एक धागा सुखाचा..(भाग ९)

आयुष्य म्हणजे सुख दुःखाचा लपंडाव
एक धागा सुखाचा - भाग ९

सतिश रावांनी त्यांच्या आईला अर्पिताविषयी सर्व माहिती सांगितली. पण अर्पिताचा भूतकाळ ऐकून निर्मला ताईंनी मात्र सतिश आणि अर्पिताच्या लग्नासाठी स्पष्ट नकार दिला.

सतिशने थोडा वेळ जाऊ दिला. 'आई जास्तवेळ माझ्यावर राग धरू शकणार नाही.'असे वाटले होते त्याला, पण बराच वेळ झाला तरी निर्मला ताईंनी लेकाला फोन केला नाही. त्यामुळे न राहवून सतिशनेच आईला फोन लावला.

"आई... झालीस का शांत? गेला का तुझा राग?"

"जोपर्यंत तू तुझा निर्णय बदलत नाहीस तोपर्यंत माझा राग जाणार नाहीये सतिश, समजलं."

आता सतिशचा देखील नाईलाज झाला होता. त्यानेही त्याचे मत मग सांगून टाकले.

"समजलं ना तुला आता...मी आतापर्यंत लग्नाला का नाही म्हणत होतो? हे असंच होतं. लग्नानंतर माणूस कधीच सुखी होत नाही. आई आणि बायकोच्या मध्ये त्याचे मरण होणार हे ठरलेलेच असते. इथे तर अजून लग्नही झाले नाहीये माझे आणि सुरुवात देखील झाली बघ." सतिशने मनातील भावना एका दमात बोलून दाखवल्या.

"असं काही नाहीये. माझं फक्त एकच म्हणणं आहे की, तू एका विधवेशी लग्न करू नये. तू इतका हुशार आहेस, दिसायला इतका स्मार्ट आहेस, त्यात कमावता देखील... मग असे आहे तर अजूनही तुला पाहिजे तशी मुलगी मिळेल रे. मग का करायचा एव्हढा मोठा त्याग?" निर्मला ताईंनी देखील कुठलाही आडपडदा न ठेवता त्यांच्या भावना व्यक्त केल्या.

"बरं...तुझ्या म्हणण्याप्रमाणे केलं मी लग्न...पण पुढे माझे आयुष्य सुखातच जाईल याची हमी तू देणार आहेस का? असे असेल तर सांग." सतिशराव म्हणाले.

"असे आधीच जर सांगता आले असते तर जगात सगळीच कुटुंब सुखी समाधानी झाली नसती का?" निर्मला ताई थोड्या रोखातच बोलल्या. 

"हो ना...मग तेच तर सांगतोय मी. अगं मी लग्नाचा विचार केला तेही फक्त अर्पितामुळे. त्या मुलीबद्दल मला खात्री आहे. तिचे संस्कार, तिचे वागणे बोलणे हे सगळे मी अगदी जवळून पाहिले आहे गं. मला विश्वास वाटतो तिच्याबद्दल. खूप समजूतदार मुलगी आहे ती. आज तिच्या आयुष्यात जे काही घडले त्यात तिची चुकी नव्हती. तरीही तिने तिचे पुढील आयुष्य रडत खडत जगावे अशी माझी मुळीच इच्छा नाहीये. आज माझ्यामुळे तिच्या आयुष्यात आनंद येणार असेल तर मला ते नक्कीच आवडेल." अर्पिताबद्दलचा विश्वास सतिशने बोलून दाखवला.

"आता तुझ्यासारखा सर्वगुणसंपन्न मुलगा तिच्या वाट्याला येणार आहे म्हटल्यावर ती तर आनंदी होणारच ना. एकदा सुद्धा तिच्या मनात विचार नाही आला का रे, की तुझं हे पहिलं लग्न आणि तिचं दुसरं, एवढंच नाही तर एक मूल आहे तिच्या पदरात असं असताना आपण समोरच्याच्या लायक आहोत का? हा विचार आधी करायला नको का तिने?" एवढी चर्चा होऊनही अर्पिताबद्दल निर्मला ताईंचे मत काही बदलेना.

"आई अजूनही तुला समजत नाहीये की समजून घ्यायचेच नाहीये? अगं तिच्या पहिल्या नवऱ्याला विसरुन तिलाही ह्या लग्नात अजिबात इंटरेस्ट नाहीये. ती अजूनही विसरली नाहीये विनयला आणि एकटी राहिली तर कदाचित पुढेही कधी विसरणार नाही. पण तिचाही आता नाईलाज आहे. फक्त तिच्या आई वडिलांच्या काळजीपोटी आणि त्या लहानग्या जीवासाठी तिने हे पाऊल उचलले आहे गं. निदान ते तरी समजून घे तू. तूही एक स्त्री आहेस ना गं. तरीही तू असा विचार करतेस? चुकतेस आई तू. नको वागूस असं."

"आतापासूनच मी तुला चुकीची वाटायला लागले, यातच सगळं आलं सतिश. जाऊ दे, मी अजून काही बोलावं असं मला नाही वाटत. तुला जे करायचं ते कर. पण माझ्याकडून चांगल्या वागणुकीची अपेक्षा नको ठेवूस."

"याचा अर्थ तुला लग्न करायचे तर कर, पण मी तुझ्याशी आणि तुझ्या बायकोशी चांगलं वागूच शकत नाही. असंच ना आई?"

"तुला जे समजायचे ते समज." रागातच निर्मला ताई उत्तरल्या.

