एक इजाजत.भाग -६७

वाचा एक अलवार फुलणारी प्रेमकथा!
एक इजाजत!
भाग -६७

“तू हमारी मनू हैं ना? चंपाने बताया था मुझे। बडी डॉक्टर बन गयी हो तुम। यह सुनकर हम कितना खुश हुए क्या बताऊं?” शेवटी अश्रू गालावर ओघळलेच.


“तुमची मनू? म्हणजे तुम्ही मला ओळखता?”


“हो, म्हणजे तशी ओळख पटली; पण ती ओळख नको आता. तू मोठी मॅडम आहेस, तुझ्या घरी खुश आहेस हे खूप चांगले आहे. तुला चंपाला भेटायचे आहे ना? जा भेटून घे आणि जिथे न्यायचे तिथे घेऊन जा.”


“आणि परत घेऊन नाही आले तर?”

“इस बात की इजाजत तो यह शीलाआँटी कभी नहीं देगी! चंपा को जाना होगा तो वह खुद की मर्जी से जाए, मैं कभी ना नहीं कहूँगी पर दुसरों के बातों में आकर जाने का सोचे तो कतई हां नहीं बोलूंगी। यहाँ के उसूल अलग हैं, हमारे बनाये हुए। तुम नहीं समझोगी।” तबकातील विडा तोंडात टाकत शीलाआँटी हसत उत्तरली.


तिच्या उत्तरावर मनस्वीने केवळ स्मित केले आणि चंपाला घ्यायला भरभर वर गेली. झिरझिरत्या पडद्याआड साडीचा पदर ठीक करणाऱ्या चंपाकडे नजर जाताच तिचे ओठ हलले.


“येऊ ना?”


“मला घ्यायला आलीस नि तूच परवानगी मागतेस? ये की.” गुलाबी ओठावर मुद्दामहून ओढलेली लिपस्टिकची गर्द लाल रेघ ओठभर पसरवत ती मोकळेपणाने हसली.


“मला कायमची घेऊन जायला आलीस असं ऐकलंय.” तिच्या ओठावरचं हसू तसंच होतं.


“हो, म्हणाले होते खरी..”


“मग? किती पैश्यात मला मोजायचे ठरवलेस?” केसात माळलेल्या मोगरा खांद्यावरून समोर घेत तिने विचारले.


“म्हणजे?”


“म्हणजे मागच्याच आठवड्यात एकजण मला हा दोन करोडचा चेक देऊन गेला. त्याच्यासोबत मी जावे अशी त्याची इच्छा होती, म्हणून मी तुला विचारतेय. तू माझी काय किंमत करशील?” चेक पर्समध्ये ठेवत चंपा.


“तुमची किंमत मी काय करणार? तुम्ही माझ्यासाठी अनमोल आहात.”


“ते बोलायला गं. आमच्या व्यवसायात आम्हाला केवळ पैश्यांची भाषा कळते. बरं चल, निघुयात; पण जास्त वेळ मी थांबणार नाही हं. आज खूप मोठा मासा गळाला लागणार आहे, तेव्हा मला लवकर परत यावे लागेल.” छातीवर मधोमध पदर ठेवत ती पुढे निघाली.


“चंपाजी.. तो पदर तेवढा..निट केला तर बरं होईल..” तिचा तसा पदर बघून मनस्वी कचरत बोलली.


“तुमच्यासारख्या सभ्य लोकांना आमचा हा असा पदर बघून लाज वाटायला लागते हे मी विसरलेच होते. इथल्या वस्तीतील बायकांसाठी दवाखाना उभारतेस तर तुला अशा बायकांची सवय करून घ्यायला हवी.” पदर व्यवस्थित करत ती पायऱ्या उतरायला लागली. डोक्याला हात लावत मनस्वी तिच्यासोबत बाहेर आली.


“बाबा आले आहेत तर त्यांना तुम्ही भेटणार का?”


“तुझ्या बाबांना भेटायला मला काय हरकत असेल? चल निघायचं?” कारचे दार उघडत चंपा आत बसली देखील.


“तुम्हाला पांढरा रंग फार आवडतो का?” तिच्या अंगावरच्या धवल रेशमी साडीकडे एक नजर टाकत मनस्वीने विचारले.


हम्म. आवडतो मला हा रंग. कुठले डाग लागले की एकदम स्पष्ट उठून दिसतो ना म्हणून हा रंग आवडतो. तुमच्या धंद्यात कसं, शुभ्र रंगाचा ऍप्रॉन घालून तुम्ही मिरवता? एखादा डाग लागला तरी चटकन दिसतो? तसंच आमच्याही धंद्यात लागणाऱ्या डागांची काही कमी नाहीये. कधी कधी तर त्या डागांनी साडीचा ओरिजनल रंगही हरवून जातो.” ती पुन्हा खळखळून हसली.


“म्हणून आवडतो हा शुभ्र रंग.. अनेक डागधब्ब्यांना आपल्यात सामावून घेतो पण त्यांचा आड असतानाही आपलं अस्तित्व सोडत नाही.” हसून बोलता बोलता ती काहीशी गंभीर झाली आणि मनस्वीने तिच्याकडे पुन्हा नजर टाकली.


‘यांच्या मनातील दुःख आपल्याला नाहीच ओळखू येणार. मुखवटे चढवून ते लपवण्याचे मघापासून प्रयत्न चालले आहेत; पण या मेकअप आणि लालीआड लपलेला त्यांचा खरा चेहरा रोज त्यांचं अस्तित्व त्यांच्यासमोर उभे करत असेल तेव्हा त्यांना किती यातना होत असतील? त्या दुःखाची खोली मी केव्हातरी मोजू शकेल?’ नुसत्या विचारानेच तिचे मन भरून आले.


“कसला विचार करतेस?”


“अहं, काही नाही. आपले ठिकाण आलेय.” कार पार्क करत ती म्हणाली.


“इथे आपल्या हॉस्पिटलची इमारत उभी राहतेय. मोठे हॉस्पिटल असेल. सगळ्या सुखसोई असतील आणि मुख्य म्हणजे कमी खर्चामध्ये योग्य उपचार मिळतील. वस्तीतील बायकांची लूट होणार नाही.” मनस्वी तिला माहिती देत होती.

डोळ्यावरचा गॉगल सावरत चालताना चंपा मोठ्याने हसली.


“कमी खर्चात का? इथल्या बायका रग्गड कमावतात. तेव्हा तू देखील त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्यायचेस आणि आपला दवाखाना काय आपला दवाखाना? हा काय धर्माथ दवाखाना आहे होय? तू शिकलीस, तुझ्या कष्टातून उभारलेला हा दवाखाना असणार आहे. तो फक्त तुझा आहे.”


“माझ्याकडे माझ्या बाबांनी कमावून ठेवलेले भरपूर काही आहे. त्यामुळे पैसे कमवायला म्हणून नाही तर या समाजाची सेवा करायला हे हॉस्पिटल उभारतेय.” तिच्याकडे बघून मनस्वीने ओठ रुंदावले.


“या सगळ्या बोलायच्या बाता. पैसा चालून आल्यावर कोण नाही म्हणणार?”

मनस्वी केवळ हसली.


“चंपाजी अशीही लोकं समाजात असतात बरं, जे स्वतः कमावलेला पैसा समाजासाठी वापरतात. कुणी कुठल्या अनाथाश्रमासाठी तर कुणी एनजीओ आणि अशाच कुठल्या संस्थेसाठी.

ते तिकडे बघताय? ते माझे बाबा आहेत.. डॉक्टर प्रकाश. खानदानी श्रीमंत. मात्र पैशाचा माज त्यांनी कधीच केला नाही. स्वतःचा दवाखाना स्वतः उभारला. गोरगरिबांना काम दिलं. आज रोजी पंधरा जणांचे कुटुंब त्यांच्याकडे काम करून आपले पोट भरत आहेत आणि तेही स्वाभिमानाने. कित्येक गरजू पेशंट्स कडून तर बाबा, फीज देखील घेत नाहीत आणि तरी आमचं उत्तम चाललंय.


एका अनाथाश्रमात वाढणाऱ्या मुलीला त्यांनी स्वतःची लेक म्हणून वाढवली. प्रेमाचा वर्षाव केला, हवे तेवढे हट्ट पुरवले सोबत योग्य संस्काराची शिदोरीही दिली. जवळ पैसा असू दे किंवा नसू दे मात्र आपले पाय कायम जमिनीवर घट्ट रोवले असावेत ही शिकवण दिली.”
ती सांगत होती आणि चंपाच्या चेहऱ्यावरचे भाव झरझर बदलत होते.


“हे सारं तू मला का सांगतेस?” जड झालेल्या स्वरात चंपाने विचारले.


“सहजच! या समाजात अशीही माणसं असतात हे सांगायचं होतं म्हणून.” ती हसून म्हणाली.


“चला, आपण पोहचलोय. आता कामाला सुरुवात करूया.”


“इथे तर कुणी जास्त लोकं नाहीयेत. मला वाटलं काही सोहळा वगैरे असेल.”


“तुम्हाला सोहळा हवा होता?”


“अगदीच हवा होता असं नाही पण म्हटलं या देहाचा सोहळा झालाच आहे आता माणसांच्या सोहळ्याला हजेरी लावायची असेल. मोठी लोकं मोठमोठ्या सेलिब्रेटीना बोलावतात तसं.” प्रकाशकडे तिरकसपणे बघत ती म्हणाली.


“माझ्यासाठी माझे बाबा आणि तुम्ही.. दोघंही सेलिब्रेटीच आहात की. बाय द वे मी ओळख करून द्यायचे विसरले.. हे माझे बाबा.. डॉक्टर प्रकाश. जळगावचे खूप मोठे डॉक्टर आहेत आणि बाबा या चंपाजी..”

“मी नाशिक मधील शालिमार वस्तीतील प्रसिद्ध वारांगना आहे.. म्हणजे वेश्या हो. हिने मात्र मला सेलीब्रेटी बनवून टाकलंय, कमाल आहे नाही?” मनास्वीचे वाक्य मध्येच तोडत ती स्वतःची नव्याने ओळख करून देत म्हणाली.


“चंपाजी, हे असं दरवेळी सांगायलाच पाहिजे का?” तिच्या अशा बोलण्याने मनस्वीला अवघडल्यासारखे झाले.


“हो तर. आपला पेशा एखाद्याला सांगायला लाजायचं कशाला? मी तर म्हणेन जे काम केल्याने आपल्याला दोन वेळच पोटभर अन्न मिळतं त्या कामाबद्दल कसं भरभरून बोलायला हवं.

बरं ते जाऊ द्या. कुठे विट रचायची ते सांग बाई म्हणजे हे काम झालं की मी माझ्या कामाला मोकळी होईल.”


“हो चला ना, ते काय सगळी कामगार मंडळी तुमची वाट बघत आहेत. बाबा तुम्हीही चला. चंपाजी तुम्ही ही विट ठेवायची आणि बाबा तुम्ही त्यावरून मसाला टाकायचा.”

“मी?” प्रकाश धक्का बसल्यागत म्हणाला.


“हो. इथे हॉस्पिटल सुरु करायचं हे तुम्हीच तर माझ्या मनात रुजवलं होतं मग जेव्हा हे स्वप्न सत्यात उतरतेय तेव्हाही तुमची सोबत हवीच ना?”

ती म्हणाली म्हणून तो चंपाच्या बाजूने उभा राहिला. त्याला तिने आधी काहीच कल्पना दिली नव्हती आणि आता वाद घालण्यात अर्थही नव्हता.

“परफेक्ट!”

कंत्राटदाराच्या सूचनेनुसार चंपाने रचलेल्या दगड आणि विटेवरून त्याने सिमेंटचा मसाला टाकताच मनस्वी उद्गारली.


दोघांच्या सोबतीचा तो क्षण तिने कॅमेऱ्यात आणि तिच्या डोळ्यातसुद्धा कायमच बंधिस्त करून ठेवला.


प्रकाश आणि त्याची रत्ना कितीतरी वर्षांनी असे एकमेकांजवळ उभे होते. ओळख असलेले तरीही अनोळखी! तिच्या सोबतीने वावरताना कितीवेळा मनात आले की म्हणावं, झालंय ना आता तुझ्या मनासारखं? मग आतातरी माझ्या सोबतीने येशील का? मात्र शब्द बाहेर पडलेच नाही.


आणि रत्ना? ती रत्ना नसून ती केवळ चंपा असल्याचे हरघडीला तिचे सिद्ध करने चालू होते.

“निघू मी? आज एक मोठे कस्टमर येणार आहेत.”


“हो, मला माहिती आहे की. मी तुम्हाला सोडून देते.”


“हो चालेल की. अहो, डॉक्टर साहेब! तुम्हाला भेटून आनंद झाला. आता निघते मी.” ब्लाउजच्या मधोमध अडकवलेला गॉगल डोळ्यावर घालत प्रकाशकडे बघून तिने हात जोडले आणि कारच्या आत जाऊन बसली.

पुढील भाग रात्री प्रकाशित होईल.
:
क्रमश:
©®Dr. Vrunda F.(वसुंधरा..)
*साहित्यचोरी गुन्हा आहे.*
*****


🎭 Series Post

View all