Login

एक होती आवडती एक होती नावडती ( भाग 2)

A Story Of Two Womens
भाग 2

शलाका आणि शेखर दोघेही सकाळी सातच्या दरम्यान मुंबईत पोचले. आल्या आल्या स्नेहाने सुरुवात केली.

" बरं झालं बाई तुम्ही आलात. आज एवढं काम आहे ना की काही विचारू नको.." असं म्हणून त्यांना पाणी सुद्धा न विचारता ती आपलं आवरायला निघून गेली.

शेखरच्या आईने दोघांना पाणी आणून दिलं.
" चहा करू ना रे की कॉफी ? " त्यांनी विचारलं.
" आई कॉफीच कर .. डोकं दुखतंय " शेखर
" का रे...? आडवा होतोस का जरा. बरं वाटेल तुला. "
" नको मी फ्रेश होऊन येतो."
त्यांचं बोलणं ऐकत शलाका तिथेच उभी होती.
" तुला नाही का आवरायचं ?" सासूबाईंचा तिरका सुर आला तशी ती आत पळाली.

स्नेहा आणि आनंद आज ऑफिसला खूप महत्वाचं काम आहे असं सांगून लवकर बाहेर पडले होते. छोट्या अवनीची सुद्धा घरात मस्ती सुरू होती. शलाका येणार म्हटल्यावर जाऊबाईनी काढता पाय घेतला होता. त्यामुळे सगळं जेवण करून सासूबाईंना हॉस्पिटलला न्यायचं होतं. रात्रभर प्रवास त्यात धड झोप नाही. तिचं अंग अगदी आंबून गेलं होतं. पण सांगणार कोणाला ?? तिने मग सगळा स्वयंपाक केला. आवरलं तोपर्यंत 12 वाजून गेले होते. छोट्या अवनीला सांभाळणारी बाई तोपर्यंत आली होती. त्यामुळे मग शेखर त्या दोघींना घेऊन हॉस्पिटलला गेला.


शेखरच्या आईची केमो थेरपी हल्लीच सुरू झाली होती. पण त्या सोबतच आयुर्वेदिक औषधांमुळे केमोचा त्रास त्यांना कमी होत होता. आईची औषधं वगैरे घेऊन ते तिघेही बाहेर पडले तेव्हा दुपारचे 2 वाजून गेले होते. शेखरने गाडी बाहेर काढली पण थोड्याच वेळात ट्रॅफिक लागल्याने ते सिग्नललाच अडकून पडले होते. रस्त्यावर फुगेवाले, फुलं विकणारी छोटी मुलं गाड्यांच्या भोवती फिरत होती. तेवढ्यात शलाकाच लक्ष बाहेर गेलं. तिचा तिच्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता. तिने बाजूलाच बसलेल्या सासूबाईंना आणि शेखरला बाहेरचं दृश्य दाखवलं ते दोघेही डोळे विस्फारून बाहेर बघत राहिले.

त्यांना घरी यायला साधारण तीन वाजले होते. आल्यावर ते सगळे जेवले. पण त्यांच्या डोक्यातून मगाचा विषय जात नव्हता. संध्याकाळी सातच्या दरम्यान स्नेहा घरी आली. आल्यावर ती फ्रेश झाली. सगळे छान गप्पा मारत बाहेर हॉल मध्ये बसले होते. तेवढ्यात स्नेहा तिथे आली.

" काय हे शलाका रात्रीच्या जेवणाची तयारी तरी करून ठेवायचीस... मी केलं असतं आल्यावर. " स्नेहा

" आम्हाला यायला आज उशीर झाला हॉस्पिटल मधून. नि माझं डोकं पण दुखतंय म्हणून जरा बसले होते. काय करायचय सांगा मी येते मदतीला." ती सोफ्यावरून उठत म्हणाली.

" अगं एवढूशा प्रवासाने तुझं डोकं दुखतं?? मग रोज आमच्यासारखा प्रवास कसा करणार तू नि नोकरी कशी करणार ?? " असं म्हणून स्नेहा कुत्सित हसली.

शलाकाने एक जळजळीत कटाक्ष शेखरकडे टाकला. तो काहीतरी बोलेल अशी तिची अपेक्षा होती पण तो मात्र या सगळ्याकडे सपशेल दुर्लक्ष करत होता. सासूबाई देखील मुद्दाम ऐकून न ऐकल्यासारखं करत होत्या. आज काहीही झालं तरी याबद्दल सगळ्यांसमोर बोलायचंच असं शलाका ठरवून आली होती. पण वेळ काळ बघून तिला बोलावं लागणार होतं.

" वहिनी मी पण जॉब केलाय. मलाही माहितेय नोकरी कशी करतात ते. पण माझी तब्येत खरंच बरी नाहीये. मी फक्त तुम्हाला त्रास नको म्हणून आलेय आईंच्या ट्रीटमेंटसाठी " शलाका बोलली.

" अगं बाई तुला कोणी सांगितलं आम्हाला आईंच्या आजाराचा त्रास होतोय म्हणून... ? आम्हाला सध्या वर्कलोड खूप आहे म्हणून आम्ही बोलावतो तुम्हाला. पण त्याचा देखील तुम्हाला त्रास होतोय तर आम्ही मॅनेज करू आमचं आमचं..." स्नेहाने अगदी केविलवाणा चेहरा केला.

" वहिनी मी असं म्हणाले तरी का ....?? मी.......

" वहिनी तुला कामाच प्रेशर किती आहे ते मला माहित आहे. आईच्या ट्रीटमेंटच आम्ही बघतो काय ते तू नको काळजी करू.." शलाकाला काही बोलू न देता शेखने मधेच आपलं तोंड उघडलं.

आपली बाजू घ्यायची सोडून शेखर कायम वहिनीची बाजू घेतो हे बघून शलाकाला राग आला. पण स्नेहा मात्र मनात खुश होती. काहीही न करता आपण आईंसाठी किती करतो हे भासवण्यात ती यशस्वी झाली होती.

" शेखर तू......"
" शलाका प्लीज शांत राहा जरा. आईची अवस्था काय आहे ते बघतेस ना...तिला त्रास नको प्लीज " शेखर जवळजवळ तिच्यावर ओरडलाच.

शलाकाच्या डोळ्यात पाणी येणं बाकी होतं. तिला देखील या सगळ्याची सवय झाली होती म्हणा. पण कधीतरी शेखर तिची बाजू घेईल असं तिला वाटत होतं.

थोड्या वेळाने आनंद पण घरी आला.. त्याने आईची चौकशी केली. डॉक्टर काय म्हणाले ते विचारलं. तोपर्यंत स्नेहा तिथेच गप्पा मारत बसली होती. शलाकाने सगळ्यांसाठीच चहा आणला होता. सगळ्यांचा चहा पिऊन झाल्यावर आनंद आत आपल्या खोलीत जायला निघाला.

" थांब " पाठून आवाज आला तसा तो जगाच्या जागी थांबला.

क्रमशः..
0