एक धागा सुखाचा..(भाग ११)

आयुष्य म्हणजे सुख दुःखाचा लपंडाव
एक धागा सुखाचा - भाग ११

निर्मला ताईंनी अर्पिता आणि सतिशच्या लग्नाला नकार दिल्यानंतर सतिशने त्याच्या बाबांना सर्व हकीकत सांगितली.

सुरेशराव लेकाच्या पाठीशी भक्कम उभे राहिले. आज लेकाबद्दल त्यांना मनापासून अभिमान वाटत होता. आधी, कधीही लग्न करणार नाही असे म्हणणारा सतिश एका विधवा स्त्रीचा आणि बापाचे छत्र हरपलेल्या मुलाचा आधार बनून त्यांच्या आयुष्यात आनंद पसरवण्याचा विचार करत होता. ही खूप मोठी गोष्ट होती सुरेश रावांसाठी. पण नेमकी हीच गोष्ट निर्मला ताईंना खटकत होती.

सुरेशरावांनी बायकोची खूप समजूत काढली. तेव्हा कुठे नाईलास्तव का होईना निर्मला ताईंनी अर्पिता आणि सतिशच्या लग्नाला होकार दिला.

त्यातच अर्पिता आणि सतिश योगायोगाने डिप्लोमाला एकाच कॉलेजमध्ये असल्याने त्याला अर्पिताबद्दल सर्वकाही माहिती होती. म्हणूनच त्याने कोणताही विचार न करता अर्पिताला लग्नासाठी रीतसर मागणी घातली.

दुसऱ्या दिवशी सुरेशराव आणि निर्मलाताई मध्यस्थी व्यक्तीच्या मदतीनने अर्पिताला भेटण्यासाठी तिच्या सासरी गेले. सतिशने फोन करून तशी तिला कल्पना दिली. अर्पिताचे आई बाबा आणि मामा मामी देखील आले होते. कमल ताईंनी मोठया आदराने पाहुण्यांचे स्वागत केले.

सुनेच्या दुसऱ्या लग्नासाठी सासूचा असलेला पाठींबा पाहून निर्मला ताईंना तर मोठे नवल वाटले. सुरुवातीला तर कमल ताईच अर्पिताची आई आहे, असे त्यांना वाटले.

"अर्पिताचं आवरलंय, पण तिचा ऑफिसचा एक कॉल सुरू आहे. काहीतरी अर्जंट काम आहे. दहा पंधरा मिनिटात येईल ती." अदबीने कमल ताई म्हणाल्या.

"हो हो ..काहीच हरकत नाही." सुरेशराव म्हणाले.

छोटा रुद्र त्याच्या आजी आजोबांच्या मांडीवर बसून त्यांच्याकडून पुरेपूर लाड करून घेत होता. निर्मलाताई सर्वकाही बारकाईने पाहत होत्या. तेवढ्यात सुरेश रावांनी खिशातून चॉकलेट्स काढून रुद्रला जवळ बोलावून त्याला ते दिले. लेकरू एकदम खुश झाले. थँक्यू म्हणत धावत जाऊन पुन्हा तो अनिता ताईंच्या मांडीवर बसला.

रुद्रला पाहून सुरेशरावांना भरुन आले. 'इतक्या लहान वयात वडिलांचे छत्र हरपल्याचे दुःख कोणाच्या वाट्याला येवू नये,' अशी मनोमन त्यांनी देवाला प्रार्थना केली.

ह्यावेळी कमल ताईंच्या आग्रहास्तव अर्पिताने सुंदर अशी साडी नेसली होती. त्यामुळे तिचे रूप अधिकच खुलले होते. तसं खूप कमी वेळा तिला साडी नेसायची वेळ येत असे. विनयला आवडते म्हणून सणावाराला ती आवर्जून साडी नेसायची.

