एक दुश्मनी प्रेमाची - भाग १
"प्रत्येक क्रियेसाठी, समान आणि विरुद्ध दिशेची प्रतिक्रिया असतेच!”
पहिल्या मजल्यावरच्या कॉरिडॉरमधून जात असताना प्रियांकाने न्यूटनचा गतीचा तिसरा नियम ऐकला. मेडिकल कॉलेजमध्ये शाळेतले नियम कोण शिकवतंय हे पाहण्यासाठी ती शेजारच्या वर्गात डोकवली आणि तिला प्रोफेसर कृष्णमूर्ती बोलताना दिसले.
“जेव्हा एक वस्तू दुसऱ्या वस्तूवर फोर्स लावते, त्याच वेळी, दुसरी वस्तूदेखील पहिल्या वस्तूवर तेवढ्याच प्रमाणात उलट दिशेने फोर्स लावत असते." प्रोफेसर कृष्णमूर्ती सांगत होते. ते नेहमीच एका वेगळ्या अनोख्या शैलीने शिकवत असत. म्हणूनच शिकवताना हे उदाहरण देत होते.
हा नियम केवळ भौतिकशास्त्रातच नाही तर आपल्या दैनंदिन जीवनातही किती लागू होतो ना! कारण आपण केलेल्या प्रत्येक क्रियेसाठी समोरून उलटी प्रतिक्रिया येतेच. आपण भिंतीवर लाथ मारली तर आपाल्यालाच उलट लागतं, तसंच आहे हे!
पण प्रत्येक नियमाला जसा अपवाद असतो तसा ह्यालाही होताच. आणि प्रियांकाच्या जीवनात तो आदित्यच्या रूपाने आला होता. तिच्या प्रत्येक कृतीसाठी तो समान नाही तर दुप्पट, तिप्पट आणि अनेक पटीने उलटी प्रतिक्रिया घेऊन यायचा.
आदित्यचा नुसता विचार मनात येताच तिला त्रास होऊ लागला. तिने ताबडतोब त्याचे विचार झटकून टाकले. आपापल्या आयुष्यातील सर्वात महत्वाच्या दिवशी तिला त्याचा विचार अजिबात नको होता.
कारण आज तिचा अठरावा वाढदिवस होता. आजपासून ती प्रौढ होणार होती. तिला आता निवडणुकीत मतदान करता येणार होतं … इतकंच नाही तर स्वतःच्या मर्जीने वागता येणार होतं … पण ते खरंच तसं होतं का?
तिची कॉलेजची बॅग पुस्तकं, वह्या आणि वैद्यकीय उपकरणांनी भरलेली होती. त्यासोबत तिने आज एक भली मोठी ज्यूट बॅग आणली होती. तिच्या नाजूक शरीरासाठी त्याचं वजन खूप जास्त होतं. त्यामुळे ती पहिल्या मजल्यावर चढताच धापा टाकायला लागली. तिला आपल्या वर्गात पोहोचण्यासाठी त्या वजनासह आणखी दोन मजले चढावे लागणार होते.
काश … वर्गातलं कोणीतरी भेटलं तर ती अवजड बॅग वरती न्यायला मदत होईल! ती इकडे तिकडे मदतीसाठी पाहू लागली आणि तिला काही अंतरावर आदित्य दिसला.
‘शैतान का नाम लिया और शैतान हाजीर’ तिने मनातच विचार केला.
पण तो तर तिच्याकडे ढुंकुनही न पाहता तिला ओलांडून गेला.
‘युजलेस’ मनातल्या मनात त्याला एक शिवी हासडुन ती पुन्हा इकडे तिकडे बघू लागली. तसाही तो तिच्यासाठी निरुपयोगी होता. एवढ्या अटीट्युड ने वागणारा तिच्यासाठी का थांबेल? कि तिला ती अवजड बॅग उचलायला मदत करेल? कधीच नाही.
तो निघून गेला हेच बरं झालं. एक तर त्याने काहीही विचार न करता आपल्या ह्या मोठ्या पिशवीची खिल्ली उडवली असती नाहीतर नेहमी प्रमाणे त्यावर काहीतरी ओव्हरस्मार्ट कॉमेंट केली असती.
तिने मुद्दाम त्याच्याकडे नजर टाकली तर तो तिला त्यांच्या वर्गाकडे जाण्याऐवजी लायब्ररी कडे वळताना दिसला. तिने स्वतःच्या मनगटावर नजर टाकली. त्यांच्या लेक्चरला अजून थोडा वेळ होता. म्हणूनच हा पुस्तकी किडा लायब्ररीत गेला असणार.
तो एक तर लायब्ररीत पडीक असतो नाहीतर पोरींच्या गराड्यात! बुक्स आणि बेब्स सोडून अजून कुठे भेटणार … तिने स्वतःला समजावलं.
मुलींना डेट करण्याच्या बाबतीत त्याने एकाही वर्गातली मुलगी सोडली नव्हती. तो अगदी त्यांच्या सीनियर मुलींना सुद्धा डेट करायचा आणि नर्सिंग कॉलेजच्या मुलींना सुद्धा!
पण खरं तर तो मुलींच्या मागे जाण्याऐवजी मुलीच त्याच्या मागे असायच्या, त्याला तो तरी काय करणार होता?
तो तसा देखणा होता … अंगकाठी थोडी बारीक असली तरी चांगला उंचापुरा होता … धारधार नाक… गुलाबी ओठ … आणि त्यावर हलकीशी मिशी … युरोपियन लोकांसारखा पिट्ट गोरा रंग … पण त्यासोबत येणारे ते फ्रेकल्स नव्हते … त्वचा भारतीय लोकांसारखी नितळ होती आणि केस सुद्धा भारतीयांसारखेच काळे … भारतीय आणि युरोपियन वंशाचं उत्कृष्ट मिश्रण घेऊन जणू जन्मला होता … सर्वांत जास्त लोभस होतं ते चेहऱ्याभोवती असलेलं बुद्धीचं तेज … आणि त्याचे ते मॅग्नेटिक डोळे … त्याच्या त्या गर्द हिरव्या डोळ्यात कोणतीही मुलगी स्वतःला सहज हरवून जायची.
त्याच्या मागे मुलींची नेहमी रीघ असायची पण प्रियांका मात्र बाकीच्या मुलींसारखी त्या रांगेत नव्हती … कारण अर्थातच तो तिचा दुष्मन होता ना!
क्रमश:
पण मग अशी काय दुश्मनी होती दोघांच्यात कि ते दोघे एकमेकांना आपल्या नजरेसमोरही धरत नव्हते?
जाणून घेण्यासाठी पुढे वाचत रहा … एक दुश्मनी प्रेमाची.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा