एक धागा सुखाचा..(भाग ५)

आयुष्य म्हणजे सुख दुःखाचा लपंडाव
एक धागा सुखाचा-भाग ५

विनयच्या जाण्याने संपूर्ण कुटुंब विस्कळीत झाले होते. विनय तर आता कायमचा निघून गेला होता, पण आता पुढे अर्पिताचे कसे होणार? ही एकच काळजी सर्वांना सतावत होती.

अनिता ताईंनी तर त्याच वेळी मनोमान ठरवले होते, 'मी माझ्या अर्पिताला आयुष्यभर असं एकटं नाही सोडणार. तिलाही आधाराची गरज आहे. तिचं वय तरी असं किती आहे. उभं आयुष्य समोर पडलेलं असताना, आयुष्याचा एव्हढा मोठा पल्ला ती एकटी कशी गाठेल? लग्न झाल्यापासून एवढ्या खस्ता खाल्ल्या तिने आणि आता आयुष्यभर देखील तिने तेच करायचे का?'

अनिता ताईंच्या मनात अर्पिताच्या दुसऱ्या लग्नाचा विचार नकळतपणे डोकावून गेला. पण ही ती बोलायची योग्य वेळ नव्हती. त्यांनी त्यांच्या मनातील विचार मनातच दाबून ठेवले.

येणाऱ्या जाणाऱ्या बायकांमध्ये देखील हीच चर्चा सुरु होती. 'आता अर्पिता कोणासाठी राहील इथे? सुरुवातीपासूनच कमल ताईंनी देखील तिला म्हणावी तशी साथ दिली नाही. तिच्या गरोदरपणात देखील तिच्या मदतीला त्या गेल्या नाहीत. नंतर लेकराला सांभाळायला देखील कोणी परकी स्री कामी आली, पण ह्या नाही; मग आता कसे विसरेल अर्पिता हे सगळं?'

काहीजणी अर्पिताचा विचार करत होत्या तर काहीजणी कमल ताईंचा. एकुलत्या एका मुलाच्या निधनानंतर कमल ताईंना आता अर्पिताशिवाय दुसऱ्या कोणाचाच आधार नव्हता. दोन लेकी होत्या पण त्या त्यांच्या सासरी. त्यामुळे अर्पिताने आता कमल ताईंनी साथ कधीही सोडू नये, एकमेकींना समजून घेत जीवाभावाने एकत्र राहावे. असेही काही जणींना वाटत होते.

दहा दिवसांनंतर अनिता ताई लेकीला आणि नातवाला घेऊन माहेरी आल्या. काही दिवस थांबून अर्पिता पुन्हा सासरी परतली. कारण बारीक सारीक सर्व व्यवहार आता सध्यातरी अर्पितालाच पाहावे लागणार होते.

अर्पिताला पुन्हा आलेले पाहून कमल ताईंच्या जीवात जीव आला. विनयला विसरणे तर अर्पिताला शक्यच नव्हते. घरातील कोपरा न कोपरा विनयच्या आठवणीने भरला होता.

हळूहळू मात्र सर्व पूर्वपदावर येऊ लागले. अर्पिताने काही दिवसांतच ऑफिस जॉईन केले. रुद्रला कमल ताईंकडे ठेवून ती ऑफिसला जाऊ लागली. कमल ताईंच्या मनात अर्पिताबद्दल आता खूप आपलेपणाची भावना निर्माण झाली होती. त्यांना त्यांच्या कृत्याचा जणू पश्र्चाताप होता होता.

'आपण अर्पितासोबत इतके हटकून वागलो, तरी ती मात्र तिचे कर्तव्य आनंदाने निभावत आहे.' कमल ताईंना देखील अर्पिताचा हेवा वाटत होता. कारण एवढं सगळं होवूनही अर्पिताचे असे वागणे त्यांना अपेक्षितच नव्हते.

तिकडे अनिता ताईंनी अर्पिताच्या दुसऱ्या लग्नासाठी स्थळं शोधायला सुरुवात केली होती. त्याआधी त्यांनी अर्पिताची परवानगी घेतली. फोनवर तिला सगळी हकिकत सांगितली.

"हे बघ अर्पिता, तुझ्या बाबांना आणि मला असं वाटतं की तू नव्याने तुझ्या आयुष्याची सुरुवात करावी. एकट्याने आयुष्य जगणे खूप अवघड आहे बाळा."

