एक धागा सुखाचा..(भाग १२ अंतिम)

आयुष्य म्हणजे सुख दुःखाचा लपंडाव
एक धागा सुखाचा - भाग १२

भावाच्या खोचक बोलण्याने निर्मला ताई खूपच दुखावल्या गेल्या.

'दादा काहीच चुकीचे बोलला नाही. आता सगळ्यांचीच ही अशी खोचक बोलणी ऐकून घ्यावी लागणार. आपण आपल्या मुलाचे एका विधवेशी लग्न लावून खूपच मोठी चूक करत आहोत.' हे आता निर्मला ताईंना खात्रीने पटले होते. पण त्यांच्या या विचारांना सुरेशराव कधीही पाठींबा देणार नाहीत याचीही त्यांना खात्री होती.

खूप विचार करून निर्मला ताईंनी गुपचूप अर्पिताला कॉल केला.
"हे बघ..तू खूप चांगली मुलगी आहेस. मला त्याबद्दल काहीही बोलायचे नाही. पण माझ्या एकुलत्या एका मुलाचे एका विधवेशी लग्न व्हावे अशी माझी अजिबात इच्छा नाही. त्यामुळे काहीही कारण सांगून तू या लग्नाला नकार दे." निर्मला ताई म्हणाल्या.

अर्पितासाठी हे खूपच शॉकिंग होते..

"अहो पण आता सगळे फायनल झाल्यावर चार दिवसांनंतर  तुम्ही हे बोलताय! त्या दिवशीच जे आहे ते स्पष्ट बोलायला हवं होतं ना तुम्ही."समजावणीच्या सुरात अर्पिता बोलली.

"हो...तेव्हाच बोलणार होते, पण नाही बोलू शकले. कारण सतिश आणि त्याचे बाबा त्यांच्या मतावर ठाम होते, पण अजूनही वेळ गेलेली नाहीये. तू नाही म्हणून सांग."

अर्पिताला तर काय बोलावे काहीच समजेना. उगीच वाद घालून आरडाओरडा करून काहीही होणार नव्हते. जास्त काही न बोलता तिने शांततेत माघार घेतली.

"बघते मी." एवढेच ती सध्या बोलू शकली.

"आणि आणखी एक गोष्ट... यातील काहीच सतिश किंवा त्याच्या बाबांना कळता कामा नये." निर्मला ताई म्हणाल्या.

अर्पिताच्या मनावरचे ओझे झटकन कैकपटीने वाढले. आता गोष्टी एवढ्या पुढे गेल्यानंतर नेमके काय करावे? ते तिलाही कळेना.
'सतिश सोबत बोलू शकत नाही... अचानक नाही म्हणून सांगितले तर आई बाबांना खूप मोठा धक्का बसेल.. आईंना सांगितले तर त्या खोलात जाऊन कारणे शोधतील आणि एका पॉइंटनंतर मला खरे बोलावेच लागेल...चार दिवस झाले रुद्रला सतिश विषयी बऱ्याच गोष्टी सांगून तो तुझा बाबा होण्यासाठी कसा पात्र आहे हे त्याच्या मनावर बिंबवले. आता एका क्षणात साऱ्यांच्या भावनांशी खेळून अचानक नकार तरी कसा सांगू? अचानक मनातील भावनांचा झालेला पसारा अर्पिताला काही केल्या आवरताच येईना.

"बघितलं..काय सुरू आहे हे? याला फक्त तू कारणीभूत आहेस. मी ना धड जगू शकतेय ना धड मरू शकतेय. तू तिथे निवांत बसून माझ्या आयुष्याचं झालेलं हसं बघ फक्त." विनयच्या फोटोला जाब विचारत अर्पिता बोलली..

आपल्या हक्काची व्यक्ती जेव्हा आयुष्यातून कायमची निघून जाते तेव्हा एका स्त्रीची होणारी फरपट, तिचे होणारे मानसिक खच्चीकरण, समाजाच्या नजरा, तिला मिळणारी हीन वागणूक या साऱ्यांपुढे ती हतबल होते. असेच काहीसे अर्पिताच्या बाबतीत घडत होते.

इकडे आड नि तिकडे विहीर अशीच काहीशी तिची अवस्था झाली. मनातील द्वंद ती कोणाला सांगूही शकत नव्हती. कशीही वागली तरी चुकीची मात्र तीच ठरणार होती. विचार करून तिचे डोके सुन्न झाले होते. रात्री खूप वेळा पर्यंत ती हाच विचार करत जागी होती.

सकाळ झाली तरी अजूनही हा गुंता तसाच होता. खूप विचार केल्यानंतर दुसऱ्या दिवशी अर्पिताने कमल ताईंशी बोलण्याचे ठरवले. पण त्याआधीच पुन्हा एकदा निर्मला ताईंचा तिला कॉल आला.

"जाऊ दे, तू कोणाला काहीच बोलू नकोस. काल भावनेच्या भरात मी तुला बोलले. लग्नाला नकार दे म्हणून सांगितले, पण त्याने गोष्टी अजून चिघळतील. कदाचित ही देवाचीच योजना असावी असे मला वाटते. त्यात आमच्या घरचे हे असे वागतात.  जगाचं त्यांना काही देणंघेणं नाही. जगाला मात्र मला तोंड द्यावं लागणार आहे. आता काय आलीया भोगासी."
निर्मला ताई असे टोचून बोलल्या आणि त्यांनी फोन ठेवून दिला.

काल त्यांनी अर्पिताला कॉल केला तेव्हा नेमके त्यांचे बोलणे सुरेशरावांच्या कानी पडले, त्यावरून दोघांच्यात वाद झाले.

"जसे फोन करून गोष्टी बिघडवल्यास ना तसेच आता वाढवून ठेवलेला हा गुंता देखील तूच सोडवयचास आणि आता लग्न होईपर्यंत कृपा करून शांत बस. फक्त सतिशच्या चेहऱ्यावरील आनंद तेवढा बघ. त्याच्या मनाचा तरी विचार कर. नाहीतर आयुष्यभर त्याला एकटं कुढत जगावं लागेल. अर्पिताच्या रूपाने आनंद येतोय त्याच्या आयुष्यात तर तो त्याला मिळू दे."

असे कडक शब्दांत सुरेशरावांनी  निर्मला ताईंना बजावले. त्यामुळे त्यांच्याकडे दुसरा कोणताही पर्याय उरला नाही. म्हणून मग त्यांनी पुन्हा अर्पिताला फोन करून सांगितले.

फायनली हो नाही करता करता अर्पिता आणि सतिशचा विवाह एक दिवसावर येवून ठेपला.

आणि अखेर तो दिवस उजाडला. अगदी मोजक्या लोकांच्या उपस्थितीत अर्पिता आणि सतिशचा अत्यंत आनंदी वातावरणात विवाह संपन्न झाला.

निर्मला ताई सोडता सगळेच जण खूष दिसत होते.
'मला माझ्या लेकाचे एका विधवेशी लग्न व्हायला नकोय.' निर्मला ताईंचे शब्द अर्पिताच्या कानात गुंजारव करत होते. पुढे जाऊन काय होणार याची तिला आधीच थोडीफार कल्पना आली होती. पण कमल ताई बदलू शकतात मग ह्याही नक्कीच बदलतील. अशी अर्पिताला मनातून आशा वाटत होती.

बघता बघता लग्नाचे सर्व विधी पार पडले. छोटा रुद्र तर त्याच्या आईचे लग्न खूप एंजॉय करत होता. अधूनमधून अर्पिता आणि सतिशच्या मांडीवर जाऊन तो बसत होता. सतिश रुद्रला एकदम मायेने जवळ घेत होता. हळूच त्याची पापी घेत होता आणि हीच गोष्ट अर्पिताला सुखावून जात होती.

सोन्याच्या पावलांनी मग अर्पिताचे सतिशच्या घरी आगमन झाले. अर्पिता सोबत पाठराखीण म्हणून कमल ताई स्वतः आल्या होत्या. अर्पिताला तर आता कमल ताईंची इतकी सवय झाली होती की त्यांच्याशिवाय आता तिचे पानच हालत नव्हते. अनिता ताई नाही तर कमल ताईच आता तिच्या आई झाल्या होत्या जणू.

'आधी सुनेचा नेहमी दुस्वास करणारी आई आज भक्कमपणे तिच्या पाठीशी उभी आहे,' हे पाहून विनयला देखील नक्कीच समाधान वाटत असणार; तो जिथे कुठे असेल तिथून हे सगळे नक्कीच पाहत असणार यात मुळीच शंका नाही.

सासरी आल्यानंतर काहींचे प्रेम तर काहींचा द्वेष, सर्वकाही पहिल्या दोनच दिवसांत अर्पिताच्या ध्यानात आले. बाकी काही नाही पण तिला फक्त तिच्या रुद्रची काळजी वाटत होती. पण कमल ताई सोबत असल्यामुळे ती थोडी तरी निर्धास्त होती. तरीही नवीन जागा, नवीन वातावरण यामुळे तो खूपच एक्साईट होता. म्हणूनच तो एका जागी शांत बसतच नव्हता. सवयी प्रमाणे कमल आजीला त्याच्या सतत मागे पुढे करावे लागत होते. त्यातच नवीन ठिकाणी त्यांना कोणताही त्रास होणार नाही याची सुरेशराव मात्र जातीने काळजी घेत होते.

शेजारी पाजारी तसेच जमलेले नातेवाईक अर्पिताला आवर्जून एकच प्रश्न विचारत होते "ह्या कोण आहेत तुझ्या?" तिही मग "माझी आई आहे," म्हणत अगदी सहजच उत्तर देवून मोकळी व्हायची.

आता सतिशच्या रूपात रुद्रलाही वडिलांची माया मिळणार होती कारण त्याच्या आयुष्यातील वडीलांची उणीव आता भरून निघाली होती आणि अर्पितालाही तिच्या आयुष्यात विनयची कमी भरुन काढण्यासाठी, मन मोकळे करण्यासाठी एक हक्काची व्यक्ती मिळाली होती. एवढेच नाही तर कमल ताईंना देखील सतिशच्या रुपात पुन्हा एकदा त्यांचा विनय मिळाला होता. 

लग्नानंतरचे सर्व सोपस्कार विधिवत पार पडले. पहिल्या बोळवणीसाठी अर्पिता तिच्या माहेरी जाऊन आली. पुन्हा येताना कमल ताई आणि रुद्र मात्र तिकडेच थांबले. कमल ताई त्यांच्या घरी जायचं म्हणत होत्या पण अनिता ताईंनी खूप आग्रह करून त्यांना दोन दिवस थांबवून घेतले.

आठ दिवसांची सुट्टी संपवून आता सतिश... अर्पिताला घेवून त्याच्या नोकरीच्या ठिकाणी जायला निघाला.

"आता तुम्ही दोघेही तुमच्या कामावर जाल मग रूद्रचे कसे करणार? त्याला कुठे ठेवणार की त्याला तू तुझ्या माहेरीच ठेवणार आहेस?" मनातील शंका निर्मला ताईंनी बोलून दाखवली.

निर्मला ताईंच्या बोलण्यावर अर्पिताने लगेचच सतिशकडे पाहिले. कारण अर्पिताने तिच्या अटी आधीच सांगितल्या होत्या. पण सतिशने मात्र त्या निर्मला ताईंना सांगितल्या नाहीत याची अर्पिताला खात्री पटली.

सतिश देखील क्षणभर गोंधळला.

"अगं आई रुद्रची आजी असणार आहे आमच्यासोबत." नजर चोरत सतिश उत्तरला.

"आता त्याला खूप आजी आहेत, त्यातील कोणत्या आजीबद्दल तू बोलत आहेस?"

"वियनची आई म्हणजेच अर्पिताच्या सासूबाई." सतिश म्हणाला.

"म्हणजे त्या आता कायम तुमच्यासोबतच राहणार का?"

"हो...म्हणजे तसंच ठरलं होतं ना."

" कोणाचं ठरलं होतं आणि कधी ठरलं होतं?"

"आई... वियनच्या माघारी विनयच्या आई ही आता माझी जबाबदारी आहेत. त्यामुळे मी त्यांना कधीही एकटं सोडणार नाही, लग्नानंतरही त्या कायम माझ्याच सोबत राहतील असे मी आधीच ह्यांना सांगितले होते." अर्पिता म्हणाली.

