एक धागा सुखाचा..(भाग ६)

आयुष्य म्हणजे सुख दुःखाचा लपंडाव
एक धागा सुखाचा - भाग ६

दुसऱ्या दिवशी अनिता ताईंनी सांगितल्याप्रमाणे कमल ताईंनी अर्पिताजवळ तिच्या दुसऱ्या लग्नाचा विषय घेतला.

"हे बघ अर्पिता, तुझी आई बरोबर बोलतेय गं. रुद्रच्या भविष्यासाठी तुला हा विचार करावा लागेल. माझी काळजी नको करू. आता माझे दिवस तरी असे किती राहिलेत? त्यामुळे माझा विचार करणं सोड. तुझा आणि रुद्रचा आधी विचार कर. तू तरुण आहेस त्यात सुंदर आहेस. एकटीने आयुष्य काढणं वाटतं तितकं सोप्पं नाही गं बाळा. नवरा सोबत नसताना एकट्या स्त्रीला कशा कशाचा सामना करावा लागतो हे माझ्या पेक्षा जास्त चांगलं कोण सांगू शकणार!" 

"आई, अहो पण तरीही तुम्ही नाही ना केलं दुसरं लग्न!"

"माझी गोष्ट वेगळी होती गं. त्यात आमचा काळ देखील वेगळा होता. फक्त चूल आणि मूल एवढंच आमचं आयुष्य. तसं बघितलं तर तुझं सगळंच उलट आहे. तुला कामानिमित्त सतत बाहेर राहावं लागणार. एकट्या बाईला एकटीने अशी आयुष्याची लढाई लढताना चांगल्या वाईट लोकांचा सामना करावा लागणारच. अशावेळी सोबत आपल्या हक्काचा आधारस्तंभ असेल तर मग कोणाची बिशाद नाही वर मान करून तिच्याकडे पाहण्याची. मग याला तू तरी कशी अपवाद असशील. म्हणून म्हणतेय, नाही म्हणू नको. तसंही तुझ्या एकटं झुरत राहण्याने थोडीच ना विनय परत येणार आहे. जे झालं ते विसरून जा आणि नव्याने आयुष्याची सुरुवात कर."

सासूचे बदललेले हे समजूतदार रूप पाहून अर्पिताला भावना अनावर झाल्या. न राहवून ती हक्काने कमल ताईंच्या कुशीत शिरली. इतक्या वेळापासून दाबून ठेवलेला हुंदका कमल ताईंना देखील मग अनावर झाला. दोघीही सासू सूना एकमेकांचा आधार बनून एकमेकींनाच जणू सावरत होत्या.

आयुष्य हे असेच असते ना, वेळ निघून गेल्यावर माणसाला खूप गोष्टी उमगतात.

"काय मग तुझा होकार समजू ना मी?"

भरल्या नजरेने अर्पिताने नजरेतून मग होकार दिला.

अनिता ताईंच्या आग्रहाखातर आणि रुद्रला बाबांचे प्रेम मिळावे या एकाच हेतूने अर्पिता दुसऱ्या लग्नाला तयार झाली होती. कमल ताईंनी अर्पिताला लग्नासाठी तयार तर केले पण अर्पिता त्यांना सोडून जाणार ही कल्पनाच त्यांना सहन होत नव्हती. राहून राहून त्यांच्या डोळ्यांत आसवांची दाटी होत होती.

अर्पिताने लग्नासाठी होकार तर दिला पण तिचे मन मात्र तिलाच खात होते. 'आपण काही चुकीचे तर करत नाही ना?' या एकाच विचाराने तिचे मन तिला अंतिम निर्णयापर्यंत पोहोचू देत नव्हते.

'अजूनही वेळ गेलेली नाहीये. मी एकटी सांभाळेल माझ्या रूद्रला. नाही गरज मला कोणाच्या आधाराची. विनयच्या आठवणीच पुरेशा आहेत माझ्यासाठी.
उद्याच मी आईंना नाही म्हणून सांगते लग्नासाठी. मग त्या आईला देखील समजावतील.' अर्पिताने मनोमन विचार पक्का केला.

रात्री बराच वेळ अंथरुणात कूस बदलत अर्पिता विचार करत होती. अधूनमधून रुद्रला कुरवाळत त्याच्या भविष्याच्या विचाराने ती कासावीस होत होती. खूप वेळाने कधी तिचा डोळा लागला हे तिचे तिलाही समजले नाही.

पहाटेच्या सुमारास अचानक तिच्यासमोर विनय उभा राहिला. ती त्याला जाऊन घट्ट बिलगली.

"ये वेडाबाई...रडू नकोस ना." अर्पिताच्या डोक्यावर हळुवारपणे थोपटत, तिच्या डोळ्यांतील अश्रू अलगद टिपत, विनय तिची समजूत काढत म्हणाला आणि अलगद त्याने आपले ओठ तिच्या कपाळावर टेकवले.

"कुठे होतास तू इतके दिवस? मी किती एकटी पडले होते माहितीये? आता तू कुठेही जायचं नाहीस.. समजलं?" विनय भोवतीची मिठी घट्ट करत अर्पिता बोलली.

"अगं जावं लागेल मला. मी फक्त तुला काहीतरी सांगायला आलोय."

"मला आता तुझं काहीही ऐकायचं नाहीये. किती दिवसांनी तुझ्या मिठीचं हे सुख माझ्या नशिबी आलंय. प्लीज त्यात आता कोणताही व्यत्यय नकोय मला." विनयच्या छातीवर डोकं ठेवून ती क्षणभर त्याच्या मिठीत पूर्णतः विरघळून गेली.

"अप्पू...मी काय म्हणतोय ते ऐक ना गं."

"बरं बाबा, बोल...?मी ऐकतेय."

"प्लीज, अगं माझ्या आठवणीत असं झुरत बसू नकोस ना गं. तुझ्या आयुष्यात माझ्या जागी जर कोणाची रिप्लेसमेंट होत असेल तर नक्की विचार कर. उगीच माझी वाट पाहत, एकटी कुढत बसू नकोस. निदान रुद्रचा तरी विचार कर."

"आता तू आलायेस ना! मग आता कशाला हवीये कोणाची रिप्लेसमेंट? आणि इतकं सोप्पं वाटतंय का रे तुला ते? हे असं बोलताना तुला काहीच कसं वाटत नाही. साता जन्माची वचनं यासाठीच दिली होती का आपण एकमेकांना? मी आता तुझं काहीही ऐकणार नाहीये. प्लीज तूही आता काही बोलू नकोस." असे बोलून तिने त्याच्या भोवतीची मिठी आणखीच घट्ट केली.

अश्रूंचा महापूर ओसंडून वाहत होता. पण आज त्याच्या मिठीत तिला ती प्रेमाची ऊब जाणवत नव्हती. तिचा रितेपणा भरुन काढायला त्याची मिठी देखील आज तिला कमकुवत वाटत होती.

तेवढ्यात ती दचकून जागी झाली.

"विनय... कुठे आहेस तू? आता तर इथेच होतास ना!" सैरभैर होऊन अर्पिता रात्रीच्या त्या काळोखात, अंधाऱ्या खोलीत विनयला शोधू लागली.

क्षणात ती भानावर आली. हे सगळं काय सुरू आहे, तिच्या लक्षात आलं.

"शेवटी दूर लोटलंसच ना मला. बाकी काही नको होतं रे मला, फक्त आयुष्यभरासाठी माझ्या हक्काची तुझी मिठी मला हवी होती. जिच्यातून मला कधीही दूर जायचं नव्हतं. तुझी प्रेमाची एक मिठी म्हणजे माझ्या जगण्याचा आधार होती रे. हे माहीत असतानाही शेवटी तू सोडून गेलासच मला. विनय खूप चुकीचं वागलास रे तू माझ्याशी. मला दिलेली सगळी वचनं एका क्षणात तू मोडलीस. काय पाप केलं होतं मी, की सर्व माझ्याच नशीबी यावं?" अश्रूंना बांध घालण्याचा केविलवाणा प्रयत्न करत अर्पिता स्वतःशीच बोलत होती.