"अगं आई पण मी विनयला नाही विसरू शकत गं."

"तू जावई बापूंना विसर असं आमचं म्हणणं नाहीच मुळी पण आयुष्य जगताना मन मोकळं करण्यासाठी एकतरी हक्काची जागा असावी ना गं, म्हणून म्हणते मी आणि मला एक सांग जावई बापूंना तरी तुझे असे एकटेपण आणि खडतर जीवन आवडणार आहे का?"

"अगं आई तसे नाही, पण सद्ध्या विनयच्या आई ही माझी जबाबदारी आहेत गं. असे असताना मी माझी जबाबदारी झटकून टाकून स्वतःच्या दुसऱ्या लग्नाचा स्वार्थी विचार कसा करु?"

"हे बघ अर्पिता... थोडं स्पष्टच बोलते, रागावू नकोस.. तू जगू शकशील एकटी पण त्या लहानग्या जीवाचे काय? त्याला नको का गं वडिलांचे प्रेम? शेवटी त्याच्या वडिलांच्या वाट्याला जे आले तेच त्याच्याही नशिबी आले. पण त्यात त्याची काय चूक? आता तू ठरव सासूचा विचार करुन लग्नाला नकार द्यायचा की लेकराचा विचार करून होकार द्यायचा."

अनिता ताईंच्या बोलण्याने अर्पिताचे डोळे खाडकन् उघडले.

'खरंच माझ्या या अशा निर्णयामुळे मी रुद्रवर अन्याय तर नाही ना करत? तो तर अजून खूपच लहान आहे. त्याला वडिलांचे प्रेम मिळणे हा तर त्याचा जन्मसिद्ध हक्कच आहे. आधीही माझ्या लेकराला म्हणावे तसे त्याच्या बाबाचे प्रेम मिळाले नाही आणि आताही  आयुष्यभर त्याने त्यासाठी झुरावे? नाही नाही हे अजिबात योग्य नाहीये.' अर्पिता मनातच विचार करत होती.

"आई मी करते तुला नंतर फोन. काम आवरते आता. चल ठेवते मी." म्हणत अर्पिताने मध्येच फोन कट केला. कारण आता काय बोलावे ते तिचे तिलाही समजेना.

'कशी आहे ही मुलगी? एव्हढा त्रास सहन करूनही शेवटी सासूचीच तिला काळजी. लेकराचा आधी विचार करायला नको का हिने? मान्य आहे कमल ताईंना आता गरज आहे अर्पिताची, त्याही एकट्या पडणार, पण एक आई म्हणून आपल्या तरुण लेकीची काळजी वाटणं, जावयाच्या मृत्यूपश्चात तिच्या दुसऱ्या लग्नाचा विचार करणं, हे चुकीचं आहे का?' अर्पिताच्या काळजीपोटी अनिता ताईंमधील आई थोडी स्वार्थी होऊ पाहत होती. लेकीच्या काळजीत त्यांचा जीव झुरत होता.

रोज अर्पिताला फोन करून त्या तिचे मन वळवण्यासाठी प्रयत्न करत होत्या. लेकीच्या आयुष्यातील सुटलेली सुखाच्या धाग्याची गाठ त्या पुन्हा एकदा घट्ट करु पाहात होत्या.

फायनली अनिता ताईंच्या प्रयत्नांना यश आले आणि अर्पिताने लग्नाला होकार दिला. खूप विचार केला तेव्हा कुठे ती दुसऱ्या लग्नाला तयार झाली खरं, पण तरीही आपण काहीतरी चुकीचे करत आहोत असे तिचे मन तिला खात होते.

"आई अगं, पण एक मूल पदरात असताना कोण करेल माझ्याशी लग्न? त्यापेक्षा नकोच ना तो विषय." अर्पिताची झालेली द्विधा मनःस्थिती स्पष्ट दिसत होती.

"तू नको काळजी करुस. आम्ही बघतो काय करायचं ते. पण आता नाही म्हणून नकोस गं बाळा." समजावणीच्या सुरात अनिता ताई बोलल्या.

अर्पिताचा देखील आता नाईलाज झाला होता. विनयचा चेहरा तिच्या डोळ्यासमोरून हटायला तयारच नव्हता.

"पण आई अगं हे चुकीचे आहे गं. विनयची जागा मी कोणालाच नाही देऊ शकत. प्लीज तू समजून घे ना."

"मग आयुष्यभर अशी एकटीच झुरत रडत बसणार आहेस का? इतकं सोप्पं वाटलं का तुला ते? एकटीने आयुष्य काढणं काय असतं ते तुझ्या सासूलाच विचार एकदा." थोडं रागातच अनिता ताई बोलल्या.

"पण त्यांनी एकटीनेच आयुष्य काढलं ना. मग मी का नाही?"

"तुला समजत नाहीये का समजून घ्यायचंच नाहीये माझं बोलणं?"

"आई तू चिडू नकोस ना गं. अगं विनयला जाऊन आता कुठे दोन महिने होत आहेत आणि मी लगेच असं दुसऱ्या लग्नाचा विचार करणं कितपत योग्य आहे? त्यात आईंना एकटं सोडून मी असा स्वार्थी विचार करणं हे विनयला देखील नाही आवडणार गं."

"जाऊ दे.. दोघीही सासू सूना मजेत आनंदात राहा. मी यापेक्षा जास्त आता काहीच नाही बोलणार. तुला माझं म्हणणं पटलं तर मला कॉल करून तसं सांग. नाहीतर तुमच्या सासू सूनेच्या प्रेमात मी नाही आडवी येणार. ठेवते मी." म्हणत अनिता ताईंनी रागातच फोन कट केला.

विनयच्या फोटोसमोर जाऊन मग अर्पिताने मन मोकळे केले.

"का गेलास असं मला एकटीला झुरत ठेऊन? बघतोयेस ना काय सुरू आहे हे? तुझी जागा मी अशी कशी काय कोणाला देऊ रे? फक्त रुद्रकडे पाहून मी गप्प आहे, नाहीतर तुला असं एकटं कधीच सोडलं नसतं. रुद्र नसता ना माझ्या आयुष्यात तर आता धावत आले असते बघ मी तुझ्याकडे." अर्पिताच्या अश्रूंचा बांध अखेर तुटला. ती हमसून हमसून रडू लागली.

"अर्पिता नको ना गं असं रडू. तू अशी खचलीस तर मी कोणाकडे पाहायचं? आता मलाही तुझ्याशिवाय कोणाचा आधार आहे सांग. आधीच मी खूप चुकीचं वागलिये तुझ्यासोबत, पण आता नाही. मी तुझी साथ कधीही सोडणार नाही. तू काळजी करू नकोस." सुनेच्या पाठीवरुन हात फिरवत कमल ताईंनी तिला धीर दिला.

'कसं सांगू आई तुम्हाला? खूप पेचात अडकलिये हो मी.' अर्पिता  मनातच बोलली आणि डोळे पुसत तिच्या कामाला ती निघून गेली.

दुसऱ्या दिवशी अनिता ताईंनी अर्पिताला न विचारता डायरेक्ट कमल ताईंना फोनवरून सर्वकाही सांगितले. अर्पिताच्या दुसऱ्या लग्नाच्या बातमीने कमल ताईंना धक्काच बसला. पण त्यांचाही आता नाईलाज होता. अनिता ताईंनी कमल ताईंना अर्पिताला या लग्नासाठी तयार करायला सांगितले.

"अर्पिताच्या ठिकाणी तुमची लेक असती तुम्ही तुमच्या तरुण लेकीच्या सुखाचा विचार नसता केला का? त्यात एकटं राहणं किती अवघड असतं हे तुमच्या शिवाय कोण चांगलं समजू शकतं?" अनिता ताईंनी सत्य परिस्थितीचे गांभीर्य कमल ताईंना समजावून सांगितले. त्यांनाही ते पटले.

'आपला मुलगाच या जगात नाही म्हटल्यावर अर्पिताला कोणत्या अधिकाराने मी इथे थांबवून घेऊ? एक आई म्हणून त्याही बरोबरच आहेत.' कमल ताई मनातच विचार करू लागल्या.

"बघते मी, बोलते अर्पिताशी." म्हणत कमल ताईंनी फोन ठेवला. नकळतपणे त्यांचे डोळे अश्रूंनी डबडबले. पदर डोळ्याला लावत त्यांनी हुंदका आवरला.

क्रमशः

पुढे काय होणार अर्पिताच्या आयुष्यात? ती तयार होईल का तिच्या दुसऱ्या लग्नासाठी? तुम्हाला काय वाटतंय अर्पिताने दुसऱ्या लग्नाचा विचार करायला हवा?

©®कविता वायकर


🎭 Series Post

View all