"बरं मग आता माझेही एक ऐक, तुझ्या मनाविरुद्ध मी काहीही करणार नाही. तुझा आणि बाबांचा होकार असेल तरच या गोष्टी पुढे जातील, अन्यथा नाही आणि आणखी एक गोष्ट... माझ्या लग्नाचा विषय आता यापुढे कायमस्वरूपी बंद असेल. मला कुणीही लग्नासाठी फोर्स करणार नाही. कारण मला त्यात काडीचाही इंटरेस्ट नाहीये. अर्पिताकडे पाहून मनात कुठेतरी आशा निर्माण झाली होती की, आतातरी मी निदान आई बाबांना सुनेच्या रुपात आनंद देवू शकेल, लग्न करून आई बाबांची इच्छा पूर्ण करेल. वाटले होते ती मुलगी माझ्या आयुष्यात आली तर इतरांपेक्षा माझे आयुष्य सुखी होईल. पण तो फक्त माझा एक गैरसमज होता. मी नेहमी म्हणत असतो की लग्न करून कोणी सुखी होत नाही. आज ते खऱ्या अर्थाने पटतंय बघ."

"म्हणजे तुझा निर्णय आधीच झालाय तर. तू फक्त आम्हाला सांगून एक फॉरमॅलिटी पूर्ण करतोय."

"तसे समज हवंतर. कारण मला खात्री वाटत होती तुझ्याबद्दल, मी असा विचार केला होता की, उशिरा का होईना पण मी लग्नाला तयार झालो, याचा खूप आनंद होईल तुला. पण तसे काहीही झाले नाही आणि तुमच्या विरोधात जाऊन मला काहीही चुकीचे करायचे नाही. तसे केले तर अर्पितालाच ते आवडणार नाही आणि माझ्याआधी तीच मला नकार देईल."

"सतिश... आतापासूनच किती विचार करतोस रे तू तिचा? तसाच विचार तू माझ्या बाबतीत का करत नाहीस? अरे आई आहे मी तुझी. तुझं चांगलं वाईट समजतं मला. त्याच हक्काने तुला समजावत होते. पण तू तर टोकाचीच भूमिका घेतली."

"चांगल्या वाईटाची शिकवण तूच तर मला दिलीस ना आई. म्हणूनच माझे विचार इतके प्रगल्भ आहेत आज. आज मी जो काही आहे तो फक्त तुझ्यामुळे आणि तू माझ्यावर केलेल्या संस्कारांमुळे. आपल्यामुळे एखाद्याचे रंगहीन आयुष्य रंगीबेरंगी होणार असेल, त्याचे आयुष्य मार्गी लागणार असेल तर त्याहून मोठा आनंद तो काय? असा विचार करणं हादेखील एक संस्कारांचाच भाग आहे ना गं?"

सतिशचे हे असे विचार ऐकून आज निर्मला ताईदेखील अवाक् झाल्या.

"तुझं सगळं बरोबर जरी असलं तरी मी एक आई आहे अरे. त्यामुळे मी त्याच भूमिकेत राहून विचार करणार ना. हे तूही समजून घे ना."

"बरं ठीक आहे. जाऊ दे.. सोड सगळं. रागाच्या भरात मी जर चुकीचं काही बोलून गेलो असेल तर माफ कर मला. निघतो मी आता, मला उशीर होतोय कॉलेजला जायला आणि आता दिवसभर नको तो विचार करत बसू नकोस. मुलगा बदलला, आई बापाच्या शब्दाला आता किंमत नाही राहिली, असं काहीबाही डोक्यात आणू नकोस. मी तुमचाच मुलगा आहे आणि शेवटपर्यंत राहणार. तुमचा शब्द माझ्यासाठी अखेर असेल. पण माझ्याही मनाचा विचार तुम्ही करावा असं वाटतं मला. चल ठेवतो मी." म्हणत सतीशने फोन कट केला.

निर्मला ताई मात्र पेचात अडकल्या. काय करावे ते त्यांनाही समजेना.

तिकडे अनिता ताई आणि कमल ताई सतिशरावांच्या फायनल उत्तराची वाट बघत होते.

पहिल्या मीटिंगनंतर पुढचे दोन दिवस असेच गेले, तरी सतिश रावांचा काहीच रिप्लाय नाही म्हणून सगळेच आता काळजीत होते.

न राहवून अर्पिताने त्यांना मेसेज केला.

" हे बघ, जर घरचे तयार नसतील तर मी अजिबात पुढे पाऊल टाकणार नाही. त्यात तुझे हे पहिले लग्न आणि माझे सगळेच उलट. त्यामुळे तुझ्या घरून होकार येईल असे मला तरी वाटत नाही आणि तशी अपेक्षा ठेवणेच मुळी चुकीचे आहे. कारण आई वडील म्हणून त्यांच्याही भावना तितक्याच महत्वाच्या आहेत. त्यामुळे हा विषय आपण इथेच स्टॉप करुयात. हेच योग्य असेल आपल्या दोघांसाठी."

दिवसभर सतिश खूप कामात होता. त्यामुळे मोबाईलकडे पाहायला सुद्धा त्याला वेळ मिळाला नाही.

रात्री घरी आल्यावर त्याने अर्पिताचा मेसेज पाहिला. काय बोलावे ते आता त्यालाही समजेना.

"अर्पिता, थो..डा वेळ दे मला. मी करतो सगळं ठीक. तू नको काळजी करुस." सतिशने अर्पिताच्या मेसेजला रिप्लाय दिला खरा, पण आता आई बाबांना कसे पटवून द्यायचे? याचा तो मनोमन विचार करू करू लागला.

क्रमशः

सतिश वळवू शकेल का त्याच्या आई वडिलांचे मन? त्याच्या प्रयत्नांना येईल का यश? जाणून घेऊयात पुढील भागात.

©®कविता वायकर


🎭 Series Post

View all