आज निमित्त जरी वेगळे असले तरी आरशात स्वतःला बघताना अर्पिता वियनला खूप मिस करत होती. ऑफिसचे काम भरभर आटोपून स्वतःला न्याहाळत ती आरशासमोर उभी राहिली. क्षणभर ती स्वप्नांच्या दुनियेत हरवली. जणू बाजूला उभा राहून विनय सवयीप्रमाणे तिला नजरेतूनच कॉम्प्लीमेंट देत होता. त्याच्या चेहऱ्यावरील ते मिश्किल हसू तिला अधिकच घायाळ करत होते. आपण आज कशासाठी साडी नेसली आहे? हेच क्षणभर ती विसरुन गेली आणि विनयसोबतच्या गोड आठवणींत रममाण झाली.

साडी नेसल्यावर विनयचे कातील नजरेने तिच्याकडे बघणे, तिला मिठीत घेण्यासाठी त्याची धडपड सुरू होणे, न बोलताही नजरेतूनच तिच्यावर प्रेमवर्षाव करणे; सारे काही आठवून अर्पिताच्या ओठांवर हसू आणि चेहऱ्यावर विनयच्या प्रेमाचा रंग चढला होता. लाजेली कळी देखील तिच्या चेहऱ्यावर अलगद खुलली होती.

तितक्यात अनिता ताई दार ढकलून हळूच आत आल्या. खूप दिवसांनी अर्पिता अशी तयार झाली होती. तिच्या आयुष्यातील रंगच जणू कुठेतरी हरवले होते, पण आज सतिशमुळेच तिचे आयुष्य पुन्हा एकदा रंगीत होऊ पाहत होते. असे असले तरीही त्यात अजूनही विनयच रंग भरत असल्याचा भास काही केल्या तिची पाठ सोडायला तयारच नव्हता.

अनिता ताईंनी अर्पिताच्या चेहऱ्यावरील हावभाव अगदी अचूक हेरले. तिला असं आनंदात पाहून त्या तोंडातल्या तोंडात पुटपुटल्या, 'माझ्या लेकीचे सुख पुन्हा एकदा तिच्या नशिबी येवू दे देवा आणि कायम स्वरुपी ते टिकून देखील राहू दे, असंच हसत खेळत ठेव तिला,' म्हणत त्यांनी मनोमन देवाला प्रार्थना केली.
पण अजूनही अर्पिताच्या या सुखी आणि आनंदी चेहऱ्यामागचे रहस्य म्हणजे विनयच आहे हे मात्र अनिता ताईंना समजू शकले नाही.

"अर्पिता... अगं किती छान दिसतेस तू! माझीच दृष्ट नको तुला लागायला बाई," म्हणत अनिता ताईंनी काजळाची मोहोर अलगद तिच्या कानाच्या मागे उमटवली.

क्षणात अर्पिताचे सुंदर स्वप्न एखाद्या काचेप्रमाणे अलगद तडकले. विनयच्या आठवणीत नकळतपणे तिचे डोळे अश्रूंनी डबडबले.

"ये वेडाबाई....आता अजिबात डोळ्यात पाणी आणायचं नाही बरं. बघ... पुन्हा एकदा तुझी सारी सुखं तुझ्याकडे आपोआपच चालत येत आहेत की नाही. मी म्हटलं होतं की नाही... 'सुखामागून दुःख आणि दुःखामागून पुन्हा सुख' हा खेळ आजन्म सुरुच असतो. हळूहळू सगळं ठीक होईल. तू अजिबात काळजी करू नकोस." म्हणत अनिता ताईंनी लेकीची समजूत काढली.

अर्पिता मात्र स्वतःच्या नशिबाला कोसत मनातील दुःख मनातच लपवत आयुष्याचा पुढचा अध्याय लिहिण्यासाठी सज्ज झाली.

थोड्याच वेळात अर्पिता नास्त्याच्या प्लेट्स घेऊन बाहेर आली.

अर्पिताला पाहून निर्मला ताई क्षणभर गोंधळल्या.
'ही नक्की ह्या पाच वर्षाच्या मुलाची आईच आहे ना?' त्याही विचारांत पडल्या.

सतिशसाठी निर्मला ताई मनोमन जशा मुलीची स्वप्न पाहत होत्या अगदी हुबेहूब तशीच मुलगी अर्पिताच्या रुपात आज त्यांच्या समोर उभी होती. त्यामुळे नकळतपणे मनातून त्या खूष झाल्या. सुरेशराव देखील मनोमन अगदीच सुखावले.

