एक दुश्मनी प्रेमाची भाग ४
“अरे! कम ऑन आदित्य, आज माझा वाढदिवस आहे” ती तिच्या नेहमीच्या अंदाजात परत आली होती आणि अगदी बारीक आवाजात बोलत होती. ती अशी खेटून का बसली हे त्याला आता कळलं. नक्कीच तिला त्याला काहीतरी सांगायचं होतं जे मागच्या गॅंग ला ऐकू जायला नको होतं.
“निदान एक दिवस तरी मला जरा बरं वाटू दे.” तिने पुढचे शब्द ऐकून तो चपापला.
शिट! ती पुन्हा आपल्या मनातलं ओळखू लागली कि काय? नाहीतर मला तिचा आजचा खास दिवस खराब करायचा नाही हे तिला कसं कळलं?
आता आपल्या विचारांवर नियंत्रण ठेवलं पाहिजे नाहीतर हि चेटकीण अजून काय काय करेल त्याचा भरोसा नाही.
"आणि मी तुला बरं वाटू दिलं तर मग मला काय मिळेल?" त्याच्या शांतपणे उच्चारलेल्या शब्दात एक प्रकारचं आव्हान होतं जे तिला पटकन जाणवलं.
हा अतिशहाणा मला चॅलेंज केल्याशिवाय गप्प कसा बसेल? हे आपल्या आधी का नाही लक्षात आलं? काही हरकत नाही. आज काहीही झालं तरी मी त्याला हा वडापाव खाऊ घालणारच. तिने निर्धार केला आणि त्याचं आव्हान स्वीकारलं
"तुला छान वाटेल असं मी एक दिवस काहीतरी करीन" ती म्हणाली खरी पण आपल्या बोलण्यातला फोलपणा लगेचच तिच्या लक्षात आला. पण तोपर्यंत बाण सुटून गेला होता.
"खरंच?" त्याने भुवया वर करत असा काही चेहरा केला ना कि त्याला काय म्हणायचं आहे ते तिला कळलं. त्याच्या डोळ्यांत आव्हान तर होतंच पण अजूनही काहीतरी वेगळंच होतं. त्याचे डोळे गडद होऊ लागले होते आणि तिला स्वतःच्या मणक्यातून एक थंड शिरशिरी गेलेली जाणवली … मन सुन्न झालं.
कॉलेज सुरु झाल्यापासून ती नेहमीच त्याचाशी भांडत होती. पण असं काहीतरी पहिल्यांदाच होत होतं कि तिला काहीच उत्तर सुचत नव्हतं.
तिच्यावर झालेला परिणाम पाहून आदित्य मनातून जाम खूश झाला. त्याची मोहिनी सभोवतालच्या मुलींवर कशी प्रभाव टाकते ते त्याला माहित होतं. पण त्याला नेहमी वाटायचं की हिच्यावर ती कधीच चालणार नाही. ती यापासून खूप दूर होती. बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड असल्या गोष्टी तिच्यासाठी कधी नव्हत्याच मुळी. ती फक्त आपल्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करायची. पण आज तिच्यावर हा असा परिणाम पाहून त्याला आश्चर्य वाटलं. त्याने थोडं आणखी ताणायचं ठरवलं.
“का एखाद्या दिवशी? आजच का नाही?" ओठांवर कुत्सित हसू खेळवत तो म्हणाला. त्याच्या डोळ्यात मात्र तेच गडद भाव होते जे तिला अस्वस्थ करत होते. कारण तिच्यावर झालेला परिणाम तो एन्जॉय करत होता.
"तुला नक्की काय म्हणायचं आहे?" आता मात्र ती रागाला आली होती. त्याचे डोळे न वाचण्याइतकी ती मूर्ख नव्हती. तो तिला अप्रत्यक्षपणे त्याची नवीन गर्लफ्रेंड होण्यासाठी आमंत्रण देत होता
“आज मला छान वाटू दे. मला माहित आहे की तू मागच्या आठवड्यात माझ्या गर्लफ्रेंडला पळवून लावलंस. मी आता एकटा आहे ते मग तूच का नाही?” आपल्या थेट बोलण्याचा तिच्यावर होणारा परिणाम पाहण्यासाठी तो मुद्दाम थोडा थांबला. ती मुळापासून हादरलेली पाहून त्याला मजा वाटली. पण ती लगेचच सावरली आणि पुढे बोलली
“ती मॅडी ना तू सिंगल व्हायची वाट बघतेय. तुला हवं तर मी पॅच इन करू शकते … तू तिला डेट कर" तिने पटकन ऑफर दिली. तिला काहीही करून विषय बदलायचा होता, आणि तशीहि मॅडी बरेच दिवस त्याच्या मागावर होती.
“पण मला तर तू हवी आहेस,” त्याने आपली निर्लज्ज मागणी चालू ठेवली तशी ती कंटाळली. कारण हा संवाद तिला हवा तसा जात नव्हता तर भलत्याच मार्गाला निघाला होता. संवादाचा वाद होण्यापूर्वी इथून गेलेलं बरं. तिच्या मनात एक विचार आला आणि ती जायला उठणार होतीच कि त्याने परत एकदा तिचा चेहरा वाचला.
त्यावर हताश भावना दिसू लागली तसा तो चपापला. आपण कदाचित थोडं जास्तच ताणलं हे त्याला जाणवलं.
"आज किती पैसे अडकले आहेत?" त्याचा आवाज हळूच तिच्या कानाजवळ घुमला तशी ती दचकली. डोळे फाडून त्याला पहायला लागली. त्याच्या ओठांवर मात्र एक जाणीवपूर्वक हसू खेळत होतं.
शिट! मी ह्याच्यावर पैजा लावते हे ह्याला कसं कळलं.
घोड्यांच्या शर्यतीत जो नेहमीच जिंकतो, जो कधीच हरत नाही, अशा भरवशाच्या घोड्याला डार्क हॉर्स म्हणतात. आदित्य तिचा एक खास डार्क हॉर्स होता. त्याच्यावर पैज लावली तर ती कधीही हरायची नाही. ती त्याच्या वागण्याचा अंदाज सहज लावू शकत होती, तो कधी कुठल्या मुलीला डेट करेल, कधी सोडेल, त्याची पुढची गर्लफ्रेंड कोण असेल अशा फालतू बाबींवर ती वर्गातल्या इतर मित्र-मैत्रिणींसोबत पैजा लावायची आणि जिंकायची सुद्धा.
पण आज तिने जरा वेगळीच पैज लावली होती. आपल्या वाढदिवसाची पार्टी म्हणून आणलेला वडापाव त्याला खाऊ घालण्याची. तिला कोणीतरी सांगितलं कि तो वडापाव खात नाही आणि तिच्या हातून तर मुळीच खाणार नाही … कारण अर्थातच त्यांची दुश्मनी!
इथे तिचा स्वाभिमान दुखावला आणि तिने पैज लावली. वर्गात मागच्या बेंच वर जमा झालेल्या मुलांमध्ये दोन तट पडले. पैसे ठरवले गेले … आणि मग मोठ्या झोकात आपली झाशीची राणी गड सर करायला निघाली.
क्रमश:
पण मग त्या झाशीच्या राणीची अशी अवस्था का झाली? तिने आज पैज लावलीय हे ह्याला कसं कळलं?
जाणून घेण्यासाठी पुढे वाचत रहा … एक दुश्मनी प्रेमाची.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा