एक इजाजत.भाग -७०

वाचा एक अलवार फुलणारी प्रेमकथा!
एक इजाजत!
भाग-७०


“मी ही ओळखत नाही. मुंबईचा खूप मोठा उद्योजक आहे म्हणे.”

“कोण म्हणे?”

“गुगलबाबा.”

“हे कोणते बाबा?”

“आहेत. एक खूप मोठे ज्ञानी बाबा आहेत. सगळ्या जगाची कुंडली त्यांच्याजवळ असते.” तिचे उत्तर ऐकून काकू चाट पडल्या आणि उभ्या उभ्याच त्यांनी गुगलबाबांना हात जोडले.


“मनुताई असे असेल तर मग त्यांच्याकडे माझीही कुंडली असेल ना? आपण त्यांच्याकडून माझेही भविष्य जाणून घेऊया की.” काकू मसाज करणे थांबवत म्हणाल्या.


“तुमचं भविष्य ना? गुगलबाबा म्हणत आहेत की आज जर का तुम्ही वेळेवर स्वयंपाक केला नाही तर तुम्हाला डॉक्टरसाहेबांकडून ओरडा मिळणार आहे.”


“असंही असतं होय?” तोंडावर हात ठेवत ती.


“असं काही नसतंय आणि हे भविष्य जाणून घ्यायला कोणत्या बाबाची गरज नाहीये. आज तुमच्या डॉक्टर साहेबांचा उपवास असतो त्यामुळे त्यांना लवकर जेवायचे असते. त्यात तुम्ही अशा गप्पा हाकत बसाल आणि वेळेवर जेवण तयार नसेल तर ओरडा मिळेलच ना?” ती हसून म्हणाली तसे नाक फेंदारून काकू कामाला गेल्या.


“सायेब,तुम्ही आदित्यला ओळखता होय?” मनू आणि प्रकाश जेवायला बसले तसे काकूंनी मुद्दाम प्रकाशला विचारले आणि तिच्या अनपेक्षित प्रश्नाने मनस्वीला जोराचा ठसका लागला.


“हळू अगं. पाणी पी जरा.” तिच्या केसातून हात फिरवत प्रकाशने तिला पाणी दिले.


“आता बरं वाटतंय ना? आणि तुम्ही कोणाबद्दल विचारत होतात? कोण आदित्य? कुणी मोठे डॉक्टर आहेत का?”


“साहेब गुगल बाबांना सगळं माहिती आहे. त्यांनाच विचारा.” पोळी वाढता वाढता काकू म्हणाल्या तसे प्रकाशने मनुकडे पाहिले.


“यांना काय झालं? या का अशा विचित्र बोलत आहेत?”


“आता काय सांगू? अहो, या सारख्या मोबाईलमध्ये डोके टाकून बसतात. रील्स काय बघत असतात. तिथलाच कोणी असेल. गंमत म्हणजे मलाही मघाशी असेच काहीतरी विचारत होत्या. आपल्याला यांचं मोबाईल वेड कमी करायला हवं हो.”

मनू हळू आवाजात म्हणाली तसे प्रकाश हसू लागला आणि त्याची खुसरपुसर ऐकून काकूंचे नाक आणखी मोठे झाले.


“मनुताई, मला हसताय ना? मग तुम्हाला आज तुमच्या आवडीची खीर मिळणार नाही हं.”


“बघा बाबा, ह्या मला अश्या धमक्या देत असतात.”


“सायेब..”


“मनुड्या काय चाललंय तुझं? तूच ते गुगलबाबाचं पिल्लू काकूंच्या डोक्यात सोडलेस ना? तुझ्या करामती मला चांगल्याच ठाऊक आहेत आणि आता त्यांची मजा घेतेस होय?” तिचा कान पिळत तो दटावत म्हणाला.


“सायेब, अहो लहान लेकरू आहे त्यांना कशापायी रागे भरता? मनुताई कान दुखतोय का?”


“नाही हो काकू. बाबांनी मस्करीत कान पकडला आणि मी सुद्धा मघाशी तुमची मस्करी करत होते. सॉरी.”


“बया! हे सॉरी कशापायी? ही घ्या खीर.” काकुंनी दोन वाट्या खीर तिच्यासमोर ठेवली.


“ओह काकू, यू आर ग्रेट! लव्ह यू.” तिचे असे मनमोकळे ‘लव्ह यू’ ऐकून तर त्यांनी लाजून तोंडाला पदर लावला आणि प्रकाश अन् मनू खुदुखुदु हसू लागले.


सायंकाळपासूनच्या या हलक्याफुलक्या गमतीचा भाग सोडला तर मनस्वी मात्र मनातून पुरती गोंधळली होती. त्या आदित्यला एकदा भेटून इतक्या मोठ्या रक्कमेच्या चेकबद्दल जाब विचारल्याशिवाय तिला स्वस्थता लाभणार नव्हती.


शेवटी गुगलवर जाऊन तिने पुन्हा एकदा त्याची मिळेल तितकी माहिती गोळा केली आणि त्याचा ऑफिसचा नंबरही मोबाईलमध्ये सेव्ह करून घेतला.

________

“मनूऽऽ”

दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्या उठल्या मनूच्या नावाचा गजर करत प्रकाश पाणी प्यायला स्वयंपाकघरात गेला. ती इकडे असली की त्याचे हे नेहमीचे होते. सकाळी सकाळी तिला उठवायचं मग दोघांनी मस्त फिरायला जायचं. आजही त्याने सवयीनुसार तिला हाक दिली; पण आतून मात्र काहीच आवाज आला नाही.

पाणी पिवून परत हाक देऊ असा विचार करत तो स्वयंपाकघरात आणि तिथे फ्रिजला चिकटवलेली चिट बघून त्याला आश्चर्य वाटले. लहान असताना शाळेत जायला लागल्यावर तो आणि मनू अशाच छोट्या चिट्सवर नोट्स लिहून एकमेकांसाठी निरोप ठेवत असत.

आज त्याला ही चिट दिसली आणि ती आठवण आठवून मंद स्मित करत त्याने ती हातात घेतली.


“मनुड्या, आता मोबाईलचा जमाना असताना हे असे चिट्सच्या माध्यमातून कोण मेसेज देतो गं? पण तू युनिक आहेस हं.” चिठ्ठी घेऊन तो तिथेच खुर्चीवर बसून वाचू लागला.


“डिअर बाबा,
सगळ्यात पहिले सॉरी, की तुम्हाला डायरेक्ट न सांगता असा मेसेज करत आहे. आज अचानक एक इम्पॉर्टन्ट काम आल्यामुळे मला मुंबईला जावं लागतंय. काम होताच मी परत येईन. तुम्ही गाढ झोपला होतात म्हणून मी कॉल किंवा मेसेज केला नाही. उगाच ट्यूनच्या आवाजाने झोपमोड झाली असती ना? आणि हे असं चिटवर लिहिताना खूप वर्षांनी शाळेतील तुमची छोटी मनुडी झाल्याचा फील देखील आला.

आणि काळजी करू नका. एअरपोर्टला मी एकटी जात नाहीये तर आपल्या हॉस्पिटलचा नितीन दादा मला सोडून देतोय. तेव्हा टेन्शन घेऊ नका.

बाय, बाय, टेक केअर! सी यू सून.
लव्ह यू!”


“नितीनऽऽ”

चिटवरचा संदेश वाचताच त्याने रिसेप्शनवर कॉल करून मोठयाने आवाज दिला.

“जी सर..”

तो फोनवर येईपर्यंत प्रकाश तसाच मोबाईल कानाला लावून खाली पोहचला होता.


“मनू कुठे आहे?”त्याच्या आवाजात एक जरब होती.


“त्या तर मुंबईला गेल्यात. सकाळच्या फ्लाईटने. त्यांनी तुम्हाला तसा मेसेज ठेवला आहे की आणि तुम्ही उठल्यावर मी तुम्हाला सांगणारच होतो.”


“तेच वाचून तुला विचारायला मी आलोय. मुंबईला एकटी कशी गेली ती?”


“ठाऊक नाही. अर्जंटमध्ये काहीतरी महत्त्वाचं काम आहे म्हणाल्या होत्या.”


“ठीक आहे.” लांब लांब श्वास घेत त्याने स्वतःच्या रागावर नियंत्रण ठेवले.

खरं म्हणजे राग आला होताच त्यापेक्षा काळजी जास्त वाटत होती. अशाच पावसाळी दिवसात रत्ना तिच्या ओळखीच्या वाटणाऱ्या लोकांसोबत मुंबईला निघाली नि परत आलीच नाही हे त्याला आठवले होते आणि तिचे चंपा म्हणून झालेले रूपांतरही तिथेच कळले होते.

म्हणूनच त्याला मनूबददल भीती वाटू लागली. ती जगात एकटी कुठेही जाईल; पण मुंबईला नाही हे त्याने कितीदातरी तिला सांगितले होते.


सारी कामे बाजूला ठेवून तो नुसता तिचा नंबर डायल करत होता. मात्र फ्लाईटमध्ये असल्यामुळे तिचा मोबाईल स्विच ऑफ येत होता. पंधरा मिनिटांनी त्याच्या मोबाईलची रिंग वाजली तसे त्याने पटकन मोबाईल कानाला लावला.


“आय एम सो सॉरी बाबा, मी तुम्हाला सांगणारच होते पण वेळेवर प्लॅन झाला आणि..”


“मनू मला आत्ताच्या आत्ता व्हिडीओ कॉल कर.” तिचं बोलणं मध्येच थांबवत तो कडकपणे म्हणाला.


“बाबा? तुम्ही रागावला आहात?”


“मनू, मी तुला काय म्हणतोय?”


“ओके. ठीक आहे. हे बघा, मी एअरपोर्टवरून निघते आहे आणि मला काहीही झाले नाहीये.” व्हिडिओ कॉल करत म्हणाली.


“मनू, तुला मुंबईला एकटीने जायची परवानगी नाहीये हे ठाऊक आहे ना? “ तो अजूनही चिडलेला होता.


“बाबा, अहो शांत व्हा. मी एकदम ओके आहे. डोन्ट वरी. बरं ऐका ना, तुम्ही तुमचं आवरून घ्या. मी नाश्ता करून घेते. पोटात कावळे जाम ओरडायला लागलेत. बाय बाय अँड लव्ह यू.”

त्याने पुन्हा तिची शाळा घेऊ नये आणि इथे येण्याच्या उद्देशाबद्दल काही विचारू नये म्हणून शक्कल लढवत तिने कॉल कट केला.


‘मनू, मोठी झालीस गं बाळा; पण तरी तुझी काळजी वाटते राणी. मुंबई म्हटलं की मग मला रत्नाचं गायब होणं आठवतं आणि तिचं चंपा म्हणून मिरवणेही. का गेलीस तू तिथे?’

मोबाईलच्या स्क्रीनवरील तिच्या फोटोकडे तो कितीतरी वेळ एकटक पाहत होता.

___________


“हॅलो, मला आदित्य सरांना भेटायचं आहे. प्लीज, तेवढं जुळवून आणाल काय?” शक्य तेवढ्या मृदू स्वरात मनस्वी रिसेप्शनवर विचारत होती.


“डू यू हॅव अन अपॉइंटमेंट?” तिला खालून वर पर्यंत न्याहाळत रिसेप्शनीस्टने विचारले.


“नाही अपॉइंटमेंट तर नाहीये; पण..”


“सॉरी मॅम, सर डज नॉट मीट एनीवन विदाउट अपॉइंटमेंट.”


“तुम्हाला कळत कसं नाहीये, मला त्यांना भेटणं फार गरजेचं आहे.”


“सॉरी मॅम, प्लीज ट्राय टू अंडरस्टॅंड मी..”


“ए इंग्रजाची औलाद, तुला एवढं मराठीतं सांगतेय ते कळत नाहीये का?”


“मॅम, यू कॅन्ट टॉक विथ मी लाईक धीस.”


“फक्त बोलतेच आहे, आता बऱ्या बोलाने आत जाऊ दिले नाहीस तर काय करेन ना माझा नेम नाहिये. मनस्वी इंगा दाखवत म्हणाली.”

होवू शकेल का मनस्वी आणि आदित्यची भेट? वाचा पुढील भागात.
:
क्रमश:
©®Dr.Vrunda F.(वसुंधरा..)
*साहित्यचोरी गुन्हा आहे.*
_________

🎭 Series Post

View all