Login

एक दुश्मनी प्रेमाची भाग ३

An unusual story about friendship and Love. Two medical college students who are arch enemies of each other, who hate each other from the bottom of their heart, start turning into Best Friends Forever.

एक दुश्मनी प्रेमाची - भाग ३

प्रियांकाच्या जवळून जाताना, आदित्यने मुद्दाम तिच्याकडे एकदा नजरेच्या कोनातून पाहिलं. भडक ड्रेस आणि त्या रंगाशी जुळणारी तितकीच चमकदार लिपस्टिक पाहून त्याने मनातच डोक्यावर हात मारला. मेकअप किंवा असल्या ड्रेस शिवाय ती किती सुंदर दिसायची. तिचे ते चॉकलेट ब्राऊन डोळे आणि त्याला मॅचिंग सरळसोट सिल्की केस तिच्या सौंदर्यात भरच घालायचे. तिचे ते नैसर्गिक गुलाबी ओठ त्या भडक लिपस्टिक शिवायच किती जास्त सुंदर वाटायचे. मनात तिच्याबद्दल जरा चांगला विचार येताच त्याने लगेच तो दूर ढकलला. 

तिच्या चेहऱ्यावर जाऊ नको …  त्या देखण्या चेहऱ्यामागे एक हडळ आहे हडळ … आणि त्या सुंदर ओठांच्या आत एक दुधारी तलवार आहे …. तिला एक मौका मिळाला ना तर तुझे त्या तलवारीनेच बारीक बारीक तुकडे करून टाकेल.

आदित्यने तिचा विचार मनातून काढून टाकला आणि लायब्ररीमध्ये आपल्याला हवं ते पुस्तक शोधू लागला. 

पुस्तक मिळताच तो वर्गाकडे निघाला. पण वर्गात  प्रवेश करताच त्याला जाणवलं कि बटाटे वड्यांचा उग्रसा गोडुस वास साऱ्या आसमंतात भरून राहिला होता. वर्गातले सगळे विद्यार्थी मागच्या बाकांवर जमा झाले होते. प्रियांका अर्थातच सगळ्या आकर्षणाचा केंद्रबिंदू होती.

त्याला त्या गदारोळात सामील होण्यात अजिबात रस नव्हता. त्याने आपली पहिल्या बेंचवरची नेहमीची जागा घेतली आणि आपले जर्नल्स उघडून चाळू लागला. खरं तर तो नुसता पानं पलटत होता. सगळं लक्ष मागच्या बेंचवर होतं … पण का कोण जाणे ते त्याला स्वतःला सुद्धा मान्य करायचं नव्हतं. 

बसल्या बसल्या, मागच्या बेंचवर बारीक आवाजात काहीतरी कुजबुज होत असल्याचं त्याला जाणवलं.  त्याचा आतला आवाज त्याला सांगू लागला कि आपल्या पाठीमागे काहीतरी शिजतंय. त्याने कान देऊन ऐकायला सुरुवात केली.

तेवढ्यात त्याला आपल्या डेस्कजवळ काही पावलांचा आवाज जाणवला. त्याने मागे न वळता डोळ्यांच्या एका कोनातून नजर टाकली आणि त्याला प्रियांका त्याच्याच दिशेने चालत येताना दिसली.  तिने हातात काहीतरी पकडलं होतं. 

“हाय!” तिने त्याला संकोचून हाक मारली आणि त्यानेही तितक्याच अनिच्छेने “हाय” असा प्रतिसाद दिला.

न्यूटनचा तिसरा नियम निदान त्या दिवसापुरता तरी वैध होता तर … तिच्या मनात क्षणभर एक विचार चमकून गेला. 

“आदित्य … आज माझा … वाढदिवस आहे …  आणि मी ठरवलं … कि … सगळ्या वर्गाला… वडा पाव…ची पार्टी द्यावी”

तो तिचा दुश्मन असला तरी सगळ्या वर्गाला पार्टी देताना, तिला त्याला एकट्याला त्यापासून दूर ठेवायचं नव्हतं. रोज त्याच्याशी भांडताना आवाज चढवून बोलायची … पण मग आज कधी नव्हे ते नीट बोलताना का अडखळत होती? 

तिच्याकडून हे असं नवीन आणि विचित्र वागणं त्याने कधीच पाहिलं नव्हतं. तिला नक्की काय करायचं आहे? माझी टर उडवायची आज काही नवीन आयडिया आहे का? आज तिच्याशी जरा जपून वागलं पाहिजे. 

तो तिच्याकडे एकटक बघत विचार करत राहिला. ना तो काही प्रतिसाद देत होता, ना त्याच्या चेहऱ्यावर काही दिसत होतं. ती आता थोडी अस्वस्थ होऊ लागली. 

"हे तुझ्यासाठी!" तिने एक हात पुढे केला आणि त्याला आपल्या डोळ्यासमोर एक वडापाव नाचताना दिसला. त्या वड्याचा तिखट वास त्याच्या नाकात भरू लागला..

“नको! थँक्स” त्याने कधी नव्हे ते तिला विनम्रपणे उत्तर दिलं तशी ती चपापली. खरं तर त्याला आपल्या पाठीवर संपूर्ण वर्गाची नजर जाणवत होती, त्यामुळे त्याने आवाज कमी ठेवण्याचा निर्णय घेतला होता.

"तू हा नाही घेतलास ना तर … तर” तिच्या बोलण्यावर त्याने लगेच भुवया वर  केल्या तशी ती पटकन पुढे म्हणाली, “मी समजेन की तू अजूनही माझ्यावर रागावलेला आहेस!" 

तिचं असं लाडात येऊन खेळकर बोलणं तो पहिल्यांदाच बघत होता. 

खरं तर त्याला तिच्यासाठी काय वाटतं ते सांगण्यासाठी राग हा एक छोटासा शब्द होता. तो तिचा नुसता राग नाही तर तिरस्कार करत होता तेही अगदी टोकाचा … पण आजच्या दिवशी ते तिला सांगण्याची हि योग्य वेळ नाही हे त्याला कळत होतं.  तो तिचा कितीही राग राग करत असला तरी कोणत्याही गोष्टीसाठी तिचा आजचा खास दिवस खराब करणं त्याला योग्य वाटत नव्हतं.  

"मला खरंच वडापाव आवडत नाही.” आवाज शक्य तितका कमी ठेवत त्याने तिची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मागच्या बेंचवरची सगळी गॅंग आपल्याला न्याहाळतेय हे त्याला माहित होतं.

त्याच्या या असल्या खालच्या आवाजाची तिला मात्र सवय नव्हती. बहुतेक वेळा, त्यांच्या भांडणा दरम्यान ते सतत एकमेकांवर ओरडत असत. तिला नीट ऐकू येत नव्हतं म्हणून ती त्याच्या आणखी जवळ गेली आणि त्याच बाकावर त्याच्या बाजूला बसली .. अगदी त्याला खेटून. त्याला तिच्याकडून अशी अपेक्षा नव्हती. 

तिला थोडी जागा देण्यासाठी तो उजवीकडे सरकला तशी ती चपापली. तिला वाटायची कि हा सतत मुलींच्या मागे असतो आणि आज आपण मुद्दाम जवळ येतोय तर अगदी तो अगदी जंटलमॅन बनून अंतर राखत होता. 

क्रमश:

तुम्हाला काय वाटतं? आदित्य असा का वागतोय? तो खरंच तितका वाईट आहे जितकं प्रियांका त्याला समजते? कि तो खरंच जंटलमॅन आहे?  

जाणून घेण्यासाठी पुढे वाचत रहा … एक दुश्मनी प्रेमाची.

0

🎭 Series Post

View all