एक धागा सुखाचा..(भाग १०)

आयुष्य म्हणजे सुख दुःखाचा लपंडाव
एक धागा सुखाचा - भाग १०

अर्पिताचा मेसेज पाहिल्यापासून सतिश विचारांत पडला होता. 'आईला तर मोठ्या तोऱ्यात बोललो की तुमच्या शब्दाबाहेर जाणार नाही, पण आता त्यांचा नकार होकारात कसा बदलवू मी?'

खूप विचार केला तेव्हा सतिशच्या मनात आले की, 'एकदा बाबांशी बोलून पाहावं का?'

बाबांना फोन करायला म्हणून त्याने फोन हातात घेतला. पण, 'स्वतःच्याच लग्नाचा विषय बाबांसमोर कसा काढायचा?' हा मोठा प्रश्न होता त्याच्यासमोर.

'आणि बाबाही नाहीच म्हणाले तर? मग मात्र मीही काहीच करु शकणार नाही. त्यांचा शब्द मोडून मी पुढेही जाऊ शकत नाही. कारण असे असेल तर अर्पिताच माझी साथ देणार नाही.' सतिशचे विचारचक्र थांबायचे काही नावच घेईना.

'पण मी का हा इतका विचार करत आहे? आज पहिल्यांदा एका मुलीसाठी मी आईशी वाद घातला, तिला दुखावलं. खरंतर एवढी हिंमतच नाहीये माझ्यात, पण हे सगळं बळ मग आलं कुठून? त्यात आता आई नाही म्हणतेय तर ठीक आहे ना. तसंही आयुष्यात लग्नच करायचं नाही हे मी आधीच ठरवलं होतं. मग आता का मला मनातून माझं आणि अर्पिताचं लग्न व्हावं असं वाटतंय? जर अर्पिताचा नकार असता या लग्नासाठी तर ठीक होतं, तेव्हा मात्र मी स्वतःहून दोन पाऊल मागे आलो असतो. पण आता तिचा होकार आलाय तेव्हापासून मी का मागे जाऊ शकत नाहीये? तसंही तिची इच्छा नाहीच आहे माझ्याशी लग्न करायची. ती आयुष्याची फक्त एक तडजोड म्हणून हे लग्न करत आहे. आज माझं आणि तिचं लग्न झालं नाही तर तिचे आईवडील दुसरा एखादा मुलगा शोधतीलच ना! पण मग हे सगळं माहीत असताना सुद्धा मी का गुंतत आहे तिच्यामध्ये?'

असे खूप सारे प्रश्न सतिशच्या मनाला वेदना देत होते. त्याचे मन सैरभैर झाले होते. दोनच दिवसांत जणू त्याचे विश्वच बदलून गेले होते. अर्पिताचा विचार काही केल्या त्याच्या मनातून जातच नव्हता.

'जाऊ दे, ते पुढचं पुढं बघता येईल. आधी कॉल तर करून पाहतो बाबांना.' म्हणत फायनली सर्व धीर एकवटून सतिशने त्याच्या बाबांना कॉल केला.

"हॅलो बाबा....काय करताय?"

"अरे आताच जेवण झालं आणि बसलोय मग टीव्ही पाहत. तू जेवलास?"

"नाही अजून...जेवेल आता थोड्या वेळात."

"बाकी काय म्हणतोस? ठीक ना सगळं?"

"हो बाबा.. सगळं काही ठीक आहे. तुम्ही कसे आहात?"

" मी पण मजेत रे."

"बरं तुझ्या आईकडे देवू का फोन?"

"अहो नको बाबा..आईसोबत सकाळीच बोललोय मी. तुमच्याशीच बोलायला कॉल केलाय मी."

"हो का..बोल ना मग. काही महत्त्वाचं आहे का रे?"

"बाबा आईने तुम्हाला काही गोष्टींची कल्पना दिलीच असेलच ना?"

"नेमकं कशाबद्दल बोलतोय तू?"

"म्हणजे माझ्याबद्दल काहीच सांगितले नाही का तिने तुम्हाला?"

"अरे आज मी दिवसभर घरीच नव्हतो रे बाळा. ते जमिनीचा एक मॅटर सुरू आहे ना कोर्टात, तिकडेच होतो आज दिवसभर. घरी यायला पण उशीरच झाला. आलो, फ्रेश झालो, जेवण केलं आणि बसलोय आता टिव्ही पाहत."

"अच्छा! म्हणजे तुम्हाला काहीच माहीत नाही."

"नाही रे... पण घरात तुझ्या आईचं काहीतरी बिनसलंय असं वाटतंय. मला यायला उशीर झाला त्यामुळे रागावली असेल असं वाटलं मला. पण काय झालंय नेमकं? पुन्हा तोच लग्नाचा विषय घेऊन भांडली नाही ना ती तुझ्याशी?"

"नाही अगदी तसेच आहे असे नाही, पण विषय माझ्या लग्नाचाच आहे."

"बरं...काय झालंय नेमकं?"

"बाबा मला लग्न करायचंय." अति उत्साहाच्या भरात सतिश बोलून गेला.

तिकडे तो असे बोलून तर गेला खरं,पण आपण हे काय बोललो! असे मनातच म्हणत त्याने दाताखाली जीभ चावली.
आता बाबा कसे रीॲक्ट होणार? याचे त्याला थोडे टेंशनच आले.

"सतिश...तू ठीक आहेस ना रे? म्हणजे नेमका तू सतिशच बोलत आहेस ना?"

"बाबा...अहो मीच आहे ओ. "

"अरे...पण कालपर्यंत आम्ही थकलो तुला लग्न कर म्हणून सांगून आणि आज चक्क तू स्वतःच लग्न करायचं म्हणतोय. मग आश्चर्य तर वाटणारच ना!"

"हो ते तर आहेच."

"बरं पुढे मग...कोणी मुलगी आहे का तुझ्या पाहण्यात की आम्ही शोधू इकडे?"

"बाबा त्याच संदर्भात मला तुमच्याशी बोलायचं आहे. म्हणजे आईशी बोललोय मी, पण त्याचा काही उपयोग झाला नाही."

"म्हणजे... कोणाच्या प्रेमात पडलास की काय तू?" आश्चर्यकारकरित्या सुरेशराव बोलले.

"बाबा... अहो काय हे? तसं काही नाहीये ओ." सतिश बोलला.

"मग जे काही आहे ते सविस्तर सांग बरं. किती वाट पाहायला लावशील आता?"

सतिशने मग अर्पिताबद्दल सर्वकाही सुरेशरावांना सांगितले.

"बाबा...आता तुम्हीच सांगा. मी काही चुकीचं करतोय का? तसं असेल तर मी तुमच्या शब्दाबाहेर अजिबात जाणार नाही."

"हे बघ... एक बाप म्हणून जर मी विचार केला तर कोणत्याच आई वडिलांना आपल्या मुलांचं एका विधवेशी लग्न व्हावं असं वाटणार नाही."

"म्हणजे बाबा...तुम्हाला पण मी चुकीचाच वाटतोय का ओ?"

"मी म्हटलं का तसं? पुढे काय म्हणायचंय मला ते तर ऐकून घे. एक बाप म्हणून कदाचित मला नाही आवडणार, पण एक मित्र म्हणून तुझ्या निर्णयाचा मी नक्कीच आदर करतो. त्यात तू लग्नाला तयार झाला हीच खूप मोठी गोष्ट आहे बघ."

"थँक्यू बाबा...खूप हलकं वाटतंय आज."

"हे बघ..काही गोष्टी या विधिलिखित असतात. त्या कोणालाही चुकल्या नाहीत. म्हणजे बघ, तुझी आणि तिची भेट या वळणावर येऊन होणं, ही त्या परमेश्वराचीच इच्छा असेल कदाचित. तू आतापर्यंत लग्न न करणं आणि नेमकं तिच्याही पतीचं निधन होणं या गोष्टींचा एकमेकांशी वरवर जरी काही संबंध दिसत नसला तरी पुढच्या काही गोष्टी घडण्यासाठी आधीच्या गोष्टी आधी घडणं देखील तितकंच गरजेचं असतं."

"अगदी खरं आहे बाबा."

"तसंही तिच्याचमुळे तू आयुष्यात लग्न न करण्याच्या तुझ्या निर्णयाचा पुनर्विचार केलास, हीच खूप मोठी गोष्ट आहे रे."

"बाबा पण मनापासून अगदी खरं खरं सांगा, अर्पिता माझ्यासाठी योग्य मुलगी नाहीये का?"

"आता तिच्या बाकीच्या ज्या ज्या गोष्टी तू मला सांगितल्या त्यावरून तर ती मुलगी अगदी समंजस आणि संस्कारी वाटते.  एकदा तिची प्रत्यक्ष भेट घ्यायला हवी. आम्हालाही समजायला हवं ना आमच्या लेकाची चॉईस कशी आहे ते?" हसतच सुरेशराव म्हणाले.

"ते करू बाबा आपण, पण आईला कसं मनवायचं? मला तर काहीच कळेना झालंय."

"तू काळजी करू नकोस..मी बोलतो तिच्याशी."

"बाबा पण मनातून खूप भीती वाटतेय ओ, माझ्या स्वतःच्या समाधानासाठी मी आईला दुखावतोय असं वाटतंय आणि तसे काहीही झाले तरी मला ते अजिबात आवडणार नाही."

"मी समजावतो तिला. तू काळजी करू नकोस. शेवटी तुझा आनंद तो आमचा आनंद."

"बाबा, पण आता आई कुठेय?"

"अरे तुझा फोन आला मग मी दुसऱ्या खोलीत आलो. ती आवरत असेल तिचं काम."

"बरं...चला बाबा...मी ठेवतो आता. तुमच्याशी बोलून खूप हलकं फील होतंय. आता पोटभर जेवण जाईल." गमतीच्या सुरात सतिश बोलला नि दोघांनीही मग फोन ठेवला.

आज खऱ्या अर्थाने बाप लेकाच्या नात्याचे रेशमी बंध अधिकच घट्ट झाल्याची जाणीव झाली.

रात्री झोपायच्या आधी सुरेशरावांनी निर्मला ताईंजवळ लेकाच्या लग्नाचा विषय घेतलाच. दोन्ही बाजू त्यांना समजावून सांगितल्या.

" हे बघ निर्मला, अगं आजकाल आई वडिलांचा विचार करणारी, त्यांच्या शब्दाला किंमत देणारी मुले क्वचितच असतात. आपला मुलगा आपल्या शब्दाबाहेर नाही ही किती मोठी गोष्ट आहे तूच सांग बरं." समजावणीच्या सुरात सुरेशराव म्हणाले.

"मलाही कळतं हो ते, पण एका विधेवेशी लग्न हे जरा अतीच नाही का होत? त्यात तिच्या पदरात पाच वर्षांचे मूल.. असं असताना मी त्यांच्या लग्नाला होकार द्यावा? ही अपेक्षा तरी कशी काय ठेवू शकता तुम्ही?"

"मग आता काय करणार आहेस तू? लेकराच्या सुखापेक्षा तुला तुझा इगो मोठा वाटतोय तर?"

"काहीही काय बोलता हो. माझं फक्त इतकंच म्हणणं आहे की, तिचं आधी लग्न झालं होतं ही गोष्ट जरी समजून घेतली तरी तिला एक मूल आहे हे कसं समजून घ्यायचं?"

"मग त्याने काय एव्हढा फरक पडतो?"

"तुम्हाला समजत कसं नाही ओ? अहो... स्वतःचं एक मूल आहे तिला, मग पुढे जाऊन ती दुसऱ्या मुलाचा विचार करेलच हे कशावरून? मग काय अर्थ आहे त्या लग्नाला? सतिशचा फक्त ती आधार म्हणून वापर करणार का? हे मला काही पटत नाहीये."

"अगं पुढे जाऊन मुल होऊ देणं किंवा न देणं हा सर्वस्वी त्या दोघांचा निर्णय असेल गं. ते त्याचं पाहून घेतील ना. तू तर कुठच्या कुठे जाऊन पोहचलीस."

"हे असं असेल तर तुम्हाला मान्य आहे थोडक्यात?"

"का मान्य नसावं? अगं...तिचं मुल हेदेखील आपलं नातवंडच असणार आहे, हे का विसरतेस तू?."

"पण ते आपल्या सतिशचं मुल थोडीच ना आहे?"

"हे बघ निर्मला, तू आतापासूनच नको त्या गोष्टींचा विचार करणं बंद कर. एकविसाव्या शतकात जगत आहोत आपण. काळाप्रमाणे चालायला शिक जरा. अगं ज्यांना मुल नाही ते लोक दत्तक मूल घेतात, मग त्यांनी काय विचार करायला हवा? नको ते विचार डोक्यातून काढून टाक बरं. लेकाच्या आनंदाचा विचार कर." थोड्या चढ्या आवाजात सुरेशराव बोलले.

"जाऊ द्या...मी आता काहीच बोलणार नाही. तुम्हाला जे योग्य वाटतंय ते तुम्ही करा." नाराजीच्या सुरात निर्मलाताई बोलल्या.

"हा असा जबरदस्तीचा होकार नकोय बरं का. फक्त तू सतीशचा विचार कर. एवढंच म्हणणं आहे माझं. अर्पिता आणि रुद्रच्या रुपात त्याच्या आयुष्यात उशिरा का होईना पण आनंद येवू पाहतोय तर त्याला तो मिळावा अशी माझी मनापासून इच्छा आहे. आता वाद घालण्यात आणि उगीच वेळ वाया घालवण्यात काही अर्थ आहे का?"

पुढे काहीही न बोलता निर्मला ताईंनी गप्प बसण्यातच शहाणपण मानले. कारण सुरेश रावांनी एकदा का एखादी गोष्ट ठरवली म्हणजे ठरवली.

निर्मला ताईंनी मग इच्छा नसतानाही अर्पिता आणि सतिशच्या लग्नाला होकार दिला.

पण अजूनही अर्पिताच्या अटी निर्मला ताईंना माहीतच नव्हत्या. त्या जेव्हा त्यांना समजतील तेव्हा त्या नेमकं कसं रिॲक्ट करतील? देवच जाणे.

क्रमशः

काय होणार आता पुढे? जाणून घेवूयात पुढील भागात.

©® कविता वायकर


🎭 Series Post

View all