची वाट पाहत होता. पण आता त्याचा बाबा कधीच घरी परतणार नव्हता. तो कायमचा त्यांना सोडून खूप दूर निघून गेला होता. कोणाच्या ध्यानी मनीही नव्हते की हे असे काहीतरी अभद्र घडेल.

हा हा म्हणता विनयच्या अपघाताची बातमी गावभर पसरली. बराच वेळपर्यंत अर्पिताला विनयच्या अपघाताची बातमी कोणीही सांगितली नाही. परंतु, सांगितलेल्या वेळेत विनय घरी परतला नाही, त्यात त्याचा फोनदेखील लागेना. म्हणून मग अर्पिताच्या मनात शंकेची पाल चुकचुकली.
तिने विनयच्या जवळच्या मित्रांना फोन करून त्याची चौकशी केली. एक दोन जणांनी खरे सांगण्याचे टाळले. कारण पुढे काय आणि कसे होणार? या विचारानेच सर्वजण पुरते हादरले होते.

अखेर विनयच्या सर्व मित्रांनी एकमताने विचार करून आपापल्या बायकांना विनयच्या घरी पाठवले आणि धीर करून अर्पिताला हे सत्य सांगितले.

असे काही अभद्र घडेल हे स्वप्नातही कोणाला वाटले नव्हते. विनयच्या निधनाची वार्ता ऐकून अर्पिताच्या डोळ्यांसमोर अचानक अंधार पसरला. जागेवरच भोवळ येवून ती जमिनीवर कोसळली. कमल ताईंना देखील लेकाच्या जाण्याचा धक्का सहन झाला नाही. त्यांनी एकच टाहो फोडला. परंतु, अर्पिताची अवस्था पाहून छोटया रूद्रसाठी त्यांनी कसेबसे स्वतःला सावरले. अरूण काकांपुढे विनयचे संपूर्ण बालपण फेर धरुन नाचू लागले.

पतीच्या निधनाचा धक्का कसाबसा कमल ताईंनी पचवला होता. आता लेकाच्या निधनाचा धक्का पचवणे त्यांच्यासाठी खूपच अवघड होते. पण आता त्याहून अवघड होते अर्पिताला सावरणे.

विनयच्या मित्रांनी तात्काळ अर्पिताला दवाखान्यात भरती केले. छोटया रुद्रला तर काय चाललंय काहीच समजेना. आईची अवस्था पाहून तो तर पुरता गोंधळला.

तिकडे विनयची डेड बॉडी पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आली. रात्री खूप उशीर झाला होता त्यामुळे बॉडी दुसऱ्या दिवशीच घरच्यांच्या ताब्यात मिळणार होती.

अर्पिता रात्रभर बेशुद्धावस्थेतच होती. पहाटे पहाटे ती शुद्धीवर आली. तिच्यासोबत तिची आई आणि मोठी बहीण होती. लेकीची अवस्था पाहून अनिता ताईंचे अश्रू थांबायचे काही नावच घेईनात.

"काय आणि कसे होणार आता माझ्या अर्पिताचे? देवा! कसा रे इतका निष्ठूर झालास? आता कुठे तिच्या माणसाची साथ सोबत तिला मिळाली होती आणि लगेचच हे असे व्हावे? लग्न झाल्यापासून ज्या सुखाची ती आतुरतेने वाट पाहत होती, ते सुख आता कुठे तिच्या नशिबी आले होते. पण तेही तिला मनापासून उपभोगता आले नाही." अनिता ताई देवाला जाब विचारत होत्या.

सकाळी नऊच्या सुमारास विनयची डेड बॉडी घरच्यांच्या ताब्यात देण्यात आली. नातेवाईक, मित्रमंडळी यांची एकच गर्दी जमली होती. विनयचा चेहराही नीट ओळखू येत नव्हता. विनयचे शेवटचे दर्शन तरी अर्पिताला घेता यावे म्हणून डॉक्टरांच्या परवानगीने काही वेळासाठी तिला घरी आणण्यात आले.

विनयची डेड बॉडी समोर पाहाताच अर्पिताने एकच टोहो फोडला आणि उपस्थितांच्या काळजाचा ठोकाच चुकला. काही बोलायच्या आतच तिची दातखीळ बसली. पुन्हा एकदा ती बेशुद्ध पडली. तिला लगेचच पुन्हा ॲडमिट करावे लागले.

अत्यंत शोकाकुल वातावरणात विनयवर अंत्यसंस्कार करण्यात आले. क्षणात होत्याचे नव्हते झाले होते.

दोन दिवस अर्पिता दवाखान्यात ॲडमिट होती. तिसऱ्या दिवशी तिला घरी सोडण्यात आले. आता पुढचे दहा दिवस तरी तिला तिच्या सासरी थांबणे भाग होते. कारण तिच्याइतकेच कमल ताईंचे दुःखदेखील मोठे होते. अनिता ताईंनी मग लेकीसाठी तिच्यासोबत थांबण्याचा निर्णय घेतला.

दरम्यानच्या काळात शेजारच्या बायका अर्पिताला तसेच कमल ताईंना भेटण्यासाठी येत होत्या. त्यांच्या दुःखात त्याही सहभागी होत होत्या. पण येणारी प्रत्येक स्त्री अर्पिताला जे सांगत होती ते ऐकून अनिता ताईंना मात्र लेकीच्या भविष्याची चिंता आणखीच सतावत होती.

"अर्पिता सावर स्वत:ला. काही गोष्टी आपल्या हातात नसतात. आता हे सर्व तुलाच पाहायचे आहे." शेजारच्या मंगल ताई म्हणाल्या.

"हो ना...तुला आता खंबीर व्हावेच लागेल. कमल ताईंना आता कोणाचा आधार आहे? तू अशी रडत बसली तर त्यांनी काय करायचे?" मंगल ताईंच्या री री मध्ये री ओढत सविता काकू बोलल्या.

अर्पिता सुन्न होवून फक्त ऐकत होती. पाणावलेल्या डोळ्यांनी शून्यात नजर लावून बसली होती. विनयसोबतची प्रत्येक आठवण फेर धरून तिच्या डोळ्यांसमोर पिंगा घालत होती. छोटा रुद्र मध्येच येऊन तिच्या मांडीवर बसत होता. तो जवळ आला की अर्पिताला आणखीच रडू यायचे. लेकाच्या वाढदिवशीच बापावर अंत्यसंस्कार करण्यात आले. विचारानेच अर्पिताला स्वतःच्याच नशिबावर किव येत होती. अश्रूंचा महापूर मग मध्येच ओसंडून वाहायचा.

'किती कमनशिबी आहोत आम्ही दोघेही. आता कुठे माझ्या लेकराला त्याचा बाबा खऱ्या अर्थाने समजायला लागला होता आणि लगेचच त्याच्या डोक्यावरचे बापाचे छत्र हरपले. मी तरी कशी जगू आता माझ्या विनयशिवाय?'

डोक्यात विचारांची गर्दी आणि डोळ्यांत आसवांचा पूर अशीच काहीशी अवस्था झाली होती अर्पिताची.

अनिता ताईंना मात्र लेकीचे दुःख बघवेना.

'अजून काय काय वाढून ठेवलंय माझ्या लेकराच्या नशिबात? एकटी कसे पेलेल हे एवढे मोठे शिवधनुष्य? जावईबापू होते तेव्हा गोष्ट वेगळी होती. आता तेच नाहीत म्हटल्यावर या जबाबदारीच्या ओझ्याखाली तिने आयुष्यभर मन मारुन त्यांच्या आठवणीत घुसमटत राहायचे का? नाही नाही मी तिला कायम या अवस्थेत नाही पाहू शकत. तिलाही कोणाच्या तरी आधाराची गरज आहे. तिच्याही मनाचा विचार व्हायला नको का? आणि रुद्रने तरी का सहन करायचे? जे जावई बापूंच्या नशिबी आले तेच आज रुद्रच्या नशिबी यावे? पुन्हा एकदा त्याच गोष्टीची पुनरावृत्ती झाली होती.' अनिता ताईंच्या मनात खूप खळबळ सुरू होती.

कमल ताई तर सुन्न होऊन स्वतःच्या नशिबाला कोसत होत्या. अर्पिताच्या जागी तर त्यांना स्वतःचाच भूतकाळ दिसत होता.

'मी कधीही माझ्या लेकराचे काहीही ऐकले नाही.' ही गोष्ट त्यांच्या मनाला राहून राहून खात होती. विचारांबरोबरच त्यांच्या डोळ्यांतील अश्रू देखील थांबायचे नावच घेईनात.

अनिता ताईंमधील आई मात्र नकळतपणे स्वार्थी होऊ पाहत होती.
'जावई बापू असताना माझ्या लेकराने एवढा त्रास सहन केला तर आता यापुढे तिच्या सुखाची आशाच मावळली.' अनिता ताईंचे विचारचक्र थांबायचे काही नावच घेईना.

क्रमशः

अनिता ताई आता नेमका काय निर्णय घेणार? जाणून घेऊयात पुढील भागात.

©® कविता वायकर


🎭 Series Post

View all