एकंदरीतच सर्व सोपस्कार पार पडले आणि लगेचच पुढची बोलणी करून लवकरात लवकर सतिश आणि अर्पिताचा विवाहसोहळा संपन्न व्हावा अशी इच्छा सुरेशरावांनी बोलून दाखवली आणि त्या दृष्टीने लगेचच चर्चेला सुरुवात देखील झाली. सर्व गोष्टी फायनल करुनच जायचे असे जणू सुरेश रावांनी आधीच ठरवले होते आणि आता मात्र ते सत्यात देखील उतरत होते.

अखेर लग्नाची बोलणी फायनल झाली. तारीख देखील ठरवण्यात आली. सारे काही अगदी सुरेश रावांनी ठरवल्याप्रमाणे घडत होते. कारण लेकाचे मन त्यांनी जाणले होते.

तिकडे अर्पिताच्या सर्व अटी मान्य करत सतिश मात्र तिच्या सोबत साता जन्माची वचने घेण्यासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून तयारच होता. पण तिने ठेवलेल्या अटी अजून तरी फक्त त्यालाच माहिती होत्या.
'आता जर हे सर्व आई बाबांना समजले तर हे लग्न काही होणारच नाही,' म्हणून सध्या तरी शांत बसण्यातच त्याने शहाणपण मानले.

सुरेशरावांनी लेकाच्या लग्नाची बोलणी परस्पर उरकवून घेतली म्हणून निर्मला ताई नाराज होत्या.

' दोन चार जवळच्या नातेवाइकांचा तरी सल्ला घ्यायला हवा होता ह्यांनी. इतकी काय घाई झालिये तेच समजेना.' मनोमन निर्मला ताई बोलल्या.

सुरेशरावांना मात्र ते नको होते. नातेवाईकांना या अशा गोष्टीत सामील करून घेणं म्हणजे एका गोष्टीला डझनभर फाटे फोडण्यासारखे होईल, म्हणून त्यांनी कोणालाही सतिशच्या लग्नाची बातमी कळूच दिली नाही. घाईतच सर्व बोलणी उरकून घेतली. कारण अर्पिता आणि तिच्या फॅमिलीबद्दल ते सर्व जाणून होते. त्यातच मध्यस्थी व्यक्ती देखील विश्वासू असल्याने सर्व गोष्टी भरभर होत होत्या.

त्यामुळे पहिल्याच बैठकीत सुरेश रावांनी लेकाचे लग्न फिक्स केले तेव्हाच ते घरी परतले. निर्मला ताईंना देखील आधीच बजावले, 'नात्यात कोणी काहीही बोलले तरी त्यांच्या बोलण्याने उगीच टेन्शन घ्यायचे नाही. सर्वांनाच आपला हा निर्णय पटेलच असे नाही आणि तो पटायलाच हवा हा अट्टाहास देखील नसावा. आपल्या मुलाचा आनंद, त्याचे सुख आपल्यापेक्षा जास्त कोणालाच माहिती नसते आणि तसेही लोक अशावेळी मुद्दाम बोलून दाखवतात. अशावेळी तोंड देण्यापेक्षा पाठ फिरवलेलीच बरी असते.

सुरेशरावांनी आधीच सर्व गोष्टी क्लिअर केल्या.

इकडे हळूहळू अर्पिताच्या लग्नाची बातमी शेजारीपाजारी पसरली. तिच्या या दुसऱ्या लग्नाला मात्र अनेकांनी विरोध दर्शवला. खूप नावे ठेवली तिला आणि तिच्या माहेरच्या माणसांना देखील.

"कमल ताईंनाही अर्पितासारखेच लवकर वैधव्य आले पण म्हणून काही त्यांनी लगेच दुसरे लग्न नाही केले. अर्पिताने मात्र असे नव्हते करायला पाहिजे. नवऱ्याला आता कुठे दोन महिने नाही झाले तर ही लगेच दुसऱ्या लग्नाला उभी राहिली. सासू सुनेनेच आता एकमेकींचा आधार बनून सुंदर आयुष्य जगायला हवं होतं. पण नाही, ह्या आजकालच्या पोरी क्षणात सगळं विसरुन जातात." शेजारी पाजारी सध्या 'अर्पिताचे लग्न ' हा एकच चर्चेचा विषय सुरू होता.

यावर कमल ताईंनीच सर्वांची तोंडे बंद केली.

"आज अर्पिताच्या या लग्नाला मी स्वतः पाठींबा देत आहे. कारण एखाद्या पुरुषावर ही अशी वेळ आली तर तो दुसरे लग्न करून मोकळा होतो. मग काही नियम फक्त बायकांनीच का पाळायचे? त्यावेळी पुरुषाला कोणी काहीही बोलत नाही मग बायकांनाच का बोल लावले जातात? माझी परिस्थिती वेगळी होती. मी नाही दुसरे लग्न केले म्हणून अर्पिताने देखील तेच करावे हा अट्टाहास कशासाठी? एकटीने आयुष्य जगताना काय काय सहन करावे लागते ते तुम्हाला नाही कळणार. मी जे भोगले ते अर्पिताच्या वाट्याला येऊ नये असेच वाटते."

कमल ताई खंबीरपणे अर्पिताच्या पाठीशी उभ्या राहिल्या. सासूचे विचार ऐकून तिलाही त्यांचा हेवा वाटला. इतक्या वर्षानंतर आता कुठे दोघींच्याही नात्यात आता बऱ्यापैकी आपलेपणाची ऊब निर्माण झाली होती. पण हे सर्व पाहायला, विनय मात्र आज त्यांच्यात नव्हता. याचीच खंत त्या दोघींच्याही मनाला राहून राहून खूपच वेदना देत होती. तरीही विनय हे कुठून ना कुठून तरी नक्कीच पाहत असेल आणि खूप हेवा करत असेल आमच्या दोघींवर याची त्यांना खात्री होती.

तिकडे सतिशच्या लग्नाची बातमी देखील एव्हाना नातेवाईक आणि शेजारीपाजारी पसरली. सुरेशराव म्हणाले अगदी तसेच झाले. बऱ्याच जणांनी ह्या लग्नाला विरोध दर्शवला. जो तो आपापल्या परीने मत व्यक्त करत होता. पण 'कोणाच्याही प्रश्नांना उत्तरे देत बसायचं नाही,' हे सुरेशरावांनी आधीच सांगितले होते. त्यामुळे त्याही दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करत होत्या.

पण सतिशच्या मामांनी स्वतः या लग्नाला विरोध दर्शवला. फोन वरून बहिणीला त्यांनी खूप काही सुनावले.

"काय अगं ताई.. परस्पर लेकाचे लग्न जमवले, या कानाची खबर त्या कानाला कळू दिली नाही. पण अशा बातम्या थोडीच ना लपून राहतात आणि तसंही तुझा लेक एका लेकुरवाळ्या विधवेशी लक्ष करतोय म्हटल्यावर तू तरी हे कोणत्या तोंडाने सांगणार होतीस म्हणा?
'त्यावेळी तुझ्या या अतिहुशार लेकाने माझ्या लेकीला नाकारलं... पण सगळे परतून आता त्याच्याकडेच येत आहे बघ. आता कोणी भेटेना म्हणून मग जे आहे पदरात पाहून घेण्याशिवाय दुसरा पर्याय तरी कुठे आहे म्हणा त्याच्याकडे." मामांनी तर आता पातळी सोडून बरेच काही ऐकवले.

निर्मला ताईंना भावाच्या या अशा बोलण्याने मेल्याहून मेल्यासारखे झाले. त्यांच्या तळपायाची आग मस्तकात गेली. आताच्या आता जाऊन हे लग्न मोडून टाकावे असे वाटले क्षणभर त्यांना.

क्रमशः

निर्विघ्नरित्या पार पडेल का आता अर्पिता आणि सतिशचा विवाहसोहळा? जाणून घेऊयात पुढील भागात.

©® कविता वायकर


🎭 Series Post

View all