एक धागा सुखाचा..(भाग ८)

आयुष्य म्हणजे सुख दुःखाचा लपंडाव
एक धागा सुखाचा - भाग ८

अर्पिताला रीतसर मागणी घालायला आलेल्या सतिश सावंत ह्यांना अर्पिता आधीपासूनच ओळखत होती. सतिश रावांना समोर पाहून तिलाही धक्काच बसला.

"म्हणजे तुम्ही ओळखता एकमेकांना?" अलका ताईंनी आश्चर्यकारकरित्या प्रश्न केला?

"हो...म्हणजे मी सांगतो सगळं काही. अर्पिता तू बस ना आधी." सतिशराव म्हणाले.

अनेक प्रश्नचिन्ह चेहऱ्यावर घेऊन अर्पिता समोरच्या खुर्चीत जाऊन बसली.

'आता सतिशराव नेमके काय बोलणार?' याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते.

अर्पिता क्षणभर जुन्या आठवणीत रमली.  तिला तो दिवस आठवला, ज्या दिवशी विनय तिला पाहायला आला होता. नकळतपणे जुन्या गोष्टी आठवून तिचे डोळे पाणावले. पण कसेबसे तिने स्वतःला सावरले. त्यात आता सतिशचे स्थळ तिच्यासाठी चालून आले हेही तिच्यासाठी खूपच शॉकिंग होते.

"बोला ना सतिशराव, तुम्ही काहीतरी सांगणार होतात." अर्पिताचे मामा बोलले.

"तर अर्पिता आणि माझी आधीपासूनच ओळख आहे. आम्ही डिप्लोमाला सोबत होतो. तसे आम्ही क्लोज फ्रेंड्स वगैरे असं काही नव्हतो, पण दुरुन एकमेकांना फक्त ओळखत होतो. पुढे डिग्रीला मी कॉलेज चेंज केले. त्यानंतर मग आमचा काहीच संपर्क नाही. त्यात अर्पिता आधीपासूनच खूप हुशार. त्यामुळे ती कॉलेजमध्ये कोणाला माहीत नसेल असे नाही.

दोन महिन्यांपूर्वी मला कॉलेजचा माझा मित्र प्रदीप दिघे.. जो की अर्पिताच्या बाबांच्या मित्राचा मुलगा, त्याचा कॉल आला. त्याने मला अर्पिताच्या मिस्टरांबद्दल सांगितले. खूप वाईट वाटले तेव्हा. त्यानंतर तिच्या दुसऱ्या लग्नाविषयी देखील त्यानेच मला सांगितले. तसेही मी लग्न करणारच नाही हे त्याला आधीपासून माहीत होते. अशातच घरच्यांनी मला लग्नासाठी खूपच प्रेशर आणले. प्रदीपला देखील फोन करून माझे मन वळवण्यासाठी  त्यांनी खूप फोर्स केले. चार पाच दिवसांपूर्वी याच विषयावर आम्ही बोलत असताना त्याला अचानक अर्पिताची आठवण आली. त्याने मला अर्पिताविषयी सुचवले. पण मी मात्र निर्णयापर्यंत पोहोचू शकत नव्हतो. तसंही लग्न म्हटलं की माझ्या अंगावर काटाच येतो. भीती वाटते मला लग्नाची. पण वयाच्या या टप्प्यावर आपली हक्काची व्यक्ती सोबत असावी असे प्रत्येकालाच वाटते. त्याला मी तरी कसा अपवाद असेल? त्यातच आपल्यामुळे जर कोणाचे आयुष्य मार्गी लागणार असेल तर काय हरकत आहे विचार करायला, असे प्रदीपने मला सांगितले. मग मीही लगेचच तयार झालो. त्यानेच मग माझे स्थळ त्याच्या बाबांकरवी अर्पिताच्या बाबांना सुचवले.
तर ही अशी आहे माझी सगळी कहाणी. आता अंतिम निर्णय अर्पिताचाच असेल. तिला हवा तेवढा वेळ घेऊ द्या पण तिच्या मनाविरुद्ध जाऊन मला काहीही करायचे नाही. तिच्या भावना देखील समजून घ्यायला हव्यात."

सतिशरावांचे असे समजूतदारपणाचे बोलणे सर्वांनाच भावले. त्यांच्या बोलण्याने अर्पितालाही विचार करायला भाग पाडले होते. सतिशला पाहून तिला खरचंच विनयची आठवण आली. दोघांमध्ये बऱ्याच गोष्टींचे साम्य होते.

"ते सगळं ठीक आहे पण तिने घातलेल्या अटी....त्या मान्य आहेत तुम्हाला? असे आम्ही समजायचे का?" अर्पिताचे मामा म्हणाले.

"हे पहा, त्या तिच्या अटी नाहीत तर तिच्या त्या भावना आहेत आणि तिच्या भावनांशी मी अगदीच सहमत आहे. पण अजूनही मी तेच सांगेल की, तिच्या मनाविरुद्ध मी जाणार नाही. जर तिची इच्छा असेल तरच गोष्टी पुढे सरकतील अन्यथा नाही. त्यात अर्पिताला मी आधीपासून ओळखतो आणि तिच्यामुळेच मी कधीही लग्न करणार नाही हा माझा विचार बदलण्याचे धाडस मी केले.

"बरं अर्पिता... बाळा सगळ्या गोष्टी आता तुझ्या समोर आहेत. आता तूच सांग काय करायचे ते? सतिश रावांनी सगळ्या गोष्टी अगदी स्पष्टपणे उलगडून सांगितल्या आहेत. आता तूही बोल काहीतरी." अर्पिताचे बाबा म्हणाले.

"बाबा... सगळं आजच सांगायला हवं आहे का? मला थोडा तरी वेळ द्याना हो."विनवणीच्या सुरात अर्पिता बोलली.

"बरं काही हरकत नाही. तिला जेवढा वेळ हवाय तेवढा घेऊ द्या." मामा म्हणाले.

"पण सतिशराव, तुमच्या आयुष्याचे हे सगळे निर्णय तुम्ही स्वतः घेतले तर तुमच्या घरच्यांना ते मान्य असतील का? म्हणजे तुमचे हे पहिलेच लग्न, अर्पिताचे मात्र तसे नाही. त्यात तिच्या पदरात एक मूल सुद्धा आहे. असे असताना तुमच्या घरच्यांनी विरोध दर्शवला तर?" काळजी पोटी अनिता ताईंनी विचारले.

"अजिबात नाही. उलट मी लग्नाला तयार झालो, हीच माझ्या आई वडिलांसाठी खूप मोठी गोष्ट असेल आणि चुकून झालेच तसे काही तर मी समजावेल त्यांना."

"म्हणजे तुम्ही तुमच्या घरी काहीही न सांगता मुलगी पाहायला आलात की काय?" अनिता ताईंनी पुन्हा प्रश्न केला.

"हो तसेच समजा हवंतर." सतिशराव उत्तरले.

"पण तुम्ही त्यांना आधीच कल्पना द्यायला हवी, असं मला वाटतं." कमल ताई म्हणाल्या.

"हो... तुम्ही म्हणता ते अगदी बरोबर आहे, पण आधी अर्पिताचा निर्णय माझ्यासाठी महत्त्वाचा आहे. ह्या गोष्टी पुढे गेल्या तर ठीक, पण नाहीच गेल्या तर घरचे उगीच निराश व्हायला नकोत. म्हणून मी इतक्यात काही बोललो नाही त्यांना."

"ह्मममम... ते पण बरोबरच आहे म्हणा. बरं सतिशराव...आता तुम्ही जेवूनच जायचं बरं का. " कमल ताई बोलल्या.

"नाही नाही काकू... जेवण वगैरे आज नको. घडल्याच नशिबाने पुढे काही गोष्टी तर हक्काने जेवायला येईल." अर्पिताकडे कटाक्ष टाकत सतिशराव बोलले.

"अहो, पण तशीही योगायोगाने तुमची आणि अर्पिताची आधीपासून ओळख आहेच ना....त्या नात्याने म्हणतेय ओ मी. बाकी पुढच्या गोष्टी जेव्हा घडतील तेव्हा घडतीलच की." कमल ताईंच्या आग्रहापुढे सतिशरावांचे मग काहीही चालेना.

सर्वांनी मिळून मग एकत्रितपणे सहभोजन केले. आज रुद्र तर काही केल्या सतीशरावांना सोडायला तयारच नव्हता. तो आतापासूनच जणू सतिशरावांमध्ये त्याच्या बाबाला शोधत होता.

रुद्रला सतिश रावांसोबत असं क्षणात मिसळून गेलेलं पाहून अर्पिताला मनातून खूपच आनंद होत होता. पण तरीही ती अजूनही द्विधा मनःस्थितीतच अडकली होती.

त्यानंतर पुढचे एक दोन दिवस असेच गेले. न राहवून कमल ताईंनी अर्पिताजवळ विषय घेतलाच.

"काय गं अर्पिता...झाला की नाही तुझा काही निर्णय?"

"कशाबद्दल..?" जणू काही समजलेच नाही या आविर्भावात अर्पिताने प्रतिप्रश्न केला.

"तुलाही माहितीये मला नेमकं काय म्हणायचं आहे ते."

"आई.. खरंतर मला काहीच कळेना झालंय ओ. एक मन विनयसाठी झुरतंय तर दुसरं रुद्रसाठी. मधल्या मध्ये मात्र माझ्या भावनांचा कस लागतोय. काही समजेना काय करावे?"