निर्मला ताईंनी सतिशवर एक रागीट कटाक्ष टाकला. पण त्या पुढे काही बोलणार तोच सुरेशराव लेकाच्या आणि सुनेच्या मदतीला धावून आले.

"अरे व्वा अर्पिता... खरंच खूप अभिमान वाटतोय आज तुझा. आम्ही भाग्यवान आहोत आम्हाला तुझ्यासारखी सून मिळाली. आता समजतंय सतिशने का तुझी निवड केली ते. बघ निर्मला.. म्हटलो होतो ना मी तुला, ही पोरगी खूप गुणी आहे म्हणून. परीस्थिती कितीही बदलली तरी तिने तिची जबाबदारी काही झटकली नाही. आता आम्हाला देखील आमच्या म्हातारपणाची अजिबात काळजी राहिली नाही बरं का सूनबाई." हसत हसत सुरेशरावांनी नव्या सुनेचे कौतुक केले.

आता पुढे काही बोलायला निर्मला ताईंकडे देखील शब्द नव्हते. मनातून त्यांना सतिश आणि अर्पिताचा राग आला खरा, पण सुरेशरावांच्या बोलण्यात देखील तथ्य होते. जे की कितीही नाही म्हटले तरी निर्मला ताईंना देखील पटले होते.

सुरेशराव आणि निर्मला ताईंचा आशीर्वाद घेऊन सतिश आणि अर्पिता मग गाडीत बसले.

अर्पिता आणि सतिशरावांचा संसार अखेर सुरू झाला. छोट्या रुद्रच्या रूपाने त्यांच्या घराचे गोकुळ झाले. अर्पिताने कमल ताईंची साथ काही सोडली नाही. चुकून तिने तसे केलेच असते तर कदाचित विनयलाही ते आवडले नसते. आज विनयदेखील अर्पितावर नक्कीच खुश असणार यात शंकाच नाही.

एकंदरीतच आयुष्यात सुख दुःखाचा हा लपंडाव असाच सुरू राहतो. विनयच्या अचानक जाण्याने अर्पिताच्या आयुष्यात पसरलेला दुःखाचा काळोख दूर करण्यासाठी नियतीने सतिशला तिच्या आयुष्यात पाठवले आणि आता सुखाच्या प्रकाशात अर्पिता आणि सतिशचा संसार हळूहळू फुलू पाहत होता.

यावरून एकच म्हणावेसे वाटते...

"दुःखाने खचून न जाता त्याला सामोरे जाण्याचे बळ मनगटात असेल तर एक ना एक दिवस सुखाच्या प्रकाशाने आयुष्य नक्कीच उजळून निघते. फक्त योग्य वेळेची वाट पाहणे तेवढे आपल्या हातात असते."

"आयुष्य म्हणजे सुख दुःखाचा असतो खेळ..
सुखानंतर दुःख नि दुःखानंतर पुन्हा सुख,
यामुळे आयुष्याची बनते आंबट गोड भेळ..
पण खचून न जाता, घालता यायला हवा योग्य तो मेळ..
ज्याला हे जमले त्याची नक्कीच बदलते वेळ..."

समाप्त

सर्वप्रथम सर्व वाचकांचे मनापासून आभार. तुमच्या उत्तम प्रतिसादामुळेच ही कथा मी वेळेत पूर्ण करू शकले.
सतिश आणि अर्पिताच्या नात्याचा पुढील प्रवास तुम्हाला वाचायला आवडेल का? तसे कमेंटमध्ये नक्की सांगा. पर्व दोनच्या रुपात लवकरच तो घेऊन येण्याचा माझा प्रयत्न असेल.

धन्यवाद

(टिप... या संपूर्ण कथेचे सर्व अधिकार लेखिकेकडे राखीव आहेत. त्यामुळे व्हिडिओ किंवा इतर स्वरूपात ही कथा यू ट्यूब किंवा इतर ठिकाणी आढळून आल्यास कायदेशीर कार्यवाही कऱण्यात येईल.)

©® कविता वायकर


🎭 Series Post

View all