Login

एक होती आवडती - एक होती नावडती ( भाग 1)

A Story About Two Women's
भाग 1

"झाली का तुझी पुन्हा सुरुवात? जरा घरात शांतता म्हणून नाही." शेखर नुकताच बाजारातून आला होता.

" मी काय केलं ? साधं बोलायचं पण नाही का तुझ्याशी मी ?? दरवेळी तुला काही सांगायला गेलं की माझ्यावरचं वैतागतोस तू. " शलाकाने आपली बाजू मांडली.

झालं पुन्हा दोघांच्यात अबोला सुरू झाला. शेखरच्या आईला चार महिन्यांपूर्वीच कॅन्सर डिटेक्ट झाला होता. त्यामुळे सध्या त्यांच्या मुंबई ते चिपळूण अशा वाऱ्या चालू झाल्या होत्या. शेखरला अजून एक मोठा भाऊ होता. आई त्याच्या इथेच राहून तिची ट्रीटमेंट चालू होती. मोठा भाऊ आनंद , स्नेहा आणि त्यांची छोटी मुलगी अवनी अशी त्यांची फॅमिली होती. आईला कॅन्सर आहे कळल्यापासून मात्र शेखर आणि शलाका त्यांना डॉक्टरकडे घेऊन जाणे आणि पुन्हा ट्रीटमेंट नंतर चिपळूणला परत जाणे. हेच सुरू होते आणि त्यामुळेच शलाका वैतागली होती.

" मग तुम्ही दोघे याल ना 23 तारखेला ? आईना केमोला न्यायचं आहे. " स्नेहा वहिनीचा फोन आला तसं शलाकाने कान टवकारले.

" आईची पुढची ट्रीटमेंट 23 तारखेला आहे " शेखरने सांगितलं.
" मी येणार नाही तू एकटा जा " शलाका बोलली.
" नको तू चल नाहीतर मला पुन्हा सारखे फोन करून कंटाळा आणशील. " एवढ बोलून शेखर आत निघून गेला.

शेखर आणि शलाकाच्या लग्नाला चार वर्ष झाली होती. गावातलं घर त्यामुळे कामं हजार. किती केली तरी ती कमीच होती. त्यात सध्या शलाकाची नोकरी नसल्याने तिला काय करावं हेच सुचत नव्हतं. सासूबाई ती आणि तिचा नवरा असे तिघेच घरी असत. मोठी दीर आणि जाऊ मुंबईत राहत होती. पण सासूबाईंना मात्र मोठ्या सुनेची नी नातीची कौतुक होती. शलाकाच लग्न झाल्यापासून तिच्या नशिबी सासरच्यांचे दोन गोड शब्द आले नव्हते. त्यामुळे या सगळ्या गोष्टीला ती अक्षरशः कंटाळली होती. नाईलाजाने पुन्हा तिने आठवड्याभराने जाण्यासाठी कपडे भरून ठेवले.

वडील गेल्यामुळे गावातल्या घराची सगळी जबाबदारी शेखरवर आली होती. आईच्या बाबतीत प्रत्येक मुलाचं मन हळवं होतं तसं त्याचसुद्धा होतं. त्यात शलाका प्रत्येक गोष्टीत चिडचिड करते असं त्याला वाटायचं. त्यामुळे एकमेकांना समजून घेणं , एकमेकांसाठी वेळ देणं या गोष्टी मागे पडल्या होत्या. आईला कॅन्सर आहे कळल्यापासून तो जास्तच इमोशनल झाला होता. त्याची वहिनी त्याच्याशी गोड गोड बोलून त्याच्याकडून कामं करून घेत होती. पण हे त्याच्या लक्षात येत नव्हतं. त्याच्या दृष्टीने वहिनी आणि आईचं छान पटतं, वहिनी घरात सगळं करते तसं शलाका कधी करणार ? ती फक्त चिडचिड करते. जबाबदारी घेत नाही. असंच चालू होतं.

त्यांच्या दोघांच्या अबोल्यातच एक आठवडा संपला. दोघेही पुन्हा आईच्या केमो साठी मुंबईला जायला निघाले. पण यावेळी शलाकाने मनाशी काहीतरी ठरवलं होतं...
0