Login

एक दुश्मनी प्रेमाची भाग ५

An unusual story about friendship and Love. Two medical college students who are arch enemies of each other, who hate each other from the bottom of their heart, start turning into Best Friends Forever.

एक दुश्मनी प्रेमाची भाग ५

पण मी आज पैज लावलीय हे ह्याला कसं कळलं? नक्कीच त्याची चमची अनन्या असणार. ती त्याची सर्वांत जवळची मैत्रीण होती … ती गर्लफेंड नव्हती. आणि त्यामुळेच गर्लफेंड कितीही बदलल्या तरी अनन्या नेहमीच स्थिर राहिली. कधीकधी प्रियांकाला त्याची मैत्री पाहून आश्चर्य वाटायची कि एखाद्या मुलींमागे फिरणाऱ्या मुलासोबत अनन्या अशी खास मैत्री कशी काय करू शकते? तर कधी तिला त्यांच्या मैत्रीचा हेवा वाटायचा कि आपल्याकडे का नाही अशी मैत्री? 

तिला विचारात पडलेली पाहून आदित्यने तिच्या डोळ्यांसमोर टिचकी वाजवली तशी ती भानावर आली.  

ती अनन्या तर अजून मागेच आहे. अजून ह्याला भेटलीच नाही. आता कुठे प्रियांकाची ट्यूब पेटली. नक्कीच माझ्या चेहऱ्यावर दिसत असेल … आपणही वाचतो कि त्याचा चेहरा  ...अगदी तस्साच हा माझा चेहरा वाचत असणार.

म्हणजे माझे मघाचे विचार पण ह्याने वाचले कि काय? आता काय करावं …  तिला काहीच सुचत नव्हतं. 

"मला किती मिळतील?" ती विचारात पडलेली पाहून तो पुढे म्हणाला.

तिच्या चेहऱ्यावर काहीतरी हललं. तिची नजर स्वतःच्या हाताकडे गेली तशीच त्यानेही आपली नजर तिकडे नेली. 

बेंचखाली तिने त्याला पाच बोटं दाखवली.

"चालणार नाही … मला अर्धा हिस्सा हवा" त्याने आपली मागणी रेटली.

“मुळीच नाही!” ती पटकन उत्तरली.

“मग सोड! आज तू किती हरशील याचा विचार कर" ओठांवर एक कुत्सित हसू खेळवत तो उठायला लागला.

हरण्याच्या विचाराने ती थोडी घाबरली. त्याच्यावर पैज लावून ती यापूर्वी कधीही हरली नव्हती … आणि आज हरली  तर परत देण्यासाठी तिच्याकडे पैसे नव्हते.

"थांबा!" बेंचच्या खाली तिने त्याचा हात पकडला. आदित्यला हे अगदीच अनपेक्षित होतं … तो हादरला.

"मला चालेल" ती बोलताच त्याचे डोळे बारीक झाले. तो तिचा अंदाज घेण्याचा प्रयत्न करत होता.

“तू मघाची संधी गमावलीस. आता माझी किंमत वाढलीय” तो सावकाश म्हणाला.

ओह नो! अजून किती पीडणार हा मला! तिने मनातल्या मनात एक शिवी हासडली. ती त्याच्याशी खोटं बोलू शकत नव्हती कारण ती बेट घेत असताना अनन्या तिथेच होती. ती तशीही त्याला रक्कम सांगणारच होती. आणि आज  संपूर्ण रक्कम घालवण्यापेक्षा त्याची मागणी पूर्ण करणं जास्त श्रेयस्कर होतं .

"तुला किती पाहिजे?" भुवया उंचावत तिनेही सरळ प्रश्न विचारला. आवाज अर्थात खालच्या पट्टीत होता. 

“तुझा अर्धा हिस्सा, आणि तू मला छान वाटेल असं काहीतरी … ” वाक्य मुद्दाम अर्धवट ठेवत तो थांबला. त्याला तिच्यावर होणारा परिणाम पहायचा होता. ती पुन्हा गडबडली आणि ते पाहून त्याला पुन्हा एकदा अतीव आनंद झाला. 

तिला जाणवलं की तिने त्याचा हात बराच वेळ धरला होता. तिने लगेच सोडला. त्याला का कोण जाणे मनातून थोडंसं वाईट वाटलं. पण तरीही आता अजून ताणायचं नाही हे त्याला कळत होतं .

"आज माझ्याशी भांडण नाही केलंस तर मला छान वाटेल" त्याने पुस्ती जोडली तसा एक ऐकू येणारा उसासा तिच्यातून सुटला.

"डील!" तिच्या गुलाबी ओठांवर पुन्हा हास्य पसरलं. मघाची ती लिपस्टिक गेली होती. बहुतेक तिने वडापाव बरोबर खाऊन टाकली असावी.

"तुला कळतंय का तू काय मान्य केलंस ते?" त्याने पुन्हा एकदा आव्हान देत विचारलं. 

“हो! मला खात्री आहे की तू मुद्दाम माझ्याशी भांडायला येशील पण मी निर्धार केला आहे … आज काहीही झालं तरी मी दिवसभर भांडणार नाही … आणि हा वडापाव तुला खाऊ घालणारच!” ती अफाट आत्मविश्वासाने म्हणाली.

"व्हेरी गुड! पण अजून एक … त्यातुन तू मला विष देत असशील तर?” त्याने तिच्या हाताकडे इशारा केला. मी गचकलो तर तुझाच फायदा ना … हे वाक्य त्याने न उच्चरताही तिला कळलं. 

जरी ती मनापासून त्याचा तिरस्कार करत असली तरी ती कधीही कोणाला विष देणार नाही याची त्याला खात्री होती. तिला उगाच भडकवण्याचा त्याचा  प्रयत्न होता. पण तो काय करतोय याचा अंदाज येण्याइतकी ती त्याला चांगलीच ओळखत होती. तिने एक जरी शब्द उच्चारला तर शब्दाला शब्द वाढत जाऊन पुन्हा भांडण ठरलेलं. 

आता कृतीने प्रतिसाद देण्याची वेळ आली होती. तिने वडापावचा एक छोटासा चावा घेतला.

"खुश?" तिने विचारलं आणि त्याच्या ओठांवर एक मोहक छोटं हसू दिसू लागलं. त्याने हळूच मान होकारार्थी हलवली.

काही बोलण्यासाठी त्याचे ओठ उघडले. पण त्याने आणखी एक स्मार्ट  टिप्पणी करायच्या आधीच तिने जवळ जाऊन वडापाव त्याच्या उघड्या तोंडात कोंबला. 

हिचं काहीही होऊ शकत नाही अशा अर्थाने मान हलवत त्याने तो आपल्या हातात घेतला आणि खाऊ लागला. 

तिने शेवटच्या बेंचकडे विजयी नजरेने पाहिलं. शेवटच्या बेंचवर जोरात टाळ्या आणि शिट्ट्या वाजत होत्या.

मग तिने त्याच्याकडे पाहिलं. त्याच्या नजरेत आज काही वेगळंच होतं. नेहमीच्या रागीट नजरेची जागा आज वेगळ्याच कशाने तरी घेतली होती.

त्याला काहीतरो बोलायचं आहे हे तिला जाणवलं. ती त्याच्या जवळ सरकली. 

“जरा विचार कर … आपण जर एकत्र आलो तर ह्या वर्गाला नाही तर सगळ्या कॉलेजला उल्लू बनवू शकतो”

“म्हणजे?” तिने न समजून विचारलं 

“मला संध्याकाळी लायब्ररीत भेट ...मग सांगतो” त्याच्या ह्या बोलण्यावर तिने त्याच्याकडे विचित्र नजरेने पाहिलं. 

ह्याच्याशी जरा चांगलं बोलले तर लगेच माझ्याशी फ्लर्ट करायला सुरुवात केली. तिच्या मनातले विचार त्याने बहुतेक वाचले.


 

“लायब्ररीत बोलंवतोय … कॉफी शॉप मध्ये डेटवर नाही! एक बिझनेस प्रपोसल आहे. आता पैज लावून किती कमवलेस? तसेच रोज कमवशील … फक्त सगळ्यांसमोर माझ्याशी भांडण करत रहायचं आणि ” 

पुढचं काही त्याला बोलायची गरजच नाही पडली. ती न सांगताच सगळं समजून गेली. 

तर वाचकहो … प्रियांकाला जे कळलं ते तुम्हांला समजलं का?

तो दिवस होता एका नव्या सुरुवातीचा! दुष्मनीचा अंत करून मैत्रीच्या आणि साहचर्याच्या एका नव्या नात्याची सुरुवात करण्याचा!

समाप्त

कथा आवडली असेल तर नक्की लाईक करा, आपली अमूल्य टिप्पणी द्या आणि आपल्या फ्रेंड्स सोबत शेअर करा.