एक दुश्मनी प्रेमाची - भाग २
प्रियांकाचे आदित्यबद्दल विचार काही फार चांगले नव्हते. तो नेहमीच मुलींच्या घोळक्यात असायचा. त्यामुळे तिला वाटायचं कि तो सतत मुलींच्या मागे मागे करणारा, एकाच वेळी अनेक मुली फिरवणारा असा आहे. एवढे उद्योग करून अभ्यास करायला वेळ कधी काढतो देव जाणे. तो खूप जास्त हुशार होता … वर्गात नेहमी पहिला येण्यासाठी तिला टशन देत होता, त्यामुळे तिला तो अजिबात आवडत नव्हता.
आदित्य अगदी मोकळ्या मनाने कॉलेजमधल्या सगळ्या मुलींना डेट करायचा पण त्याचं कोणतंही अफेअर सहसा दोन आठवड्यांपेक्षा जास्त काळ टिकायचं नाही. आणि समजा चुकून माकून टिकलंच तर त्याच्या गर्लफ्रेंड पळवून लावण्याचं सर्वात मोठं काम प्रियांका करायची.
का कोण जाणे पण तिला यात खूप मजा यायची. ती नक्की काय करतेय याची तिला कल्पना नव्हती, परंतु तिला मात्र जमेल तसं, जमेल तेव्हा, जमेल तिथे त्याला क्रॉस करणं भारी आवडायचं. असं करताना तिला आतून एक थरार जाणवायचा … एक अवर्णनीय किक लागायची.
तिने थोडी दूर नजर टाकली आणि तिला तिच्या वर्गातला दुसरा एक मित्र क्षितिज समोरून येताना दिसला. त्याचा हसरा चेहरा पाहून तिने मनातल्या मनात देवाचे आभार मानले.
"हॅपी बर्थ डे … प्रियांका” क्षितिजने जवळ येताच तिला शुभेच्छा दिल्या आणि हस्तांदोलनासाठी हात पुढे केला.
“यात काय आमच्यासाठी पार्टी आहे वाटतं?” त्याने दुसऱ्या हाताने तिच्या मोठ्या बॅगेकडे निर्देश करत विचारलं
प्रियांकाने त्याचा समोर आलेला हात घेऊन त्याचं अभिवादन स्वीकारलं आणि हसतमुखाने उत्तर देत मान होकारार्थी हलवली. तिने त्याच्याकडे काही मदत मागण्यापूर्वीच त्याने तिची ती अवजड बॅग स्वतःहून उचलली.
तिला त्या दोन मुलांमधला फरक लक्षात येण्याजोगा जाणवला. तिचा आतला आवाज ओरडून सांगत होता.
क्षितिज हा तुझा एक विश्वासार्ह मित्र आहे, तर आदित्य…. एक दुश्मन ...शत्रू … आणि बरंच काही.
त्याला लाखोली वाहण्यासाठी तिने आपल्या मनात शिव्यांची एक डिक्शनरीच ठेवली होती. पण त्या क्षणी का कोण जाणे तिला योग्य शब्द आठवत नव्हता … कारण अर्थातच तिचं मन आपल्या येणाऱ्या वाढदिवसात गुंतलं होत. तिने आदित्यचे विचार झटकले आणि क्षितिज बरोबर पुढे चालू लागली.
लायब्ररीकडे वळताना आदित्यने हळूच मागे वळून पाहिलं तर क्षितिज तिच्याशी हस्तांदोलन करताना दिसला. आदित्यला क्षितिज अजिबात आवडत नव्हता कारण तो आदित्यपेक्षा पूर्ण वेगळा होता. … जितका आदित्य स्मार्ट तितकाच तो बावळट. त्याला कोणतीही मुलगी भाव द्यायची नाही पण प्रियांका मात्र त्याला जवळ करायची. इतकं कि कधी कधी त्याला वाटायचं हि मुद्दाम आपल्याला चिडवायला करते आहे.
आताही त्याने नजरेच्या कोनातून पाहिलं तर क्षितिजने अंमळ जास्तच वेळ तिचा हात पकडला होता. अर्थात त्या मूर्ख मुलीला ते कळलंच नव्हतं.
तिचा वाढदिवस असावा असा त्याने अंदाज केला. जेव्हा त्याने तिला आधी ओलांडलं होतं तेव्हाच त्याला थोडीफार कल्पना आली होती.
आदित्यचे सुद्धा प्रियांकाबद्दल विचार काही फार चांगले नव्हते. तिचे त्याच्याबद्दल जसे विचार होते तितके किंवा कदाचित त्याहून थोडे जास्तच वाईट त्याचे विचार होते. त्याच्या दृष्टीने ती अभ्यासात हुशार असली तरी अतिशहाणी आणि स्वतःला खूप स्मार्ट समजणारी आणि प्रत्येक बाबतीत टोकाची प्रतिक्रिया देणारी अशी आगाऊ मुलगी होती. उगाच प्रोफेसर्स समोर पुढे पुढे करून प्रॅक्टिकलच्या परीक्षेत जास्त मार्क हडपायला बघायची.
त्याच्या दृष्टीने ती एक मूर्ख मुलगी होती आणि आजच तिने आपल्या मूर्खपणाचा एक सबूत दिला होता. तिने अतिशय भडक रंगाचे कपडे घातले होते. त्यांच्या कॉलेजच्या वार्षिक सेलिब्रेशनला अजून एक आठवडा बाकी होता, मग अचानक असे चमक धमक वाले कपडे त्या मेडिकल कॉलेजच्या अभ्यासू वातावरणात अजिबात शोभत नव्हते. त्यातून ती एका मोठ्या ज्यूटच्या पिशवीत काहीतरी घेऊन जात होती. तिला ते कपडे, आपली अवजड बॅकपॅक आणि ती मोठी बॅग अजिबात झेपत नव्हती.
एकदा तिची मदत करावी का? त्याच्या मनात विचार आला पण त्याने तो लगेच झटकला. हिची मदत करणं म्हणजे स्वतः जाऊन चिखलात पाय आपटणं … ती काही बाही बरळली असती आणि कदाचित भांडण सुद्धा उकरून काढलं असतं.
क्रमश:
तुम्हाला काय वाटतं? आदित्य सोबत पंगा घेऊन प्रियांका क्षितिजला का जवळ करतेय? दोघांच्यातली हि दुश्मनी त्यांना कुठे घेऊन जाईल?
जाणून घेण्यासाठी पुढे वाचत रहा … एक दुश्मनी प्रेमाची.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा