एक धागा सुखाचा..(भाग ७)

आयुष्य म्हणजे सुख दुःखाचा लपंडाव
एक धागा सुखाचा - भाग ७

सकाळी अर्पिताला उठायला खूपच उशीर झाला त्यामुळे तिने नंतर कॉल करते म्हणत अनिता ताईंचा कॉल काही सेकंदात कट केला. त्यातच ती उठेपर्यंत कमल ताईंनी बरीचशी कामे आटोपली होती. अशातच अनिता ताईंनी पुन्हा कॉल केला पण अर्पिता मात्र बाथरुममधे होती.

"अगं अर्पिता, तुझ्या आईचा कॉल आलाय गं." कमल ताईंनी बाहेरूनच अर्पिताला आवाज दिला.

'ही आई पण ना.. हात धुवूनच माझ्या मागे लागलीये. आताही नक्की त्याच विषयावर बोलायचं असणार तिला. मला नाही करायचं लग्न, का हिला समजत नाहीये.' अर्पिताचा संताप होत होता.

"अगं अर्पिता काहीतरी बोल. बघ बरं आता कट झाला की नाही फोन."

"पुन्हा आला कॉल तर जे काही बोलायचं ते तुम्हीच बोला आई. माझं तर डोकंच बंद झालंय." अर्पिता चिडून बोलली.

"बरं...मी बोलते. तू नको चिडचिड करू. आवर तू तुझं." कमल ताई म्हणाल्या.

अर्पिता बाथरूममध्ये होती पण स्वप्नातील विनयचा तो स्पर्श, त्याची ती प्रेमळ मिठी आठवून अजूनही तिच्या सर्वांगावर रोमांच उठत होते. काही केल्या तिच्या मनातून या गोष्टी जायलाच तयार नव्हत्या. डोळे बंद करून ती विनयसोबतची प्रत्येक आठवण जगत होती. त्याचा प्रेमळ स्पर्श ती मनात साठवून ठेवत होती. डोळ्यांतील अश्रू मात्र ओसंडून वाहत होते. कारण आता ह्या आठवणी फक्त आठवणीच राहणार होत्या. ना विनय आता पुन्हा तिला मिळणार होता ना त्याचा तो स्पर्श. तीही हतबल होती. कारण विनयला मनातून काढून टाकणं तिला तर शक्यच नव्हतं. .

कशीबशी आंघोळ आटोपून अर्पिता बाहेर आली. कमल ताई फोनवरून अनिता ताईंसोबत बोलत होत्या.

"अर्पितासाठी एक छान स्थळ चालून आलंय, हेच सांगण्यासाठी मी तिला कॉल करत होते." अनिता ताई म्हणाल्या.

"हो का... छानच की. मी सांगेल हा तिला. आता ठेवू का? सकाळची कामाची गडबड सुरू आहे." कमल ताई म्हणाल्या.

अर्पिता आधीच चिडलेली होती. तिला हा विषय नको होता. म्हणून कमल ताईंनी बोलणे आटोपते घेतले आणि फोन बंद केला.

"काय म्हणत होती आई?" अर्पिताने कमल ताईंना विचारले.

"काही नाही गं.. असंच बोलत होत्या त्या."

"हो का? आई तुम्हाला खोटं नाही बोलता येत. पुन्हा माझ्या लग्नाचा विषय घेतला ना तिने?"

"अगं, पण त्यांच्या भावना समजून घे ना तू अर्पिता."

"आणि माझ्या भावनांचं काय? त्या नाही का तुम्हाला कोणालाच समजत? मी विनय सोडून इतर कोणालाही माझ्या हृदयात स्थान देवू शकत नाही आणि तुम्हाला जर मी लग्नच करावे असे वाटत असेल तर माझ्याही काही अटी आहेत त्या तुम्हाला सर्वांना मान्य असतील तर करते मी हे लग्न.."

"अटी...? कोणत्या अटी?" आश्चर्यकारक रित्या कमल ताईंनी प्रश्न केला.

"फक्त रुद्रला वडिलांचे प्रेम मिळावे ह्या एकाच हेतूने मी हे लग्न करायला तयार आहे. त्यामुळे बायको म्हणून समोरच्या व्यक्तीने मला वेठीस धरु नये. कारण विनय माझे सर्वस्व होता आणि कायम राहील."

"आणि माझी दुसरी अट अशी आहे की, लग्नानंतर मी तुम्हाला असं एकटं सोडणार नाही. मी जिथे असेल तिथे तुम्ही पण माझ्या सोबतच राहाल. तुम्हाला काय हवं नको ते मीच बघेल. आई...हे सगळे तुम्हा सगळ्यांना मान्य असेल तरच मी लग्नाला तयार आहे अन्यथा नाही."

