Login

एक दिवस स्वतःसाठी

स्त्रीच्या जीवनात इतकं सगळं करून स्वतःसाठी वेळ नसतो. पण तिने स्वतःसाठी पण काही करावं.
शीर्षक :एक दिवस स्वतःसाठी


"आराधना, चहात साखर घातलीस का?"
"आई, माझा कंपास सापडत नाही!"
"आई माझा शर्ट सापडत नाहीं!"

एकाच वेळी तीन आवाज कानावर येत होते — नवरा, मुलगा, मुलगी. आणि त्या सगळ्यांच्या मध्ये आराधना, गॅससमोर उभी राहून दोन्ही हातात चमचा आणि फोन धरून ऑफिसचं ईमेल वाचत होती.

ती हसली, पण त्या हास्यात थकवा होता.
घड्याळ आठ वाजून गेलं होतं, सगळ्यांची धावपळ सुरू होती. मुलं शाळेकडे, नवरा ऑफिसकडे, आणि आराधना स्वतःही तिच्या कॉर्पोरेट ऑफिसकडे.
पण एक गोष्ट दररोज सारखीच होती — सगळे निघून जातात, आणि आराधना शेवटची दार बंद करते.

दार बंद करताना तिला नेहमी वाटतं — “मीही कधी कोणीतरी माझ्यासाठी चहा बनवेल का?”
पण लगेच ती स्वतःलाच थांबवते — “अगं वेडी, विचार करून काय होणार? उशीर होतोय, निघ!”



ऑफिसमध्ये तिचं काम छान होतं. प्रेझेंटेशन, मिटिंग्ज, क्लायंट कॉल्स — सगळं नीट .
पण मन मात्र सतत कुठेतरी हरवलं होतं.
लंचच्या वेळी ती कॅन्टीनमध्ये बसलेली असताना तिची मैत्रीण रुचा भेटली.

"ए आराधना! तू किती बदललीस गं!"
— ती हसत म्हणाली.
"का गं म्हातारी दिसते की काय?" —आराधना म्हणाली.
"नाही गं, पण डोळ्यातलं ते जुनं चमकणं दिसत नाही आता."

आराधना थोडी गप्प झाली.
“कदाचित थकलेय मी.” एवढंच उत्तर दिलं तिने.

त्या रात्री ती घरी आली, सगळे झोपले, आणि ती आरशात पाहत बसली.
तीन सुरकुत्या, ओठांच्या कोपऱ्यांवरचा थकवा, आणि डोळ्यांतील पोकळपणा.
ती कुजबुजली — “ही मी आहे का खरंच?”



दुसऱ्या दिवशी सकाळी ऑफिसमध्ये जाताना तिचा फोन बंद झाला.
ती विचार करत होती — “आज सगळं उलटं चाललंय.”
आणि अचानक तिच्या मनात एक आवाज आला — “कदाचित हेच योग्य असेल.”

ती ऑफिसला न जाता, एका जुन्या कॉफी हाऊस मध्ये गेली.
कॉलेजच्या दिवसांत ती इथे कविता लिहायची,पेंटिंग काढायची आणि मैत्रिणींसोबत किती तरी वेळ बसायची.
आज जवळपास १५ वर्षांनी ती परत आली होती.

तिने कॉफी ऑर्डर केली आणि खिडकीतून बाहेर पाहिलं.
समोर एक चित्रकार बाई बसली होती — केस पांढरे झालेले, पण चेहऱ्यावर एक सुंदर शांतता होती.
आराधना तिच्याकडे पाहत राहिली.


त्या चित्रकार बाईने हसून विचारलं,
“तुम्ही चित्र काढता का?”
आराधना हसली— “पूर्वी काढायचे... आता वेळच नाही मिळत.”
“वेळ नसतो की आपण देत नाही?” — त्या बाईचं साधं वाक्य तिच्या मनात खोलवर गेलं.

“तुमचं नाव काय?”
“आराधना.”
“सुंदर नाव आहे. पण मला असं वाटतं, आराधनेला स्वतःची आराधना करायची गरज आहे.”

त्या बाईने तिला एक छोटं कॅनव्हास गिफ्ट केलं आणि म्हणाल्या—

“रंग विसरू नका, आयुष्य राखाडी व्हायला वेळ लागत नाही.”




त्या दिवशी ती ऑफिसला गेलीच नाही.
घरी आली, मुलं शाळेत, नवरा ऑफिसमध्ये, आणि ती एकटी.
फोन सायलेंटवर ठेवला आणि त्या कॅनव्हासवर रंग ओतले.

लाल, पिवळा, निळा, हिरवा — रंग मिसळत गेले आणि तिच्या चेहऱ्यावर हसू परत आलं.
असं हसणं तिने कित्येक वर्षांनी केलं होतं.

संध्याकाळी मुलं आली, त्यांनी तिचं चित्र पाहिलं.
“आई! हे तू काढलंस? खूप छान!”
आणि पहिल्यांदाच तिच्या मनात शब्द उमटले —
“हो, आज मी काहीतरी माझ्यासाठी केलं आहे.”


दुसऱ्या सकाळी आराधना नेहमीप्रमाणे उठली, पण आज काही वेगळं होतं.
ती थोडं लवकर उठली होती. योगा केला, थोडी डायरी लिहिली, आणि स्वतःसाठी चहा बनवला.

आरशात पाहिलं —
तोच चेहरा, पण नजरेत वेगळी चमक.

ती स्वतःला म्हणाली—

“माझ्या आयुष्यात महिन्यातून एक दिवस नेहमी माझ्यासाठी असेल — ‘आराधनेचा दिवस.’


त्या दिवशी ती ऑफिसमध्ये गेली आणि डेस्कवर तिचं चित्र ठेवलं.
कोणीतरी विचारलं, “ही पेंटिंग कुणी काढली? "
ती हसून म्हणाली—“मीं ”

आता ती दर महिन्यात एक दिवस स्वतःसाठी राखून ठेवते — वाचन, लिखाण करणं, चित्रं काढणं, आणि स्वतःशी बोलणं.


एका रविवारी सकाळी, तिची लहान मुलगी आरशासमोर उभी राहून केस विंचरत होती.
आराधना तिच्यामागे आली.
मुलगी हसली आणि म्हणाली—
“आई, आज तू खूप सुंदर दिसतेस!”

आराधनाने आरशात स्वतःकडे पाहिलं — चेहऱ्यावर शांतता होती, डोळ्यांत समाधान.
आणि ती मनोमन म्हणाली —

"हो, कारण आज मी पुन्हा मला सापडलेय.”



प्रत्येक स्त्रीने ती गृहिणी असो किंवा कामाला जाणारी असो,आयुष्याच्या गोंधळात एक दिवस “स्वतःसाठी” राखून ठेवावा.
कारण ती जेव्हा स्वतःला शोधते, तेव्हाच ती खरं जगायला शिकते.


समाप्त.
©निकिता पाठक जोग
0