"हे बघ, तू तर सतिश रावांना चांगलंच ओळखतेस. त्यांच्यात चूक काढावी असे मला तरी काही दिसत नाही. म्हणून मग एकच सांगेल मी, विनयच्या आठवणीत असं रोजच झुरत बसण्यापेक्षा नवीन आयुष्याची नव्याने पुन्हा एकदा सुरुवात कर. आयुष्य खूप सुंदर आहे गं, ते आनंदात घालव. त्यात सतिशरावांसारखा समजूतदार जोडीदार मिळाल्यावर सगळं आयुष्य सोप्पं होऊन जाईल बघ. त्यामुळे नक्कीच विचार कर, एवढेच सांगेल."

"आई सगळं पटतंय हो मला, पण तरीही मन ऐकायला तयार नाहीये."

"मनाचं नको ऐकू ह्यावेळी माझे ऐकशील, तर मी हेच सांगेल की सतिश रावांनाही जोडीदाराची गरज आहे आणि तुलाही. मग तुम्ही एकत्र यायला काहीच हरकत नसावी."

कसेबसे कमल ताईंनी अर्पिताला लग्नासाठी तयार केलेच. अनिता ताईंना देखील ही आनंदाची बातमी सांगितली. त्यांनाही खूपच आनंद झाला. सतिश रावांना तर विश्वासच बसेना. न राहवून त्यांनी अर्पिताला फोन लावला.

"थँक्यू अर्पिता.... हा माझा नाही तर तू माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाचा विजय आहे. तू अजिबात काळजी करू नकोस. सगळं काही तुझ्याप्रमाणेच होईल. माझ्याकडून तुला कुठलाही त्रास होणार नाही याची मी नक्कीच काळजी घेईल." सतिश रावांनी नात्यातील विश्वासाची अर्पिताला हमी दिली.

"तुझ्या घरी आधी सांग सगळं. त्यांचा होकार देखील तितकाच महत्त्वाचा आहे." अर्पिता म्हणाली.

"हो गं...घरीच फोन करायला घेतला होता, पण फायनली एकदा तुझ्याशी बोलावं म्हटलं. म्हणून तुला आधी कॉल केला."

"बरं... काही हरकत नाही. घरी कॉल कर आता. काय म्हणतात घरचे ते नंतर मला सांग."

"ओके...करतो मी तुला नंतर कॉल. आता ठेवतो." म्हणत सतिशने फोन कट केला.

नव्या नात्याची नव्याने आता सुरुवात होणार होती. त्यातच सतिश रावांनी ही बातमी घरी सांगण्यासाठी म्हणून त्यांच्या आईला कॉल केला. त्यांचे आईवडील आणि इतर सर्व फॅमिली दुसऱ्या गावी सेटल होते. नोकरी निमित्त हे दुसरीकडे होते.

"हॅलो आई...अगं मी एक आनंदाची बातमी सांगायला फोन केलाय."

"तू जर लग्न करणार असशील तरच सांग, जे सांगायचे आहे ते. त्याशिवाय माझ्यासाठी दुसरी आनंदाची बातमी असूच शकत नाही."

"अगं तेच सांगायला फोन केलाय मी."

"काय...? खरं बोलतोयेस तू?"

" तुला काय वाटतं ह्या बाबतीत मी तुझी मस्करी करेल?"

"नाही रे तसं नाही पण माझ्या कानांवर माझाच विश्वास बसेना, म्हणून म्हणाले मी तसं. बरं ते सगळं जाऊ दे, मला सांग...मुलगी कोण आहे? कशी आहे? तिचं नाव काय? गाव कोणतं?"

"अगं हो हो... एकाच वेळी एवढे प्रश्न? सगळं सांगतो, पण तू ऐकून घेशील तेव्हा ना!"

"बरं बाबा..ऐकते आता बोल..सगळी हातातील कामे बाजूला ठेवून बसले आता एका जागी, बोल पटकन्." निर्मला ताई म्हणजेच सतिश रावांच्या आई म्हणाल्या.

सतिश रावांनी मग अर्पिता विषयी सर्व इत्यंभूत माहिती त्यांच्या आईला सांगितली.

सगळी हकीकत ऐकून निर्मला ताईंचा चेहराच पडला.

"आधीच लग्न झालेल्या, त्यातच विधवा आणि हे काही कमी होतं म्हणून तिच्या पदरात एक लहान मूल सुद्धा आहे. अशा मुलीशी तू लग्न करणार?
नाही आ सतिश, अशा मुलीशी मी तुझं लग्न लावून देणार नाही."

"आई...अगं तू सगळं काही ऐकून तर घे ना आधी."

"काही ऐकायचं नाहीये मला तुझं. जाऊ दे सतिश, मी रागाच्या भरात आणखी काही बोलेल तुला. त्यापेक्षा आपण नंतर बोलुयात का?"

"ठीक आहे." म्हणत दोघांनीही मग फोन ठेवला.

क्रमशः

काय होणार आता पुढे? कसे होणार अर्पिता आणि सतिशरावांचे लग्न? जाणून घेऊयात पुढील भागात.

©®कविता वायकर


🎭 Series Post

View all