अर्पिताने तिचे मत थोडे स्पष्टच सांगितले. तिने तिच्या काही अटी आधीच क्लिअर केल्या. कमल ताईंना देखील अर्पिताचा हेवा वाटला क्षणभर, पण पोरीने अशा काही अटी ठेवल्या होत्या समोर की कोण हिच्याशी लग्न करणार? हा मोठा प्रश्न निर्माण झाला होता कमल ताईंसमोर.

"आई तुम्ही फोन करून आईला हे सगळं सांगून टाका. पण त्याआधी मला एक सांगा, मगाशी ती काय बोलली तुम्हाला.?"

"काही नाही, तू शांत हो बरं आधी. मी नंतर सांगते तुला."

"विषय सुरू आहे तर आताच सांगा. मला रोज उठून तोच विषय नकोय. जे काही होईल ते आजच होऊन जाऊ दे. लग्न हा विषय ऐकून कान शिनलेत आता माझे."

"अगं एक छान स्थळ आलंय तुझ्यासाठी. हेच सांगायला फोन केला होता त्यांनी."

"व्वा... किती छान! काल मला लग्न कर म्हणाली, आज मुलगा शोधलाही, आता उद्या मांडवात उभं करेल मला. परवा म्हणेल रुद्रला खेळायला एखादं भावंडं आण. इतकं सोप्पं गणित आहे हे." अर्पिताला भावना अनावर झाल्या. हातातील टॉवेल सोफ्यावर आपटत तिने त्रागा व्यक्त केला. तिच्या अश्रुंनी आता पुन्हा एकदा त्यांची सीमा ओलांडली.

"अर्पिता शांत हो... असं काही नाहीये गं. तू समजूनच घेत नाहीयेस. अगं कोणत्या आईला आपल्या लेकीचे सुख नको असते गं. थोडं सबुरीने घे."

"कंटाळा आलाय हो आई मला आणि हे सगळं फक्त आणि फक्त तुमच्या लेकामुळे होतंय. कोणताही विचार न करता मला असं एकटीला सोडून गेला. देवाला तरी का दया आली नाही हो माझी? इतकी वाईट आहे का हो मी?"

"तू शांत हो बरं आधी. तुझ्या आवाजाने रुद्र उठेल आणि अजिबात तू काळजी करू नकोस. तू म्हणते तसंच होईल. मी बोलते अनिता ताईंसोबत. मी आहे तुझ्यासोबत आणि कायम राहील." अर्पिताला जवळ घेत कमल ताईंनी तिची समजूत काढली.

थोड्या वेळाने अनिता ताईंना फोन करुन कमल ताईंनी सगळी हकीकत सांगितली.

अनिता ताई मात्र लेकीचे विचार ऐकून क्षणभर सुन्न झाल्या.

'कशी आहे ही मुलगी? एकेकाळी सासूने तिला समजून घेतले नाही,पण आज मात्र त्यांच्यासाठी हिचा जीव तुटतो. पण असो, माझी शिकवण कधी वाया नाही जायची. पण आता समोरच्याने पण तिच्या अटी मान्य करायला हव्यात ना. लग्न म्हणजे काय पोरखेळ आहे का? कसं समजत नाही हिला?' अनिता ताई मनोमन दुःखी झाल्या. कारण त्यांना आलेले हे स्थळ हातचे जाऊ द्यायचे नव्हते.

काही जुने दिवस आठवून कमल ताई मात्र मनोमन खजील झाल्या.

'अर्पिताच्या वाईट परिस्थितीत मी तिला साथ दिली नाही पण आता ती मात्र माझ्यापाठी भक्कम उभी आहे. तिचे आनंदी जग तिला खुणावत आहे पण तरीही ती माझाच विचार करत आहे. खरंच हिऱ्याची पारख व्हायला वेळ लागतो, हेच खरे.' डोळ्यांतील अश्रू पदराने टिपत एक समाधानाचे हास्य कमल ताईंच्या चेहऱ्यावर पसरले.

अर्पिताच्या आई बाबांनी मुलाची सर्व माहिती काढली. तीच्या सर्व अटी देखील त्याला सांगितल्या.