सुन्न होवून ती स्वप्नातील सर्व गोष्टी आठवण्याचा प्रयत्न करत होती.
'तुझ्या आयुष्यात माझ्या जागी जर कोणाची रिप्लेसमेंट होत असेल तर नक्की विचार कर. उगीच माझी वाट पाहत, एकटी कुढत बसू नकोस.' विनयचे शब्द अगदी जसेच्या तसे तिला आठवले.

प्रयत्न करूनही आता तिला तिचे अश्रू काही आवरता येईनात. पिलो छातीशी कवटाळत तिने अश्रूंना मनसोक्त वाट मोकळी करून दिली. विनयचा चेहरा, त्याची मिठी, त्याने तिच्या कपाळाचे घेतलेले चुंबन काही केल्या तिच्या नजरेसमोरून हटायला तयारच नव्हते.

थोड्याच वेळात सकाळ झाली. पण काही वेळापूर्वीच तिचा डोळा लागला होता.

'रोज लवकर उठणारी अर्पिता आज उठली कशी नाही?' मनात विचार येताच कमल ताईंनी अर्पिताच्या बेडरुमचे दार अलगद ढकलले.

पिलो छातीशी घट्ट कवटाळून शांतपणे निजलेल्या अर्पिताचे आणि तिच्या शेजारी असलेल्या रुद्रचे निरागस रूप पाहून कमल ताईंच्या डोळ्यांत टचकन पाणी आले. अर्पिताच्या जागी त्यांना त्यांचा स्वतःचाच भूतकाळ दिसत होता. विनय हयात असताना त्यांना अर्पिताच्या भावना कधीही समजल्या नाहीत आणि त्या समजून घेण्याचा कधी प्रयत्नही केला नाही. पण आज मात्र सारे काही समजून देखील त्यांचा नाईलाज होता. कारण सासू सुनेचे फुलत असलेले नाते पाहायला आता विनय थोडीच ना पुन्हा येणार होता?

अर्पिताला शांत झोपलेले पाहून कमल ताईंनी अलगद दार ओढून घेतले आणि त्यांनी स्वतःच कामाला सुरुवात केली. अर्पिता उठेपर्यंत त्यांची जवळपास सर्व कामे उरकली होती.

अनिता ताईंच्या कॉलने अर्पिताला जाग आली.

'बापरे साडे आठ? आई मी तुला नंतर कॉल करते हा. आता ठेवते." म्हणत अर्पिताने अनिता ताईंचे बोलणे ऐकून न घेताच  फोन कट केला.

घाईतच तिने अस्ताव्यस्त झालेले तिचे केस वर बांधले. गाऊन ठीक करत ती तडक किचनमधे गेली. कमल ताईंनी सगळी कामे आवरली होती.

"आई... अहो मला उठवायचं तरी. किती उशीर झालाय पाहा बरं आणि हे सगळं कशाला करत बसलात तुम्ही? मी केलं असतं ना."

"तू जा गं...आधी अंघोळ करून घे तोपर्यंत मी चहा ठेवते आपल्यासाठी." कमल ताई बोलल्या.

कमल ताईंमधील हा बदल अर्पिताला सुखावून जात होता.

'आत्ता हे सर्व पाहायला विनय तू हवा होतास रे. आईंचे हे बदललेले रूप नक्कीच आवडले असते तुला.' मनातच अर्पिता बोलली आणि बाथरूममध्ये निघून गेली.

थोड्याच वेळात अनिता ताईंनी पुन्हा कॉल केला. कमल ताईंनी कॉल रिसिव्ह केला.

क्रमशः

एवढं काय महत्त्वाचं बोलायचं असेल अनिता ताईंना? जाणून घेऊयात पुढील भागात.

©® कविता वायकर


🎭 Series Post

View all