कॉलेजात प्रोफेसर असलेल्या सतिश सावंत यांनी 'आयुष्यात लग्न करून कोणीही सुखी होत नाही' या एका विचाराने आजतागायत लग्न करण्याचा विचार टाळला होता. परंतु, वयाच्या या टप्प्यावर आता त्यांनाही कोणाच्या तरी साथीची गरज भासू लागली होती. म्हणूनच मग त्यांनी अर्पिताच्या एकटेपणाला साथ देण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला.

'सर्व अटी सांगितल्या नंतर देखील माझ्याशी लग्न करण्यासाठी तयार झालेली व्यक्ती नेमकी आहे तरी कोण?' अर्पिता मनोमन विचार करु लागली.

न राहवून तिने अनिता ताईंना कॉल केला.

"आई... अगं, कोण आहेत हे सतिश सावंत?"

"अगं खूप चांगले स्थळ आहे हे. अगदी विनय रावांसारखेच आहेत बघ सतिशराव. जणू त्यांचाच जुळा भाऊ."

"आई, अगं पण त्यांनी माझ्या सगळ्या अटी मला न भेटता, न पाहता कशा काय मान्य केल्या? हे मला पडलेलं कोडं आहे आई. त्यात त्यांचे हे पहिलेच लग्न. म्हणून थोडं वेगळं वाटतंय गं."

"आता तू, नको ते विचार करत बसू नको हा..मी आत्ताच सांगते तुला. खूप चांगले स्थळ आहे हे. त्यामुळे तू तुझ्या भविष्याबद्दल अगदी निर्धास्त राहा."

"तरी पण, मला त्यांच्याशी बोलायचं आहे एकदा. त्यांचा काही कॉन्टॅक्ट नंबर असेल तर दे ना."

"अजिबात नाही आ अर्पिता. नंबर तर माझ्याकडे नाहीये आणि असता तरी मी तुला तो दिला नसता."

"आई अगं का असं वागतेस गं?"

"हे बघ अर्पिता, तुझे बाबा आणि मी बघतो ना काय करायचं ते. तू नको ना गं जास्त विचार करू आता आणि उद्या ते येणार आहेत तुला पाहायला. म्हणजे अगदीच नटून थटून तयार रहा असं नाही म्हणत मी, पण तरी जरा नीटनेटका ड्रेस घालून तयार झालीस तरी पुरेसं आहे."

"आई, अगं पण इतकी घाई कशाला?"

"काही गोष्टी घाईतच होतात गं. बरं मला एक फोन येतोय मी ठेवते आता. करते तुला नंतर." म्हणत अनिता ताईंनी फोन कट केला.

इकडे अर्पिताच्या डोक्यातील विचारचक्र थांबायचे काही नावच घेईना.

दुसऱ्या दिवशी ठरलेल्या वेळेत सतिशराव अर्पिताच्या सासरी पोहोचले. अर्पिताचे आई बाबा आणि तिचे मामा मामी देखील वेळेत हजर झाले.

सतिशराव त्यांच्या कारमधून आले होते. सोबत त्यांचा एक मावसभाऊ आणि मध्यस्थी व्यक्ती असे ते तिघेचजण होते.

कमल ताईंनी पाहुण्यांचे आनंदाने स्वागत केले. क्षणभर सतिश रावांना प्रश्न पडला की अर्पिताचे हे नक्की सासर आहे की माहेर? ह्याच अर्पिताच्या सासूबाई आहेत यावर त्यांचाही विश्वास बसेना. कारण सुनेच्या दुसऱ्या लग्नासाठी असा पुढाकार घेणारी सासू ते आज पहिल्यांदा पाहत होते.

छोटा रुद्र तर सतिश रावांच्या मांडीवरच जाऊन बसला होता. रुद्रबद्दल सतिश रावांना माहिती असल्यामुळे ते येताना त्याच्यासाठी खाऊ घेऊन आले होते. आल्या बरोबर त्यांची रुद्र सोबत गट्टी जमली. हे सगळे चित्र पाहून सगळेचजण मनोमन सुखावले.

थोड्याच वेळात कमल ताई अर्पिताला घेऊन बाहेर आल्या. समोर सतिश रावांना पाहून क्षणभर ती गोंधळली.

"अरे... तू तर सावंत ना? पण तू इथे कसा काय?" सतिशरावांना समोर पाहून आश्चर्यकारकरित्या अर्पिताने प्रश्न केला.

क्रमशः

अर्पिता सतिशरावांना कशी ओळखते? होईल का अर्पिता आणि सतिशरावांचा विवाह सोहळा संपन्न? अर्पिताचा अंतिम निर्णय काय असणार? या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊयात पुढील भागात.

©®कविता वायकर


🎭 Series Post

View all